অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

मुलांच्या विकासातील महत्त्वाचे टप्पे

मुलांची वाढ ही एक गुंतागुंतीची व सातत्याने होणारी प्रक्रिया आहे. मुलांनी विशिष्ट वयात विशिष्ट गोष्टी करणे अपेक्षित असते. यालाच मुलांच्या विकासप्रक्रियेतील महत्त्वाचे टप्पे म्हणतात. एक पालक म्हणून आपण हे लक्षात घेणे गरजेचे आहे की कोणत्याही दोन मुलांची वाढ सारख्याच गतीने होत नाही. त्यामुळे शेजारच्याचे मूल असे करू शकते, तसे वागू शकते आणि आपले मूल मात्र तसे वागू शकत नाही, करू शकत नाही म्हणून चिंता करणे व्यर्थ आहे. मुलाने विशिष्ट वयात ज्या गोष्टी करणे अपेक्षित असते त्या त्याने कराव्यात यासाठी थोडी वाट पहाणे व मुलाचे निरिक्षण करणेदेखील गरजेचे आहे.

मात्र काही महिने उलटून गेल्यानंतरही जर मूल त्याच्या वयाला अपेक्षित असे वागत नसेल तर बालचिकित्सा तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. जर मूल आजारी किंवा अस्वस्थ असल्यामुळे असे वागत असेल तर तज्ञांना भेटून ही समस्या दूर होऊ शकते. काही वेळेस मूल काही गोष्टींमध्ये बाकी मुलांपेक्षा बरेच मागे असते तर काही गोष्टींमध्ये बरेच पुढे असते. मात्र त्याच्यावर जोरजबरदस्ती करून त्याला नवीन गोष्टी शिकायला लावणे यात कोणाचाही फायदा नसतो.

विकासप्रक्रियेत होऊ शकणारा उशीर

  • २ महिने: माणसे ओळखून हसणे
  • ४ महिने: मानेचा तोल सावरता येणे
  • ८ महिने: आधाराशिवाय बसता येणे
  • १२ महिने:   उभे राहता येणे

जन्मापासून ६ आठवडे

  • बाळ एका बाजूला मान करून पाठीवर झोपू शकते.
  • अचानक झालेल्या जोरदार आवाजामुळे दचकून त्याचे शरीर ताठ होते.
  • मुठी आवळता येतात.
  • त्याच्या तळहाताला स्पर्श होणारी प्रत्येक वस्तू घट्ट पकडते; ही त्याची स्पर्शाला दिलेली प्रतिक्रिया असते.

६ ते १२ आठवडे

  • डोके ब-यापैकी सावरता येते.
  • एखाद्या वस्तूकडे टक लावून बघता येते.

३ महिने

  • पाठीवर उताणे झोपल्यावर बाळ त्याचे हात पाय ब-यापैकी लयीत हलवू शकते. त्यांमध्ये सुसूत्रता असते. शिवाय ते रडण्याव्यतिरिक्त गुरगुरल्यासारखे इतरही वेगवेगळे आवाज काढू शकते.
  • बाळ आपल्या आईला ओळखते व तिच्या आवाजाला प्रतिसाद देते.
  • बाळाचे पंजे बहुतेकदा उघडे असतात.
  • त्याला उभे धरल्यास ते किमान थोडावेळ तरी आपले डोके सावरू शकते.

६ महिने

  • बाळ आपले हात एकमेकांवर आपटून खेळते.
  • अवतीभवती एखादा आवाज झाल्यास आवाजाच्या दिशेने बघते.
  • पाठीवरून पोटावर उपडे किंवा पोटावरून पाठीवर उताणे वळू शकते.
  • आधाराच्या सहाय्याने थोडावेळ बसू शकते.
  • उभे केल्यास पायांवर थोडे वजन घेऊ शकते.
  • पोटावर झोपवल्यास हात लांब करून त्यांच्यावर आपले वजन पेलवू शकते.

९ महिने

  1. बाळ स्वतःच्या शरीराला हाताने आधार दिल्याशिवाय स्वतंत्रपणे बसू शकते.
  2. हातांवर आणि गुडघ्यांवर रांगू शकते.

१२ महिने

  1. स्वतःहून उभे रहाते.
  2. “आई” म्हणायला व त्यासारखे शब्द बोलायला शिकते.
  3. फर्निचर किंवा एखाद्या वस्तूचा आधार घेऊन चालते.

१८ महिने

  1. स्वतःच्या हाताने पेला धरून न सांडवता पाणी पिते.
  2. खोलीत न पकडता, न धडपडता बरेच अंतर चालते.
  3. थोडे शब्द बोलते.
  4. स्वतःच्या हाताने खाते.

२ वर्षे

  • अंगावरील पायजम्यासारखे कपडे काढू शकते.
  • न पडता धावू शकते.
  • पुस्तकातील चित्रांमध्ये रस घेते.
  • त्याला हवे ते मागू शकते.
  • दुस-याने बोललेले शब्द बोलते.
  • त्याच्या शरीराचे काही अवयव ओळखू शकते.

३ वर्षे

  • बॉल फेकू शकते (डोक्यावरून हात फिरवून, आडव्या हाताने नव्हे)
  • साध्या साध्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकते. उदा: तू मुलगा आहेस की मुलगी?
  • वस्तू आवरून ठेवू शकते.
  • एखाददुस-या रंगाचे नाव सांगू शकते.

४ वर्षे

  • तीनचाकी सायकल चालवू शकते.
  • पुस्तकातील चित्रांची नावे सांगू शकते.

५ वर्षे

  • कपड्याची बटणे लावू शकते.
  • किमान तीन रंग ओळखू शकते.
  • मोठ्या माणसांप्रमाणे पाय-या उतरू शकते.
  • पाय दूर ठेवून उड्या मारू शकते.

 

स्त्रोत डॉक्टर एनडीटिव्ही टीम

अंतिम सुधारित : 6/5/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate