অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

स्वाईन फ्लूची दक्षता

स्वाईन फ्लूची दक्षता

महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यामध्ये स्वाईन फ्लूला प्रतिबंध करण्यासाठी जिल्हाधिकारी वि. ना. काळम यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. आरोग्य विभागामार्फत प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. स्वाईन फ्लूचा होत असलेला प्रसार ही जरी काळजीची बाब असली तरी घाबरुन जाण्याचे कारण नाही. स्वाईन फ्लूबाबत वेळीच दक्षता घेतल्यास या साथीवर आपण मात करु शकतो. जिल्ह्यात स्वाईन फ्लूचा प्रतिबंध करण्यासाठी आरोग्य विभाग कटिबद्ध असून आरोग्य यंत्रणा २४ तास सक्रिय झाली आहे.

स्वाईन फ्लू म्हणजे इन्फ्लुएन्झा एच १ एन १ या आजाराचे रुग्ण जिल्ह्यात आढळून येत आहेत. हा आजार विषाणूपासून होतो. या आजारामध्ये बाधित व्यक्तीस सर्वसाधारणपणे ताप, सर्दी, खोकला, घसा खवखवणे व दुखणे तसेच श्वास घेण्यास त्रास होणे व क्वचित प्रसंगी उलट्या, जुलाब इत्यादी लक्षणे दिसून येतात. इन्फ्लुएन्झा ए एच १एन १ विषाणू हवेतून पसरतो व त्याचा अधिशयन कालावधी १ ते ७ दिवसांपर्यंत आहे. स्वाईन फ्लूच्या अतिजोखमीच्या व्यक्तींमध्ये ५ मुले आणि त्यातही विशेष करून १ वर्षाखालील बालकांचा समावेश होतो. जिल्ह्यात स्वाईन फ्लूचा प्रतिबंध करण्यासाठी जिल्हाधिकारी वि. ना. काळम यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राम हंकारे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी आवश्यक उपाययोजनांना प्राधान्य दिले आहे.

स्वाईन फ्लूची लक्षणे दिसल्यास त्या व्यक्तीने घाबरुन न जाता शक्य तितक्या कमी लोकांशी संपर्क ठेवून घरी विश्रांती घ्यावी. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. तसेच खोकताना व शिंकताना तोंडावर रुमाल वापरावा, वारंवार साबणाने व पाण्याने हात स्वच्छ धुवावेत. पौष्टिक आहार, लिंबू, आवळा, मोसंबी व संत्री तसेच हिरव्या पालेभाज्यांचा आहार घ्यावा. भरपूर पाणी प्यावे. त्याचबरोबर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार घ्यावा.

स्वाईन फ्लूला प्रतिबंध करण्यासाठी जिल्हास्तरावर ५ वैद्यकीय पथके, तालुकास्तरावर १०, ग्रामीण रुग्णालयस्तरावर १५ पथके, प्राथमिक आरोग्य केंद्रावर ५९ पथके व महानगरपालिका स्तरावर १३ सुसज्ज वैद्यकीय पथके कार्यरत आहेत. सर्व शहरी व ग्रामीण आरोग्य केंद्रावर तपासणी केंद्र कार्यरत करण्यात आली असून तेथे स्वाईन फ्लू प्रतिबंधात्मक पुरेसा औषधसाठा उपलब्ध ठेवला आहे. रुग्णांनी आवश्यकतेनुसार नजीकच्या आरोग्य केंद्रामध्ये तपासणी करुन उपचार करुन घ्यावेत. रुग्णांच्या सोयीसाठी आवश्यकतेप्रमाणे १०२ व १०८ या रुग्णवाहिका सेवा सुरु करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. खाजगी वैद्यकीय व व्यावसायिक प्राथमिक आरोग्य केंद्राकडील वैद्यकीय अधिकारी यांच्या कार्यशाळा घेण्यात आल्या आहेत. शाळा व महाविद्यालय येथील विद्यार्थ्यांना जनजागृतीचा भाग म्हणून याबाबत माहिती देण्यात आली आहे. भारती विद्यापीठ मेडिकल कॉलेज, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतर्गत सांगली सिव्हील व मिरज सिव्हील येथे अतिदक्षता विभाग व गरजेप्रमाणे आयसोलेशन कक्षाची अहोरात्र सुविधा करण्यात आली आहे.

आरोग्य विभागाच्या माध्यमातून जिल्ह्यात स्वाईन फ्लू प्रतिबंधक उपाययोजना राबविण्यात येत आहेत. मात्र या रोगास प्रतिबंध करण्यासाठी खालील गोष्टी प्रत्येकाने जाणून घेणे गरजेचे आहे.

इन्फ्लुएन्झा व्हायरस काय आहे..?

हा विषाणूंमुळे होणारा आजार आहे. याचा संसर्ग एका माणसापासून दुसऱ्या माणसाला होतो.

हे करा...

हात सातत्याने साबण व पाण्याने धुवावेत. गर्दीच्या ठिकाणी किंवा संपर्काच्यावेळी रूमाल व मास्क वापरावा. स्वाईन फ्लू रूग्णापासून किमान एक हात दूर रहा. खोकताना, शिंकताना तोंडाला रूमाल लावा. भरपूर पाणी प्या. पुरेशी झोप घ्या. पौष्टिक आहार घ्या.

लक्षणे...

ताप येणे, खोकला, घसा दुखणे, अतिसार, उलट्या होणे, श्वास घेण्यास त्रास होणे.

हे टाळा...

हस्तांदोलन अथवा आलिंगन, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेणे, अफवा पसरविणे, गर्दीमध्ये जाण्याचे टाळावे.

अति जोखमीचे रूग्ण...

५ वर्षापेक्षा लहान बाळ, ६५ वर्षांपेक्षा मोठी व्यक्ती, गर्भवती महिला, हृदयरोग, फुफ्फुसाचे आजार, यकृताचे आजार, मुत्रपिंड, दमा आजार असणाऱ्या व्यक्ती, रक्ताचे व मेंदूचे आजार असणारे रूग्ण, एच.आय.व्ही./एड्सचे रूग्ण, खूप कालावधीसाठी स्टेरॉईड घेणारे व्यक्ती उदा. दमा असलेल्या व्यक्ती.

आजारी असाल तर...

शक्य तितक्या कमी लोकांशी संपर्क ठेवून घरीच विश्रांती घ्या. पातळ पदार्थ मोठ्या प्रमाणात घ्या.

लेखक: शंकरराव पवार

माहिती स्रोत: महान्युज

अंतिम सुधारित : 4/23/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate