मेनासू : (स्लॅ. अँटिडेस्मा मेनासू; कुल-यूफोर्बिएसी). या लहान वृक्षाचा प्रसार पश्चिम भारतातील (कोकण, उत्तर कारवार इ) घनदाट जंगलात व इतरत्र नद्या नाल्यांच्या काठाने झालेला आढळतो. त्यांच्या अँटिडेस्मा ह्या प्रजातीच्या एकूण १५० जाती असून पैकी सुमारे २५ भारतात आढळतात. आमटी याच प्रजातीतील असून तिची व मेनासूची काही लक्षणे सारखी आहेत. मेनासूच्या फांद्या, देठ, उपपर्णे व फुलोरे यांच्यावर मखमली लव असते. पाने दीर्घवृत्ताकृती-आयत, लांबट टोकाची व गुळगुळीत असतात. एकलिंगी फुले एकेकटी किंवा फुलोऱ्यावर परिमंजरीत; पुष्पबंध, पानांच्या बगलेत किंवा खोडाच्या टोकावर फेब्रुवारी-मेमध्ये येतात. पुं-पुष्पाचे संवर्त पेलल्यासारखे व चतुःखंडी; केसरदले ३–४; स्त्री पुष्पाचे संवर्त तसेच पण खंड लघुकोनी फुल. फळे लहान (०·६ सेमी.), अंडाकृती, कोनीय व खाद्य असून ती सप्टेंबर–ऑक्टोबरात पिकतात. बिया फार बारीक असतात.
जोंध्रा (ॲ. घीसेंबिला) ही या प्रजातीतील दुसरी जाती म्हणजे सु. १२ मी. उंचीचा वृक्ष असून तो हिमालयात सिमला ते भुतान, उत्तर कारवार, कोकण व श्रीलंका या प्रदेशांत आढळतो. याची फळे गर्द जं भळी, आंबू स व खाद्य असून मेनासूच्या सालीपासून निघणारे धागे दो ऱ्या बनविण्यासाठी वापरतात. साल स्तंभक (आकुंचन करणारी) व पौष्टिक असते. लाकूड तांबडे, कठीण व गुळगुळीत असून ते कपाटासाठी वापरतात.
लेखक - ज. वि. जमदाडे
स्त्रोत - मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 7/17/2020