बिटर्लिंग हे सहजीवनाचे एक असामान्य उदाहरण आहे. प्रजोत्पादनाच्या काळात मादीची जननपिंडिका (जनन ग्रंथीचा मऊ पेशीसमूहाचा निमुळता लहान उंचवटा) वाढून एखाद्या नळीसारखी लांब होते आणि तिचा अंडनिक्षेपक (जनन रंध्राच्या कडा लांब होऊन तयार झालेली लवचिक नळी) म्हणून उपयोग होतो. गोड्या पाण्यात आढळणाऱ्या युनिओ आणि ॲनोडोंटा वंशांच्या कालवांच्या अर्धवट उघड्या शिंपांच्या मधून ही नळी आत घालून मादी आपली अंडी कालवाच्या क्लोमांच्या (कल्ल्यांच्या) मध्ये घालते. नंतर नर आपले रेत कालवावर सोडतो. श्वसनाकरिता शिंपांच्या आत शिरणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाबरोबर रेत आत जाऊन त्यातील शुक्राणूंच्या (पुं-जनन पेशींच्या) योगाने अंड्यांचे निषेचन (फलन) होते. निषेचित अंड्यांचा विकास कालवाच्या शरीरात होऊन सु. एक महिन्याने पिल्ले कालवाच्या शरीरातून बाहेर पडतात. पिल्ले बाहेर पडून पोहत दुसरीकडे जाण्याच्या सुमारास कालव आपले डिंभ (भ्रूणानंतरच्या स्वतंत्रपणे अन्न मिळवून जगणाऱ्या व प्रौढाशी साम्य नसणाऱ्या सामान्यतः क्रियाशील पूर्व अवस्थेतील जीव) या पिल्लांच्या अंगावर फेकतो व ते त्यांच्या अंगाला चिकटतात. त्यांचे पुटीभवन (आच्छादले जाण्याची क्रिया) होऊन माशांच्या त्वचेत ते काही काळ या अवस्थेत राहतात. नंतर त्यांची वाढ होऊन ते माशांच्या कातडीतून बाहेर पडतात. या विलक्षण योजनेमुळे बिटर्लिंग आणि कालव या दोघांचाही फायदा होतो. [⟶ सहजीवन].
कर्वे, ज. नी.
स्त्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 7/26/2020