रिस्ले, हॅलन, आइकस्टेट, गुहा, हटन इ. मानववंशशास्त्रज्ञांनी भिन्न भिन्न कसोट्या लावून भारतीय जनतेचे आणि आदिवासींचे पृथक्करण केले आहे. त्यानुसार सर्वसामान्यपणे भारतीय आदिवासींचे प्रोटोऑस्ट्रेलॉइड, मंगोलॉइड आणि नेग्रिटो असे तीन वांशिक विभाग मानले जातात. प्रोटोऑस्ट्रेलॉइड वंशात मोडणारे आदिवासी मध्य भारतात व मंगोलॉइड वंशाचे आदिवासी उत्तर व ईशान्य विभागात दिसून येतात. त्याचप्रमाणे दक्षिणेस व अंदमान निग्रिटो वंशाचे आदिवासी आढळून येतात. भारतातील हे मूलनिवासी होत, असे काही मानववंशशास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.
तिबेटी-चिनी, ऑस्ट्रिक भाषाकुळातील मुंडा आणि द्राविडी ह्या तीन प्रमुख भाषागटातील बोलीभाषा भारतीय आदिवासींममध्ये आहेत. उत्तर आणि ईशान्य भागातील जमाती या तिबेटी-चिनी गटात अंतर्भूत होणाऱ्या बोलीभाषा बोलतात. त्यांतही इतक्या उपशाखा आहेत, की सोळा प्रकारच्या बोलीभाषा बोलणाऱ्या नागांपैकी अंगामी, सेओ आणि आओ यांना एकमेकांच्या भाषा समजत नाहीत. मध्य विभागातील जमातींपैकी संथाळ, खासी, मुंडा, हो इत्यादींमध्ये मुंडा भाषागटातील स्वतंत्र बोलीभाषा प्रचलित आहेत. या भाषेतही असेच भेद आहेत. मध्य विभागातील कंध, कुरूख, ओराओं आणि दक्षिणेकडील तोडा, कोटा, कादर इ. जमाती द्राविडी भाषिक आहेत. मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्र या तीन राज्यांतील गोंड जमातींची बोली द्राविडी भाषांपैकीच आहे. वायव्येत बलुचिस्तानमधील ब्राहूई आणि ईशान्येत राजमहाल पर्वतराजीमध्ये आढळून येणारी माल्टो ह्या आदिवासी बोली द्राविडी भाषागटातच मोडतात. अंदमानमधील ओंगींची भाषा या तीनही भाषांहून वेगळी समजली जाते. निकोबार बेटावरील आदिवासी हे मुंडा भाषागटातच मोडणारी निकोबारी बोलतात. आदिवासी भाषांना परंपरागत लिपी नाही. परंतु ख्रिस्ती मिशनऱ्यांनी नागा लोकांच्या भाषांना रोमन लिपीत आणण्याचा प्रयत्न अलीकडे केला आहे. तसेच संथाळ जमातीच्या संथाळी बोलीभाषेला कलकत्ता विद्यापीठाने अलीकडे मान्यता दिली आहे. जेथे विकासित अशा इंडो-आर्यन अगर द्राविडी भाषांचा संबंध आला, तेथे आदिवासींनी हिंदी, बंगाली, तामिळ इ. भाषाही थोड्याप्रमाणात उचलल्या आहेत. तथापि पुष्कळशा आदिवासींना स्वतःच्या बोलीभाषा सोडून इतर कोणतीही विकसित भाषा येत नाही.
आदिवासींना इतरांहून भिन्न मानावयाचे कारण ते केवळ सुसंस्कृत समाजाहून मागासलेले आहेत म्हणूनच नव्हे, तर देश-काल-परिस्थितिपरत्वे त्यांची संस्कृती, आचार, विचार आणि समाज रचना ह्या अतीव भिन्न आहेत किंवा सुसंस्कृत समाजाच्या विरूद्ध टोकाच्या आहेत, हे होय.
