অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

शाश्वत विकास नियोजन – नारायणपूरच्या महिलांचा मार्ग

शाश्वत विकास नियोजन – नारायणपूरच्या महिलांचा मार्ग

भारतातील हरियाणाच्या  नारायणपूरमधील तलावाच्या (स्थानिक नाव-जोहड़) काठावर उभे राहिलेल्या व्यक्तीला तो काठोकाठ भरलेला दिसतो - अगदी एप्रिल महिन्याच्या उन्हाळ्यातदेखील. पावसाला अजून खूपच दिवस बाकी असल्याने इतर तलाव आणि बांध-बंधारे कोरडे पडलेले दिसतात परंतु ह्या तलावातून नारायणपूरच्या रहिवाशांना वर्षभऱ चवदार पाण्याचा पुरवठा होतो. हरियाणा राज्यातील रेवारी जिल्ह्यामधले नारायणपूर हे एक खेडे. तेथे मिळणारे पाणी कायमच क्षारयुक्त असते त्यामुळे ते पिता येत नाही. कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन संस्थेने केलेल्या पाहणीत असे दिसले की एकूण कूपनलिकांपैकी (बोअरवेल्स) फक्त २४% विहिरींचे पाणी चांगले आहे तर उरलेल्यांचे पाणी क्षारयुक्त आणि छोट्या कणांनी भरलेले आहे.

नारायणपूरच्या काही महिलांनी पडझड झालेल्या ह्या जुन्या तलावाची पुनर्बांधणी करण्याचा विचार मांडला. "जोहड़ है तो गाँव है"  (तलाव असेल तर गाव टिकेल) अशी घोषणाच त्यांनी दिली. "…भांडेभर पाणी मिळवण्यासाठी आम्हांला तासनतास थांबावे लागे. उन्हाळ्यात तर फक्त एक हंडाभर पिण्याचे पाणी भरण्यासाठी दिवसचे दिवस खर्चावे लागत. अखेर नाइलाजाने आम्हांला हातपंप आणि विहिरींतून येणारे क्षारयुक्त पाणीच वापरावे लागे." असे ललिता नामक स्थानिक महिलेने सांगितले.

खेड्यात पिण्याजोगे पाणी मिळत नसल्याने लोकांना इतर ठिकाणांहून पाणी मिळवावे लागे. येथे २२५ कुटुंबे राहतात. पाण्यासाठी वाट पाहून, वणवण भटकून आणि कष्ट उपसून नारायणपूरच्या रहिवासी महिला वैतागल्या होत्या. किरण नावाच्या महिलेने, काही महिलांच्या साथीने, तलावाबाबतचे काम सुरू केले तेव्हा त्यांना कोणाचीही साथ नव्हती. परंतु त्यामुळे खचून न जाता त्यांनी स्वतःच तलाव उपसण्याचे काम सुरू केले आणि अखेर खेड्यातील इतर महिला ह्या कामात सहभागी झाल्या. काम पूर्ण होण्यासाठी तब्बल पाच महिने लागले.

नारायणपूर ज्या जिल्ह्यात आहे त्या रेवारी जिल्ह्यामधील पावसाचे आणि भूजलाचे प्रमाण सातत्याने कमी होत आहे. रेवारी जिल्ह्याच्या बहुतेक भागात भूजलाचा अति-वापर (ओव्हर एक्स्प्लॉयटेशन) केला जातो असे केंद्रीय भूजल प्राधिकरणाने पूर्वीच जाहीर केले आहे.

हरियाणाच्या पेयजल आपूर्ती विभागातर्फे शेजारील पुन्सिका खेड्यातून पिण्याचे पाणी उचलून नारायणपूरला पुरवले जाई. परंतु २००७ साली पाण्याची फारच गंभीर टंचाई निर्माण झाल्याने पुन्सिकातील रहिवाशांनी नारायणपूरकरांना पाणी पुरवण्यास नकार दिला. काही वर्षे सरकारने टॅकरने पाणी पुरवले परंतु हा पुरवठा अनियमित होता आणि तो कमी पडत असे. काहींना पिण्याचे पाणी विकत घेण्याची वेळ आली. काही स्थानिक महिलांना आठवले की, १९९० साली नळपणी योजना सुरू होण्यापूर्वी, गावातील जुन्या तलावातूनच पिण्याजोगे चवदार पाणी भरले जात असे. नळातून पाणी मिळू लागल्यानंतर त्या तलावाकडे सर्वांनीच दुर्लक्ष केले होते.

ह्या कामासाठी मार्गदर्शन आणि पैशाची मदत मिळावी ह्यासाठी ह्या महिलांनी 'सोशल सेंटर फॉर रूरल इनिशिएटिव ऍँड ऍडव्हान्समेंट' (SCRIA) कडे धाव घेतली. एससीआरआयए (SCRIA)ने ह्या योजनेस मान्यता दिली आणि खेड्यातील रहिवाशांनी खर्चाचा काही भार उचलावा असे सुचवले. त्यानुसार गावकर्‍यांनी ३१९५०/- रुपये गोळा केले तर उरलेला खर्च करण्याचे एससीआरआयए (SCRIA) ने मान्य केले. महिलांनी स्वतः हार्डवेअरच्या दुकानांत जाऊन दुकानदारांना प्रकल्पाचे स्वरूप समजावून दिले आणि कामासाठी लागणार्‍या वस्तू कमी किंमतीत मिळवल्या. त्यांनी स्वतः श्रमदान करून देखील बराच खर्च वाचवला. ७३,९५०  रुपयांच्या एकूण खर्चापैकी एससीआरआयए (SCRIA) ने ४२,०००  रुपये दिले व अशा रीतीने हा प्रकल्प मार्च २००९ मध्ये पूर्ण झाला.

अर्थात ह्या जुन्या तलावाचे रूप बदलून तो पाण्याने काठोकाठ भरण्याचे हे काम सोपे नव्हते. ह्या महिलांचा गट सकाळी लवकरच घराबाहेर पडत असे. खेड्यातील दुकानदारांना आणि व्यावसायिकांना त्या भेटून स्वस्तात वस्तू किंवा देणगी मिळवत असत. परंतु ह्या कामात अडथळा आणण्यात आणि संबंधित महिलांची टर उडवण्यात तेथील पुरूषच आघाडीवर होते. त्यांची पर्वा न करता ह्या महिला दिवसभर तलावावर काम करीत. त्यांचा निश्चय पाहून नंतर इतरही महिला कामात सहभागी झाल्या.

तलावातले पाणी दोन कूपनलिकांद्वारे बाहेर काढले जाते. एकीतून क्षारयुक्त पाणी वर काढले जाते आणि त्याचा पुरवठा ह्याआधीच घराघरातून दिलेल्या नळजोडांमधून केला जातो. मात्र पिण्याचे गोडे पाणी नळांतून पुरवले जात नाही – गावकर्‍यांनी ते विहिरीवरून प्रत्यक्ष भरायचे असते. घरटी दोन ते  तीन हंडे पाणी दिले जाते जे फक्त स्वयंपाक आणि पिण्यासाठीच वापरायचे असते. चांगल्या पाण्याचा संभाव्य दुरूपयोग टाळण्यासाटी हे पाऊल मुद्दामच उचलले असल्याचे गावच्या सरपंच अनिता ह्यांनी सांगितले. खेड्यातील सर्व महिला एकाच वेळी पाणी भरण्यासाठी येत असल्याने कोणीच जास्त पाणी नेऊ शकत नाही. शिवाय हे पाणी डोक्यावरील हंड्यातून सुमारे ८०० मीटर वाहून नेणे हीदेखील सोपी गोष्ट नाही - त्यामुळे दोन-तीन हंड्यांपेक्षा जास्त पाणी तसेही कोणी नेतच नाही. हा निर्णय घेऊन २ वर्षे होऊन गेली, अजूनही त्यामध्ये खंड पडलेला नाही. “खेड्याला मिळणारे चवदार पाणी ही देवाची देणगी आहे. एखाद्या मंदिराप्रमाणेच आम्ही सतत त्याचा मान राखू” असे तेथील एका वृद्धेचे म्हणणे आहे.

ह्या तलावातील पाण्याने स्थानिकांच्या सर्व गरजा वर्षभर भागवल्या जातात. आता तलावाजवळच असलेल्या एका शाळेमध्ये पावसाचे पाणी अडवण्याची योजना उभारण्याचे खेड्यातील लोकांनी ठरवले आहे. शाळेच्या छपरावर पडणारे पावसाचे तसेच जमिनीत मुरणारे पाणी भूजलाच्या पुनर्भरणासाठी वापरले जाते. ह्यामुळेही तलावातील पाण्याची पातळी टिकून राहण्यास मदत होते. शिवाय तांदुळासारखे, खूप पाणी लागणारे, पीक न घेण्याचाही निर्ण गावकर्‍यांनी घेतला आहे.

ह्या खेड्याने आसपासच्या खेड्यांसाठी एक आदर्श घालून दिला आहे. आसपासच्या खेड्यांमध्येही, हळूहळू का होईना, बदल होताना दिसत आहेत.

स्रोत : http://www.cseindia.org

अंतिम सुधारित : 8/4/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate