অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

शेतीकामे - त्वचेला सांभाळा

शरीराच्या इतर भागाला जसे विकार होतात, तसेच ते त्वचेलाही होतात. त्वचेवर अनेक सूक्ष्म जंतू वास करतात, त्यामुळे योग्य निगा राखली न गेल्यास या जंतूंची वाढ होण्यास सुरवात होते आणि त्वचेला जंतुसंसर्ग होतो. विशेषत- शेतकऱ्यांनी पावसाळ्यात चिखलपाण्यात काम करताना त्वचेची काळजी नीट घेतली नाही तर जंतुसंसर्गांचा धोका होऊ शकतो.

त्वचा हा मानवी शरीराचा सर्वांत मोठा अवयव आहे आणि तितकाच नाजूकसुद्धा. साधारणपणे निसर्गाने त्वचेची जी रचना केली आहे, त्यात वातावरणीय घटकांपासून बचाव करणारी यंत्रणा आहे. त्वचा प्रामुख्याने तीन स्तरांवर आपल्या शरीराचे संरक्षण करीत असते. तापमान नियंत्रित करणे, आर्द्रता राखणे आणि आवश्‍यक क्षारांचे संतुलन राखणे. त्याचप्रमाणे धूळ, पाणी, सूक्ष्म जीव-जंतू यांसारख्या बाह्य घटकांपासून शरीरातील अवयवांचे रक्षण करण्याचेही मुख्य कार्य त्वचा करीत असते. विशेषत- शेतकऱ्यांना पावसाळ्यात नेहमी चिखलात, पाण्यात काम करावे लागते. पावसाळ्यात चिखलपाण्यात काम करताना त्वचेची काळजी नीट घेतली गेली नाही तर जंतुसंसर्गाचा धोका होऊ शकतो.

आपल्या त्वचेवर नेहमीच अब्जावधी सूक्ष्म जीव राहात असतात, मात्र या जिवांमुळे नेहमीच त्वचेचे विकार उद्‌भवतात असे नव्हे. कारण, सामान्यत- त्वचेची नैसर्गिक प्रतिकारशक्ती म्हणजेच नियमित काळाने बदलणारा त्वचेचा स्तर, पीएच, स्निग्धांश, वेळोवेळी त्वचेतून पाझरणारी काही द्रव्ये या सूक्ष्म जिवांपासून शरीराचे संरक्षण करीत असतात.

जिवाणूजन्य त्वचाविकार

त्वचेला अनेक प्रकारच्या जिवाणूंचा संसर्ग होऊ शकतो, मात्र त्यात स्टेफॅलोकॉकस आणि स्ट्रेप्टोकॉकस या दोन प्रकारच्या जिवाणूंमुळे निर्माण होणारे विकार आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. ज्या व्यक्तींमध्ये विशेषत- हाता-पायांना रक्तपुरवठा खूपच कमी झालेला असतो, अशा व्यक्तींमध्ये जिवाणूजन्य त्वचाविकार निर्माण होण्याची शक्‍यता इतरांपेक्षा जास्त असते; तसेच त्वचा पाण्यात खूप वेळ राहिल्याने किंवा खाजवल्याने हुळहुळी झालेली असेल, त्यावर भेगा पडलेल्या असतील अशावेळीही जिवाणूजन्य त्वचाविकार होण्याची शक्‍यता अधिक असते. जिवाणूजन्य त्वचाविकार पुढीलप्रमाणे आहेत -

१) फोड किंवा इंपेटिगो - स्ट्रेप्टोकॉकस किंवा स्टेपॅलोकॉकस जिवाणूंमुळे निर्माण होणाऱ्या या विकारात पूने भरलेले छोटे फोड हे मुख्य लक्षण असते. याचेही दोन प्रकार असतात. अ) नॉबुलस हा प्रकार लहान मुलांमध्ये साधारण सहा ते दहा या वयोगटांत आढळतो. यात त्वचेवर लालसर चट्टा आणि छोटे फोड येतात.

२) इक्‍थायमा - हा इंपेटिगोचाच थोडा वेगळा, पुढचा प्रकार. यात त्वचेच्या अधिक खालच्या स्तरावर जिवाणूंचा संसर्ग होतो. आहारातील प्रथिने, जीवनसत्त्वे यांची कमतरता याला हातभार लावणारी ठरते. हात आणि पायावर मोठ्या खपल्यांसारखे याचे स्वरूप असते. जखम भरल्यावरसुद्धा याचे व्रण राहू शकतात.

३) केसतूड किंवा फॉलिक्‍युलायटिस - त्वचेवर असलेल्या केसांच्या मुळाशी हा आजार होतो. याचा संसर्ग किती खोलवर आहे यानुसार याचे "सुपरफिशिअल' आणि "डीप' असे दोन प्रकार पडतात. अनेकदा राठ केस वळून पुन्हा आत गेल्याने त्वचादाह वाढतो. खते, कीटकनाशके वापरणाऱ्यांनाही याचा धोका असतो. वेळीच उपचार केले नाहीत तर हाच आजार पुढे "क्रॉनिक फॉलिक्‍युलायटिस'चे स्वरूप धारण करू शकतो, त्यामुळे यावर वेळीच उपचार करणे आवश्‍यक असते.

त्वचेचे आरोग्य नीट ठेवण्यासाठी

त्वचेवरील असंख्य सूक्ष्म छिद्रात जंतू, दूषित द्रव्ये साठून राहण्यास मोठा वाव असतो, म्हणूनच त्वचा स्वच्छ राखणे गरजेचे असते. यासाठी स्नान हा सर्वोत्तम उपाय होय. खूप घाम आल्यास, धूर-धूळ-प्रदूषणाच्या संपर्कात बराच वेळ राहावे लागल्यास पुन्हा एकदा स्नान करणे योग्य.

पूर्णत- न वाळलेले कपडे घालणे, घामाने वा पावसात भिजल्याने ओले झालेले कपडे वेळेवर न बदलणे वगैरे कारणांनी कोंडा, उवा-लिखा होणे. अंगावर खरूज, नायटा, घामोळी उठणे, त्वचेला कंड सुटणे वगैरे. त्यामुळे अनेक समस्या उद्‌भवू शकतात. म्हणून त्वचा स्वच्छ व निरोगी राहील याकडे लक्ष देणे गरजेचे असते. त्वचारोगाचा त्रास असणाऱ्यांनी रक्‍तशुद्धिकर द्रव्यांनी तयार केलेल्या उटण्याचा वापर करावा. किंवा अंघोळीच्या पाण्यात कडुनिंबाची पाने टाकण्याचा वा निर्गुडी, त्रिफळा, तुळशी वगैरेंचा काढा मिसळून स्नान करूनही उपयोग होतो. काही विशिष्ट जंतुसंसर्गात, विशेषत- पाणी-लस वाहणाऱ्या त्वचारोगात, पायाच्या बोटांच्या बेचक्‍यात चिखल्या वगैरे झाल्यास धुरी घेण्याचाही उपयोग होताना दिसतो.

वेखंड, कडुनिंब, राळ वगैरे जंतुसंसर्ग दूर करण्याची क्षमता असणाऱ्या द्रव्यांचा किंवा तयार धुपाची धुरी त्या-त्या विशिष्ट जागेवर घेण्याने जंतुसंसर्ग दूर होऊ शकतो. वैद्यांच्या सल्ल्याने मंजिष्ठा, अनंतमूळ, हळद, अर्जुन, चोपचिनी, त्रिफळा वगैरे द्रव्ये, धात्री रसायनासारखी रसायने घेणे उत्तम होय. जंतुसंसर्गाची प्रवृत्ती समूळ नाहीशी होण्यासाठी महामंजिष्ठादि काढा वगैरे योगही प्रभावी असतात.
(लेखिका वैद्यकीय तज्ज्ञ आहेत.)

 

स्त्रोत: अग्रोवन

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate