অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

ओळखा मानसिक आजार

ओळखा मानसिक आजार

  1. धावपळीच्या युगात लोकांचं मानसिक आरोग्य बिघडत चालंल आहे. मानसिक आरोग्य म्हणजे नेमकं काय हे सांगा ?
  2. मानसिक असंतुलन हे समाजातील सर्वंच स्तरामध्ये दिसून येत आहे का? जसे की गरीब,श्रीमंत, अशिक्षितापासून शिक्षितापर्यंत ?
  3. मानसिक आजार आणि शारीरिक वाढ याचा संबंध कसा आहे ?
  4. बऱ्याचदा अनेक मुलमुली लहान पणापासूनच एकटं एकटं राहतात, खूप अध्यात्मिक आहेत, कमी बोलतात असं आपणास दिसून येतं तर हे देखील मानसिक तणावाखाली आहेत असं म्हणता येईल का ?
  5. मानसिक आरोग्य बिघडण्याची नेमकी काय कारणं सांगता येतील?
  6. लहान मुलांचे मानसिक आरोग्य बिघडण्याची नेमकी लक्षणं काय सांगता येतील ?
  7. गंभीर मानसिक आजाराचं प्रमाण किती आहे ?
  8. अनेकदा आपण पाहत असतो रस्त्यानं जात असताना अनेक जण स्वत:शी बोलत असतात हातवारे करत असतात अशा वेळी तो व्यक्ती मानसिक आजाराकडे वळत आहे असं आपण समजायचे का?
  9. मानसिक रुग्णांना डॉक्टरपर्यंत नेण्यात त्यांच्या कुटूंबियांचा मोठा वाटा असतो कारण कोणीही हे मान्य करत नाही की मी मानसिक रुग्ण आहे आणि मला डॉक्टरकडे गेलं पाहिजे काय सांगाल याविषयी ?
  10. मानसिक आजारामध्ये अनुवांशिकता आणि परिस्थितीजन्य असे दोन प्रकार आहेत काय सांगाल याविषयी.?

दिवसेंदिवस आत्महत्या तसंच मानसिक आजाराचं प्रमाण वाढत आहे. २१ व्या शतकातला सर्वांत मोठा आजार म्हणून मानसिक आजार असल्याचं अनेक जाणकार आणि तज्ज्ञांनी सांगितलं. अनुवांशिक असो किंवा परिस्थितीजन्य कारणं असो अशा रुग्णांना मदत करण्यासाठी १०४ हा हेल्पलाईन क्रमांक २४ फेब्रुवारी २०१५ पासून सुरू करण्यात आला आहे. मानसिक आजार झालेल्या कुटूंबातील सहकारी, नातेवाईक, मित्र, शेजारी यांनी रुग्णांचे लक्षणं ओळखून मानसोपचार तज्ज्ञांची मदत घेतल्यास नक्कीच तणावाखाली येऊन आत्महत्या करण्याऱ्यांचं प्रमाण कमी होईल.

मानसिक आरोग्य म्हणजे नेमके काय, त्याची लक्षणं काय आहेत आणि त्याच्यावर उपचार कसे केले जातात याविषयी जाणून घेण्यासाठी ज्येष्ठ मानसोपचार तज्ज्ञ डॉ. नीलम मुळे यांना दिलखुलास कार्यक्रमात आमंत्रित करण्यात आलं आहे. डॉ. मुळे यांनी मानसोपचारामध्ये मास्टरही पदवी प्राप्त केली आहे. निसर्गोपचार, योगा, ध्यानधारणा यामधला ३ वर्ष कालावधीचा पदवी अभ्यासक्रम देखील त्यांनी पूर्ण केला आहे. अमरावती येथे तसेच सध्याच्या सह्याद्री हॉस्पीटलमध्ये देखील मानसोपचारतज्ज्ञ म्हणून त्यांनी काम पाहिलं आहे. २००९ पासून त्यांनी स्वत:ची प्रॅक्टीस सुरू केली असून मानसिक आजाराविषयी जनजागृती करणे हे त्यांचं ध्येय आहे. त्यांच्याशी केलेली दिलखुलास बातचीत.

धावपळीच्या युगात लोकांचं मानसिक आरोग्य बिघडत चालंल आहे. मानसिक आरोग्य म्हणजे नेमकं काय हे सांगा ?


थोडक्यात याची व्याख्या करायची झाल्यास “संतुलित जीवनशैली” असणं म्हणजे मानसिक आरोग्य असं म्हणता येईल. मानसिक आरोग्य हे मेंदू, शरीर आणि मन या तिन्हीशी निगडीत असल्यामुळे या तिघांमध्ये संतुलन असणं खूप गरजेचं असतं. हे संतुलन जोपर्यंत आहे तो पर्यंत आपलं मानसिक आरोग्य चांगलं आहे असं समजलं जातं. सध्याच्या धावपळीच्या आणि स्पर्धेच्या युगात अनेक कारणांमुळे आपलं मानसिक आरोग्य ढासळत चाललं आहे आणि आपण आपल्या जीवनातल्या आनंदी क्षणापासून वंचित राहत आहोत. परिणामी आपण अधिकच तणावग्रस्त बनत चाललं आहे.

मानसिक असंतुलन हे समाजातील सर्वंच स्तरामध्ये दिसून येत आहे का? जसे की गरीब,श्रीमंत, अशिक्षितापासून शिक्षितापर्यंत ?


‘हो निश्चितच. यांच्यासाठी निश्चित असा स्तर किंवा वर्ग नसतो. फक्त त्याची कारणं निरनिराळी आहेत एवढंच.

मानसिक आजार आणि शारीरिक वाढ याचा संबंध कसा आहे ?


पूर्वी वाढत्या वयात या आजाराचं प्रमाण दिसून येत असे. मात्र आज असं नाही म्हणता येणार कारण आज लहान वयातच अनेकांना तणाव दिसून येत असल्यानं मानसिक आजाराचं प्रमाण वाढत आहे. यामध्ये विद्यार्थ्यांचं प्रमाण सर्वांत जास्त आहे. विशेष म्हणजे केवळ ८ ते १० वर्षांच्या मुला-मुलींमध्ये देखील या आजाराचे प्रमाण वाढत असल्याचं दिसून येत आहे आणि ही बाब खूप गंभीर आहे. उदाहरण द्यायचं झालं तर माझ्याकडे एका १० वर्ष मुलीचे पालक माझ्याकडे आले आणि ते म्हणाले की “माझ्या मुलीला अध्यात्माची फार ओढ लागलेली आहे आणि ती नेहमी म्हणत आहे की मला देवाकडे जायचे आहे” विशेष म्हणजे ते पालक खूप खुश होते की त्यांच्या मुलीला देवाकडे जायचे आहे.

पण त्यांना हे माहितीच नव्हतं की त्यांच्या मुलीला एक मानसिक आजार आहे आणि हे आत्महत्येकडे जाण्याचं लक्षण असू शकतं. गंभीर बाब म्हणजे ते पालक मानसिक आजाराविषयी ते अनभिज्ञ होते. या वयोगटातल्या मुला-मुलींमधील वागण्याच्या बदलत जाणाऱ्या सवयीवरून आपणाला याचा अंदाज येणं आवश्यक आहे. त्यांचं शांत शांत राहणं, चिडचिड करणं, बोलण्याच्या पद्धतीत बदल होणं अशा काही गोष्टींवरून आपणास लक्षात यायला हवं की ते मानसिक तणावाखाली आहेत.

बऱ्याचदा अनेक मुलमुली लहान पणापासूनच एकटं एकटं राहतात, खूप अध्यात्मिक आहेत, कमी बोलतात असं आपणास दिसून येतं तर हे देखील मानसिक तणावाखाली आहेत असं म्हणता येईल का ?

नाही. सरसकटपणे असं म्हणता येणार नाही. साधारणपणे दोन प्रकारचे व्यक्तिमत्व असतात. एक सकारात्मक आणि दुसरं नकारात्मक. पहिल्या प्रकारातल्या एखादा अध्यात्माविषयी खूप बोलतो आहे, चर्चा करतो आहे, ज्ञान ग्रहण करतो आहे म्हणजे तो आयुष्याकडे सकारात्मकदृष्टीनं पाहतो आहे, आपल्या जीवनात आणि समाजात सकारात्मक बदल करतो आहे.

हे खरंच समाजासाठी चांगलं आहे. पण नकारात्मक व्यक्ती मात्र त्यामध्ये गुरफटल्या जात असतो. उदाहरण द्यायचं झालं तर एखादा रुग्ण दैनंदिन कामं सोडून दिवसांतले अनेक तास देवासमोर बसलेला असतो, देवाची पूजा केली नाही तर मला काहितरी होईल, माझं कुठलंच काम होणार नाही असे नकारात्मक विचार त्याच्यात निर्माण होतात.

मानसिक आरोग्य बिघडण्याची नेमकी काय कारणं सांगता येतील?


मानसिक आरोग्य बिघडण्याचं मुख्य कारण म्हणजे आजची जीवनशैली होय. आजच्या स्पर्धेच्या युगात मनात आलेली आणि हवी असलेली गोष्ट लगेच हवी आहे. कोणतीही गोष्ट प्राप्त करण्यासाठी जो संयम लागतो तो आजच्या पिढीमध्ये दिसून येत नाही. महत्त्वाकांक्षा असणं वेगळं आणि अतिमहत्त्वाकांक्षा असणं हे वेगळं. या अतिमहत्त्वाकांक्षेपायी आजचा तरूण तणाखाली येत आहे.

लहान मुलांचे मानसिक आरोग्य बिघडण्याची नेमकी लक्षणं काय सांगता येतील ?


आज सगळीकडे विभक्त कुटूंबपद्धती पहायला मिळत आहे. एकत्र कुटूंब पद्धती असताना सहाजिकच सर्वांना आपलं मन मोकळं करण्यासाठी घरात खूप लोकं असायची. विभक्त कुटूंबपद्धतीमध्ये सदस्यांची संख्या कमी असल्यानं लहान मुलं चिडचिडं बनत चालली आहेत. घरात त्यांच्याशी बोलायला कुणीच नसल्यानं मुलं त्यांच्या खेळण्याशी, बाहुल्यांशी बोलतात अनेकदा एकटंच काहीतरी करत बसतात तेव्हा मात्र त्यांच्या पालकांनी लक्ष द्यायला हवं की आपलं मुल एकट्यात काय करत आहे, काय बोलत आहे.
महत्वाचं म्हणजे आजच्या स्पर्धेच्या युगात लहान मुलांना वेळच मिळत नाही. कारण दिवसातले किमान ६ ते ८ तास शाळा, क्लासेस यांच्यात जातात. आजच्या आई वडिलांना वाटतं की माझं मुल स्पर्धेत पुढं जाण्यासाठी जन्मलं आहे. माझं म्हणणं आहे की तुम्ही आपल्या मुलाकडं एक सामाजिक व्यक्तिमत्व म्हणून पहा जे भविष्यात आपल्या समाजाचा एक भाग होणार आहे त्याला त्याप्रमाणं घडवा. तो जरी अभ्यासात कमी असेल तर त्यामध्ये सकारात्मक दृष्टीने बदल घडवून आणा.

गंभीर मानसिक आजाराचं प्रमाण किती आहे ?


साधारणपणे गंभीर मानसिक आजाराचं प्रमाण ३० टक्के आहे. तसं पाहिलं तर आजच्या स्पर्धेच्या युगात प्रत्येक व्यक्तीला कोणता ना कोणता ताण असतोच. अनेक जण आपण केलेल्या कामाबद्दल समाधानी नसतात, ८ ते १० तास काम करुनही काम केल्याचं समाधान मिळत नाही.

अशावेळी आपण आपल्या जीवनशैलीकडे बारकाईने पाहणं गरजेचं असतं. आपला जास्तीत जास्त वेळ कशात जात आहे, आपला जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा आहे हे आपण पाहणं गरजेचं आहे. याकडे दुर्लक्ष केलं तर आपला प्रवास गंभीर मानसिक आजाराकडे होऊ शकतो.

अनेकदा आपण पाहत असतो रस्त्यानं जात असताना अनेक जण स्वत:शी बोलत असतात हातवारे करत असतात अशा वेळी तो व्यक्ती मानसिक आजाराकडे वळत आहे असं आपण समजायचे का?


- निश्चितच. अति ताणामुळे असं होतं. त्या व्यक्तीला आलेल्या ताणामुळे तो इतर कोणाशी बोलत नसतो किंवा त्याला ज्याच्याशी बोलायचे तो व्यक्ती आपल्यासमोर आहे असं त्याला वाटतं आणि तो बोलत सुटतो. बऱ्याचदा मिरगी या आजाराने त्रस्त रुग्ण देखील स्वत:च्या मनाशी बोलताना, हावभाव करताना पाहायला मिळतात.

बऱ्याच व्यक्तींना वस्तूंना वारंवार हात लावण्याची सवय असते. खांब असो, गाडी असो किंवा झाड असो अशा वस्तूंना त्याला हात लावण्याची सवय असते हा देखील एक मानसिक आजारच असतो.

मानसिक रुग्णांना डॉक्टरपर्यंत नेण्यात त्यांच्या कुटूंबियांचा मोठा वाटा असतो कारण कोणीही हे मान्य करत नाही की मी मानसिक रुग्ण आहे आणि मला डॉक्टरकडे गेलं पाहिजे काय सांगाल याविषयी ?


ही महत्त्वाची बाब आहे. कारण रुग्ण तर सोडाच पण कुटूंबिय देखील हे मान्य करत नाहीत की आमच्या कुटूंबात कोणी मानसिक रुग्ण आहे. यासाठी वेगवेगळ्या प्रकारे रुग्णांना डॉक्टरपर्यंत आणण्यासाठी प्रयत्न केले जातात.

जसे की त्याला डॉक्टरकडे जायचे आहे असं न सांगता आपल्याला एका मॅडमला भेटायला जायचे आहे, असे सांगावे लागते. त्याला आवडणाऱ्या गोष्टींवर पहिल्यांदा चर्चा केली जाते. एकदा त्याचा विश्वास संपादन केला की, मग उपचाराला सुरूवात केली जाते.

मानसिक आजारामध्ये अनुवांशिकता आणि परिस्थितीजन्य असे दोन प्रकार आहेत काय सांगाल याविषयी.?


तसं पाहिलं तर अनुवांशिकता खूप महत्त्वाची आहे. आपल्या आजोबा, वडील यांना जर एखादा मानसिक आजार असेल तर शक्यता असते की पुढल्या पिढीला याचा धोका असतो. तसंच परिस्थितीजन्य प्रकारात कुटूंब देखील महत्त्वाचा भाग असतो. आपण एका कुटूंबाचे घटक असतो.

आपण कोणत्या कुटूंबातून आलोत, कुठल्या वातावरणात वाढलो आहोत, शिक्षण कोणत्या क्षेत्रात घेतलं आहे हे खूप महत्त्वाचं आहे. यातून देखील ते तणावाखालून जातात. तरूण पिढीमध्ये तर तणावाचं कारण खूप वेगवेगळे असल्याचं दिसून येत आहे कारण बरेच तरूण फेसबुकवर मला खूप लाईक्स मिळाले, मला गर्लफ्रेंड नाही, मला बॉयफ्रेंड नाही अशा गोष्टींवरून देखील तणावाखाली जाताना पहायला मिळतात.

लेखक - जयश्री श्रीवास्तव

स्त्रोत - महान्युज

अंतिम सुधारित : 6/5/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate