प्राणीजगताच्या उत्क्रांतीमध्ये मानवाचा मेंदू सर्वात प्रगत आहे. अर्थातच मानवी मेंदूच्या उत्क्रांतीत इतर प्राण्यांच्या मेंदूच्या विकासाचे टप्पे पायाभूत आहेतच. इतर प्राण्यांच्या मेंदूच्या मूलभूत घडणीखेरीज काही नवे 'थर' मानवी मेंदूत आहेत. मेंदूरचनेत हे 'थर' स्पष्टपणे दिसून येतात. मेंदूच्या रचनेत लहान मेंदू व मोठा मेंदू ही सामान्यपणे प्रचलित विभागणी आहे.
मानसशास्त्राच्या दृष्टीने तीन विभाग धरलेले आहेत.
यात श्वसन, रक्ताभिसरण, शुध्दी किंवा जाणीव, इत्यादी प्राणिजीवनाला लागणारी प्राथमिक कामे येतात. मूळ मेंदूला इजा झाल्यास बेशुध्दी, श्वसन व हृदयक्रिया थांबणे आणि मृत्यू येणे संभवते. मध्यमेंदू हा भावना, वासना, लैंगिक इच्छा, इत्यादी नियंत्रित करतो. प्रजननासाठी लैंगिक इच्छा, स्वसंरक्षण व आक्रमण या प्राणिजीवनासाठी आवश्यक पण उत्क्रांतीतल्या नंतरच्या प्रवृत्ती आहेत. या सर्व मध्यमेंदूतून नियंत्रित होतात. हिंसा आणि लैंगिक वासना या काही 'पाशवी' वाटणा-या गोष्टी मध्यमेंदूत आहेत, त्यांचा वारसा प्राचीन आहे. झोपेचे केंद्रही यातच आहे.
मुख्यमेंदू हा मध्यमेंदूच्या वर, पुढे, मागे, बाजूला पसरलेला असतो. याचे डावा-उजवा असे दोन स्पष्ट भाग असतात. या दोन्ही भागांचे काम जरा वेगळे असते. डावा भाग विचारशक्ती, बोलणे, भाषा, तंत्रज्ञान, इत्यादी प्रगत कामे पार पडतो. उजवा भाग संगीत,नृत्य, भावना, जाणिवा, आध्यात्मिक उर्मी आणि अवकाशज्ञान (म्हणजे आपल्या आजूबाजूला कोठली वस्तू कोठे कशी आहे याचे ज्ञान), इत्यादी जबाबदा-या सांभाळतो. यातही मोठया मेंदूचा पुढचा कपाळातला भाग विचारशक्ती आणि सामाजिक भान सांभाळतो. या भागाला इजा झाली तर विचारशक्ती दुबळी होईल आणि सामाजिकदृष्टया अयोग्य गोष्टी त्या व्यक्तीकडून होतील (उदा. चारचौघांत लघवी करणे, नागवे होणे, इ.). मेंदूचा मानेकडचा मागचा भाग हा दृष्टीज्ञानाशी संबंधित आहे. कानाकडचा भाग ध्वनिज्ञान आणि वासाचे ज्ञान सांभाळतो. वरचा मध्यभाग शरीराची हालचाल आणि संवेदना ज्ञान सांभाळतो. मेंदूचे काम कोटयवधी मेंदूपेशींमार्फत (चेतापेशी) चालते.
या मेंदूपेशींना असंख्य टोके असतात. ही टोके आजूबाजूच्या पेशींच्या टोकांना जोडलेली असतात. या जोडणीचे स्वरूप'रासायनिक + विद्युत' असे असते. एका पेशीतून निर्माण झालेला संदेश दुस-या पेशीपर्यंत असा पोहोचतो यात टोकांमध्ये असलेले 'रासायनिक' माध्यम आणि त्यातून जाणारा'विद्युत' संदेश यांचा मुख्य वाटा असतो. या रासायनिक पदार्थाचे प्रमाण वाढले किंवा कमी झाले किंवा विद्युतसंदेशांमध्ये बिघाड झाला तर मेंदूचे कामकाज बिघडते. अल्झायमरच्या आजारात असाच बिघाड होतो. एवढे आता माहीत असले तरी मन व मानसिक आजार यांबद्दल शास्त्राला अजूनही पुष्कळ कळायचे शिल्लक आहे.
लेखक : डॉ. श्याम अष्टेकर
(MBBS, MD community Medicine)
संदर्भ : आरोग्यविद्या
अंतिम सुधारित : 10/7/2020
आपल्या प्रत्येक दाताचे २ भाग असतात – क्राऊन (दाताच...
कानाचा मुख्य भाग बाहेर दिसतो त्यापेक्षा जास्त आत अ...
बाहेरचा, मधला आणि आतला. याला बाह्यकर्ण,मध्यकर्ण आण...
गाई-म्हशींसाठी गोठ्याची रचना कशी असावी याबाबतची मा...