অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

स्तनपान जनजागृती सप्ताह

स्तनपानाबाबत 1 ते 7 ऑगस्ट दरम्यान जनजागृती सप्ताह

राष्ट्रीय माता बाल संगोपन कार्यक्रमाअंतर्गत व युनिसेफ या बाळांसाठी कार्य करणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्वयंसेवी संस्थेतर्फे दरवर्षी 1 ते 7 ऑगस्टदरम्यान आरोग्य विभागामार्फत महिलांसाठी स्तनपान जनजागृती सप्ताह राबविण्यात येतो. यावर्षी पण दि.1 ते 7 ऑगस्टदरम्यान प्रत्येक जिल्ह्यात ‘शून्य मातामृत्यू व शून्य बालमृत्यू’ या संकल्पनेतून सर्व आरोग्य संस्थेत ‘स्तनपान जनजागृती सप्ताह’ साजरा करण्यात येत आहे.

स्तनपान जनजागृती

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गोंदिया, बाई गंगाबाई महिला व बाल रुग्णालय, राष्ट्रीय पोषाहार पुनर्वसन केंद्र गोंदिया यांच्यामार्फत व्यापक प्रमाणावर स्तनपानावर जनजागृती करण्यात येत आहे. राष्ट्रीय स्तनपान जनजागृती सप्ताहानिमित्त प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये तसेच महिला रुग्णालये येथे हिरकणी कक्षाची स्थापना करुन कार्यान्वित करण्यात येणार आहे.

कुपोषण

महाराष्ट्रात मेळघाट, पालघर, नंदूरबार इत्यादी आदिवासी व दुर्गम क्षेत्रातील पाड्यावरील बालके दरवर्षी आपला पहिला वाढदिवस साजरा करण्यापूर्वीच या जगाचा निरोप घेतात. कारण असते कुपोषण. ज्या बाळांना जन्मापासून व्यवस्थित स्तनपान मिळत नाही अशा बाळांचे स्तनपानाअभावी कुपोषण होते. म्हणून ही कोवळी पानगळ थांबविण्यासाठी महाराष्ट्र शासनाने आरोग्य विभागातर्फे ब्रेस्ट फिडींग नेटवर्कच्या माध्यमातून व्यापक प्रमाणात राष्ट्रीय स्तनपान सप्ताहाद्वारे जनजागृती अभियान आयोजित केले आहे.

गर्भवतींना स्तनपानाबाबत प्रशिक्षण

बाळ येण्याची चाहूल लागते अन् ज्यावेळी महिला दवाखान्यात जावून गर्भारपणाची नोंदणी करते. त्यावेळेपासूनच आता एएनसी क्लिनीकमध्ये या गर्भवतींना स्तनपानाबाबत रितसर शास्त्रोक्त पद्धतीने प्रशिक्षण दिले जाणार आहे. कारण ज्यावेळी गर्भवती डॉक्टरांकडे वैद्यकीय तपासणीसाठी येईल, त्यावेळी तिला पोषाहार मार्गदर्शन, वैद्यकीय तपासण्या, लोहयुक्त व कॅल्शियमचा उपचार आदी देण्यात येईल. स्तनपानासंबंधी महत्व पटवून सांगून त्याबाबतचे गैरसमज समुपदेशनाने दूर करण्यात येतील. त्याचबरोबर स्तनासंबंधी काही विकार असतील त्याचे योग्य निदान व उपचार करुन सुलभ स्तनपानासाठी भावी स्तनदा मातांची मानसिक तयारी करुन घेण्यात येते.

एपीजे अब्दुल कलाम अमृत आहाराचा लाभ

आदिवासी व दुर्गम भागातील किशोरवयीन मुलीच या पूर्वीपासून कमी वजनाच्या व मुळातच अॅनिमिक (लोहची कमी) असतात. त्यांचे कमी वयातच लग्न होते आणि त्या पुढे गर्भवती राहिल्या तर त्यांचेच वजन कमी व बॉडी मॉस इंडिक्स कमी असल्याने त्यांना स्तनपानास अडचणी येतात. म्हणून मुले कुपोषित राहू नये म्हणून व गर्भवती महिलांना आदिवासी क्षेत्रात एपीजे अब्दुल कलाम अमृत आहाराचा लाभ देवून स्तनपानातील अडचणी दूर करण्यात येत आहेत.

आशा स्वयंसेविकाला प्रशिक्षण

नवजात शिशुला 100 टक्के स्तनपान बाळाच्या जन्माच्या बरोबरच मिळावे म्हणून प्रत्येक आशा स्वयंसेविकाला, एएनएमला व परंपरागत बर्थ अटेंडला प्रशिक्षण देण्यात आले आहे. आदिवासी भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रातून ‘माहेर’ ही संकल्पना राबवून स्तनदा मातांना नवजात शिशुला द्यायचे स्तनपान व त्याच्या व्यवस्थापनाबाबत समुपदेशन देण्यात येत आहे.

आईचे दूध बाळासाठी अमृत

आईचे दूध हे बाळासाठी अमृतच आहे. जन्म झाल्याबरोबर दिले जाणारे स्तनपान म्हणजे बाळाला मिळणारे पहिले लसीकरण आहे. स्तनपानातून बाळाला जन्मत: रोगप्रतिकार शक्ती प्राप्त होते व आई व मूल यामध्ये बॉण्डींग निर्माण होवून बाळाची मानसिक व शारिरीक वाढ चांगली होते. आजकालच्या सुशिक्षित व उच्चभ्रू शहरी भागातील मातांच्या मनात नवजात शिशुला स्तनपान देताना खूप गैरसमज असतात. परंतू स्तनपान दिल्याने बाळाला तर फायदा होतोच पण स्तनदा मातेला देखील खूप फायदे होतात. बाळाला स्तनपान दिल्याने नैसर्गिकपणे बऱ्याचदा पाळणा लांबतो. स्तनपानामुळे बांधा सुडौल होतो. स्तनपानामुळे त्या महिलांना स्तनाचा कॅन्सर होत नाही. स्तनपान दिल्याने गर्भाशय, अंडाशय व इतर कर्करोगांचा धोका कमी होतो. बाळंतपणानंतर लगेचच स्तनपान सुरु केल्याने नाळ लवकर पडते. गर्भाशय आकुंचन लवकर पावते व बाळंतपणानंतर गर्भाशय पूर्वस्थितीत लवकर येण्यास स्तनपानामुळे चांगलीच मदत होते. युवा अवस्थेत बाळंतपणात नवजात बाळाला भरपूर स्तनपान दिल्यास उतार वयात हाडांचे ढिसूळपणापासून संरक्षण होते.

शहरी भागातील उच्चशिक्षीत नवमाता पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण करुन हवाबंद डब्यातील दूध भुकटी व दूध पावडर बाळाला जन्मापासून देतात. तयार आहाराचे बेबीफूड सुरु करतात, त्यामुळे बाळाला डायरिया व डिहायड्रेशन होते व बरेच बाळ फेल्युअर टू थ्राइव्ह या अवस्थेत पोहोचतात. कुपोषणाने अशी बाळ मरतात. म्हणून स्तनपानाबाबत खरी जनजागृतीची गरज तर शहरी भागातच आहे. स्तनपानाचे बाळाला अनेक फायदे होतात. बाळाला अत्यावश्यक असणारे घटक गायीच्या किंवा म्हशीच्या किंवा शेळीच्या दुधातून मिळत नाहीत. फक्त स्तनदा मातेच्या स्तनपानात बाळाच्या वाढीसाठी आवश्यक सर्व पोषक घटकांचे योग्य प्रमाण फक्त आईच्या दुधातच असते. बाळंतपणाच्या पहिल्या तीन दिवसात स्तनदा मातेला जे (चीक) दूध येते त्या कोलोस्ट्रम म्हणजे भरपूर जीवनसत्व अ व उच्च प्रतीचे रोगप्रतिकार शक्तीकारक इम्यूनोग्लोबूलीन्स असतात. त्यातून बाळाला भविष्यात डायरिया, न्यूमोनिया, श्वसनदाह व इतर जंतू संसर्गापासून संरक्षण मिळते. म्हणून सुरुवातीचे चीक दूध प्रत्येक नवजात शिशुला मिळालेच पाहिजे. इतर दूध किंवा वरच्या दुधापेक्षा स्तनपान देण्यात खूप फायदे आहेत.

आईचे दूध पचायला हलके असते. स्तनपानामुळे बाळाची निकोप व सुदृढ वाढ होण्यास मदत होते. त्याला भविष्यात स्थूलता, रक्तदाब, हृदयविकार व मधुमेह इत्यादी विकारांची शक्यता राहत नाही. त्यामुळे स्तनपान बाळाला दिलेच पाहिजे. सुदृढ बालक हीच देशाची खरी संपत्ती आहे. म्हणून प्रत्येक गर्भवतीच्या पोटी 3 कि.ग्रॅमचा सुदृढ बाळ जन्माला यावा व कुपोषणमुक्त महाराष्ट्र साकार व्हावा, यासाठी शासन सज्ज आहे.

- डॉ.सुवर्णा हुबेकर, वैद्यकीय अधिकारी, बाई गंगाबाई शासकीय स्त्री रुग्णालय, गोंदिया.

माहिती स्रोत: महान्युज

अंतिम सुधारित : 1/30/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate