অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

मोटार वाहन कायद्यातील तरतुदी

मोटार वाहन कायद्यातील तरतुदी

राष्ट्रीय स्तरावर 26 वे राष्ट्रीय रस्ता सुरक्षा जनजागरण अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या निमित्ताने वाहन चालकांनी मोटार वाहन कायद्यातील काही महत्वाजनच्या कलमांची माहिती करून घेणे आवश्यक आहे.

  • मोटार वाहन धोकादायक होईल अशा स्थितीत उभे करणे (कलम 122)
  • मोटार वाहन चालकाने सार्वजनिक ठिकाणी आपले वाहन उभे करताना इतर वाहन चालकांना धोका, अडथळा किंवा त्रास होणार नाही यांची खबरदारी घ्यावी.
  • पायफळी/FOOTREST वरून प्रवास (कलम 123) :- मोटार वाहन चालकाने आपले वाहनाचे पायफळी/Footrest वरुन कोणासही प्रवास करु देऊ नये. वाहनाचे बाहेर लटकून अथवा वर बसून कोणत्याही इसमास प्रवास करू देऊ नये.
  • चालकास अडथळा (कलम 125) :- चालकाने वाहन चालविताना अडथळा निर्माण होईल अशाप्रकारे कोणत्याही इसमास बसवू नये अथवा वस्तू ठेवू नये.
  • मोटार वाहन थांबविले असता (कलम 126) :- चालकाने वाहन उभे करुन जाताना वाहनाचे इंजिन बंद करावे. वाहन गियरमध्ये ठेवून, हातरोधक लावून ते पूर्ण लॉक करावे. चावी स्वत:जवळ घेऊन जावी. टायरला मागे उटी लावावी. जेणेकरुन वाहन आपोआप चालू होणार नाही.
  • दुचाकी वाहनांच्या मागील बाजूस बसणे (कलम 128):- दुचाकी वाहन चालकाने आपले वाहनाचे मागील सीटवर एकापेक्षा अधिक व्यक्ती नेऊ नयेत.
  • वाहनाची कागदपत्रे सादर करणे (कलम 130):- वाहनाचे नोंदणी प्रमाणपत्र, कर प्रमाणपत्र, विमा, प्रदूषण नियंत्रण दाखला व आपले ड्रायव्हिंग लायसन्स नेहमी जवळ बाळगा आणि गणवेशातील पोलीस किंवा आर.टी.ओ. अधिकाऱ्याने मागितल्यावर त्वरीत सादर करा. व्यावसायिक वाहन असल्यास वरील कागदपत्रांशिवाय परवाना व योग्यता प्रमाणपत्रदेखील जवळ बाळगणे आवश्यक आहे.
  • अपघात घडल्यास चालकाची कर्तव्ये (कलम 134):-अपघातास कारणीभूत झालेल्या वाहनचालकाने जखमींना ताबडतोब वैद्यकीय उपचारासाठी दवाखान्यात घेऊन जाणे बंधनकारक आहे व तसेच जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये त्वरीत खबर देणे आवश्यक आहे.
  • ड्रायव्हिंग लायसन्स नसताना वाहन चालविणे (कलम 180):- कायदेशीर गुन्हा असून त्यास 3 महिने कैद, 500 रुपये दंड किंवा दोन्हीही शिक्षा होऊ शकतात.
  • ज्या व्यक्तीकडे ड्रायव्हिंग लायसन्स नाही अशा व्यक्तीस वाहन चालविण्यास दिल्यास (कलम 181) :- वाहन मालकास 3 महिने कैद, 1 हजार रुपये दंड किंवा दोन्हीही शिक्षा होऊ शकतात.
  • दारू पिऊन किंवा अमली पदार्थाच्या नशेत वाहन चालविल्यास (कलम 185):- पहिल्या अपराधाबद्दल 6 महिने कैद किंवा दंड 2 हजार रुपये किंवा दोन्हीही शिक्षा होऊ शकतात. तसेच ड्रायव्हिंग लायसन्स निलंबित किंवा रद्द होते.
  • कलम 185 :- मोटार वाहन कायदा, 1988 च्या कलम 185 अन्वये रक्तातील मद्याकांची पातळी ( बल्ड अल्कोहोल कॉन्सेंट्रेशन ABC) ही 100 मिलीलिटर रक्तात 30 मिलीग्रॅमपेक्षा जास्त असल्यास कायद्याने गुन्हा आहे. अशा प्रकारच्या पहिल्या गुन्ह्यासाठी रुपये 2 हजार दंड किंवा सहा महिने कैद अथवा दोन्ही अशी शिक्षा होऊ शकते. तसेच कलम 20 (2) अन्वये सदर चालकाचे लायन्सेस सहा महिने निलंबित होऊ शकते. तसेच पुन्हा त्याच व्यक्तीने सदर गुन्हा केल्यास 22 (2) कलमान्वये लायसेन्स कायमचे रद्द होते.
  • वाहने अटकावून ठेवण्याचा अधिकार (कलम 207):- ड्रायव्हिंग लायसन्स, परवाना, रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट नसताना चालविण्यात येणारी वाहने अटकावून ठेवण्याचा अधिकार आर.टी.ओ. तसेच पोलीस अधिकाऱ्यांना आहेत.
  • अवैध प्रवासी वाहतूक (कलम 66/ 192 अ) :- विना परवाना चोरटी प्रवासी वाहतूक केल्यास अथवा आसन क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक केल्यास कलम 66/192-अ अन्वये न्यायालयीन कारवाई होऊन रुपये 5 हजार पर्यंत दंड होऊ शकतो. तसेच वाहनाचे रजिस्ट्रेशन 120 दिवसांपर्यंत निलंबित केले जाऊ शकते. अशा प्रवासी वाहतुकीस विम्याचे संरक्षण नसते.
  • केंद्रीय मोटार वाहन नियम 138(3) :-सिटबेल्ट न वापरता वाहन चालविणे.
  • महाराष्ट्र मोटार वाहन नियम 250 (अ) :-वाहन चालवित असताना मोबाईल फोनचा वापर करु नये .
  • नो फॉल्ट लायबिलिटी, (मोटार वाहन कायदा कलम 140) :- मोटार वाहन अपघात एखाद्या व्यक्तीला मृत्यु अथवा कायमचे अपंगत्व आल्यास सदर वाहन चालकाची मोटार वाहन चालकाची काहीही चूक नसली तरी कायमचे अपंगत्व आलेल्या व्यक्तीस किंवा मृत व्यक्तीच्या वारसदारास सदर वाहनाच्या मालकाला अथवा त्या वाहनाच्या विमा कंपनीस मृत्युसाठी किमान 50 हजार रुपये व अपंगत्वासाठी किमान 25 हजार रुपये नुकसान भरपाई देणे मोटार वाहन कायदा 1988 च्या कलम 140 अन्वये बंधनकारक आहे. या व्यक्तीरिक्त कलम 163 अ अन्वये अपघातग्रस्त व्यक्तीचे वय आणि वार्षिक उत्पन्न यावर आधारित सुप्रीम कोर्टाने निर्धारित केलेल्या तक्त्याच्या आधारे नुकसान भरपाई मिळण्यासाठी दावा दाखल करता येतो.
  • अज्ञात वाहनाने ठोकर दिल्याने मृत्यु अथवा कायमचे अपंगत्व आल्यास :-मोटार वाहन कायदा 1988 च्या कलम 163 (1) अन्वये केंद्र सरकारने अध्यादेशाद्वारे ‘सोलॅशियम स्कीम’ (अनुकंपा योजना) तयार केली आहे. त्याद्वारे ज्या तालुक्यात अपघात झाला असेल त्या तालुक्याच्या तहसीलदारांकडे सहा महिन्याच्या आत विहित नमुन्यात अर्ज केल्यास सरकारतर्फे मृत व्यक्तींच्या वारसदारास 25 हजार रुपये व गंभीर इजा होणाऱ्या व्यक्तीस 12 हजार 500 रुपये नुकसान भरपाई मिळते.
  • अनावश्यक हॉर्नचा वापर :-चालकाने गरज नसताना व आवश्यकतेपेक्षा अधिक हॉर्नचा वापर करता कामा नये. हॉर्न सतत दाबून धरणे गुन्हा आहे. विविध आवाजाची धुन असणारे (जनावरांचे आवाज, मुलाच्या रडण्याचे आवाज, रिव्हर्ज हॉर्न) हॉर्न वाजविण्यास बंदी आहे. सायलेल्स झोनमध्ये (हॉस्पीटल, न्यायालये इत्यादी) हॉर्न वाजविणे गुन्हा आहे.


-जिल्हा माहिती कार्यालय, 
नाशिक

माहिती स्रोत: महान्यूज, मंगळवार, १३ जानेवारी, २०१५.

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate