অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

साथ व साथीचे नियंत्रण

एखाद्या प्रदेशात विशिष्ट आजाराचा उद्भव नेहमीच्या अपेक्षित प्रमाणापेक्षा अधिक झाल्यास साथ आली असे समजले जाते. रोगांची निर्मिती कशामुळे होते व शरीरात त्यामुळे कोणत्या प्रक्रिया घडून येतात, त्याबद्दल फारशी माहिती आणि तिला आधार देणारी प्रत्यक्ष प्रमाणे जेव्हा उपलब्ध नव्हती, त्या काळात साथींचा संबंध दैवी प्रकोपाशी लावला जात असे. माणसांची पातके, त्यांमुळे होणारे दूषित वातावरण, दूषित शरीरे किंवा आकाशातील ग्रह-ताऱ्यांची बदलती स्थिती यांसारख्या गोष्टींनाही साथींच्या आगमनाबद्दल जबाबदार धरले जाई. अठराव्या शतकात सूक्ष्मजंतू आणि त्यांच्यामुळे होणारे संसर्गजन्य (संक्रामणजन्य) रोग यांची माहिती मिळू लागल्यावर ‘साथीचे आजार’ हा शब्दप्रयोग मुख्यतः तीव्र संक्रामणजन्य विकारांच्या संदर्भात प्रचारात आला; उदा., पटकी (कॉलरा), प्लेग, इन्फ्ल्यूएंझा इत्यादी. विसाव्या शतकात आरोग्याविषयी व्यापक प्रमाणात जाणीव होऊ लागल्यानंतर संक्रामणांखेरीज इतर विकारांचा, तसेच आरोग्य-विघातक घटनांचाही अभ्यास साथींच्या शीर्षकाखाली होऊ लागला; उदा., कर्करोग, मधुमेह, हृदयविकार, रक्तदाब, मनोविकार, अपघात, धूम्रपान, मादक पदार्थांचे सेवन, औषधी पदार्थांचे दुष्परिणाम इत्यादी.

एकोणिसाव्या शतकाच्या मध्याच्या सुमारास इंग्लंडमध्ये पटकी व आंत्रज्वराच्या (टायफॉइडाच्या) साथी वरचेवर उद्‌भवत होत्या. त्यावेळी त्यांचा पद्घतशीर अभ्यास करून प्रतिबंध करण्याच्या उद्देशाने रोगपरस्थितिवैज्ञानिक संस्था स्थापन झाली. लंडन शहराला पिण्याचे स्वच्छ पाणी पुरविणे आणि टेम्स नदीत शहराचे मलयुक्त सांडपाणी न सोडणे यांसाठी आवश्यक ते नियम करण्यात या संस्थेचा पुढाकार होता. सार्वजनिक आरोग्यविषयक स्वतंत्र सरकारी विभाग याच सुमारास स्थापन होऊन साथीच्या रोगांच्या अभ्यासास चालना मिळाली. मुख्यतः तीव्र संसर्गजन्य विकारांच्या प्रतिबंधाचा उद्देश पुढे ठेवून हा अभ्यास होत असतो. त्यातून समाजाचे सर्वसाधारण आरोग्य सुधारुन समाजकल्याणास मदत होत असते.

अशा रोगपरिस्थितिवैज्ञानिक अभ्यासात साथीच्या रोगाची भौगोलिक व्याप्ती आणि समस्येची तीव्रता अचूकपणे जाणून तिची नोंद करण्याचा उद्देश प्राधान्याने सर्वप्रथम असतो. त्याबरोबरच रोगनिर्मितीची सर्व कारणे शोधली जातात; उदा., सूक्ष्मजीवांचा प्रकार, दूषित पाणी किंवा खाद्यपदार्थ, प्रतिकारशक्तीमधील न्यूनता, कुपोषण, हवेचे प्रदूषण, वैयक्तिक आरोग्य-विषयक सवयी इत्यादी. या सर्व अभ्यासातून मिळालेली माहिती संकलित होऊन तिच्या पोश्वभूमीवर आरोग्यसेवेचे नियोजन केले जाते. तसेच या नियोजित सेवेची अंलबजावणी व तिचे मूल्यमापन यांसाठीही अशी माहिती उपयुक्त ठरते.

ही सर्व उद्दिष्टे समोर ठेवून कराव्या लागणाऱ्या अभ्यासाच्या पद्घतीमध्ये काही भाग वर्णनात्मक तर इतर भाग सखोल विश्लेषणात्मक असतो. त्यासाठी सांख्यिकीय सूत्रांचा उपयोग करणे इष्ट असते. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रत्येक रुग्णावर त्वरित उपचार करीत असतानाच असा अभ्यास शांतपणे नियोजित केला जातो. लोकांमध्ये निष्कारण निर्माण होणारे धास्तीचे वातावरण कमी करण्यासाठी अभ्यासाचे निष्कर्ष उपयोगी पडू शकतात. त्यामुळे हा अभ्यास त्वरित सुरु करणे आवश्यक ठरते. पुढील काही प्रश्नांची उत्तरे प्राप्त करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभाग अशा प्रसंगी कार्यरत होतो :

(१) रोगाचा धोका असलेली लोकसंख्या किती आहे व कोणत्या प्रकारची आहे? उदा., शाळकरी मुले, नदीकाठची वस्ती, यात्रेकरु, उपाहारगृहात खाणाऱ्या व्यक्ती इत्यादी. रोगांचे प्रमाण (वारंवारता) निश्चित करण्यासाठी जी छेदस्थानाची संख्या आवश्यक असते ती प्राप्त करण्यासाठी हा आकडा आवश्यक असतो. उदा., एकूण वीस हजार शाळकरी मुलांपैकी एक हजारांना गोवर झाला आहे असे कळू शकले, तर दुसऱ्या एखाद्या ठिकाणच्या प्रमाणापेक्षा हे अधिक आहे किंवा कसे हे ठरविता येते.

(२) रोगाची निश्चिती येत असलेला ताप इन्फ्ल्यूएंझा, डेंग्यू, हिवताप किंवा इतर काही रोगांमुळे आहे? जुलाब, उलट्या ही लक्षणे पटकीची का ग्रॅस्ट्रोची? काविळीचे कारण काय? इन्फ्ल्यूएंझाचा प्रकार कोणता? पूर्वी आलेल्या साथीमधील विषाणू व आताचे विषाणू यात काही फरक आहे का?

(३) साथीचा उद्‌भव केव्हा झाला? आजार किती दिवस टिकत आहे? कोणत्या ऋतूत अधिक रुग्ण आढळतात?

(४) प्रदेशाच्या किंवा शहराच्या कोणत्या भागात उद्‌भव झाला आहे? नकाशा पुढे ठेवून त्यावर साथीच्या प्रगतीची नोंद करणे आवश्यक ठरते.

(५) आजारी पडणाऱ्या व्यक्तींमध्ये प्रामुख्याने कोणत्या प्रकाराचे आधिक्य आहे? वय, लिंगभेद, व्यवसाय, सामाजिक दर्जा व व्यसनाधीनता यांसारखे घटक ओळखू येतात का?

(६) रोगाच्या प्रसाराचे स्वरुप कसे आहे? एकाच ठिकाणी केंद्र आहे की अनेक केंद्रांपासून तो पसरत आहे? लागणीचा वेग मंद आहे की शीघ्र? प्रसारामध्ये प्रवासी व्यक्ती, आहाराचा प्रकार व प्रत्यक्ष संपर्क यांसारख्या घटकांची भूमिका आहे का? उदा., २००३ मधील ‘सार्स’ २००९ मधील ‘स्वाईनफ्ल्यू’ या रोगांत आंतरराष्ट्रीय प्रवास हा महत्त्वाचा घटक होता [⟶ सार्स]. रोगसंक्रामण एखाद्या केंद्राकडून सर्वांना होत आहे का? (उदा., अन्न-विषबाधा); अथवा संक्रा मणाची साखळी आहे का? (उदा., पटकी, आंत्रज्वर इत्यादी).

साथींचा अभ्यास करताना एखाद्या जनसमूहाचा एकाच वेळी केलेला अभ्यास (अवच्छेदीय अभ्यास) जसा उपयुक्त असतो; त्याचप्रमाणे अशा समुदायाचा किंवा विशिष्ट गटाचा दीर्घकालिक अभ्यास करणेही बोधप्रद असते. साथीचे पुनरागमन, अन्य रोगांचा आढळ, विकारामुळे निर्माण होणारी दीर्घकालिक दुर्बलता यांसारख्या अनिष्ट परिणामांची माहिती त्यामुळे मिळू शकते. अभ्यासासाठी निवडलेल्या जनसमूहांना जे आरोग्यविषयक निर्देशांक लावले जातात (उदा., आजाराच्या उद्भवाचे किंवा नवीन रुग्णांचे प्रमाण, एकूण रुग्णांची जनसमूहातील टक्केवारी, आजारामुळे घडून येणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण, अपंगत्वाचे किंवा तात्पुरत्या दुर्बलतेचे प्रमाण, वंध्यत्वाचे प्रमाण इत्यादी). तसेच निर्देशांक वापरुन दुसऱ्या एखाद्या गटावर केलेला तुलनात्मक अभ्यासही रोगाच्या स्वरुपाविषयी बरीच माहिती देऊ शकतो. ज्या देशांमध्ये आरोग्यविषयक नोंदी ठेवण्याच्या पद्घती शंभर-दीडशे वर्षांत चांगल्या रुढ झालेल्या आहेत आणि विश्वसनीय आहेत, अशा देशांमध्ये एखाद्या विशिष्ट आजाराचा मागोवा घेऊन त्याच्या उद्भवामागील कारणांबद्दल अनुमाने काढण्याची पद्घतही आता परिणामकारक ठरत आहे. भूतलक्षी अभ्यासाच्या या पद्घतीमुळे हृदयविकार, वाढता रक्तदाब व मधुमेह यांसारख्या दीर्घकालिक आणि मंद गतीने उद्‌भवणाऱ्या समस्यांची सांगड व्यक्तीच्या जन्माच्या वेळच्या वजनाशी किंवा गर्भावस्थेतील घटनांशी घालण्याचे प्रयत्न केले जात आहेत. साथग्र स्त लोकसमूहांच्या निरीक्षणाप्रमाणेच प्रायोगिक अभ्यासातूनही रोगांच्या कारणांबद्दल व शरीरात घडणाऱ्या विकृतिवैज्ञानिक आणि प्रतिरक्षावैज्ञानिक बदलांबद्दल माहिती मिळू शकते. तसेच रोगनिदान, प्रतिबंध व निर्मूलनासाठी शोधून काढलेल्या तंत्रांची चाचणी करता येते. प्राण्यांवरील प्रयोगांमधून विविध लशींची निर्मिती करण्यास मदत झाली आहे. तसेच जीवनसत्त्वांचा अभाव आणि मुडदूस, स्कर्व्ही यांसारखे विकार यांचा संबंध प्रस्थापित करणे शक्य झाले आहे. माणसांवरील प्रयोगांमधूनही स्कर्व्ही, हिवताप, पीतज्वर, उपदंश व एड्स यांच्यासंबंधी अधिक माहिती मिळत आहे. अशा सर्व प्रायोगिक संशोधनांत (प्राण्यांवरील व माणसांवरील) अभ्यासाची उपयुक्तता, अपरिहार्यता आणि संबंधित व्यक्ती किंवा प्राण्यांचे हक्क यासंबंधी अनेक नैतिकतेचे प्रश्न उभे राहतात. त्यांची दखल प्रयोगांच्या नियोजनापूर्वी घ्यावी लागते. व्यक्ती, व्यक्तीचा परिसर आणि हानिकारक घटक (सूक्ष्मजीव किंवा परोपजीवी) यांच्यामधील परस्परक्रि यांचा एक समतोल नेहमी टिकून असतो. तो विचलित झाल्यामुळे साथीचा उद्‌भव व प्रसार होत असतो, असे मानले जाते. साथींच्या अभ्यासाच्या वर दिलेल्या पद्घतींमुळे या तीनही घटकांबद्दल विस्तृत माहिती मिळविणे शक्य होते. या माहितीच्या आधारे साथींचे नियंत्रण केले जाते. त्यासाठी वापरली जाणारी काही धोरणे व तंत्रे यांचा विचार यापुढील भागात केला आहे. संसर्गजन्य रोगाला कारणीभूत रोगजंतूंचे उगमस्थान असणारा रुग्ण, त्यापासून इतरत्र प्रसार होण्याचे मार्ग आणि या मार्गांनी येणाऱ्या यासंक्रामणाचे लक्ष्य ठरणारी ग्र हणशील अथवा विकारविवश निरोगी व्यक्ती अशा तीन घटकांची साखळी साथींच्या नियंत्रणात विचारात घेतली जाते. या साखळीतील एक किंवा अधिक दुर्बल घटक निवडून त्यांवर उपाययोजना केली जाते. ती करताना तंत्राची उपलब्धता, आर्थिक पाठबळ, परिणामकारकता, जनतेकडून मिळणाऱ्या सहकार्याची शक्यता, राजकीय पाठबळ आणि सरकारच्या किंवा नगरपालिकांसारख्या यंत्रणेच्या विविध विभागांचे आपापसातील सहकार्य हे सर्व घटक विचारात घ्यावे लागतात.

उगमस्थान किंवा संचयावरील उपाय

(१) त्वरित व अचूक रोगनिदान. रुग्णाच्या तपासणीबरोबरच (वैद्यकीय तज्ज्ञांकडून) प्रयोगशाळेच्या सेवेची मदत घेणे. (२) संशयित रुग्णाच्या तपासणीपाठोपाठ रोगाचे केंद्र ठरु शकणाऱ्या रुग्णांची अधिसूचना स्थानिक आरोग्याधिकाऱ्यांना देणे; यासाठी आवश्यक ती रोगासंबंधी माहिती प्रसिद्घीस देणे किंवा कायदेशीर आवेदन प्रसृत करणे. कोणत्या रोगांच्या बाबतीत अशी सूचना सक्तीची करावयाची याचा निर्णय देश आणि परिस्थिती यांनुसार बदलू शकतो. सामान्यतः पटकी, प्लेग व पीतज्वर यांसारख्या गंभीर आजारांची दखल सर्वत्र घेतली जाते व स्थानिक संस्थांकडून त्यांची सूचना जागतिक आरोग्य संघटनेपर्यंत पोहोचणे अपेक्षित असते. यांखेरीज जागतिक पातळीवर काही रोगांच्या वारंवारतेबद्दल सतत निरीक्षण चालू असते; त्यांच्याही अधिसूचनांचे अहवाल वरचेवर पाठविणे इष्ट असते; उदा., हिवताप, पोलिओ (बालपक्षाघात), टायफस, ज्वर, इन्फ्ल्यूएंझा इत्यादी. (३) वैद्यकीय व्यावसायिक, सामाजिक कार्यकर्ते आणि इतर जबाबदार नागरिक यांच्याकडून रोगाच्या उद्भवाबद्दल मिळालेल्या माहितीच्या (अधिसूचना) आधारे साथीबद्दल रोगपरिस्थितिवैज्ञानिक अन्वेषण सुरु करणे. या अन्वेषणात पूर्वी उल्लेख केलेले अभ्यासाविषयक सर्व मुद्दे विचारात घेतले जातात. उदा., जनसमूहांची वैशिष्ट्ये , भौगोलिक स्थिती, वातावरण, पूर्वी आलेल्या साथी इत्यादी. याचवेळी घरोघर जाऊन नवीन रुग्णांची माहिती घेतली जाते व साथीच्या नियंत्रणास उपयुक्त असा सविस्तर अहवाल तयार केला जातो. (४) औषधोपचार सर्व रुग्णांना मिळतील याची खात्री करणे. रुग्णांना आराम मिळवून देणे आणि गुंतागुंती टाळण्यास मदत करणे या उद्दिष्टांबरोबरच संक्रामणाचा प्रसार कमी करणे हाही उद्देश यामागे असतो. त्यामुळे शक्य तेवढ्या कमी खर्चात व जमल्यास विनामूल्य उपचाराची सोय शासनास करावी लागते. कधीकधी रुग्णाबरोबरच त्याच्या संपर्कात आलेल्या निरोगी व्यक्तींनाही औषधोपचार करणे इष्ट ठरते. त्यामुळे रोगाच्या प्रसारास आळा बसू शकतो. (५) संक्रामणाचा उद्‌गम असलेल्या व्यक्तींना समाजापासून अलग ठेवणे. नियंत्रणाचा हा उपाय बराच गैरसोयीचा आणि परिणामांच्या दृष्टीने विवाद्य ठरतो. रुग्ण व त्याच्या संपर्कातील व्यक्तींपासून संसर्गाचा धोका किती काळ आहे किंवा असू शकेल याचा अंदाज घेऊन अलगीकरणाची (विलग्नवासाची) मुदत ठरविली जाते. लक्षणे स्पष्टपणे दाखविणाऱ्या रुग्णांना विशेष रुग्णालयात दाखल करणे निश्चितपणे स्वागतार्ह ठरते; परंतु रुग्णांची संख्या मोठी असल्यास ते अशक्य होते. अशा वेळी रोगग्रस्त कुटुंबाशी संपर्क टाळण्याचा सल्ला जनतेला देणे एवढेच अधिकाऱ्यांच्या हातात असते. अलगीकरणाची कारवाई समाजाचा फारसा विरोध न होता राबविता येते; परंतु संपर्कात आलेल्या निरोगी व्यक्तींना दूर ठेवण्याची उपाययोजना कष्टप्रद ठरते. आंतरराष्ट्रीय स्तरावर विलग्नवासाची उपाययोजना अधिकच कठीण, परंतु उपयुक्त ठरु शकते. याचा अनुभव २००३ साली चीनमध्ये उद्‌भवलेल्या सार्सच्या साथीमध्ये आला आहे. तसेच भारत व जगभर पसरलेल्या ⇨ स्वाइन फ्ल्यू रोगाच्या साथीचा अनुभव २००९ साली आला आहे. पूर्वीच्या सागरी प्रवासाच्या काळात नेहमी अंमलात आणला जाणारा संपूर्ण जहाजाच्या विलग्नवासाचा उपाय आता मागे पडला आहे. अलगीकरण आणि विलग्नवासांच्या उपायांमुळे सुरक्षिततेची खोटी जाणीव निर्माण होऊ शकते, हे लक्षात घेऊन आधुनिक काळात संनिरीक्षण अधिक जाणीवपूर्वक केले जाते. [→ विलग्नवास].

संक्रामणाच्या प्रसारावरील उपाय : परिसरातील रोगवाहक घटक निश्चित करून त्यांच्यात आवश्यक ते बदल घडवून प्रसार कमी करता येतो. पाण्यावाटे पसरणारी साथ रोखण्याकरिता पिण्याच्या पाण्याचे सर्व स्रोत (विहिरी, तळी, नद्या व नळयोजना) क्लोरीन किंवा विरंजक चूर्ण वापरुन वरचेवर रोगमुक्त ठेवले जातात. उदा., पटकी, आंत्रज्वर, ग्रॅस्ट्रो व कावीळ यांसारख्या साथी. तसेच त्यामध्ये उत्सर्जित द्रव्यांमुळे होणारे प्रदूषण टाळण्यासाठी सांडपाण्याच्या निचऱ्यावर लक्ष ठेवले जाते. अन्नाद्वारे (दूध, भाजीपाला, शिजविलेले अन्न इ.) प्रसार होत असल्यास अशा पदार्थांची स्वच्छ हाताळणी, ताजे अन्न सेवन करण्यावर भर देणे, शीतन करावयाचे असल्यास ते विनाविलंब करणे व अन्न शिजविण्याची क्रिया अधिक काळ करण्यावर भर देणे हे उपाय अंमलात आणले जातात. प्रसंगी दूषित किंवा संशयास्पद अन्नाच्या वितरणावर बंदी घालणे व ते जप्त करून नष्ट करणे यांसारखे कठोर उपाय अवलंबणे अपरिहार्य ठरते. रुग्णांच्या श्वसनामार्गे साथ पसरण्याचा धोका असल्यास मोठ्या प्रमाणावर मुखाच्छादनांचा वापर आणि सार्वजनिक कार्यक्रमांना तात्पुरती बंदी घालणे (सभा, चित्रपट, नाटके, शिक्षणसंस्था इ.) हितावह ठरते (उदा., सार्स व स्वाइन फ्ल्यू यांची साथ). रोगवाहक कीटकांचा व प्राण्यांचा प्रसारातील वाटा लक्षात घेऊन हिवताप, प्लेग इ. साथींमध्ये कीटकनाशनाचे उपाय; पैदास थांबविण्याचे उपाय (उदा., डेंग्यू ज्वर); पाळीव प्राणी, भटकी कुत्री, गुरे व उंदीर यांसारख्या रोगवाहकांवर नियंत्रण हे काही अन्य उपाय संक्रामणाचा प्रसार रोखू शकतात. परिसर स्वच्छ ठेवल्याने आणि सांडपाण्यामुळे होणारी दलदल कमी केल्याने डास व माश्या यांचा उपद्रव कमी होऊन अनेक संसर्गजन्य रोगांच्या साथींवर नियंत्रण ठेवणे शक्य होते. [→ रोगप्रतिबंधक आणि सामाजिक वैद्यक; सार्वजनिक स्वच्छता व आरोग्य].

साथीला बळी पडू शकणाऱ्या व्यक्तींना अनुलक्षून करावयाचे उपाय

रोगसंक्रामणाच्या संसर्गाचा धोका असणाऱ्या व्यक्तींची संख्या मोठी असल्यामुळे त्यांच्यासाठी अंमलात आणावयाचे उपाय खर्चिक असू शकतात. तसेच त्यांचा परिणाम दिसून येण्यास वेळ लागू शकतो. संक्रामणापासून संरक्षण करणारी प्रतिजैविक (अँटिबायॉटिक) द्रव्ये आणि इतर जंतुप्रतिरोधक औषधे उपलब्ध होण्यापूर्वी, मुख्यतः प्रतिरक्षायंत्रणेवर अवलंबून असलेले उपायच वापरात होते. योग्य नियोजनपूर्वक अंमलात आणले तर हे उपाय अनेक साथींना प्रतिबंध करु शकतात व त्यांची तीव्रता कमी करु शकतात.

स्वार्जित प्रतिरक्षण

निरोगी व्यक्तींच्या शरीरात प्रतिपिंड (अँटिबॉडी) निर्माण करण्यास उत्तेजन देणाऱ्या या उपायांमध्ये अनेक प्रकारच्या लशींचा समावेश होतो. प्रत्येक व्यक्तीमध्ये अशा लसीकरणामुळे १००% प्रतिरक्षण होत नसले, तरी लोकसंख्येतील मोठा हिस्सा प्रतिरक्षित झाल्यामुळे रोगाच्या प्रसारास निश्चित आळा बसतो. या परिणामास ‘कळप प्रतिरक्षा’ असे म्हणतात. प्रतिरक्षणाचा कार्यक्रम योग्य वेळी, तांत्रिक आणि प्रशासकीय बाजूंची शक्यता लक्षात घेऊन व जनतेच्या सहकार्याने राबविल्यास त्याची परिणामकारकता वाढते. राष्ट्रीय पातळीवर व जागतिक आरोग्य संघटनेच्या मदतीने असे अनेक कार्यक्रम विशेषतः लहान मुलांध्ये १९७४ पासून अस्तित्वात आहेत. त्यात पोलिओ, घटसर्प, डांग्या खोकला, धनुर्वात व क्षयरोग यांच्या लशींचा समावेश होतो. विसाव्या शतकाच्या अखेरच्या दशकात यांमध्ये गोवर, कावीळ, गालगुंड इत्यादींची भर पडली आहे. यांखेरीज आवश्यकतेनुसार साथींच्या प्रसंगी स्वार्जित प्रतिरक्षणासाठी वापरल्या जाणाऱ्या लशींमध्ये पटकी, प्लेग व आंत्रज्वर या लशींचा समावेश होतो. विशिष्ट व्यक्तींमध्ये घ्यावयाच्या लशीमध्ये पित्तज्वर, मेंदूज्वर, परिमस्तिष्कशोथ व श्वानदंशामुळे होणारा अलर्क रोग यांचा उल्लेख करता येईल. इन्फ्ल्यूएंझा व एड्स यांसारख्या रोगांवरील लशी विकसित होत आहेत, तर काविळीसारख्या काही रोगांसाठी आवश्यकतेनुसार लशींचे उत्पादन करून पुरवठा केला जातो. [→ लस व अंतःक्रामण].

परार्जित प्रतिरक्षण

संक्रामणास प्रतिकार करणारे प्रतिपिंड तयार स्वरुपात बाहेरुन पुरविण्याच्या या पद्घतीत अनेक तोटे आहेत. प्राणिजन्य पदार्थांना उद्‌भवणाऱ्या अनिष्ट प्रतिक्रिया, अल्पकाळ (१ ते ६ आठवडे) मिळणारी सुरक्षा, खर्च आणि उपलब्धतेमधील अडचणी या कारणांमुळे अशा प्रतिरक्षणाचा उपयोग मर्यादित प्रमाणात होतो. मुख्यतः रुग्णांसाठी वापरली जाणारी ही द्रव्ये (इम्युनोग्लोब्युलीन, रक्तजल, प्रतिविषे, मानवी रक्तजलापासून तयार केलेली प्रतिरक्षक द्रव्ये इ.) त्वरित लक्षणे दूर करु शकतात; परंतु निरोगी व्यक्तींमध्ये त्यांचा उपयोग केवळ विशेष संपर्कातील नातेवाईक, रुग्णालयीन किंवा साथग्रस्त संस्थांमधील सेवक, प्रतिरक्षान्यूनता असणारे संपर्कग्रस्त व गर्भिणी यांच्यासाठी करणे शक्य होते. घटसर्प, धनुर्वात, वायुकोथ (ग्रॅस गँग्री न), अलर्क रोग, कावीळ, जर्मन गोवर व कांजिण्या यांच्या प्रतिपिंडांची उपलब्धता सामान्यतः आढळून येते.

रासायनिक (औषधांच्या साहाय्याने) रोगप्रतिबंध

साथीच्या रोगांपैकी ज्यांच्या विरुद्घ औषधे उपलब्ध आहेत अशा रोगांपासून निरोगी व्यक्तींचे संरक्षण करणे आता सुलभ झाले आहे. जंतुरोधक औषधांपैकी सर्वांत परिणामकारक; परंतु कमीत कमी खर्चाचे औषध निवडून त्याची पुरेशी मात्रा रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींना दिल्यास रोगाचा प्रसार थांबविता येतो. औषधाच्या विशिष्ट मात्रेची पुरेशी उपलब्धता, तिच्या उपयोगाबद्दल जनतेस सल्ला देणे आणि जंतूमध्ये औषधाविरुद्घ प्रतिकारशक्ती निर्माण होत नाही याची खात्री करून घेणे यांबद्दल प्रशासनास जागरुक राहावे लागते. पटकी, घटसर्प, मस्तिष्कावरणशोथ, डोळे येणे, हिवताप व प्लेग यांच्या साथींमध्ये अशी उपाययोजना यशस्वी ठरली आहे.

प्रतिबंधाचे सर्वसाधारण उपाय

दीर्घकालिक प्रतिबंधासाठी काही धोरणात्मक निर्णय व त्यांची अंलबजावणी यांकडे सतत लक्ष पुरवावे लागते. पोषक आहार, जीवनसत्त्वाचे वाटप, स्वच्छ पाण्याचा पुरवठा, दाटीवाटी नसलेली घरे, आरोग्यविषयक शिक्षण, प्रयोगशाळांची उपलब्धता, आरोग्यविषयक कायद्यांची व नियमांची अंलबजावणी (उदा., उघड्यावर खाद्यपदार्थ न विकणे) आणि सर्व कार्यक्रमांध्ये समाजाचा सहभाग यांसारख्या अनेक गोष्टी साथींचा प्रसार थांबविण्यास मदत करु शकतात.

संनिरीक्षण

साथीचा उद्‌भव आणि प्रसार यांबद्दलच्या सर्व घटकांची सतत समीक्षा म्हणजे संनिरीक्षण होय. नियंत्रणाचे वर दिलेले सर्व उपाय साथ चालू असताना अवलंबिले जातात. साथ पूर्णपणे आटोक्यात आल्यावरही संनिरीक्षण चालूच ठेवणे आवश्यक असते. संनिरीक्षणात संभाव्य नवीन रुग्णांचा कसोशीने शोध घेतला जातो. संशयित लागणीची प्रयोगशाळेच्या मदतीने छाननी होते. तिचा उगम आणि संपर्कात आलेल्या व्यक्तींद्वारे संभाव्य प्रसार यांचा अभ्यास केला जातो. मिळालेल्या माहितीचे वेळोवेळी संकलन करून ती इतरत्र पाठविली जाते. प्रयोगशाळेतील रक्तरसशास्त्रीय (प्रतिरक्षावैज्ञानिक)निष्कर्षांची तुलना पूर्वी उद्‌भवलेल्या साथींशी केली जाते. तसेच इतरत्र येणाऱ्या साथीशी केली जाते. या सर्वंकष अभ्यासाचा उद्देश नियंत्रणास मदत करणे आणि साथीचा प्रतिबंध करणे असा असतो.संनिरीक्षण स्थानिक पातळीवर सुरु होते; परंतु त्याचा विस्तार प्रादेशिक, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरांवर होत असतो. विविध उपायांच्या यशस्वीतेचा किंवा निष्फळतेचा अभ्यास करून त्यांमध्ये सुधारणा सुचविल्या जातात. त्या सर्वांचा उपयोग करून प्रत्येक प्रशासनास आपला आरोग्यविषयक कार्यक्रम अधिक परिणामकारक रीत्या नियोजित करणे शक्य होत असते.

--------------------------------------------------------------------------------------

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/23/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate