অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

कुपोषणमुक्तीसाठी रानभाज्यांचा उपयोग

कुपोषणमुक्तीसाठी रानभाज्यांचा उपयोग

फ्लॉवर, कोबी, गवार आणि बटाटा ह्या रोजच्या जेवणात असणाऱ्या भाज्या आहेत. नेहमीच्या भाज्या खाऊन कंटाळलेल्यांसाठी रानभाज्या ही खुशखबर असते. डोंगरकपारीत राहणारे आदिवासी रानावनात फिरून या भाज्या गोळा करतात आणि नजिकच्या शहरात जाऊन विकतात. अशा रानभाज्या सर्वांना हव्याहव्याशा वाटतात. सर्वसामान्य भाज्यांची आपल्याला माहिती आहे. मात्र, रानकेळी, चायवळ, करटुली, कोरड या भाज्यांची रानभाज्या म्हणून आपल्याला ओळख नाही. या रानभाज्यांमध्ये लोह, तंतुमय पदार्थ व इतर खनिजे भरपूर प्रमाणात आढळतात. सर्वसामान्यांना अपरिचित असलेल्या मात्र पौष्टिक आणि आरोग्यास हितकारक असलेल्या या रानभाज्यांची 'कुपोषणमुक्तीसाठी रानभाज्यांचा उपयोग' या विषयावर दिलखुलास कार्यक्रमातून श्रीमती इंदवी तुळपुळे यांनी दिलेली सविस्तर माहिती जाणून घेऊया...

आपल्या रोजच्या आहारातील भाज्या सर्वसामान्यांना माहिती आहे. मात्र, रानभाज्या म्हणजे काय आहेत, याविषयी सांगा ?

उत्तर – आपल्या रोजच्या आहारात असणाऱ्या भाज्या ह्या शेती करून, लागवडीने, मळा करून लावलेल्या असतात. वांगी, भेंडी, गवार, पालेभाज्या ह्या रोजच्या आहारात असतात. मात्र ज्या भाज्याची लागवड कोणीही केली नसून त्या आपोआप रानात उगवतात अशा भाज्यांना रानभाज्या म्हणतात. निसर्ग हा रानभाज्या भरभरून देत असतो. मोठ्या झाडांची कोंब, पाला, कोवळी फुल, फळे जी स्वतःहून रानात उगवत असतात. असे रानभाज्यांचे अनंत प्रकार आहेत. आदिवासी भागात रानभाज्यांच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात येत्ते. शिवाय रानभाज्या महोत्सवाचे आयोजनही करण्यात येते. यामुळे नव्याने ६० ते ७० रानभाज्यांचा समावेश आहे.

रानभाज्यांची नावे कोणती ती जाणून घ्यायला आवडेल ?

उत्तर – आघाडा, माळा, पुननर्वा, कर्डू, मोरंगी, अबई, दवणा, शेवगा, अगस्ती, काटेसावार, बाहवा, नारइ, लवंडी, वागोटी, भोकू, टाकळा, पांचट, आंबाडी, वर्साकोल, कोहळा, मोरंबा, भोकर, खडकतेरी, तांदुळजा, भोवरी, अशा असंख्य रानभाज्या आहेत. स्थानिक भागात वरील भाज्यांची नावे वेगवेगळ्या परिसरानुसार बदललेली असू शकतात.

कुपोषण रोखण्यासाठी ह्या रानभाज्या कशाप्रकारे फायदेशीर ठरत आहेत ?

उत्तर – डोंगर- दरीत राहणारे आदिवासी यांचे अधिक वास्तव्य हे जंगलात असते. सकाळी उठल्याबरोबर ते लोक जंगलात जात असतात. जंगलातून फेरफटका मारून आल्यानंतर त्यांच्या पदरात, कोंबे, फळे, पाला रानभाज्या असतात. आदिवासी लोकांच्या आहारात प्रामुख्याने ह्याच रानभाज्यांचा समावेश असतो. ते राहत असणाऱ्या ठिकाणी बाजारपेठ उपलब्ध नसल्याने तसेच अनेकदा खिशात पैसे नसल्याने ह्या रानभाज्याच त्यांचा आहार असतो. हा आहार मोफत आणि पौष्टिक असल्याने फायदेशीर आहे. आपण सर्वसाधारणपणे ज्या भाज्या खातो त्यात असणारे पोषण तत्त्वे या रानभाज्यातून मिळत असतात. जी जीवनसत्त्वे आपल्याला पालेभाज्यातून मिळतात तीच जीवनसत्वे रान पालेभाज्यांमधून मिळत असतात. या भाज्यांचे पावसाळ्यात येण्याचे प्रमाण जरी अधिक असले तरी वर्षभर ऋतुमानानुसार या भाज्या येत असतात. त्यामुळे आदिवासी लोकांचा आहाराचा मुख्य प्रश्न सुटतो शिवाय कुपोषणावर देखील या रानभाज्या फायदेशीर आहेत.

विषारी आणि बिनविषारी रानभाज्या कशा ओळखाव्यात ?

उत्तर – रानावनात उगवणाऱ्या अनेक भाज्यांमध्ये विषद्रवे असतात. मात्र आदिवासींना या विषारी भाज्यांचे विष कसे काढायचे आणि यांचा आहाराध्ये समावेश करायचा याचे ज्ञान असते. काही भाज्या या राखेच्या पाण्यात उकळून घेतल्यानंतर त्यातील विषारी पदार्थ कमी होऊन त्या खाण्या योग्य होतात. तर काही भाज्यांचे तुकडे करून ते वाहत्या पाण्यात ठेवल्यानंतर त्याचे विष कमी केले जाते. काही रानभाज्या या अतिविषारी असल्याने त्या खाल्या जात नाहीत. तर काही विशिष्ट जाती – प्रजातीच्या भाज्या या त्याच परिसरात उगवतात पण त्या विषारी नसतात ते त्यांच्या रंग, रूप, आणि वासावरून ओळखले जाते.

रानभाज्या राज्यभर सर्वत्र सारख्याच प्रमाणात आढळतात का ?

उत्तर – जिकडे डोंगर – जंगल अस्तित्वात आहे. तिकडे भौगोलिक परिस्थिती व पावसामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या रानभाज्या आढळतात. ज्या ठिकाणी मानवाचा वावर कमी आहे अशा सर्व ठिकाणी रानभाज्या मोठ्या प्रमाणात आढळतात.

रानभाज्यांमध्ये असलेल्या पैाष्टिक घटकद्रव्यांविषयी माहिती द्या ?

उत्तर – रानभाज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पौष्टिक घटक असतात. कुडा हा सर्वात उपयोगी रानपाला आहे. कुडा हा पोटदुखीवर वापरला जातो. इतर भाज्यांमध्ये झिक, तांबे, कॅल्शियम याचे प्रमाण अधिक असते. रानकेळी हा खोकल्यावर रामबाण उपाय आहे. भारंगीची भाजी ही नवीन फुटलेल्या कोंबाच्या व पानाच्या स्वरुपात असते. यात प्रोटीनही भरपूर असतात. टाकळ्याची भाजी ही मेथीच्या भाजीसारखी असते. अशा प्रकारे अनेक रानभाज्यांमध्ये पौष्टिक घटकद्रव्ये असतात. ही निरोगी आरोग्यासाठी महत्वा अची असतात.

लेखिका: अमृता आनप

माहिती स्रोत: महान्युज

अंतिम सुधारित : 6/5/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate