অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

राष्ट्रीय पोषाहार सप्ताह

राष्ट्रीय पोषाहार सप्ताह

दरवर्षी महाराष्ट्र राज्याच्या आरोग्य विभागातर्फे १ ते ७ सप्टेंबरदरम्यान राष्ट्रीय पोषाहार सप्ताह साजरा करण्यात येतो. भारतासारख्या विकसनशील देशात किशोरवयीन मुली व लहान बालके यांच्या पोषणाची समस्या खूप गंभीर आहे. त्यामुळे पोषाहाराबाबत व्यापक प्रमाणात जनजागृती करण्यासाठी पोषाहार सप्ताहाचे दरवर्षी आयोजन करण्यात येते.

आजकाल प्रत्येक पालकांची इच्छा असते की, आपले बालक स्मार्ट बुद्धिमत्तेचे व सुदृढ असावे, मात्र बाळाचे पोषण मात्र स्मार्ट होत नाही. म्हणून यावर्षी राष्ट्रीय पोषाहार सप्ताह २०१७ चे घोषवाक्य ‘स्मार्ट फिडींग-सुरुवातीपासूनच’ असे आहे. गोंदियासारख्या अतिदुर्गम, आदिवासी व नक्षलग्रस्त जिल्ह्यात कुपोषणाची समस्या आहे. कमी उंचीचे, कमी वजनाचे, जन्मत: अपुऱ्या दिवसाचे व कमी वाढ झालेल्या कुपोषित बालकांमुळे कोवळी पानगळ वाढत चाललेली आहे. पोषाहाराबाबत असलेल्या अज्ञानामुळे लहानपणापासून बाळाला गैरसमजुतीतून, अंधश्रद्धतेतून चुकीच्या पद्धतीने आहार दिला जातो. पुरक आहाराअभावी बाळ पहिला वाढदिवस साजरा करण्यापूर्वीच कुपोषणाच्या खाईत लोटला जातो. रोजच्या आहारात अपेक्षित पोषणमूल्य असलेला सकस आहार बाळाला मिळत नाही. विटॅमिन्स, कॅल्शियम, मिनरल्स, आवश्यक कॅलरीज मिळतच नाही आणि बॅकलॉग पुढे वाढतच राहतो व बाळ तीव्र कुपोषणात ढकलले जाते.

राज्य शासनाने 'राष्ट्रमाता जिजाऊ कुपोषण निर्मूलन अभियान' हाती घेतले आहे. पोषण मिशनसारख्या ध्येयाने झपाटून महिला व बालकल्याण व आरोग्य विभाग झटत आहे. गोंदिया जिल्ह्यात अशा कमी वजनाच्या बाळासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या स्तरावर व्हीसीडीसी (गावपातळीवरील ग्राम सुपोषण केंद्र-अंगणवाडी) सुरु करण्यात आले आहे. या केंद्रात कमी वजनाच्या बाळाला ३० दिवसासाठी अंगणवाडीत वैद्यकीय अधिकाऱ्याच्या देखरेखीखाली दिवसातून पाचवेळा आहार व विटॅमिन्स औषधी देवून उपचार केले जातात.

बरेचसे बालके या व्हीसीडीसीच्या माध्यमातून वजनवाढ होवून दुरुस्त होतात. त्यापैकी काही बालकांना जर कुठली वैद्यकीय समस्या आढळून आली तर त्यांना गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रातून सीडीसीमध्ये उपचारासाठी दाखल केले जाते. इथे तज्ञांच्या देखरेखीखाली त्यांच्या सर्व रक्त तपासण्या, हिमोग्लोबीन, सर्वंकष रक्तकणिका काऊंट, सिकलसेल तपासणी, ईएसआर, युरीन टेस्ट, मलेरिया टेस्ट, मॉण्टॉक्स टेस्ट, छातीचा एक्सरे इत्यादी चाचण्या करुन विस्तृत रोगनिदान व उपचार करण्यात येतो. उपचार व संपूर्ण पोषाहार देवून बालकाला कुपोषणाच्या खाईतून बाहेर काढले जाते.

व्हीसीडीसी व सीडीसीतून दुरुस्त झालेली बालके काही कारणांमुळे पुन्हा आजारी पडली तर त्यांना जिल्हास्तरावरील राष्ट्रीय पोषाहार व पुनर्वसन केंद्रात माता-पालकांसोबत दहा दिवस राहण्यासाठी ठेवण्यात येते. तिथे त्यावर प्रशिक्षीत पोषाहार तज्ज्ञ व बालरोग तज्ज्ञामार्फत उपचार व संतुलीत आहार, विटॅमिन्स टॉनिक्स, मिनरल्स दिले जातात आणि बालकाला कुपोषणाच्या गर्तेतून बाहेर काढले जाते.

अशा पद्धतीने कुपोषणावर मात करण्यासाठी समाजामध्ये संतुलीत आहाराबाबत जनजागृती करण्यासाठी दरवर्षी १ ते ७ सप्टेंबरदरम्यान पोषाहार सप्ताह राबविण्यात येतो. यानिमित्त घोषवाक्य, रांगोळी व पोस्टर स्पर्धा, गर्भवतीसाठी पोषाहार प्रदर्शनी, पोषाहार सप्ताहानिमित्त सुदृढ बालक स्पर्धा इत्यादी स्पर्धांचे आयोजन केले जाते. शाळा-महाविद्यालयीन युवतींमध्ये पोषाहाराबाबत साक्षरता यावी म्हणून खास तज्ज्ञांची व्याख्याने आयोजित करण्यात येतात. गोंदियासारख्या आदिवासी जिल्ह्यात अज्ञान, अंधश्रद्धा व पोषाहाराबाबत साक्षरता नसल्याने अपुऱ्या दिवसांचे व कमी वजनाचे बाळ जन्माला येवून अकाली मृत्यू पावत आहेत किंवा कुपोषणामुळे पोटातच अर्भक मृत्यू होत आहेत. म्हणून जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी शून्य बालमृत्यू अभियान सुरु केले आहे. यात गर्भवती महिलांची आरोग्य सेविकेकडे नोंदणी झाल्यानंतर ती प्रत्येक वैद्यकीय तपासणीला घरातील पुरुष पालकांना घेवून येतील व डॉक्टर मंडळी त्यांच्या कुटुंबियांना गर्भवतीची आरोग्य पत्रिका समजावून सांगतील.

पुरुष मंडळींना जबाबदारी देण्यात आली आहे की गर्भवतीला संपूर्ण नऊ महिने संतुलीत आहार मिळेल, लसीकरण वेळोवेळी औषधोपचार व वैद्यकीय सल्ला मिळेल. जेणेकरुन बाळंतपणानंतर संपूर्ण वाढ झालेले निरोगी तीन किलो वजनाचे बाळ जन्माला येईल. अशाप्रकारे राष्ट्रीय पोषाहार सप्ताहानिमित्त जिल्हा पातळीपासून तर आदिवासी पाड्यापर्यंत विविध जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत.

लेखिका: डॉ.सुवर्णा हुबेकर

माहिती स्रोत: महान्युज

अंतिम सुधारित : 7/2/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate