‘न्यूरोसिस’ ह्या संज्ञेचा वापर विल्यम कलन (१७१० – ९०) ह्या ब्रिटिश तंत्रिकाविकारतज्ञाने न समजून येणारे तंत्रिकाविकार किंवा मनोविकार यांचे वर्णन करताना केला (१७६९). मनोमज्जाeविकृती (सायकोन्यूरोसिस) ही संज्ञा फ्रॉइड ह्या सुप्रसिद्ध मानसचिकित्सकाने प्रचलित केली (१९२६).
ह्या विकारसमूहातील ⇨ उन्माद ह्या विकाराचा पहिला अभ्यास ⇨ झां मार्तँ शार्को (१८२५ – ९३) या फ्रेंच तंत्रिकाविकारतज्ञाने केला (१८७०). त्याने प्रेरित होऊन ⇨ प्येअर झाने (१८५९ – १९४७), ⇨ सिग्मंड फ्रॉइड (१८५६ – १९३९) व ⇨ योझेफ ब्रॉइअर (१८४२ – १९२५) या मानसचिकित्सकांनी उन्माद तसेच काही इतर मज्जाविकृतींचा शास्त्रोक्त पद्धतीने अभ्यास केला.
मज्जाविकृती हा विकारसमूह पूर्णपणे मानसिक असून त्याचा मज्जासंस्थेशी काही एक संबंध नसतो. ह्या समूहात पुढे नमूद केलेल्या मनोविकारांची गणना जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यू.एच्. ओ.) केलेल्या नवव्या आंतरराष्ट्रीय मनोविकारांच्या वर्गीकरणात (आय्. सी. डी. – ९) केलेली आहे (१९७८). ती अशी : (१) चिंताविक्रिया, (२) उन्माद, (३) भयगंड, (४) भावातिरेकी – सक्तियुक्त – मज्जा्विकृती, (५) मज्जाचविकृतीय अवसाद, (६) मज्जादअशक्तियुक्त मज्जायविकृती, (७) व्यक्तिमहत्त्वहरण (डीपर्सनलायझेशन), (८) शरीर चिंता अथवा आरोग्य चिंता (हायपोकाँड्रिअॅतसिस), (९) इतर मज्जा विकृती आणि (१०) अनिर्दिष्ट मज्जाविकृती.
(१) व्यक्तिमत्त्व थोडे कच्चे, अपर्याप्त व निर्बंधित; अहंसामर्थ्य कमी; आत्मप्रतिमा निकृष्ट. शिवाय मज्जाचविकृतीय गुणधर्मांची (न्यूरोटिक ट्रेज) उपस्थिती. उदा., लहानपणी अंगठा चोखणे, बिछाना भिजविणे, डुलणे, चाचरत बोलणे, झोपेत बरळणे आणि मोठेपणी नखे खाणे, संवेदनशीलता, हळवेपणा, भित्रटपणा, अतिविचारी वृत्ती, काळजीखोर स्वाभाव वगैरे. मज्जाविकृतिजन्यता हा आनुवंशिक गुणक असून त्यात स्वायत्त तंत्रिकातंत्राची संवेदनशीलता समाविष्ट आहे. (आयसेंक).
(२) दैनंदिन जीवनातील तणाव व क्षुल्लक दुर्घटना अतिरंजित करून त्या स्वहिताला घातक आहेत, असे ठरविण्याची वृत्ती.
(३) त्यातून सतत उद्भवणारी विकृत चिंता किंवा कष्टभाव (डिस्फोरिया).
(४) चिंतानिवारणासाठी अविरत सक्तियुक्त आणि पुनरावृत्त अशा संरक्षक हालचाली; परंतु सामाजिक वातावरणाशी समायोजन करण्यात अपयश.
(५) वागणुकीत सतत अकार्यक्षमता व बऱ्याच वेळा वेंधळेपणा.
(६) या सर्वांची वैफल्यपूर्ण जाणीव, त्याचे दडपण आणि काही वेळा त्यातून येणारी त्रस्तता तसेच संशयी व भांडकुदळ वृत्ती.
(७) चिंतेचे शारीरिक आविष्कार म्हणून दिसणारी शारीरिक लक्षणे, उदा., छातीत धडधड, डोकेदुखी, पोटाच्या अपचनवजा तक्रारी.
(८) आत्मकेंद्रितता आणि त्यामुळे सामाजिक संबंधांना येणारी बाधा.
