অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

मरळ

मरळ

मरळ (चॅना मरूलियस)

मरळ

चॅनिडी या मत्स्यकुलात मोडणारे हे मासे भारतातील सर्व नद्यांमध्ये व जलशयांत आढळतात. महाराष्ट्रात मरळींच्या मुख्यत्वे चार जाती आहेत. त्यांना अनुक्रमे चॅना मरूलियस (मरळ किंवा फुलमरळ), चॅ स्ट्राएटस (पट्टमरळ किंवा धडक्या), चॅ पंक्टॅटस (बोटरी मरळ) व चॅ. गाचुआ (डाकू, डोक किंवा डोकर्‍या) असे म्हणतात. मरळींचे डोके सापाच्या डोक्यासारखे चपटे असल्यामुळे यांना इंग्रजीत ऑफिओसेफॅलस वा स्नेकहेडेड फिश असे म्हणतात.या कुलास पुर्वी ऑफिओसेफॅलिडी हे नाव दिले होते; परंतु आता चॅनिडी हे नाव प्रचारात आहे.

फुलमरळ हा या वंशातील सर्वात मोठा होणारा म्हणजे २ मी. लांबीपर्यंत वाढणारा आहे. त्यानंतर पट्टमरळ हा ५५ सेंमी. तर धडक्या ३० सेंमी. लांबीपर्यंत वाढतो. डाकू हा सर्वात लहान म्हणजे जास्तीत जास्त २० सेंमी. लांब होणारा मासा आहे. धडक्या पश्चिम महाराष्ट्रात क्वचितच मिळतो; मात्र विदर्भ व उत्तर भारतात तो सर्वत्र आढळतो.

मरळ मासे प्राणिभक्षी असून ते विशेषेकरून लहान माशांवरच आपली उपजिवीका करतात. कधीकधी ते बेडूक, चिंबोरी व इतर जलचर प्राणीही खातात. त्यामुळे जेथे निरनिराळ्या माशांचे संवर्धन एकत्रितपणे केले जाते अशा तळ्यात त्यांना ठेवता येत नाही. ते हवेतील ऑक्सिजनचाही थोडाफार उपयोग करू शकत असल्यामुळे ते ओल्या जमिनीवरूनही सरपटत जाऊ शकतात व ते अती घाणेरड्या पाण्यातही राहू शकतात. अलीकडे भारतातील काही ठिकाणी विशेषत: कर्नाटकात बंगलोर येथे फक्त मरळीचेच लहान तळ्यांमध्ये संवर्धन करून त्यांचे उत्पन्न घेता येऊ लागले आहे. त्याकरिता ते बोटुक्याच्या (फिंगरलिंग) स्थितीत असताना कमी प्रतीची, स्वस्त अशी सुकी मासळी पाण्यात भिजवून ती त्यांना खाण्यास शिकविले जाते. नंतर ते अशी भिजविलेली मासळी आवडीने खाऊ लागतात व मोठे होऊ लागतात. त्यात सुक्या मासळीचे मरळीच्या वाढीशीप्रमाण १. ६: १ असल्याचे दिसून आले आहे व दर हेक्टरी २,००० किग्रॅ. इतके मरळीचे उत्पादन होते, असेही दिसून आले. महाराष्ट्रातही १९३८ साली मरळीची पैदास करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, परंतु त्या वेळी कृत्रिम खाद्य उपलब्ध न झाल्यामुळे तो प्रयत्न सोडून देण्यात आला.

मरळींची वीण लहान तलावांत किंवा नद्यांच्या डोहांत होते. पाणवनस्पतींची पाने, गवत, तरंगणारी पाने इत्यादींचे तुकडे एका ठिकाणी गोळा करून त्यांचे घरटे करून त्यात माद्या अंडी घालतात. ती फलित झाल्यावर नर व मादी आपल्या पक्षांच्या (परांच्या ) साहाय्याने त्यांच्यावर पाण्याचा प्रवाह चालू ठेवतात. त्यामुळे वाढणार्‍या अंड्यांना पाण्यातील ऑक्सीजनाचा सतत पुरवठा होत रहातो. तसेच नरमादी अंड्यांचे रक्षणही करतात. अंड्यांतून पिले बाहेर आल्यावरही नरमादी त्यांचे रक्षण करतात. पिले पाण्याच्या पृष्ठभागाजवळ मोठमोठ्या थव्यथव्यांनी फिरतात व त्याच्या खाली पोहत राहूनकोठे जावे, काय खावे यांबाबत नरमादी त्यांना मार्गदर्शन करतात. पिले ७-८ सेंमी. एवढी मोठी झाली की, मग मात्र नरमादी त्यांना हुसकून लावून स्वतंत्रपणे जीवन जगावयास लावतात. इतकेच नव्हे , तर कधीकधी स्वत:च त्यांच्यावर हल्ला करतात.

खाण्याच्या द्दष्टीने मरळ हा उत्तम मासा गणला जातो. फक्त बंगालमध्येच त्याला थोडासा गौण मानतात. इतरत्र सर्व ठिकाणी त्याला उत्तम किंमत येते, त्याचे उत्पन्न मात्र मोठ्या प्रमाणावर नसते. पाण्याच्या पृष्ठभागावर असलेल्या पिलांचा अजाणतेपणा मच्छीमारांकडून मोठ्या प्रमाणावर नाश होतो. यामुळे बरेच मासे वाढीस लागण्यापूर्वीच मरतात. पिलांचे संरक्षण करणयास मच्छीमारांना सांगितले जाते. काही मासे जाळ्याच्या खालच्या बाजूने निसटतात. पुष्कळदा मासे गळाणे पकडणे जास्त फायदेशिर असते. त्यांची बंदुकीनेही शिकार करतात. ऑक्सीजनासाठी त्यांना पाण्याच्या पृष्ठभागावर यावे लागते व तेव्हा त्यांना बंदुकीने मारणे शक्य होते.

 

कुलकर्णी, चं. वि.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate