অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

सदोष व्यक्तिमत्त्वाचे विविध प्रकार

वर दिलेले गंभीर किंवा साधारण मनोविकाराचे इतर ठळक प्रकार आहेत. याशिवाय अनेक प्रकारचे व्यक्तिमत्त्वाचे दोष आढळतात. यांतले बरेच प्रकार आपण आजूबाजूच्या लोकांमध्ये पाहत असतो. यात उपचार करावाच असे फारसे काही नसते. किरकोळ गोष्ट व स्वभावाचा दोष म्हणून आपण ते सोडूनही देतो. यातले बरेच पैलू सौम्य स्वरूपात सर्रास आढळतात, फक्त ते जास्त तीव्रतेने आढळले तरच त्याला आपण दोष मानतो. यांतले काही प्रकार आता आपण पाहू या.

संशयग्रस्त स्वभाव

आजूबाजूच्या लोकांवर अविश्वास, सतत संशयीपणा, कोणीतरी आपल्यावर कटकारस्थान करीत आहे अशी खात्री, ही या प्रकाराची वैशिष्टये असतात. अशा पूर्वग्रहदूषित व्यक्ती कोणाशीही दिलखुलासपणे वागू शकत नाहीत.

अंतर्मुख स्वभाव

या प्रकारच्या व्यक्तींचे इतरांशी संबंध जुळणे अगदी कठीण असते. अशा व्यक्ती एकलकोंडया, हातचे राखून बोलणा-या, एकमार्गी, छंदिष्ट आणि थंड वाटतात. यांचे निर्णय पक्के नसतात, पण या प्रकारात संशयग्रस्तता नसते.

आत्मकेंद्री स्वभाव

या व्यक्तींना स्वतःबद्दल अवास्तव अभिमान असतो व स्वतःच्या सामर्थ्याबद्दल अवास्तव कल्पना असतात. सर्वांचे लक्ष आपल्याकडे असावे असा त्यांचा प्रयत्न असतो. जेव्हा स्वतःबद्दलच्या मोठेपणाच्या भावनेला इतरांकडून धक्का बसतो तेव्हा या व्यक्तींचे राग-द्वेष, दुबळेपणा, न्यूनगंड, लाज, इत्यादी गोष्टी उफाळून येतात. कधीकधी या व्यक्तींची प्रवृत्ती समाजविरोधी असते.

समाजविघातक किंवा दुष्ट स्वभाव

हा प्रकार जास्त प्रमाणात पुरुषांमध्ये आढळतो. याची सुरुवात पौगंडावस्थेपासूनच होते. खोटे बोलणे, चोरी, मारामारी, मोठयांचा अनादर, आक्रमक लैंगिक प्रवृत्ती (उदा. बलात्कार), व्यसने, इतरांच्या हक्कांची पायमल्ली करणे, इत्यादी गोष्टी त्यांच्या अंगवळणी पडलेल्या असतात. असे वर्तन खूप वर्षे टिकून राहते. यातूनच गुन्हेगारी प्रवृत्तीकडे कल होतो. या व्यक्तींची मानसिक अवस्था ('मूड') ब-याच वेळा बिघडते. यांचे मित्र, जोडीदार (पती-पत्नी) यांच्याशी स्थिर संबंध तयार होत नाहीत. अशी प्रवृत्ती असणारी मुले शाळेतून लवकर बाहेर पडतात. पण तरीही अशा मुलांना सुधारणे शक्य असते. मात्र घरची गरिबी,आईबापांची भांडणे, अस्थिर कौटुंबिक वातावरण आणि सामाजिक अन्यायामुळे मात्र अशा प्रवृत्ती वाढतात.

परावलंबी स्वभाव

या व्यक्ती न्यूनगंड बाळगणा-या, स्वतःचे सामर्थ्य कमी लेखणा-या, इतरांना चटकन शरण जाणा-या आणि महत्त्वाचे निर्णय स्वतःऐवजी इतरांवर सोपविणा-या असतात. सतत मित्रमंडळींच्या शोधात असलेल्या या व्यक्ती, बुज-या व लाजाळू असतात.

हटवादी स्वभाव

या प्रकारच्या लोकांची विशेष खूण म्हणजे सतत किरकोळ गोष्टींवर लक्ष केंद्रित करून त्यावर अडून राहणे. असे लोक कामाचे व्यापक स्वरूप लक्षात न घेता त्यातल्या बारीकसारीक तपशीलांवर, कायदेकानूंवर अकारण आग्रह धरून ठेवतात. तसेच त्याप्रमाणे इतरांनी वागले पाहिजे असा या माणसांचा हेका असतो. अशी माणसे स्वतः नीटनेटकी,बारीकसारीक तपशिलासह विचार करणारी, नीतिवादी आणि खरेखोटयाबद्दल चिकित्सक असतात. अशा स्वभावामुळे त्यांची व्यावहारिक प्रगती कमी होते. यामुळे त्यांना मानसिक क्लेश भोगावे लागतात.

अंगात येणे

हा विशेषकरून स्त्रियांचा मनोविकार आहे. पण त्यामानाने हा इतका क्षणिक भाग असतो, की इतर वेळी त्याचा सहसा मागमूस नसतो. त्यांचे इतर वागणे-बोलणे सर्वसामान्य असते. 'अंगात येणे' ही एक आपसूक येणारी संरक्षक प्रतिक्रिया आहे. अनेक स्त्रिया आयुष्यात सतत पडती दुय्यम बाजू घेतात. घरात वारंवार बोलणी खाऊन, मार खाऊन त्या दु:खीकष्टी असतात. या स्त्रियांनी यापासून थोडा वेळ तरी सुटण्याचा आणि मोठेपणा मिळवण्यासाठी नकळत वापरलेला हा मार्ग आहे. क्षणभर का होईना 'देवत्व'प्राप्त होते. यामुळे आजूबाजूंच्या लोकांचा तिने न्यायनिवाडा करणे, आदेश देणे, शिक्षा सांगणे, प्रायश्चित्त सांगणे या गोष्टी इतर लोकही त्या-क्षणी स्वीकारतात. एकदा याचा फायदा होतो हे कळल्यावर नकळत या प्रकाराची पुनरावृत्ती होत जाते. पण अशा वेळी कधीकधी इतरांकडून त्या व्यक्तीला मारझोडही होते हे वेगळेच. आदिवासी, ग्रामीण, दरिद्री समाजात अंगात येण्याचे प्रमाण खूप असते. त्या मानाने सुखी-समाधानी समाजात त्याचे प्रमाण नगण्य असते. बरेच पुरुष रोजच्या कटकटीतून सुटण्यासाठी दारू पितात व घडीभर वेगळया पातळीवर जगण्याचा प्रयत्न करतात. तसेच स्त्रियांच्या बाबतीत ही एक नकळत वेगळया पातळीवर जगण्याची 'सुटका' असते.

 

लेखक : डॉ. श्याम अष्टेकर (MBBS, MD community Medicine)

संदर्भ : आरोग्याविद्या

अंतिम सुधारित : 7/23/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate