काही रोगांच्या साथी येतात,त्यांत काही जण बळी पडतात तर काही वाचतात. बळी जाणा-यांना प्रतिकारशक्ती नव्हती असे आपण म्हणतो, तर वाचणा-यांना प्रतिकारशक्ती आहे असे समजतो. मात्र देवीच्या साथीतून वाचलेला मनुष्य सर्दी-पडशाने पण आजारी पडू शकतो. याउलट एकदा लहानपणी गोवर उठला किंवा लस दिली असेल तर गोवर परत मोठेपणी येत नाही.
या सर्व विविध घटनांच्या मागे रोगप्रतिकारशक्ती हे कारण आहे. प्रत्येक प्रजातीच्या रोगजंतूंचे गुणधर्म वेगळे असतात. काही जंतूंविरुध्द प्रतिकारशक्ती तयार होते. कधी ती तात्पुरती टिकते तर काही वेळा जन्मभर राहते.
रोगप्रतिकारशक्ती म्हणजे काय? एखाद्या प्रकारच्या रोगजंतूंनी (रोगकण) शरीरात प्रवेश केला, की शरीरात त्याची प्रतिक्रिया उमटते. सुरुवातीला नुसत्या पांढ-या पेशी लढतात. यातल्या काही मरतात. काही प्रकारच्या पांढ-या पेशी या जंतूंची रोगकणांची छाननी करून कोणते रासायनिक पदार्थ त्यांविरुध्द काम करतील हे पाहतात. त्यानंतर शरीरातील रक्तसंस्था व रससंस्था त्यावर प्रथिने तयार करून रक्तात सोडतात. या प्रथिनांना प्रतिकण (प्रतिघटक किंवा प्रतिपिंडे) असे म्हणता येईल. हे प्रतिकण जंतूंना मारतात. निरनिराळया जंतूंवर निरनिराळे खास प्रतिघटक तयार होतात. म्हणून एखादा रोग झाला नाही तरी दुसरा रोग होण्या - न होण्याशी त्याचा संबंध नसतो.
काही जंतूंवर प्रतिकण काम करीत नाहीत, पण जंतुविशिष्ट संरक्षक पांढ-या पेशी तयार होतात. कुष्ठरोग व क्षयरोगाची प्रतिकारशक्ती अशा पेशींवर चालते.
पोषण चांगले असेल तर प्रथिनांचा पुरवठा चांगला असतो व त्यामुळे प्रतिकणही पुरेसे तयार होतात. कुपोषणात प्रतिकण कमी तयार होतात. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती कमी पडते व रोग प्रबळ होतात.
आईकडून बाळाला तात्पुरती प्रतिकारशक्ती
आईच्या रक्तातून गर्भाला आपोआप ब-याच रोगांवरचे तयार प्रतिकण मिळतात. (मात्र जंतुविशिष्ट संरक्षक पेशी मिळत नाहीत.) या प्रतिकणांमुळे पहिले तीन-चार महिने बाळाला नैसर्गिक प्रतिकारशक्ती मिळते. तीन चार महिन्यांनंतर ही शक्ती कमी होते. तोपर्यंत बाळाला लसटोचणी चालू केली नसेल तर मग बाळाला निरनिराळे आजार होऊ शकतात. आईच्या दुधातूनहीबाळाच्या पोटात काही प्रतिकण जात असतात. विशेषतः बाळंतपणानंतर पहिल्या चार-पाच दिवसांतले चिकाचे दूध (पांढरे दिसत नसले तरी) फार औषधी असते. ज्या बाळांना अंगावरचे हे दूध मिळत नाही ती बाळे लवकर आजारी पडण्याची शक्यता अधिक असते.
लसीकरण
शरीरात प्रतिकण किंवा जंतुविशिष्ट संरक्षक पेशी
निर्माण होतात त्या रोगजंतूंशी संबंध आल्यानंतरच. लस देण्याचा उद्देश हाच असतो. लसीमध्ये अर्धवट किंवा पूर्ण मारलेले रोगजंतू किंवा त्यांच्यापासून तयार केलेले घटक असतात. त्यांच्यावर शरीर प्रतिकण किंवा खास पेशी तयार करायला शिकते. म्हणून लस देऊन प्रतिकारशक्ती मिळते. पण रोग होत नाही. लसीकरणानंतर प्रतिकण व जंतुविशिष्ट प्रतिपेशी निर्माण होण्यात काही काळ जातो. प्रत्येक जंतूच्या बाबतीत हा प्रशिक्षण काळ वेगवेगळा असतो. उदा. क्षयरोगावरच्या खास पेशी तयार व्हायला लस टोचणीनंतर दीड-दोन महिने जातात
, धनुर्वाताची लस टोचल्यानंतर (दोन डोस) दोन-तीन महिने गेल्यावरच पुरेशा प्रमाणात प्रतिकण तयार होतात. म्हणून जखम झाल्या झाल्या लगेच धनुर्वात प्रतिबंधक लस टोचून त्या प्रसंगात काहीही फायदा नसतो. धनुर्वात लगेच (एक-दोन तासांत देखील) होऊ शकतो. प्रतिकण मात्र उशिरा तयार होतात. पण नंतरच्या जखमांसाठी मात्र याचा उपयोग होऊ शकतो. गोवर प्रतिबंधक लस दिल्यावर पंधरा दिवसांतच पुरेसे प्रतिकण तयार होतात.
लेखक : डॉ. श्याम अष्टेकर (MBBS, MD community Medicine)
संदर्भ : आरोग्याविद्या