অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

स्वच्छतेचा महोत्सव..

स्वच्छतेचा महोत्सव..

महाराष्ट्राच्या नाशिक जिल्ह्याच्या दिंडोरी तालुक्यातील मोहाडी गावात बुधवारी सकाळी उत्साहाचे वातावरण होते. गावातील प्रत्येक भाग स्वच्छ करून प्रत्येक घरासमोर आणि रस्त्यावर रांगोळी काढण्यात आली होती. रांगोळीच्या माध्यमातून स्वच्छतेचे संदेश देण्यात आले होते. लेझीम पथक, गोंधळी, पारंपरिक वाद्य, पथनाट्य…..जणू गावात ‘स्वच्छतेचा महोत्सव’ सुरू होता…

…जिल्हा परिषदेने नवरात्रीच्या निमित्ताने सुरू केलेल्या ‘जागर नारी शक्तीचा, संकल्प स्वच्छतेचा’ कार्यक्रमांतर्गत गावात प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ‘स्वच्छता हिच सेवा’ उपक्रमांतर्गत जिल्हा परिषदेतर्फे स्वच्छतेत महिलांचा सहभाग वाढविण्यासाठी ग्रामीण भागात ठिकठिकाणी जनजागृती करण्यात येत आहे. उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रतिभा संगमनेरे यांनी यासाठी विशेष पुढाकार घेतला आहे. हा कार्यक्रम उपक्रमाचाच एक भाग जरी असला तरी गावातील उत्साह वेगळाच होता. जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., जिल्हा परिषद अध्यक्षा शीतल सांगळे, मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना यांनी अन्य मान्यवरांसह या कामांना यावेळी भेट दिली.

कार्यक्रमाची सुरूवात स्वच्छता रॅलीने झाली. सनई, हलगी, लेझीम, भगताच्या सादरीकरणातून स्वच्छतेचा संदेश, गोंधळी पथकाच्या माध्यमातून स्वच्छतेचा जागर यामुळे रॅली विशेष अशीच ठरली. रॅलीनंतर जिल्हाधिकारी राधाकृष्णन आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.मीना यांनी श्रमदानात सहभाग घेतला. या प्रसंगी शालेय विद्यार्थींनींनी पथनाट्याद्वारे स्वच्छतेचा संदेश दिला. उपक्रमानिमित्त घेण्यात आलेल्या वक्तृत्व, निबंध आणि रांगोळी स्पर्धेचे पारितोषिक वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या ‘एलईडी व्हॅन’च उद्घाटन श्री.राधाकृष्णन यांच्या हस्ते करण्यात आले. शौचालय बांधकामात चांगली कामगिरी करणाऱ्या वणी आणि चौसाळे ग्रामपंचायतीचा यावेळी सन्मान करण्यात आला. तसेच प्रातिनिधीक स्वरुपात शौचालय अनुदानाच्या धनादेशाचे वितरण करण्यात आले.

यावेळी बोलताना श्री.राधाकृष्णन यांनी मोठ्या ग्रामपंचायतींनी कचरा विलगीकरण आणि प्रक्रियेवर विशेष लक्ष द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. श्रीमती सांगळे यांनी आरोग्यासाठी परिसर स्वच्छता महत्त्वाची असल्याचे सांगून केवळ उद्दीष्ट म्हणून न पाहता स्वच्छतेला दैनंदिन सवयीचा भाग करावा, असे आवाहन केले.

जिल्ह्यात १५ सप्टेंबरपासून ‘जागर नारी शक्तीचा, संकल्प स्वच्छतेचा’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत महिलांचे आरोग्य आणि स्वच्छतेविषयी व्याख्यान आयोजित करण्याबरोबरच त्यांच्यातील आत्मसन्मान जागविण्यासाठी प्रबोधन करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग असलेल्या अशा उत्सवाच्या माध्यमातून लोकसहभाग वाढविण्याचा प्रयत्न अत्यंत स्तुत्य होता.

लेखक: डॉ.किरण मोघे

माहिती स्रोत: महान्युज

अंतिम सुधारित : 1/29/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate