অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

श्वेतकोशिकाधिक्य

श्वेतकोशिकाधिक्य

हीमोग्लोबिनयुक्त रक्तकोशिकांचा (तांबड्या पेशींचा) अपवाद सोडल्यास रक्तातील इतर सर्व कोशिका श्वेतकोशिका या वर्गात मोडतात. त्या सर्व केंद्रकयुक्त आणि चलनक्षम असतात [ कोशिका]. त्यांच्या विविध प्रकारांपैकी बिंबाणूंचे वास्तव्य आणि कार्यक्षेत्र रक्तात आणि रक्तवाहिन्यांच्या अंतर्गत मर्यादेत असते. इतर सर्व श्वेतकोशिकांचे रक्तातील अस्तित्व केवळ परिवहनासाठी असते. अस्थिमज्जेत निर्माण होणाऱ्या कणकोशिका व एककेंद्रक कोशिका तसेच शरीरभर विविध इंद्रियांमध्ये विखुरलेल्या लसीकाजनक ऊतकात [समान रचना व कार्य असणाऱ्या कोशिकासमूहात; ⟶ लसीका तंत्र] निर्माण झालेल्या लसीका कोशिका आणि प्लाविका कोशिका काही तास रक्तात तरंगतात व केशिकावाहिन्यांच्या सूक्ष्म छिद्रांमधून ऊतकांमध्ये प्रवेश करतात. विविध ऊतकांच्या किंवा लसीका गंथींच्या ऊतकद्रवांमध्ये त्यांचा पुढे विकास होतो व कार्य सुरू होते. या सर्व गोष्टी लक्षात घेतल्यास असे दिसते की, श्वेतकोशिकांच्या रक्तातील संख्येत होणारी वाढ किंवा घट याची कारणे प्रत्यक्ष रक्ताशी संबंधित नसतात, रक्तातील बदल त्यांच्या निर्मितिस्थळांमध्ये किंवा कार्यस्थानी असणाऱ्या कारणांचे प्रतिबिंब असते. त्यांचा रोगनिदानासाठी उपयोग होऊ शकतो. उपचारांच्या परिणामाचीही त्यातून कल्पना येते.

बिंबाणुव्यतिरिक्त इतर सर्व श्वेतकोशिकांची रक्तातील एकूण संख्या प्रतिमायक्रोलिटर (घन मिलीमीटर) ४,००० ते १०,००० असते. प्रत्येक प्रकारच्या कोशिकांची गणनेतील टक्केवारी आणि प्रतिमायकोलिटर केवळ गणनेत सामान्यतः आढळणारी संख्या पुढील वर्णनात सुरूवातीस दिलेली आहे. [⟶ रक्त].

उदासीनरागी (उदासीनरंजी) कणकोशिका

४०-७५% (२,५०० ते ७,५००). कोणत्याही ऊतकात शोथप्रक्रिया (दाहयुक्त सुजेची प्रक्रिया) सुरू होताच या कोशिका तेथे प्रवेश करतात. त्यामुळे त्यांचे आधिक्य ताप आणणाऱ्या जंतुसंकामणात प्रामुख्याने आढळते. तसेच, संकामणरहित ऊतकशोथात या श्वेतकोशिकांची वाढ कमी-जास्त प्रमाणात आढळते. [उदा., भाजणे, अपघाती दुखापत, फुप्फुस किंवा हृदयातील वाहिनी क्लथन (चोंदणे), जलद वाढणारी अर्बुदे (शरीरास निरूपयोगी गाठी), ⇨मधुमेहा तील अम्लरक्तता, संधिवाताचा तीव आवेग, वृक्कविकारामुळे (मूत्रपिंडाच्या विकारामुळे) यूरियारक्तता इ.] निरोगी व्यक्तींत तात्पुरती आणि अल्प प्रमाणातील वाढ करणारी परिस्थिती अनेकदा उद्‌भवते; उदा., भावनिक आवेग, धूम्रपान, अतिश्रम, बाह्य तापमानात वाढ, गर्भिणी अवस्थेतील अखेरचे दोन महिने, प्रसूती, लठ्ठपणा, अतिरेकी आहार इत्यादी.

इओसीनरागी (अरूणकर्षी) कणकोशिका

१-६% (४०० ते ४,०००). बाह्य परिसराशी संपर्क येणाऱ्या ऊतकांकडे जाण्याची प्रवृत्ती असणाऱ्या या कोशिका परकीय रेणूंमध्ये होणाऱ्या प्रतिजन-प्रतिपिंड या पद्धतीच्या संरक्षक प्रक्रियांमध्ये भाग घेतात [⟶ प्रतिजन; प्रतिपिंड]. त्वचा, योनिमार्ग, श्वसनमार्ग यांच्या श्लेष्मल कलेच्या (बुळबुळीत पटलाच्या) खालच्या स्तरात त्यांचे प्राबल्य आढळते. प्रतिपिंडांनी बद्ध केलेल्या रेणूंचे भक्षण, त्यांना बाहेर काढण्यासाठी श्लेष्मल स्रावांना उत्तेजन, हिस्टामीन व सिरोटोनीन यांसारख्या द्रव्यांचे निष्कियीकरण, परोपजीवींच्या संकामणात (उदा., कृमी) त्यांना घातक अशी द्रव्ये निर्माण करणे इ. कार्ये त्या करतात. त्यामुळे औषधे, परागकण, अन्न इत्यादीप्रत अधिहृषता (ॲलर्जी), श्वसनी दमा, त्वचाविकार, पोटातील कृमी इत्यादींमध्ये त्यांचे प्रमाण बरेच वाढते. निरोगी अवस्थेत सकाळी उठल्यावर न्यूनतम असलेली संख्या दुपारपासून वाढत जाऊन रात्री झोपताना अधिकतम होते. रक्तातील अधिवृक्कजन्य स्टेरॉइड हॉर्मोनांशी विरोधी असे हे जैव तालबद्धतेचे नाते असते (लसीका कोशिकाही असाच संबंध दाखवितात). त्यामुळे रात्रपाळी करणाऱ्या व्यक्तीत हेच प्रमाण रात्री न्यूनतम असू शकते.

क्षारकरागी (क्षारककर्षी) कणकोशिका

एक टक्क्यापेक्षा कमी (१५-१००). हिस्टामीन, हिपॅरिन यांसारख्या द्रव्यांचे अभिसरण करणाऱ्या या कोशिका ऊतकांमधील शोथप्रक्रिया संपून प्रतिष्ठापन (दुरूस्ती) कार्य सुरू झाल्यावर ऊतकांमध्ये अधिक आढळतात. अनेक प्रकारच्या विकारांत उपशमन काळात (बरे होताना; आजारातून उठल्यावर) त्यांचे रक्तातील आधिक्य दृष्टीस येते. दीर्घकालिक रक्ताच्या कर्करोगात (मज्जाभ श्वेतकोशिकार्बुद) त्यांच्या संख्येत अचानक होणारी वाढ पुढे येणाऱ्या गंभीर अवस्थेची पूर्वसूचना देऊ शकते. अपरिपक्व कोशिकांचे रक्तात मोठया प्रमाणात आगमन होऊन त्यामुळे ही गंभीर अवस्था निर्माण होते.

एककेंद्रक श्वेतकोशिका

२ -१०% (२०० ते ८००). रक्तातून ऊतकात प्रवेश केल्यावर या कोशिका आकारमानाने वाढतात आणि महाभक्षिका कोशिका म्हणून अनेक महिने कार्य करतात. यकृत, प्लीहा, फुप्फुसांचे वायुकोश, लसीका गंथी, वृक्क, तंत्रिका तंत्र आणि हाडांचा मुख्य भाग (अस्थिमज्जाशिवाय इतर) यांच्या ऊतकांत त्यांचे विशेष प्रकारच्या भक्षिकांमध्ये रूपांतर होते. उदा., कुप्फर कोशिका, तंत्रिका श्लेष्म, अस्थिभंजक इत्यादी. तीव स्वरूपाच्या विकारांतून बरे होताना क्षयरोगाच्या दीर्घकालिक अवस्थेत; हिवताप (मलेरिया), काळा आजार व निद्रारोगांसारख्या प्रजीवी संक्रामणात; कर्करोगात आणि कोलॅजेन विकारांमध्ये एककेंद्रक कोशिकांचे आधिक्य आढळते.

लसीका कोशिका

२० - ५०% (१,०००-३,५००). लसीका-जनक ऊतकात निर्माण होणाऱ्या या कोशिका केवळ काही तासच रक्तात संचार करून विविध ऊतकांत प्रवेश करतात. ऊतकद्रवातून काही कोशिका लसीका वाहिन्यांव्दारे परत लसीका तंत्रात जाऊन कित्येक आठवडे वा महिने कार्यरत राहून परत रक्तात येतात. प्रतिरक्षायंत्रणेतील कोशिकीय प्रकारच्या कार्यात महत्त्वाची कामगिरी बजावणाऱ्या या कोशिकांची संख्या नवजात अर्भकात अधिक असते. वयाच्या बाराव्या वर्षाच्या सुमारास ही संख्या कमी होत होत प्रौढाच्या पातळीवर पोहोचते. मध्यंतरीच्या काळात मुलांच्या लहानमोठया दुखण्यांमध्ये (उदा., ताप, खोकला, पोट दुखणे, उलटी होणे) प्रत्येक वेळी त्यांची संख्या वाढलेली आढळते.

प्रौढ व्यक्तींमध्ये दैनंदिन चढ-उतार दर्शविणारी लसीका कोशिकांची पाकळी विषाणुजन्य संक्रमणात विशेष वाढलेली दिसते. दीर्घकालिक विकारांपैकी कुष्ठरोग, क्षयरोगांच्या काही अवस्था, यकृतशोथ, अवटू गंथींची अतिरिक्त कार्यशीलता (अवटुविषाक्तता) यांमध्ये त्यांचे आधिक्य बळावते. पोषण, शस्त्रक्रियेसाठी भूल देणे या अवस्थांमध्ये त्यांची थोड्या प्रमाणात वाढ आढळते.

रक्तातील लसीका कोशिका या मुख्यतः ‘टी’ (थायमस) प्रकारच्या असतात, त्यांच्या मदतीने दुसऱ्या म्हणजे ‘बी’ (बर्सा) मालिकेतील कोशिकांचे सक्रियण होऊन त्यांच्यापासून प्लाविका कोशिका निर्माण होतात [⟶ कोशिका].

प्लाविका कोशिका

लसीकाजनक ऊतकातून येणाऱ्या या कोशिकांची रक्तातील संख्या नगण्य असते. ऊतकांच्या आंतरकोशिकीय अंतरालात राहून प्रतीपिंडाची (ग्लोबुलिनाचे विविध प्रकार) निर्मित करणे हे त्यांचे मुख्य कार्य असते. मज्जाबुंदाच्या काही रूग्णांमध्ये लशीच्या ( प्रतिपिंडयुक्त रक्तरसाच्या) मात्रेमुळे उद्‌भवणाऱ्या प्रतिक्रियांमध्ये आणि किरणोत्सर्गामुळे (भेदक कण वा किरण बाहेर टाकण्याच्या गुणधर्मामुळे) प्रतिरक्षायंत्रणेवर झालेल्या अनिष्ट परिणामानंतर रक्तात प्लाविका कोशिकांचा आढळ सहज लक्षात येण्यासारख्या असतो.

बिंबाणू म्हणजेच क्लथनकोशिका : प्रतिमायक्रोलिटर १.५ ते ४.० लक्ष. वरील सहा प्रकारांपेक्षा भिन्न असल्यामुळे त्यांची गणना श्वेतकोशिकांच्या टक्केवारीत केली जात नाही. अस्थिमज्जेतील बृहत्‌केंद्रक कोशिकांच्या विभाजनातून निर्माण झालेल्या व आकारमानाचे लहान असलेल्या या कोशिकांची संख्या रक्तकोशिकांच्या खालोखाल मोठी असते. रक्तवाहिन्यांच्या अंतःस्तराच्या पृष्ठभागाच्या गुळगुळीतपणा टिकविणे व वाहिनीस इजा होताच क्लथन क्रियेचा प्रारंभ करून रक्तस्राव रोखणे ही मुख्य कामे त्या करतात. त्यांची संख्या अतिरिक्त शारीरिक श्रमामुळे वाढू शकते. अंडमोचन, प्रसूती, रक्तस्राव, दुखापती ⇨ श्वसनस्थगिती, कर्करोगाचे काही प्रकार, लोहाची कमतरता संधिवात यांसारख्या कारणांनी बिंबाणुआधिक्य निर्माण होऊ शकते.

 

पहा : औषधिक्रियाविज्ञान; रक्त; विकृतिविज्ञान, उपरूग्ण; श्वेतकोशिकान्यूनता; श्नेतकोशिकार्बुद.

संदर्भ : 1. Berkow, R., Ed., The Merck Manual of Madical Information, New Jersey, 1997.

2. Eastham, R. D.; Slade, R. R. Clinical Haematology, Oxford, 1992.

3. Guyton, A. C.; Hall, J. E. Textbook of Medical Physiology, Philadelphia, 1996.

श्रोत्री, दिं. श.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 6/4/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate