অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

लठ्ठपणा... वजन घटविण्यासाठी

लठ्ठपणा... वजन घटविण्यासाठी

जन्मतः बाळाचे वजन विचारले जाते, केले जाते व तो आरोग्य निर्देशांक आहे. नंतर मुलाच्या वाढीच्या टप्प्यावर योग्य माईलस्टोन म्हणून बालरोगतज्ज्ञ ‘वजन’ हा महत्वाचा घटक मानतात. ‘बॉडी मास इंडेक्स’ याला आरोग्य कुंडलीत महत्वाचे स्थान आहे. त्या वयाला योग्य ठराविक वजन हे निरोगीपणाचे लक्षण मानले जाते. साधारणतः आरोग्य तपासणीत वजन, उंची मोजली जाते. लठ्ठपणा केव्हा मानायचा? ‘नॉर्मल’ वजन, उंची किती? १८.५ (किग्रॅ/मी) पेक्षा कमी वजन ‘आजारपणाचे’ निर्देशक मानता येईल.

१८.५ ते २५ कि.ग्रॅ. - नॉर्मल, २५ ते ३० कि.ग्रॅ. - अतिवजन, ३० कि.ग्रॅ. पेक्षा जास्त - लठ्ठपणा. ही माहिती सर्वांना असणे आवश्यक वाटते. दिवसरात्र विविध टीव्ही चॅनल्सवरून चालणाऱ्या जाहिराती आपण पाहिल्या असतील. घाम आणणारा किंवा व्हायब्रेट होणारा बेल्ट लावा, चरबी कमी करा, विशिष्ट पावडर खाऊन, औषधी चहा पिऊन बारीक व्हा, वजन कमी करा असे ‘मनोरंजक’ दावे या जाहिराती करतात. हे दावे विवेकाच्या फूटपट्टीवर न तपासता, कितपत खरे आहेत याचा विचारही न करता अनेकजण या जाहिरातींना बळी पडून जाहिरातीतील उत्पादने खरेदीही करतात. वजन कमी करण्यास यात कोणताही शास्त्रीय आधार नाही, फसवणूकच अधिक होते.

जीवनशैलीत सकारात्मक बदल करणे हाच वजन कमी करण्याचा योग्य मार्ग आहे. दैनंदिन गोष्टींमध्ये बदल करूनही व्यायामाला सुरूवात होऊ शकते. कार्यालयात वरच्या मजल्यांवर जाण्यासाठी जीना वापरणे (लिफ्टचा वापर टाळणे), घराजवळच्या ठिकाणी जाण्यासाठी गाडी न वापरणे, यातून शरीराला हालचालीची सवय होऊ लागते. गोड पदार्थ पूर्णपणे बंद करण्याऐवजी आठवड्यातून एकदाच खाणे, मद्यपान टाळणे हे जीवनशैलीतील बदल टप्प्याटप्प्याने आरोग्यवर्धक बनवले तर वजन कमी होऊ लागते.

अचानक वजन कमी करण्यासाठी सुरु केलेले ‘हिरोईक एफर्टस’ देखील फोल ठरतात. आहारातील बदल आणि नियमित व्यायामाशिवाय वजन कमी करणे शक्य नाही. जीवनशैलीत आहार आणि व्यायाम या दोन्हींचे संतुलन असेल तरच योग्य प्रकारे वजन कमी करणे शक्य आहे. जीवनशैलीत आहार आणि व्यायाम या दोन्हींचे संतुलन असेल तरच योग्य प्रकारे वजन कमी होऊ शकते आणि कमी झालेले वजन पुन्हा न वाढता टिकते. खाल्लेल्या आहाराचे उर्जेत रुपांतर होण्याचा दर म्हणजे ‘बेसल मेटॅबोलिक रेट’ हा रेट वाढविण्यासाठी व्यायामाची मदत होते.

वजन कमी करताना प्रत्येक व्यक्तीच्या प्रकृतीनुसार त्याचा आहार ठरवावा लागतो.

लठ्ठपणा कमी करण्यासाठी टप्पे:
  • दैनंदिन जीवनशैलीत सकारात्मक बदल घडविणे.
  • अतिरिक्त आहारावर बंधने आणणे, योग्य प्रमाणात आणि संतुलित आहार घेणे.
  • आपल्या प्रकृतीस झेपेल त्या व्यायामाला सुरूवात करणे, त्यात नियमितता ठेवणे.
  • वैद्यकीय तज्ज्ञ (विशेषज्ञ) योग्य आहार आणि व्यायामाबरोबरच औषधे सुचवितात. ही औषधे त्या-त्या रुग्णाच्या प्रकृतीनुसार ठरवली जावीत यासाठी वैद्यकीय सल्ला घ्यावा.
  • लठ्ठपणावरची शस्त्रक्रिया (बॅरिएट्रिक सर्जरी) हा अर्थातच इतर सर्व उपाय थकल्यानंतरचा आहे.


लेखक - डॉ. सोमनाथ सलगर,
सहयोगी प्राध्यापक, जीवरसायनशास्त्र विभाग,
बै.जी. शासकीय महाविद्यालय व ससून सर्वोपचार रुग्णालय, पुणे-०१

स्त्रोत : महान्युज

अंतिम सुधारित : 1/30/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate