मोरी : या माशाचे शास्त्रीय नाव स्कोलिओडॉन पॅलासोरा असे असून इंग्रजीत याला ‘डॉगफिश’ असे म्हणतात. भारत, पाकिस्तान, श्रीलंका, द. आफ्रिका, अरबस्तान, मलाया, जावा, चीन, जपान या प्रदेशांच्या किनाऱ्यांवर आढळतो. हा सागरी मासा असून याचे शरीर उपास्थींचे (कूर्चांचे) बनलेले आहे. याची लांबी ०·६ ते १·५ मी. इतकी असते. याचा आकार लांबट व सडपातळ असतो. पाठीचा रंग गडद करडा तर पोट पांढरट असते.
मुस्कट लांब व टोकदार असून त्याची लांबी डोळा व कल्ले यांच्या मधील अंतराएवढी असते. मुखाजवळ नासाद्वार असते. दात बोथट व तिरके असून ते दोन्ही जबड्यांवर असतात.डोळ्यावर तिसरी पापणी असते. कल्ल्यांच्या पाच जोड्या असतात. पाठीवर दोन कंटकरहित पर असतात व यांपैकी पहिल्या पराच्या मागे कमरेवरील पर असतो. वक्षीय (छातीवरील) पर बरेच लहान असून ते शेवटच्या दोन कल्ल्यांपासून सुरू होतात. पुच्छपर (शेपटीवरील पर) बराच लांब असून त्याच्या उगमाजवळ खाच असते. याच्या विणीसंबंधी विशेष माहिती उपलब्ध नाही.
मोरी मासा फार खादाड आहे. याची दृष्टी विशेष तीक्ष्ण नाही. यामुळे वासावरून हा खाद्य ओळखत असावा. याची मच्छीमारी मोठ्या प्रमाणावर होते. याचे मांस रुचकर असून त्यात २० ते २५% प्रथिने असतात. याच्या यकृतापासून तेल काढतात. या तेलात अ जीवनसत्त्व मोठ्या प्रमाणात व त्या खालोखाल ड जीवनसत्त्व आढळते. परातील जिलेटीनचा साबण निर्मितीत उपयोग केला जातो. याचे कातडे पिशव्या, पर्सेस वगैरे बनविण्यासाठी वापरले जाते. प्रयोगशाळेत विच्छेदनासाठी हे मासे मोठ्या प्रमाणात वापरले जातात.
लेखक - प्रतिमा. न. चंदाराणा
स्त्रोत - मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 10/7/2020