भौगोलिक पर्यावरण, त्याचा उपयोग करून घेण्याकरिता अगर त्यापासून उद्भवणाऱ्या अडथळ्यांना तोंड देण्याकरिता आवश्यक आणि उपलब्ध असलेले ज्ञान, मानवी सामर्थ्याला आणि हिकमतीला जोड म्हणून असलेली हत्यारे, अवजारे वा इतर साधने या तिन्हींमधून आदिवासी समाजात निर्माण होणारी अर्थव्यवस्था आणि राजव्यवस्था भिन्न असते. शिवाय वरील सर्व गोष्टीना अनुरूप असलेली आणि कालांतराने समाजाच्या अनुभवांतून निश्चित झालेली मूल्ये यांच्या बाबतींतही आदिवासी समाज इतरांपासून भिन्न आहे. आदिवासी हे आपला समाज इतरांपासून वेगळा आहे असे समजतात, हेही महत्त्वाचे आहे जमातीची व्याप्ती विवक्षित प्रदेशापुरतीच मर्यादित असून जमातीतल्या सर्वांनाच तो प्रदेश आपली जन्मभूमी आहे असे वाटणे, विवाहसंबंध जमातीपुरते मर्यादित असणे, उपजीविकेचे मुख्य साधन अविकासित शेतीवर अगर जंगलात भटकून शिकार करून अगर अन्य रीतीने अन्नसंचय करण्यावर अवलंबून असणे, अर्थव्यवस्थेत असणारा विशिष्टीकरणाचा अभाव, एकाच जमातीपंचायतीचे प्रभुत्व, एकनायकत्व, जमातीच्या उत्पत्तीविषयी अगर पूर्वजांविषयी असलेली एकवाक्यता, जमातीची अस्मिता जागृत ठेवणाऱ्या दंतकथा, पोवाडे इ. लोकसाहित्य, बाह्यसंपर्काविषयीची उपेक्षा किंवा विरोध, मानववंशदृष्ट्या जमातीच्या सर्व लोकांमध्ये दिसून येणारा सारखेपणा आणि एकाच संस्कृतीचा अंमल ही आदिवासी समाजाची प्रमुख लक्षणे होत. अशा रीतीने विचारमूल्ये, आचार, समूह आणि संस्था ही समाजरचनेची अंगे आदिवासी समाजात इतर समाजांहून भिन्न दिसून येतात; म्हणून आदिवासी समाज हा वेगळा समजला जातो.
काही आदिवासी आणि त्यांच्या प्रदेशाच्या आसपास राहणारे बिगर आदिवासी यांच्यात आचारविचारांच्या बाबतीत अंशतः दिसून येणारा सारखेपणा (उदा., हिंदू देव-देवता, सण, उत्सव, उपास-तापास, पावित्र्य व विटाळाची कल्पना, बाह्मण पुरोहित इत्यादींचा आदिवासींनी केलेला स्वीकार) त्यांच्यातील सामाजिक-आर्थिक संबंधामुळे आलेला आहे. परिस्थिती लादल्यामुळेही स्त्रीस्वातंत्र्यासारखी काही प्रगत समाजाची वैशिष्ट्ये त्यांच्यात दिसून येतात; म्हणून आदिवासी हे प्रगत किंवा बिगर आदिवासी समाजाचे संपूर्णतया घटक बनले होते किंवा सध्या आहेत, असे म्हणता येणारी नाही; त्याचप्रमाणे ते संपूर्णतया वेगळेच आहेत, असेही म्हणता येणारी नाही.
कारण देवाबद्दलची त्यांची कल्पना, जीवनास आवश्यक असलेल्या प्रत्येक चराचर वस्तूंना दैवत कल्पिणे, त्या दैवताला संतुष्ट करण्याकरिता बळी देणे, भुताखेतांवर आणि जादूटोण्यावर विश्वास ठेवणे इ. गोष्टी आदिवासींप्रमाणेच भारतातील नागरी आणि ग्रामीण समाजांतही कमीअधिक प्रमाणात दिसून येतात. फरक एवढाच की आदिवासींचे संपूर्णतया अशा अंधश्रद्धेवर अवलंबून असते; इतर समाजाचे तसे नसते.
प्रत्येक सचेतन-अचेतन वस्तूमध्ये आत्म्याची शक्ती आणि जादूमय चैतन्य आहे, हा आदिवासी-धर्मविचारांचा गाभा मानल्यास हिंदू धर्मतत्त्वज्ञानाचा पाया आणि आदिवासी धार्मिक कल्पना यांत बरेच साम्य दिसून येते, असे १९३१ सालातील भारतीय जनगणनेचे कमिशनर असलेले जे. एच्. हटन यांचे मत आहे. याच कारणामुळे आदिवासी धार्मिक आचारविचार यांना हिंदू धर्मापासून वेगळे काढून दाखविणे कठिण असल्याचे १८९१ पासूनच्या सर्वच जनगणनांच्या अधिकाऱ्यांनी मान्य केले आहे. हिंदूंच्या चार वेदांपैकी अथर्ववेद हा आर्य आणि आदिवासी यांच्या संपर्कातून उद्भवलेला आहे, असेही म्हटले जाते.
आदिवासी समाजात सर्वांत व्यापक आणि प्रधान गट म्हणजे कुळी किंवा टोळी होय आणि सर्वांत लहान गट म्हणजे कुटुंब. कुटुंबाहून मोठा गट म्हणजे विस्तारित कुटुंब आणि त्याहून मोठा गट म्हणजे कुळीच्या खालोखालचा सकुलक जनांचा गट अगर सकुलक-गट. कोणत्याही जमातीतील हे सर्व लहानमोठे गट रक्तसंबंधाच्या खऱ्या अगर काल्पनिक अस्तित्वावर आधारित असतात. रक्तसंबंधीयांमधील विवाहसंबंध हे सर्व आदिवासी जमातीमध्ये निषिद्ध मानले जातात. कुळीचे अस्तित्व आणि तिचा वेगळेपणा ह्या गोष्टी कुळीमध्ये रूढ असलेल्या कुळीच्या आद्य वंशजाच्या कल्पनेवर आधारित असतात. कोणत्या तरी प्राण्याला अगर झाडाला आद्य वंशज मानण्याची प्रथा प्रदेश आणि इतरत्र पसरलेल्या खाडिया, ओराओं आणि गोंड या जमातींत रूढ आहे. मृत सभासदांचे पंथ, त्यासंबंधीच्या लाकडी प्रतिमा अगर दगडी स्मारके इत्यादींतही आदिवासी वैशिष्ट्ये आहेत. परंपरेने निश्चित झालेल्या आणि कुटुंबांत नित्य-नैमित्तिक पूजेत असलेल्या देवतांची संख्या आणि त्यांवरून बहिर्वैवाहिक गट बनणे इ. गोंड व इतर जमातींत दिसून येतात.
स्थलपरत्वे आणि वयपरत्वेही आदिवासी जमातींमध्ये गट पडलेले आढळून येतात. मूलतः एकाच जमातीचे परंतु कालांतराने वेगवेगळ्या प्रदेशांत स्थायिक झालेले आदिवासी हे एकमेकांना परके समजतात.
संदर्भ : 1. Ghurye, G. S. The scheduled Tribes, Bombay, 1959.
2. Government of India, Adivasis, Delhi, 1960.
3. Government of India, Report of Commissioner for Scheduled Castes and Scheduled Tribes, for the Year 1964-65, Delhi, 1967.
4. Government of India,Report of Scheduled Areas and Scheduled Tribes Commission 1960-1961, Vols. I, II, Delhi, 1961.
5. Government of India, Social Welfare in India, Delhi, 1960.
6. Government of India, Welfare of the Backward Classes, Delhi, 1963.
7. Mujumdar, D. N.Races and Cultures of India, Bombay, 1961
8. Mujumdar, D. N.; Madan, T. N. An Introduction to Social Anthropology, Bombay, 1956.
9. Thakkar, A. V. The Problem of Aborigines in India, Poona, 1941.
लेखक: शरच्चंद्र गोखले ; मा. गु. कुलकर्णी
माहिती स्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 7/31/2023
सोयाबीनच्या ताण सहनशीलतेसाठी कारणीभूत दोन विकरांची...
शासनाने अनुसूचित जाती व नवबौध्द घटकाचे सबलीकरण व स...
अनुसूचित जाती व जमाती विषयक माहिती.
अनुसूचित जाती व जमाती विषयक माहिती.