অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

पाणी शुध्दीकरण

पाणी शुध्दीकरण

नळयोजना असल्यास त्या केंद्रांवरच शुध्दीकरणाचे उपाय करता येतात. मग घरोघर ते करण्याचा त्रास वाचतो. शुध्द पाण्याचा पुरवठा ही मूलभूत गरज आहे. ही गरज भागल्याशिवाय आरोग्यमानात फार सुधारणा होणार नाही.

बोअरवेल पंपाचे पाणी खडकाखालून येत असेल तर ते सहसा जंतुदृष्टया शुध्द असते. सर्वसाधारणपणे महाराष्ट्र आणि दख्खनच्या पठारावर खूप खोल गेल्याशिवाय पाणी लागत नसल्याने बोअरवेलचे पाणी साधारण शुध्दच असते. इतर विहिरींची गोष्ट मात्र वेगळी आहे. त्यांमधले पाणी खडकाखालून येत असले तरी'वरचे' (अशुध्द)पाणी त्यात मिसळते. उघडया कच्च्या विहिरी, पाय-या यामुळे सतत घाण मिसळत असते. या विहिरी सुरक्षित करायच्या तर पाय-या काढून टाकून त्या आतून बांधून, कट्टा, फरशी करून, झाकून पाणी उपसण्यासाठी काही यंत्रणा बसवावी लागते. नाहीतर मग रोजच्या रोज ब्लिचिंग पावडर टाकणे हाच उपाय उरतो. पण याचा खर्च ग्रामपंचायतीच्या आवाक्याबाहेर जातो व यामुळे औषध टाकले जात नाही. याशिवाय निरनिराळे घरगुती उपायही (उकळणे,साठवून ठेवणे, औषध टाकणे) पाण्यावर करता येतात. पण विहिरीतल्याच साठयावर उपाय करणे कमी खर्चाचे व कमी त्रासाचे आहे.

पाणी शुध्दीकरणाच्या घरगुती पध्दती

नद्या, तलाव, ओढे, झरे यांचे पाणी हे बहुधा खराबच असते. पाणी शुध्द करण्यासाठी खालील उपाय आहेत.

साठवण आणि निवळणे

पाणी भांडयात गाळून, साठवून स्थिर ठेवल्यानंतर काही वेळ जाऊ दिला तर गाळ खाली बसतो. 24 तास स्थिर ठेवून पाणी वापरल्यास त्यातले 90 टक्के जंतू नष्ट झालेले असतात. तुरटी फिरवून ही क्रिया लवकर होते. ही सर्वात स्वस्त व सोपी पध्दत आहे. साथीच्या काळात मात्र रासायनिक शुध्दीकरण केलेलेच बरे. पाणी साठवून, निवळून औषध टाकले तर आणखी चांगले. पण यात वेळ लागत असल्याने हे उपाय कमी वापरले जातात.

उकळणे

एकदा उकळी फुटल्यानंतर किमान पाच मिनिटे उकळत ठेवणे हा खात्रीचा उपाय आहे. पण मोठया प्रमाणावर करायचा झाल्यास हा खर्चीक उपाय आहे. त्यामुळे हा उपाय नेहमी परवडणारा नाही.

शेवग्याच्या बिया वापरुन पाणी शुध्दीकरण

तुरटीच्या ऐवजी शेवग्याच्या बियांची पूड वापरुन पाणी निवळता येते. तुरटी ही आरोग्याला काही प्रमाणात हानीकारक असल्यामुळे शेवग्यांच्या बियांचा वापर जास्त निर्धोक आहे प्रथमत: वाळलेल्या शेवग्याच्या शेंगा घेऊन त्यातील बी काढून घ्यावी. बी ची टरफले काढून घ्यावीत. टरफले काढल्यानंतर सफेद दिसणा-या बियांची बारीक पावडर करून घ्यावी. पाणी स्टीलच्या किंवा तांब्याच्या भांडयात घ्यावे. साधारणत: 10 लिटर पाण्यासाठी15-20 बीयांची पावडर करून ती हळूवार पाण्यात टाकावी. जर पाणी गढूळ/खराब दिसत असेल तर बियांच्या पावडरचे प्रमाण वाढवावे. बियांची पावडर टाकल्यानंतर पाणी 1तासानंतर गाळून घ्यावे.

रासायनिक शुध्दीकरण

ब्लिचिंग पावडर वापरुन पाणी निर्जंतुक करता येते. नद्या, तलावांचे पाणी भरून आणायची पध्दत असेल तर घरोघर हा उपाय करावा लागेल. यासाठी क्लोरीनच्या गोळया किंवा पातळ औषध मिळते. गोळयांच्या पाकिटावर किंवा औषधांच्या बाटलीत किती पाण्यात किती रसायन मिसळायचे ते दिलेले असते. औषध किंवा गोळी टाकल्यानंतर ते पाणी सुमारे अर्ध्या तासाने वापरावे. औषध किंवा गोळी नसल्यास क्लोरीन द्रावण तयार करता येते.

ब्लिचिंग पावडरपासून जंतुनाशक द्रावण करण्याची कृती

एका तांब्यात एक लिटर पाणी घ्यावे. त्यात व्यवस्थित साठवलेली 200 ग्रॅम ब्लिचिंग पावडर मिसळावी. ही ब्लिचिंग पावडर ग्रामपंचायत किंवा बहुद्देशीय आरोग्य कर्मचारी यांच्याकडे उपलब्ध असते. पाणी चांगले ढवळावे आणि पाच मिनिटे न हलवता ठेवावे. हे मिश्रण एका प्लास्टिकच्या बाटलीत गाळून भरावे. न विरघळलेली पावडर तळाशी ठेवून द्रावण वेगळया बाटलीत भरावे. आता ही बाटली बंद करून ठेवावी. ही बाटली दोन दिवस वापरता येईल. याचे पाच मिली मिश्रण (एक मोठा चमचा) एक बादलीभर पाण्यात घालावे व चांगले ढवळावे. हे पाणी अर्ध्या तासानंतर वापरावे. जंतूनाशक द्रावणाची बाटली परत घट्ट बंद करून ठेवावी. नाहीतर त्यातील क्लोरीनचा वायू निघून जाईल व ते निरुपयोगी होईल. शेजारपाजारची सर्व कुटुंबे हेच द्रावण वापरु शकतील.

क्षार गाळणी

बोअरवेल व विहिरींच्या पाण्यात क्षारांमुळे जडपणा असतो. खरे म्हणजे अनेक क्षार शरीराला अपायकारक असतात. अन्न शिजवायलाही त्याने त्रास होतो व चव बदलते. म्हणून पाण्याची क्षार तपासणी करून घ्यावी. ठरावीक मर्यादेपलिकडे क्षार असतील तर उपाय करायला पाहिजेत. हल्ली क्षार गाळणी मिळू लागली आहेत. त्याचा सुरुवातीचा खर्च जास्त असतो. (रु.5000 पर्यंत) पण देखभाल खर्च कमी असतो.

सुजल वॉटर फिल्टर

हा वॉटर फिल्टर तयार करण्यासाठी धान्याचा कोंडा, वाळू, खडी व बाईंडर (सिमेंट) ह्यांचा वापर करण्यात येतो. हा फिल्टर तयार करण्याची पध्दत अतिशय सोपी आहे.

वैशिष्टये

1. एका वेळेस 8 ते 10 लिटर पाणी 4 तासात गाळले जाते.

2. पाण्यातील गढूळपणा 12 ते 18 टक्के कमी केला जातो.

3. किटाणूंची संख्या 13 ते 11 टक्के कमी होते. 4. पाण्यातील फ्लोराईड व आर्सेनिक यांचे प्रमाण कमी होते. 5. फिल्टर बेड 6 ते 8 महिने कार्यक्षम राहते. 6. फिल्टर अतिशय माफक दरात मिळतो व सहजपणे बनविता आणि बदलता येतो.

7. फिल्टर धानाची राख, वाळू, खडी व सिमेंट पासून बनविण्यात येतो.

फिल्टर वापरण्याबद्दल सूचना

- फिल्टर नेहमी जमिनीपासून काहीशा उंचीवर ठेवावा. - फिल्टर ठेवलेली जागा व आजुबाजूचा परिसर स्वच्छ ठेवावा. - फिल्टरची काट्रिज (कांडी) व वरचे भांडे साफ करताना नेहमी स्वच्छ थाळीवर ठेवावे. जमिनीवर ठेवू नये. - खालचे भांडे व प्लेट दररोज साफ करावी. - आठवडयातून किमान एकदातरी फिल्टर स्वच्छ करण्यासाठी त्यात 7 लिटर उकळते पाणी ओतावे आणि ते खालच्या भांडयात पाझरु द्यावे. - नेहमी खालच्या (नळ असलेल्या ) भांडयातूनच पाणी घ्यावे. वरच्या भांडयात ग्लास बुडवू नये. - खालच्या भांडयातलेच पाणी स्वच्छ व पिण्यायोग्य असते. - फिल्टरमध्ये पाणी हळूवारपणे भरावे. असे केल्यास फिल्टर खराब होत नाही.

सामुहिक पाणी शुध्दीकरण

घरोघर पाणी शुध्द करण्याऐवजी सामूहिक पाणीपुरवठा शुध्द ठेवणे जास्त चांगले. पण स्वयपाकाशिवाय इतरही कामासाठी हे पाणी वापरल्यास शुध्द करण्याचा तेवढा खर्च वाया जातो. तरीही सामूहिक पाणीपुरवठयात आधी शुध्दीकरण करून पुरवठा केलेला बरा.

पाणी शुध्दीकरण केंद्रे

शहरातील सुसज्ज पाणी-शुध्दीकरण केंद्रांवर तीन टप्प्यांत पाणी शुध्द केले जाते. - तुरटी मिसळून गाळ बसू देणे, - वाळूच्या थरातून पाणी गाळणे, - क्लोरिन गॅस मिसळून पाणी निर्जंतुक करणे. यातील बांधकाम, यंत्रसामग्री वगैरेंचा खर्च मोठा असतो. पण लहान गावांसाठी इतर स्वस्त आणि तेवढयाच परिणामकारक योजना करता येतात. भरपूर पाणी असलेली खोल विहीर असेल तर ती मागे सांगितल्याप्रमाणे आतून बाहेरून बांधून, झाकण लावून, उपसा यंत्रणा बसवून शुध्द ठेवता येते. 2.

आदर्श विहीर

विहिरीत जमणा-या पाण्याचा झरा खडकाखालून येत असेल तर हे पाणी बहुधा शुध्द असते. अशा पाण्याच्या विहिरीत बाहेरून रोगजंतू मिसळू दिले नाहीत तर पिण्याच्या पाण्याच्या शुध्दतेची हमी देता येईल. जलस्वराज्य प्रकल्पात या प्रकारच्या सोयी केल्या आहेत. - बाहेरून घाण मिसळू नये म्हणून विहिरीत सुधारणा कराव्या लागतील. प्रथम विहिरीला आतून पक्के बांधकाम करून पृष्ठभागावरचे पाणी झिरपणार नाही याची व्यवस्था करावी. जमिनीवर तीन-चार फूट कठडा करून घाण व बाहेरचे पाणी आत जाण्यापासून रोखावे, तसेच वरून झाकण लावावे. - पाण्यात न उतरता पाणी काढण्याची व्यवस्था (उदा. पंप, रहाट इ.) करावी लागेल. - सांडलेले पाणी आत झिरपू नये म्हणून विहिरींच्या कडेने चर बांधून पाण्याला वाट करून द्यावी लागेल. - विहिरीच्या आजूबाजूला सुमारे दीडशे फुटांपर्यंत संडास, सांडपाण्याचा नाला, इत्यादी दूषित पाण्याच्या जागा असू नयेत. एवढी काळजी घेतली तर पिण्याचे पाणी सुरक्षित व शुध्द राहील. शक्य असेल तर पंप बसवून हे पाणी नळाने गावात जागोजाग पोचवता येते.

वनस्पती गाळण (स्लो सँड फिल्टर)

हल्ली काही लहान गावांमधूनही पाणीपुरवठा केंद्रे झालेली आहेत. मात्र पाणी-शुध्दीकरणाची पध्दत तशी खर्चीक असल्याने ब-याच लहान केंद्रांवर शुध्दीकरण अगदी जुजबी आणि असमाधानकारक असते. गावासाठी पाणी शुध्दीकरणासाठी सोपे व स्वस्त तंत्रज्ञान उपलब्ध आहे. एक उदाहरण म्हणजे यांत्रिक गाळण्याऐवजी पाणवनस्पतींचा वापर करणे. या पाणवनस्पती वाळूच्या थरांवर पाणी साठल्यावर आपोआप वाढतात व त्यामधून गाळले जाणारे पाणी शुध्द होते. यांत्रिक गाळण्यांपेक्षा या गाळण्यांचे काम सावकाश होते; पण शुध्दीकरण मात्र त्यापेक्षा फारच चांगले असते. यात 99 टक्के जंतू नष्ट होतात. छोटया गावासाठी वनस्पतीयुक्त गाळणी वापरणेच अधिक योग्य आहे. त्याचा देखभाल खर्च अगदी कमी असून अत्यंत शुध्द पाणी मिळते.

 

लेखक : डॉ. श्याम अष्टेकर (MBBS, MD community Medicine)

संदर्भ : आरोग्यविद्या

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate