অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

वैद्यकीय संमोहन

वैद्यकीय संमोहन

वैद्यकीय संमोहन

संमोहन ही एक अशी मानसिक अवस्था असते की, जिच्यात व्यक्ती विश्रांत व ग्लानीत असते आणि तिची एखाद्या व्यक्तीने दिलेल्या सूचनांचे पालन करण्याची प्रवृत्ती म्हणजेच सूचनक्षमता अतिशय वाढलेली असते. स्वत: होऊन काही क्रिया करण्याची तिची इच्छाशक्ती जवळजवळ लुप्त झालेली असते. तिची स्मृती, संवेदन व जाणीव या तात्पुरत्या निष्क्रिय होतात आणि परिसरात काय चालले आहे हे तिला समजत नाही. संवेदनाचा जो भाग संमोहनानिर्माता सुचवील तेवढाच फक्त सक्रिय होतो. शरीराचे शिथिलीभवन होऊन डोळे थकल्यासारखे, अर्धवट उघडे असतात आणि श्वसन मंद असते. अशा रीतीने ही स्थिती झोप, शुद्धिहरण (किंवा भूल) आणि जागृती या तिन्हीपेक्षा निराळी असते. तिला संमोहन निद्रा असेही म्हणतात.

संमोहनाची स्थिती अनेक प्रकारे निर्माण करता येते. व्यक्ती या अवस्थेत जाण्यासाठी स्वखुशीने तयार असावी, ही मुख्य शर्त मात्र असते. तसेच आपण संमोहित होऊ याबद्दल व्यक्तीच्या मनात विश्वास असावा लागतो. संमोहननिर्माता प्रथम व्यक्तीस एखाद्या बिंदूवर (उदा., फिरती वस्तू, चमकणारी वस्तू) लक्ष केंद्रित करायला सांगतो व नंतर लयबद्ध, एकसुरी आवाजात सूचना देतो, शिथिलीकरण आणि मंद श्वसन करायला सांगतो आणि क्रमाक्रमाने अनेक सूचना देत राहतो. अगदी हलक्या संमोहनात किंवा मोहनिद्रेत केवळ ताणरहित मानसिक स्थिती साधता येते. जास्त गाढ संमोहनाच्या मदतीने सूचनाक्षमता पुष्कळ वाढवून निराधार असे भ्रम निर्माण करता येतात, सजीव वाटणाऱ्या प्रतिमा डोळ्यांपुढे निर्माण करता येतात आणि काही विवश माणसांमध्ये जागृतावस्थेत सुद्धा सूचनापालनाने घडविता येते असे वर्तन या अवस्थेत सहजसाध्य ठरते. उदा., एखाद्या मुलासारखे वागणे.

संमोहनाचा उपयोग रोगमुक्तीसाठी किंवा रोगलक्षणांपासून आराम मिळण्यासाठी प्राचीन ईजिप्त व ग्रीस येथील पुरोहित वर्गाकडून नेहमी केला जाई. नंतरच्या काळात ख्रिस्ती धर्मगुरूंनी आणि चेटूकविद्येच्या किंवा यातुविद्येच्या [→ जादूटोणा] पुरस्कर्त्यांनी देखील असाच उपयोग केला होता; परंतु आधुनिक काळातील संमोहनविद्येची सुरुवात मात्र फ्रान्ट्‌स (फ्रीड्रिख) आंटोन मेस्मर यांनी अठराव्या शतकात केली. त्यामुळे या विद्येला मेस्मरिझम हे नाव मिळाले. त्यावेळी दिसून आलेल्या उपचारक परिणामांचे स्पष्टीकरण देताना मेस्मर यांनी तरल चुंबकीय शक्तीचा सिद्धांत मांडून स्वत:मध्ये अशी गूढ शक्ती असल्याचा दावा केला होता. तो सु. दहा वर्षांतच म्हणजे १७८४ मध्ये निराधार ठरला. नंतर हे परिणाम सूचनक्षमतेमुळे होतात, असे सिद्ध झाले. १८४० मध्ये `हिप्नॉसिस' ही संज्ञा जेम्स ब्रेड (१७९५–१८६०) यांनी तयार केली व त्याच वर्षी दोन शल्यचिकित्सकांनी ही पद्धती कोलकाता व लंडन येथे शस्त्रक्रियेसाठी वापरली. ⇨सिग्मंड फ्रॉइड यांनी मानसोपचारासाठी तिचा वापर करून पाहिला, पण यशस्वी न झाल्याने तिचा त्याग केला. विसाव्या शतकाच्या सुरुवातीस संमोहनाच्या शरीरक्रियावैज्ञानिक परिणामांचा विस्तृत अभ्यास करून स्वयंजात प्रशिक्षण या नावाने स्वयंसूचनाचे एक तंत्र विकसित करण्यात आले. भावनिक विकारांची शारीरिक लक्षणे बरी करण्यासाठी त्याचा उपयोग होऊ लागला.

आधुनिक मनोवैज्ञानिक सिद्धांतानुसार संमोहन ही आंशिक निद्रा किंवा बदललेल्या जाणिवेची स्थिती आहे, असे काहींचे मत आहे. इतरांच्या मते ही केवळ एक प्रकारची आंतरव्यक्तीय म्हणजे व्यक्ती-व्यक्तींमधील किंवा सामाजिक अन्योन्यक्रिया असते व तिच्यातून मिळणारी सूचनक्षमता हा फक्त एक तोषक परिणाम असतो. कोणतेही मत स्वीकारले, तरी ते एक तंत्र आहे, प्रत्यक्ष उपचार किंवा त्याचे शास्त्र नाही याबद्दल प्रश्न नाही. मोहनिद्रा उत्पन्न केल्याशिवायही हळूहळू सूचनक्षमता निर्माण करता येते आणि संमोहनानेच घडवून आणता येतील असे कोणतेही मानसिक परिणाम नसतात, असे मनोविकारतज्ञ म्हणतात.

वैद्यकीय संमोहनाने सूचन करून वेदनाजनक चेदकाप्रत किंवा उद्दीपकाप्रत जी संवेदनक्षमता शरीरात असते, ती कमी करता येते. अशा संवेदनाहरणाचा उपयोग प्रसूतीमध्ये, बरेच भाजलेले असता, वेदनाकारक वैद्यकीय उपचारांत (उदा., जखमेवरील पट्ट्या बदलणे) किंवा कर्करोगाच्या अंतिम अवस्थेत वेदना कमी करण्यासाठी होऊ शकतो. शस्त्रक्रियेसाठी भूल देण्यापूर्वी किंवा दातांवरील उपचारांसाठी बधिरीकरण करण्यापूर्वी संमोहनाने पूर्वोपचार करून रोग्याच्या मनातील भीती कमी केल्यास संवेदनाहरण सुलभ होते आणि त्यासाठी औषधाची मात्राही कमी लागते. मनोदैहिक वैद्यकांच्या क्षेत्रात शारीरिक आधार नसलेले काही विकार (उदा., रक्तदाब, डोकेदुखी, दीर्घकालीन त्वचाविकार) संमोहनाने नियंत्रणात ठेवणे अनेकदा शक्य होते; परंतु त्याचबरोबर शारीरिक आजारांची लक्षणे दडपली जाण्याचा धोकाही लक्षात घ्यावा लागतो.

मानसचिकित्सेमध्ये संमोहनजन्य सूचनाने मानसिक तणाव कमी करणे, लक्षणांपासून मुक्ती मिळाल्याचे सूचन सरळसरळ आरोपित करणे, दडपल्या गेलेल्या स्मृतींना परत येण्याचे आवाहन करणे हे परिणाम साधता येतात. त्यांच्या मदतीने मनोविश्लेषणाच्या विरेचक कार्यास मदत होते. मनोमज्जाविकृतीवरील उपचार करताना ही पद्धती उपयोगी पडू शकते. लक्षणांपासून मुक्तता मिळण्याचा परिणाम अल्पकालिक असू शकतो. त्वरित परिणामाने एकाएकी लक्षणांचे नि:सारण होऊन त्यामुळे कधीकधी चिंता किंवा विषादपूर्ण भावनिक प्रतिक्रिया निर्माण होऊ शकते.

इ.स. १९५० नंतर अनेक प्रभावशाली व सुरक्षित वेदनाशामक औषधे आणि मनोविकारावरील औषधे उपलब्ध झाल्यामुळे संमोहनाची वैद्यकीय क्षेत्रातील लोकप्रियता कमी झाली आहे.


पहा : मानसचिकित्सा; मेस्मर, फ्रान्ट्‌स (फ्रीड्रिख) आंटोन; संमोहनविद्या.

संदर्भ : 1. Rhodes, R. H. Hypnosis : Theory, Practice and Applications, 1989,

2. Wester II, W.C.; Alexander Jr., H. Clinical Hypnosis : A Multidisciplinary Approach, New York, 1991.

3. Wolberg, L. R. Medical Hypnosis, New York, 1948.

श्रोत्री, दि. शं.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 5/2/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate