गाव - नगर
गट - मालपुरा
जिल्हा - टोंग
काही वर्षांपूर्वी चार शाळकरी मित्र एकत्र आले. गावातली नेहमीचीच पाणीटंचाई, दुष्काळ या गोष्टी ते पाहत होते. गावाची ही समस्या सोडवण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे, अशी पक्की जिद्द होती. त्यांनी "बांध‘ बांधण्याचा निर्धार केला. जागा निश्चित झाली आणि शाळेव्यतिरिक्तच्या वेळेत काम सुरू झाले .
येणारे-जाणारे विचारायचे ः
""काय करताय?‘
""बांध बना रहे है !‘‘
विचारणाऱ्याच्या चेहऱ्यावर अनेक प्रश्न असायचे.
"बांध बांधणं ही सोपी गोष्ट नाही. तुम्ही एवढेसे...कसा काय पूर्ण होणार तुमचा बांध? तुमची शक्ती ती कितीकशी...?‘ असे एक ना अनेक प्रश्न; पण निर्धार पक्का होता. कुणी काहीही म्हणो, आपलं काम नेटानं करायचं. चिकाटी सोडायची नाही. कधीतरी कुणीतरी येऊन सहभागी व्हायचं. मदत करायचं. पावसाळा येईपर्यंत बऱ्यापैकी बांध उभा राहिला. पाऊस पडला आणि भरलेला बांध पाहून, पाणी पाहून लोकांची मनं बदलली आणि एक मोठं काम उभं राहिलं. एक बांध बनल्यावर पुढच्या वेळी गावातल्या लोकांचा सहभाग वाढला. एकामागून एक अनेक कामं होऊ लागली.
छोटे बांध, तळी, समतल चर, आधीच्या असलेल्या वृक्षांची मुळं मजबूत करणं, स्थानिक प्रजातीच्या बियांचं संकलन करून नवीन वृक्षलागवड इत्यादी करून बघता बघता गावाचं चित्र पालटलं. "चिडियाघर‘च्या टेकडीवर चढून पाहिलं, की लक्षात येतं 100 बिघा जमिनीचं पालटलेलं चित्र. पावसाचा पडणारा प्रत्येक थेंब अडवून, जमिनीत जिरवून गावाचा पाण्याचा प्रश्न सोडवण्यात आला आहे. जनावरांना चारा, पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध झालं. दूधसंकलन केंद्रांची संख्या वाढली. गावातल्या लोकांचं स्थलांतर थांबलं. गावात समृद्धी आली. गावात प्रवेश करताच उजव्या बाजूला ‘चिडियाघर‘ आहे.
ही जागा खास पक्ष्यांसाठी, वन्य प्राण्यांसाठी राखून ठेवलेली आहे. इथं वन्य जीवांसाठी पाण्याच्या टाक्या बांधलेल्या आहेत. झाडा-झाडांवर पाण्यानं भरलेली भांडी अडकवलेली आहेत. टेकडीवरच्या मंदिराजवळ रोज "चुगाहा‘ पसरला जातो. "चुगाहा‘ म्हणजे पक्ष्यांसाठी पसरलेलं धान्य. गावातच राहणारे बैरूम खोकर यांनी धान्य, पाणी ठेवण्याची जबाबदारी स्वीकारली आहे. अतिशय आनंदानं ते हे काम करतात. माणसांबरोबरच निसर्गातल्या प्रत्येक सजीवाचा जगण्याचा प्रश्न इथं सोडवण्यात आलेला आहे. आपण पिकवत असलेल्या पिकावर फक्त आपलाच हक्क नाही; तर इतर पशू-पक्ष्यांचाही आहे, ही जाणीव इथं रुजली आहे. त्यामुळं नीलगाय, मोर, हरणं गावाच्या आजूबाजूला फिरताना सहज दिसतात. त्यांना हुसकावलं जात नाही की मारलंही जात नाही. त्यांना त्यांचा वाटा दिला जातो !
माहिती लेखक - नीलिमा जोरवर
अंतिम सुधारित : 7/24/2020
औद्योगिक वातावरणविज्ञान हि वातावरण विज्ञानाची एक श...
बेभरवशाचा नि बेमोसमी पाऊस... पर्यावरणाचा बिघडत चाल...
हवामानामध्ये आपल्याला आवश्यक तसे बदल घडविणे शक्य ...
पृथ्वीवरील सार्या सजीव सृष्टीचा आधार हे येथील पर्...