याचा आकार साधारण आयताकृती असून दोन्ही बाजू थोड्याशा बहिर्गोल असतात. डोळे मोठे असून ते डोक्याच्या मध्यभागी असतात. पृष्ठपक्ष (पाठीवरील पर म्हणजे हालचालीसाठी किंवा तोल सांभाळण्यास उपयोगी पडणारी त्वचेची स्नायुमय घडी) जवळजवळ मुस्कटाच्या मागील टोकापासून सुरू होतो. त्याचा वरचा भाग अंतर्गोल असतो. अंसपक्ष (छातीवरील पर) जवळजवळ अधरपक्षापर्यंत (खालच्या परापर्यंत) पोचलेला असतो व त्याचा अर्धा भाग पृष्ठपक्षांनी झाकला गेलेला असतो. पुच्छपक्ष (शेपटीचा पर) खालपर्यंत विभागलेला असतो. रंग रूपेरी असून त्यावर सोनेरी व जांभळट झाक असते. शरीराची वरची बाजू हिरवट असते. पिलाच्या पाठीचा रंग काशासारखा (ब्राँझसारखा) असून पाठीवर वरच्या कडेने गडद रंगाचे ठिपके असतात व पुच्छपक्षाची कडा गडद रंगाची असते. हे ठिपके पूर्ण वाढ झाल्यावर दिसेनासे होतात. पूर्ण वाढ झालेल्या मादीची लांबी ३८ – ४६ सेंमी. असते. नर मादीपेक्षा आकारमानाने लहान असतो. पावसाळ्याच्या सुरुवातीला याची अंडी फुटून पिले बाहेर येतात.
हा मासा रुचकर असल्यामुळे त्याच खाद्य म्हणून उपयोग करतात. नरापेक्षा वयात आलेली किंवा गाभण मादी जास्त चविष्ट लागते, तिला ‘चस्की’ म्हणतात. याच्या अंगात काटे जास्त असतात, तरीही याच्या रुचकर चवीमुळे व २०% वसा (चरबी) संचयामुळे याचा खाद्य म्हणून मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो.
जोशी, लीना
स्त्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 10/7/2020