धुळे जिल्ह्यातील शिवाजीनगर येथील 125 मेगावॅट क्षमतेच्या देशातील सर्वात महाकाय सौर प्रकल्पानंतर बारामती तालुक्यातील शिर्सुफळ येथे 50 मेगावॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प महानिर्मितीने सुरु केला आहे. खात्रीशीर महसुली परताव्याच्या तरतुदीमुळे शासन-खासगी सहभाग प्रारूपातून उभारला जाणारा देशाच्या ऊर्जाक्षेत्रातील अशा प्रकारचा हा पहिला प्रकल्प ठरला आहे.
पारंपरिक ऊर्जा निर्मिती प्रकल्पांमुळे दिवसेंदिवस पर्यावरणाची मोठ्या प्रमाणावर हानी होत आहे. राज्याची ऊर्जेची गरज भागविण्यासाठी पारंपरिक ऊर्जा निर्मिती प्रकल्पांवर भिस्त ठेवून जमणार नाही. त्यामुळे राज्याने आपले अपारंपरिक ऊर्जा धोरण तयार केले आहे. या धोरणानुसार शासन राज्यात खाजगी सहभागातून सुमारे 7500 मेगावॅट क्षमतेच्या सौर प्रकल्पांची उभारणी करणार आहे. तसेच सुमारे 2500 मेगावॅट क्षमतेचे सौर प्रकल्प महानिर्मितीतर्फे राबवण्याचे नियोजनही करण्यात आले आहे.
राज्यात मागणीपेक्षा व्यस्त असणारे विजेचे प्रमाण लक्षात घेऊन राज्य शासनाने टप्प्या टप्प्याने शेतकऱ्यांना सौर पंप देण्याचे धोरणही स्विकारले आहे. यामुळे विजेअभावी पिकांचे होणारे नुकसान टळणार आहे. सौर ऊर्जेचा प्रसार करण्यासाठी वीजनिर्मिती केंद्रे व इमारतींवर सोलर पॅनेल्स बसविण्यासंबंधी शासनाचा अभ्यास सुरू आहे. कृषी उद्योगांना चालना देण्यासाठी वीज दर नियंत्रित ठेवून महानिर्मितीची एकूण कार्यक्षमता वाढविण्यासाठी अंतर्गत सुधारणांचा कालबद्ध कार्यक्रम शासनाने हाती घेतला आहे.
बारामती तालुक्यातील शिर्सुफळ येथील 36 मेगावॅट व 14 मेगावॅट क्षमतेचे असे मिळून एकूण 50 मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प अनुक्रमे डिसेंबर 2014 व मार्च 2015 मध्ये कार्यान्वित करण्यात आले आहेत. हे प्रकल्प ग्रीड कनेक्टेड व क्रिस्टलाईन तंत्रज्ञानावर आधारित आहेत. या प्रकल्पाचे भूमिपूजन झाल्यानंतर अतिशय विक्रमी वेळेत ही कामगिरी पार पाडून प्रत्यक्ष वीज उत्पादन सुरू करण्यात महानिर्मितीला यश आले आहे.
बारामती तालुक्यातील कमी पावसाच्या आणि अवर्षण प्रवण क्षेत्रातील शिर्सुफळ गावाच्या माळावर या प्रकल्पाची उभारणी करण्यात आली आहे. या भागातील नापीक, डोंगराळ, खडकाळ जमिनीचा वापर यासाठी करण्यात आला आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारची सुपीक जमीन या प्रकल्पासाठी अधिग्रहीत करण्यात आलेली नाही. या प्रकल्पामुळे परिसरातील स्थानिकांना या प्रकल्पात रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत.
एकूण 50 मेगावॅट क्षमतेचा हा प्रकल्प दोन टप्प्यांत उभारण्यात आला आहे. या प्रकल्पातून प्रतिवर्षी 83 दशलक्ष युनिटस् इतकी वीजनिर्मिती अपेक्षित आहे. महानिर्मितीने खासगी विकासकाच्या माध्यमातून उभारेलला हा प्रकल्प त्याच्या खात्रीशीर महसूली परताव्याच्या तरतुदीमुळे शासन-खासगी सहभाग प्रारूपातून उभारला जाणारा देशाच्या ऊर्जाक्षेत्रातील अशा प्रकारचा पहिला प्रकल्प आहे. देशाच्या ऊर्जाक्षेत्रात या नवीन संकल्पनेचा स्वीकार करणारी महानिर्मिती ही पहिली वीज निर्मिती कंपनी ठरली आहे. या प्रकल्पाची संपूर्ण मालकी महानिर्मितीची आहे. महानिर्मितीच्या चंद्रपूर 5 मेगावॅट व शिवाजीनगर (ता. साक्री जि. धुळे) येथील 125 मेगावॅट क्षमतेच्या देशातील सर्वात महाकाय सौर ऊर्जा प्रकल्पपूर्तीनंतर बारामती तालुक्यातील शिर्सुफळ येथील सौर ऊर्जा प्रकल्प सुरु झाला आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यामुळे महानिर्मितीची एकूण सौरऊर्जा स्थापित क्षमता 180 मेगावॅट झाली आहे. या प्रकल्पाच्या यशस्वीतेमुळे राज्यातील अन्य सौर प्रकल्पांना चालना मिळणार आहे.
-संग्राम इंगळे,
उप माहिती कार्यालय, बारामती
अंतिम सुधारित : 8/27/2020
सिंचनाच्या स्वाभाविक मर्यादा विचारात घेऊनही कृषी उ...
दुग्ध प्रक्रिया प्रकल्पासाठी आवश्यक इमारत ही विवि...
मोठी गुंतवणूक करून एखादा कृषी प्रक्रिया उद्योग उभा...
आगळीवेगळी खानावळ हरसूलजवळील खोरीपाडाच्या ग्रामस्था...