অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

जर्मन गोवर

प्रस्तावना

हा गोवरासारखाच पण अगदी सौम्य आजार असतो, म्हणून याला 'लहान गोवर' असेही म्हणता येईल. हा आजार विषाणूंमुळेच होतो. मुख्यत: मुलांनाच (5 ते 9 वर्षे) होतो. अंगावर पुरळ उठायच्या आधी एक आठवडा आणि नंतर एक आठवडयापर्यंत इतरांना याचा संसर्ग होऊ शकतो. एकदा संसर्ग झाला की पूर्ण प्रतिकारशक्ती येत असल्याने हा आजार पुन्हा होऊ शकत नाही.

जर्मन गोवर आजाराची लक्षणे

विषाणुप्रवेशानंतर सुमारे दोन-तीन आठवडयांनी याची लक्षणे उमटतात. सहसा एक-दोन दिवस किरकोळ सर्दीताप होऊन पुरळ येतात. मात्र कधीकधी पुरळ येतच नाहीत. पुरळ आले तर ते बहुधा चेहरा, छाती, पोट, इत्यादी भागांवर येतात. चेहे-यावर पुरळ असणे हे निदानाच्या दृष्टीने फार महत्त्वाचे आहे. हे पुरळ रंगाने लालसर असतात. ते एक-दोन दिवसांतच पूर्णपणे जातात.

याबरोबर गळयात अवधाण येते. हे अवधाण आठवडाभर आधी येऊ शकते. पुरळ गेल्यावर हे अवधाण दोन-तीन आठवडे टिकू शकते. गळयामागच्या आणि कानामागच्या रसग्रंथीही यामुळे सुजतात. कधीकधी सांधेदुखी, नसांना सूज, इत्यादी त्रासही जाणवतो. पण बहुधा हा आजार आपोआप जातो व विशेष त्रास होत नाही. गरोदरपणात मात्र याचे घातक परिणाम होतात.

गरोदरपणातले दुष्परिणाम

गरोदरपणात जर जर्मन गोवर हा आजार झाला तर विषाणू गर्भात शिरून अनेक प्रकारचे दुष्परिणाम होतात. जन्मजात मोतीबिंदू, काचबिंदू, हृदयाचे दोष, मूकबधिरता,नेत्रपटलाचे आजार,रक्तस्रावाची प्रवृत्ती, मतिमंदत्व, अस्थिसंस्थेचे दोष, चेतासंस्थेचे दोष, इत्यादी अनेक दुष्परिणाम होतात. म्हणून जर्मन गोवर हा आजार टाळणे फार महत्त्वाचे आहे. गर्भारपणात सुरुवातीस हा आजार झालाच तर डॉक्टर गर्भपाताचा सल्लाही देतात,कारण याचे गर्भावर गंभीर दुष्परिणाम दिसतात.

हा आजार टाळण्यासाठी लस उपलब्ध आहे, पण ती अजून सार्वजनिक आरोग्यसेवेत समाविष्ट केलेली नाही. एम.एम.आर. नावाच्या लसीत या रोगाविरुध्दची लसही असते. एकदा लस दिल्यावर कायमची प्रतिकारशक्ती येते. पण लस महाग असते. (एक डोस 45ते 50 रू.)

 

लेखक : डॉ. श्याम अष्टेकर

(MBBS, MD community Medicine)

संदर्भ : आरोग्याविद्या

अंतिम सुधारित : 6/27/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate