অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

सितेपालाच्या हिरामनला सौर कृषी पंपाचा आधार

सितेपालाच्या हिरामनला सौर कृषी पंपाचा आधार

विविध घटकाच्या कल्याणासोबतच सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने शासन विविध योजनांची अंमलबजावणी करीत आहे. वैयक्तिक व सामुहिक लाभाच्या विविध योजनांच्या लाभातून व्यक्तीचे कौटुंबिक जीवनमान उंचावून दरडोई उत्पन्न वाढविण्यासोबतच सामुहिक विकासही साधण्यात येत आहे. गोंदिया जिल्ह्याच्या सालेकसा तालुक्यातील सितेपाला येथील हिरामन जिंदाकुर या अल्पभूधारक शेतकऱ्याने शासनाच्या सौर कृषीपंप योजनेचा लाभ घेऊन शेतीला सिंचनाखाली आणले आणि उत्पादनात वाढ करुन समृद्धीचा मार्ग शोधला आहे.

सालेकसा हा राज्याच्या टोकावर असलेला गोंदिया जिल्ह्यातील तालुका. दुर्गम, मागास, आदिवासी बहुल आणि नक्षलदृष्ट्या संवेदनशील तालुका म्हणून ओळखला जातो. मागास व दुर्गम भागातील नागरिकांचे व शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासन प्रयत्नशील असून त्यामधून त्यांचा मानव विकास निर्देशांक वाढविण्यास मदत होत आहे.

सितेपाला येथील हिरामन जिंदाकुर हे अल्पभूधारक शेतकरी. जेमतेम तीन एकर शेतीवर कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवितात. श्री.जिंदाकुर हे अनुसूचित जाती प्रवर्गात येत असल्यामुळे 1995 या वर्षात त्यांनी विशेष घटक योजनेच्या लाभातून सिंचनासाठी विहीर तयार केली. पावसाच्या पाण्यावर पूर्वी अवलंबून राहून हिरामन धानपीक घेत असायचे. शेतात विहीर झाल्यामुळे त्यांनी कृषीपंप जोडणीसाठी वीज वितरण कंपनीकडे रितसर तेव्हाच अर्ज केला होता. परंतु हिरामनजीच्या विहिरीच्या शेतापर्यंत वीज पुरवठा करणे हे वीज वितरण कंपनीला आर्थिकदृष्ट्या परवडणारे नव्हते. यासाठी हिरामनजीच्या शेतापर्यंत वीज वितरण कंपनीला 25 विजेचे खांब उभे करावयाचे होते. त्यामुळे त्यांच्या शेतातील विहिरीला कृषी पंपाची जोडणी देणे शक्य झाले नाही.

हिरामनजीचा मोठा मुलगा गजानन याने सालेकसा येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून इलेक्ट्रीशियनचा डिप्लोमा घेतल्यामुळे तो सालेकसा येथील वीज वितरण कंपनीच्या उपकेंद्रात वायरमन अप्रेंटीसशीप करीत होता. या कार्यालयातच काम करीत असल्यामुळे वीज वितरण कंपनीच्या सौर कृषीपंप योजनेची माहिती गजाननला मिळाली. जवळपास 20 वर्षापेक्षा जास्त कालावधी शेतात विहीर तयार करुन झाला, परंतू शेतीला वीज पुरवठा नसल्यामुळे सिंचनासाठी डिझेल इंजीनचा ते वापर करीत होते. सौर कृषीपंप योजनेची माहिती गजाननने आपल्या वडिलांना दिली. त्यानंतर शेतातील विहिरीवर सौर कृषीपंप बसविण्याचा निर्णय हिरामनजीने घेतला.

तीन एकर शेतीतील विहिरीवर 3 एचपी सौर कृषीपंप बसविण्यासाठी हिरामनजीने 4 मार्च 2016 रोजी लाभार्थ्याचा हिस्सा म्हणून 20 हजार 250 रुपयांची डिमांड वीज वितरण कंपनीच्या सालेकसा येथील कार्यालयात भरली. केंद्र शासनाने या सौर कृषी पंपासाठी 4 लाख 5 हजार रुपये किंमत निश्चित केली आहे. यामध्ये लाभार्थ्याचा 5 टक्के हिस्सा 20 हजार 500 रुपये, केंद्र सरकारचे 30 टक्के अनुदान 1 लाख 21 हजार 500 रुपये, राज्य शासनाचा 5 टक्के हिस्सा म्हणजे 20 हजार 500 रुपये आणि 60 टक्के म्हणजे 2 लाख 43 हजार रुपये कर्ज उचलून वीज वितरण कंपनी लाभार्थ्याला देणार आहे.

सौर कृषीपंप योजनेतून मे 2016 मध्ये हिरामनजीच्या शेतातील विहिरीवर सौर कृषीपंप बसविण्यात आले आहे. सौर कृषी पंपामुळे खरीप हंगामात धानाला पाणी देता आले. कधी कधी एका पाण्याच्या कमतरतेमुळे उत्पादनात घट होत होती, आता मात्र उत्पादनात कधीच घट येणार नाही. विहिरीवर लावण्यात आलेल्या सौर कृषी पंपामुळे वाढ होणार असून रब्बी हंगामात देखील धानासोबतच भाजीपाला पिके व उन्हाळी धानपीक घेण्याचा विचार असल्याचे हिरामनजीने सांगितले.

जलयुक्त शिवार अभियानाचेही महत्व हिरामनजीला कळले असून भविष्यात शेती ठिबक सिंचनाखाली आणण्याचा त्यांचा विचार आहे. त्यामुळे पाण्याची नासाडी होणार नाही आणि आवश्यक तेवढेच पाणी थेट पिकाला देता येईल. पूर्वी शेतात विहीर नव्हती. विहीर तयार करण्याचे स्वप्न विशेष घटक योजनेतून पूर्ण झाले. शेतातील विहिरीपर्यंत कृषी पंपाला वीज जोडणी करणे हे वीज वितरण कंपनीला आर्थिकदृष्ट्या परवडणारे नव्हते. मात्र राज्य सरकारने दुर्गम व मागास भागातील शेतकऱ्यांच्या कृषी पंपाला वीज जोडणी न देता थेट सौर कृषीपंप देऊन अशा शेतकऱ्यांच्या जीवनात बदल घडवून आणण्यासाठी केलेल्या प्रयत्नाला यश आले आहे.

आपल्याला सिंचनाची सुविधा उपलब्ध व्हावी ही इच्छा वीज वितरण कंपनीने सौर कृषीपंप देऊन पूर्ण केल्यामुळे आता माझ्या आर्थिक जीवनात तर बदल होईल, सोबतच सामाजिक स्थिती सुधारण्यास मदत होणार असल्याचे हिरामनजीने सांगितले.

- विवेक खडसे

जिल्हा माहिती अधिकारी, गोंदिया

स्त्रोत - महान्युज

अंतिम सुधारित : 8/11/2023



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate