आज अस्तित्त्वात असलेल्या बहुतांश शौचालयांमध्ये मल - मूत्र एकत्रितपणे प्रक्रियेकरिता सोडले जाते किंवा एकाच पाईपमधून वाहून नेले जाते. काही ठिकाणी एकत्रित मल आणि मूत्र शेतीकरीता वापरले जाते. परंतु असे आढळून आले आहे की,मानवी विष्ठेमध्ये आरोग्यास घातक असे जे जिवाणू असतात त्यांचा परिणाम शेतीमधील पिकांवर होऊ शकतो. तसेच यामुळे आरोग्यास धोका होण्याची शक्यता वाढते.
याउलट मानवी मूत्रामध्ये कुठल्याही प्रकारचे नुकसानकारक जिवाणू नसतात आणि शेतीसाठी उपयोगी अशी अनेक मूलद्रव्ये असतात. मूलद्रव्ये शेतांमध्ये सरळ वापरल्याने आरोग्यास नुकसान होण्याची शक्यता नसते. यावर उपाय म्हणून इको सॅनिटेशन ही पध्दती आहे. या पध्दतीमध्ये शौचालयाची अशी रचना केली जाते की, मूत्र स्वतंत्रपणे जमा होते आणि मल पाण्याचा वापर न करता एका वेगळया टाकीमध्ये जमा होते. या विष्ठेवरती प्रत्येक वापरानंतर राख, चुना किंवा लाकडाचा भुसा टाकावा. अशा प्रकारच्या राख चुना किंवा भुश्याच्या वापरांमुळे विष्ठा लवकर कोरडी होत जाईल आणि विष्ठेतील पी.एच. चे प्रमाण (अल्कली गुणधर्म) वाढेल. तसेच पाण्याचा वापर नसल्यामुळे लहान टाकी पुरते.
ही विष्ठा लवकर कोरडी होत असल्याने तिचे खतामध्ये रुपांतर होते. हे खत शेती करण्यासाठी सुरक्षितपणे वापरले जाऊ शकते. या विष्ठेमध्ये पाण्याचा संपर्क येत नसल्याने घातक जिवाणूंचे प्रमाण कमी असते. तसेच विष्ठा कोरडी होण्याच प्रक्रियेत घातक जीवाणूंचा त्त्वरित नाश होतो. पूर्वीच्या काळी ओली विष्ठा एका जागेवरुन दुस-या जागेवर वाहून नेण्याची पध्दती प्रचलित होती. ही पध्दती अतिशय असुरक्षित व घातक असल्याचे निदर्शनास अल्याने बंद करण्यात आली. परंतु इको सॅनिटेशन पध्दतीमध्ये अशा प्रकारचा कोणताही धोका आढळून येत नाही.
ही पर्यावरणीय स्वच्छता पध्दती सध्या प्रचलित असलेल्या मल मूत्राच्या सर्व प्रकारच्या प्रक्रियांपेक्षा स्वस्त, सुरक्षित आणि गतिमान अशी आहे. यामध्ये अतिशय कमी वेळात खताचे पी.एच मूल्य वाढते आणि घातक जिवाणूंचा नाश लवकर होतो. यामध्ये विष्ठेची दुर्गंधी कमी असते. तसेच विष्ठेचे तापमान वाढल्यामुळे घातक जिवाणूंचा नाश अधिक तापमानामुळे त्वरित होतो. विष्ठा वाळविण्याकरिता राख हा पदार्थ अधिक उपयुक्त असल्याचे लक्षात आले आहे. राखेमुळे घातक जिवाणूंचा नाश अधिक गतीने होतो असे एका संशोधनात आढळून आले आहे.
इको सॅनिटेशनच्या पध्दतीत स्वतंत्रपणे जमा झालेल्या मूत्राचा वापर फळे देणा-या झाडांसाठी करावा. परंतु मूत्राचा वापर कच्च्या स्वरुपात खाल्ल्या जात असणा-या भाजीपाल्यावर करण्याचे टाळावे. एका संशोधनात असे आढळून आले की, मानवी विष्ठेमध्ये नत्राचे (नायट्रोजन) प्रमाण 70% असते आणि स्फुरद (फॉस्फरस) चे प्रमाण50% असते. जेव्हा मूत्राचा सरळ उपयोग खतासाठी केला जातो त्यामध्ये घातक जिवाणूंचे प्रमाण मुळीच नसते. तसेच मल आणि मूत्र एकत्रित गोळा केल्यास विष्ठेमधील जीवाणूंचा प्रादुर्भाव मूत्रावर होऊन मूत्र दूषित होते. मल आणि मूत्र यांचे विभाजन सुरुवातीलाच करणे जास्त आवश्यक व फायदेशीर आहे.
सुरुवातीलाच वेगळया केलेल्या मूत्रामध्ये नायट्रोजनचे प्रमाण 90% आणि स्फुरदाचे प्रमाण 10% असते. मूत्रामध्ये नायट्रोजन अमोनियाच्या रुपामध्ये आहे आणि अमोनिया हा काही झाडांकरिता अधिक उग्र आणि जहरी असल्यामुळे याचा वापर करताना झाडांसोबत मूत्राचा सरळ संपर्क होणार नाही याची काळजी घ्यावी. म्हणजेच झाडांपासून काही अंतर सोडून जमिनीमध्ये मूत्राचा वापर खताकरिता करावा. असे केल्याने मूत्राचा खत म्हणून वापर अधिक प्रमाणात केला जाऊ शकतो. मूत्र स्वतंत्रपणे गोळा करणे, त्यांना वाहून नेणे व शेतांमध्ये वापरणे हे अधिक स्वस्त व फायदेशीर असल्याचे लक्षात येईल.
इकॉलॉजिकल सॅनिटेशन किंवा पर्यावरणीय स्वच्छता हे एक तंत्र म्हणून विचार करण्याऐवजी एक वेगळी चळवळ म्हणून त्याचा प्रसार करणे आवश्यक आहे. मूत्रामधून मिळणारे मूलद्रव्य शेतीतील पिक वाढवण्यासाठी अतिशय उपयुक्त व सुरक्षित असल्याचे आढळून आले आहे. इकॉलॉजिकल सॅनिटेशन ह्या तंत्रज्ञानास फक्त गरिबांसाठी किंवा दुय्यम दर्जाचे तंत्रज्ञान किंवा स्वस्त शौचालय पध्दती या रुपाने बघण्यात येऊ नये. त्याऐवजी हे तंत्रज्ञान सर्वांसाठी किंवा समाजातील सर्व घटकांसाठी कसे उपलब्ध करुन देता येईल हे बघणे आवश्यक आहे. या तंत्रज्ञानाचा वापर करुन पर्यावरणीय समतोल साधणे सहज शक्य होणार आहे.
लेखक : डॉ. श्याम अष्टेकर
(MBBS, MD community Medicine)
संदर्भ : आरोग्यविद्या
अंतिम सुधारित : 7/23/2020
अनियंत्रित पेशी-विभाजनामुळे उद्भवणारा एक रोग. या र...
सुवर्ण छेद म्हणजे एखाद्या दिलेल्या रेषाखंडाचे एका ...