(९) मर्मदृष्टी मर्यादित असल्यामुळे वास्तवतेशी असलेल्या संपर्कात परिमाणात्मक बिघाड.
(१०) सामाजिक कर्तव्यांपासून अर्भकीय परावलंबनाकडे माघार. त्यामुळे स्वकीयांपासून फाजील अपेक्षा.
(११) लक्षणांची सुरुवात बहुधा नाट्यमय व धक्कादायक प्रसंगातून होते. उदा., अपघाती मृत्यू पाहून.
ह्यांतील बरेच घटक फ्रॉइडवादी सिद्धांताचा आधार घेत असल्यामुळे सर्वसामान्य नाहीत तसेच सर्व घटक उन्माद ह्या मज्जा विकृतीलाही पूर्णपणे लागू पडत नाहीत. मज्जाविकृतीची ⇨ चित्तविकृतीशी तुलना केल्यास, ह्या संकल्पनेचे आकलन सुलभ होण्यास मदत होईल :
अनुक्रम |
लक्षणे व चिन्हे |
मज्जाविकृती |
चित्तविकृती |
१ |
रूप |
आत्मनिष्ठ |
वस्तुनिष्ठ |
२ |
वास्तवतेशी संपर्क |
परिमाणात्मक व अंशतः बिघाड |
गुणात्मक व संपूर्ण बिघाड |
३ |
भावनिक लक्षणे |
साधारण |
तीव्र स्वरूपात |
४ |
वर्तनीय लक्षणे |
अल्प प्रमाणात |
अतिरिक्त प्रमाणात |
५ |
विचारात बिघाड |
अत्यल्प प्रमाणात |
अत्यंत तीव्र |
६ |
मर्मदृष्टी |
मर्यादित |
अत्यल्प |
७ |
चिंता व शारीरिक लक्षणे |
प्रामुख्याने |
क्वचितच |
८ |
निराधार भ्रम व संभ्रम |
पूर्ण अभाव |
सर्रास (प्रिव्हेलंट) |
९ |
सामाजिक जीवन |
अंशतः बिघडलेले |
सामान्यतः उद्ध्वस्त झालेले |
१० |
फलानुमान |
बहुधा उत्तेजक |
काही वेळा निराशाजनक |
पाश्चात्त्य देशांत आढळून आलेले मज्जासविकृतींचे प्रमाण ६% (१६ जणात १) असे आहे. भारतात हे प्रमाण कमी असावे (नक्की आकडेवारी उपलब्ध नाही). ह्या विकृतीचे प्रमाण शहरवासियांत, मध्यमवर्गीयांत आणि सुशिक्षितांत जास्त आहे. वयाची मर्यादा विशेष नसली, तरी सुरुवातीची लक्षणे तरूण वयात जास्त दिसून येतात तसेच बदलत्या सांस्कृतिक तणावामुळे स्त्रियांत ह्या विकृतीचे प्रमाण वाढते आहे.
(२) अॅड्लर : अॅड्लर यांच्या मूळ व्यक्तिमत्त्व सिद्धांताप्रमाणे व्यक्ती आपल्या अर्भकावस्थेत पालकांच्या ताकदीशी स्वतःची तुलना करते आणि स्वतःला अत्यंत असहाय समजते (अर्भकीय न्यूनता). पुढे या असहायतेवर मात करण्यासाठी ती पालकांच्या दडपणाला विरोध करू लागते आणि त्यातून आपले अस्तित्व प्रस्थापित करण्यासाठी तसेच वर्चस्व (सुपिरियॉरिटी) मिळविण्यासाठी विशेष धडपड करते (पुरूषी निषेध – ’मॅस्कूलिन प्रोटेस्ट’). ह्या पार्श्वभूमीवर मज्जाविकृतिप्रवण व्यक्ती चुकीच्या अतिरंजनात्मक दृष्टिकोनामुळे सामाजिक वातावरणाचा बागुलबोवा करतात आणि नंतर समाजाशी समायोजन करण्यासाठी ’चुकीची जीवनशैली’ स्वीकारतात. नवीन अनुभवाने शहाणे होणे त्यांना जमत नाही. अपयश येऊ नये म्हणून न्यूनतेवर मात करण्यासाठी त्या अतिरेकी धडपड करतात. ह्या संरक्षणात्मक उपायांपोटीच मज्जायविकृतीची लक्षणे उद्भ वतात. अर्भकीय न्यूनता जेव्हा शरीरावर केंद्रित केली जाते, त्यावेळी शरीर चिंतात्मक वृत्ती (हायपोकाँड्रीयाक अॅयटिट्यूड) निर्माण होते.
(३) अभिसंधान सिद्धांत : पाव्हलॉव्ह (१९२७) यांच्या कुत्र्यांवरील मानसशास्त्रीय प्रयोगांनंतर मानसिक प्रयोगशाळांतून आधी प्राण्यांच्या मानसशास्त्राचा व नंतर त्यांच्यात निर्माण केलेल्या प्रायोगिक मज्जावविकृतीचा आणि पर्यायाने मानवी वर्तनाचा पद्धतशीर अभ्यास सुरू झाला (वॉटसन, हल, स्कीनर व वोल्पे). त्यातूनच अध्ययन सिद्धांत निर्माण झाला. अपसामान्य वर्तनाचे परिवर्तन करण्यासाठी या सिद्धांताचे उपयोजन करण्यात आले. (वोल्पे, आयसेंक, आयाँ, राचपन). या सिद्धांताप्रमाणे मूलभूत चिंता निर्माण करणाऱ्या परिस्थितीतील मूळ निरावलंबित उद्दीपक (उदा., भयगंडपीडित रूग्णाच्या अंगावर आलेला विशिष्ट चावरा कुत्रा) आणि त्यासारखा इतर कुठलाही कुत्रा (लहान, गोंडस, शांत व प्रेमळसुद्धा) यांचे अवलंबीकरण होऊन ’कुत्रा हा प्राणी’ हेच अवलंबित उद्दीपक बनते. त्यामुळे मूळच्या कटू अनुभवात उद्भ वलेली भीतीची लक्षणे ही अवलंबित प्रतिसाद बनतात. कुत्र्यापासून पलायन केल्यावर आणि कुत्रा द्दष्टीआड अथवा श्रवणापलीकडे गेल्यामुळे भीती ओसरते व तिच्यामुळे झालेले शारीरिक क्लेश लुप्त होतात. ह्या आरामदायी प्रतिसादामुळे पळून जाण्याच्या सवयीचे आणि कुत्र्याच्या भीतीचे प्रबलन होते आणि त्यामुळे भयगंडाची विकृती पक्की होते.हा विकार प्रचलित असूनसुद्धा क्वचित समजून येतो. याचे कारण भावातिरेकी लक्षणे लपविण्याची वृत्ती या विकारात समाविष्ट असते. तसेच विकृत विचार हेच मुख्य लक्षण असल्याकारणाने ते व्यक्त केल्याशिवाय समजत नाहीत. हा विकार एका विशिष्ट व्यक्तिमत्त्वातूनच उद्भवतो. त्याला ‘अॅनॅन्कॅस्टिक कॅरॅक्टर’ असे संबोधले जाते. अशी माणसे उद्योगी, टापटीप व स्वच्छताप्रिय, मितव्ययी, प्रावीण्यवादी, अतिविवेकी, धर्मभोळी, अतिविचारी व आत्मसमीक्षक असून सतत असमाधानी व क्षीण निश्चयी असतात. लक्षणांना सुरूवात बहुधा तीव्र भीती किंवा किळस वाटणाऱ्या एखाद्या धक्कादायक प्रसंगाने होते. मुख्य लक्षणे पाच प्रकारची असतात :
(१) भावातिरेकी विचार,
(२) सक्तियुक्त कृती,
(३) भयगंड,
(४) निरंतर व्यर्थ विचार (रुमिनेशन) आणि
(५) विकृत कर्मकांड.
भावातिरेकी विचार अनाहूत व अप्रिय असून जाणिवेतून जाता जात नाहीत. त्यामुळे रूग्ण दुःखी - कष्टी होतो. उदा., आदरणीय व्यक्तीबद्दल अपशब्द मनात येणे, विष्ठा - कचरा - खरकटे इत्यादींनी विटाळले गेल्याची कायम शंका, दैंनांदिन क्रिया बरोबर न केल्या गेल्याची सतावणारी शंका अथवा गैरकृती करण्याची इच्छावजा शंका. बहुधा अशा विचारांचा ससेमिरा चुकविण्यासाठी सक्तियुक्त कृती केली जाते. परंतु अशी कृती सक्तीने पुनःपुन्हा करूनसुद्धा भावातिरेकी विचार सहसा ओसरत नाहीत आणि समाधान मिळत नाही. म्हणूनच ती कृती पुन्हा करायची आणखी सक्ती होते. उदा., देवाला पुनःपुन्हा हात जोडणे; हात सारखे धूत बसणे – विशेषतः संडासातून जाऊन आल्यावर; उंबरठा अथवा जमिनीतील भेग ओलांडताना ‘समाधान’ न झाल्यास मागे जाऊन पुन्हा ओलांडणे; कुलुपे - कड्या वारंवार तपासून पाहणे; नोटा अनेकदा मोजून पाहणे इत्यादी. भावातिरेकी भयगंडाचे सर्वसामान्य विषय वा वस्तू म्हणजे घाण, विष्टा, सरपटणारे प्राणी, विषारी पदार्थ, भयंकर रोग, वेड किंवा मरण हे असून त्यांच्याविषयी अतिरेकी भीती वाटते; म्हणून हे विषय वा वस्तू टाळण्याची पराकाष्ठा केली जाते. निरंतर विचार म्हणजे जीवन, मरण, सृष्टी, मनुष्यप्राणी, ‘मी’, अध्यात्म, देवधर्म, नीती वगैरे गहन विषयांवर प्रश्नार्थक तसेच निरर्थक विचार किंवा चर्चा करीत रहाण्याची अनावर व असमाधानी वृत्ती. विकृत कर्मकांड म्हणजे एका विशिष्ट क्रमाने नियमित करण्यात येणाऱ्या निरर्थक सक्तियुक्त कृती. ह्या पाच लक्षणांमुळे रूग्ण हवालदिल व उदासीन बनतो आणि काही वेळा वैतागून आत्महत्येचा पण विचार करतो. ह्या विकाराचे कालसातत्य दीर्घ असून लक्षणांची तीव्रता कमीजास्त होत राहते. आत्मप्रतिमा व आत्मविश्वास यांची पातळी आणि लक्षणांची तीव्रता यांचे प्रमाण व्यस्त असते. ह्या विकारांवर मानसोपचाराचा उपयोग होतो; परंतु वर्तनोपचार जास्त प्रभावी ठरलेले आहेत. विशेषतः उद्दीपक वर्षाव (फ्लडिंग) व उद्दिष्टविरोधी आचरण (नेगेटिव्ह प्रॅक्टीस). सर्व अवसादविरोधी औषधे ह्या लक्षणांची तीव्रता कमी करतात. काही कठीण प्रकारांवर विद्युत् उपचार आणि काही वेळा मानसशल्यचिकित्सा (सायकोसर्जरी) यांचा पण वापर करावा लागतो. अवसादी मज्जाविकृती : अवसादी मज्जावविकृती (डिप्रेसिव्ह न्यूरोसिस) अथवा मज्जाकविकृतीय अवसाद (न्यूरोटिक डिप्रेशन) ह्या विकाराची संकल्पना गेल्या पंधरा वर्षांतच स्पष्ट झालेली आहे. चित्तविकृतीय अवसाद (सायकॉटिक डिप्रेशन) या विकाराच्या लक्षणांशी त्याची तुलना केली जाते. पहिल्या विकारात मूळ व्यक्तिमत्त्व मज्जातविकृतीय असते; परंतु दुसऱ्यात ते भावचक्राकारी (सायक्लोथायमिक) असते. पूर्वायुष्यात पहिल्या प्रकारचे विकार जडल्याचे आढळून येत नाही; त्याउलट दुसऱ्या प्रकारात तसे अनेकदा घडलेले असते. विषण्णतेची तीव्रता पहिल्या विकारात कमी, तर दुसऱ्यात जास्त असते; त्यामुळे आत्महत्येचा धोका दुसऱ्यात जास्त असतो. मज्जािविकृतीय अवसादात लक्षणांची सुरूवात धक्कादायक प्रसंगाने होते व मुख्य लक्षणांत चिंता प्रामुख्याने सापडते; पण चित्तविकृतीय अवसादात ती सापडत नाही. ह्या विकाराला मानसोपचार अत्यंत जरूरीचा असतो. चित्तविकृतीय अवसादाला गुणकारक ठरलेला विद्युत् उपचार ह्या विकारात प्रभावी ठरत नाही. तसेच चिंतानाशक औषधांचा फायदा अवसादविरोधी औषधांपेक्षा जास्त होतो.
----------------------------------------------------------------------------------------
स्त्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 6/5/2020