बाळंतीणीची खोली - विशेष रचना
डॉ. संतोष जळूकर (मुंबई)
+917208777773
पूर्वी एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये घराघरात बाळंतीणीसाठी म्हणून एक खोली असायची. या खोलीमध्ये उजेड फार कमी (किंबहुना अंधारच) असायचा. अनेक कुटुंब एकत्र राहत असल्याने कुणाचेतरी बाळंतपण सुरु असायचे. म्हणून अशी खोली सज्ज केलेली असायची. आजकाल विभक्त कुटुंब पद्धती असली तरीही त्यामागची तत्वे विसरून चालणार नाही. “बाळंतीणीच्या खोलीमध्ये अंधार का” या प्रश्नाचे कोडे काहीशा चिंतनाने उलगडले.
मूल मातेच्या पोटात असतांना त्याच्या इंद्रियांवर कोणत्याही प्रकारचा आघात होत नाही. सर्व आघात मातेच्या गर्भजल रूपी चिलखताने शोषले जातात. शिवाय गर्भाशयाचे आवरण, वार (प्लासेंटा) असल्याने गर्भ पूर्णपणे कोंदणात सुरक्षित राहतो. जन्मानंतर बाळाच्या डोळ्यांवर सूर्याचा प्रखर प्रकाश पडला तर त्याच्या नाजूक इंद्रियाला दुखापत होईल. वेल्डिंग करतांना त्याकडे मोठ्या माणसांनीही बघू नये कारण त्याचा प्रकाश अत्यंत प्रखर असतो, डोळ्यांना त्याचा त्रास होतो. म्हणूनच त्या कामाशी निगडीत लोकांना विशिष्ट चष्मा दिला जातो. नवजात बालकाची दृष्टि तर त्याहून कितीतरी नाजूक असते. ट्यूबलाईट, हॅलोजन, एल ई डी लाईट्स किंवा कॅमेऱ्याचा फ्लॅश अशा सारखे प्रकाश झोत त्याच्या डोळ्यांवर पडल्यावर काय होईल? म्हणून त्याला काही महिने अंधारात ठेवणे अतिशय महत्वाचे आहे. त्यासाठी बाळंतीणीची खोली अंधारी असावी. ह्या पारंपारिक संस्कृतीचे विस्मरण किंवा त्याकडे भाकडकथा म्हणून बघितले जाते आणि म्हणूनच मुलांना लहान वयात दृष्टीदोष निर्माण होत असावा. मोबाईल फोन्स, दूरदर्शन, लॅपटॉप अशा गोष्टींमुले डोळे बिघडतात असे म्हटले जाते. पण ह्या गोष्टी मुलांच्या आयुष्यात कितीतरी उशिराने येतात. तान्ह्या बाळाला प्रखर प्रकाशापासून सुरक्षित ठेवले पाहिजे. किमान त्याच्या इंद्रियांना सराव होईपर्यंत त्याला अंधारातच ठेवले जावे. इंग्रजीमध्ये याला अॅक्लमटायझेशन (नवीन हवामानाशी किंवा परिस्थितीशी रूळण्याची क्रिया म्हणतात). अंधाऱ्या खोलीत लहासहान कीटक, डास होण्याची शक्यता असते. म्हणून त्याठिकाणी विशिष्ट धूप करण्याची सूचनाही आयुर्वेदात दिली आहे. कान, त्वचा, डोळे, जीभ आणि नाक अशी पाच ज्ञानेंद्रिय आहेत. प्रत्येक इंद्रीयासाठी हा अॅक्लमटायझेशनचा नियम सारखाच आहे. बाळाच्या पोषणासाठी गर्भाशयात गर्भजल (अॅम्निऑटिक फ्ल्युईड) असते. त्यातूनच गर्भाला पोषक घटक व इम्युनोग्लोब्युलिन्स (रोगप्रतिकारक्षमतेचे रक्तातील घटक) प्राप्त होतात. त्याची चव, पी.एच, एपिडर्मल ग्रोथ फॅक्टर (इ जी एफ) आणि अन्य गुणधर्म मातेच्या दुधाशी मिळतेजुळते असतात. म्हणून बाळाला जन्मानंतर सहा महिन्यांपर्यंत फक्त मातेच्या दुधावर राहणे गरजेचे असते. सहाव्या महिन्यात उष्टावण संस्कार केला जातो. त्यानंतर हळूहळू इतर चवींचे पदार्थ देण्याची सुरुवात करावी. हे सुद्धा एकप्रकारचे अॅक्लमटायझेशनच आहे.
मातेच्या उदरातील तापमान सुमारे ३७.२ डिग्री सेल्सियस असते. जन्मानंतर ह्या तापमानाच्या आसपास तापमान बाळ सहन करू शकते. अकाल प्रसूती झाल्यास बाळाला इनक्यूबेटर मध्ये ठेवले जाते. त्या इनक्यूबेटरमध्ये ३६.५ ते ३७.२ सेल्सिअस एवढे तापमान ठेवले असते. प्रौढ व्यक्तींना या तपमानात उकाडा वाटतो परंतु नवजात बाळाला हेच तापमान योग्य असते. त्यामुळे वातानुकुलीत खोलीत बाळाला ठेवणे योग्य नाही. बाळंतीणीच्या खोलीत शेक देण्याची, धूपन करण्याची संकल्पना त्यासाठी आखली आहे. त्या काळात उपलब्ध असलेल्या सामग्रीचा विचार करून ह्या सर्व गोष्टी केल्या जात असत.
कानांच्या (श्रवणेंद्रिय) सुरक्षिततेसाठी हाच नियम लागू आहे. म्हणूनच बाळंतीणीची खोली तुलनेने शांत जागी असण्याची गरज आहे. त्यांच्या सुरक्षिततेसाठी हा अॅक्लमटायझेशनचा नियम आचरणात आणला तर बालपण अधिक स्वास्थ्यसंपन्न होऊ शकेल.
अंतिम सुधारित : 7/3/2020