অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

रक्तस्राव

रक्ताभिसरण तंत्रा च्या रक्तवाहिन्या या प्रमुख भागातून रक्त (कोशिकांसह-पेशींसह-रक्तद्रव) बाहेर पडण्याला ‘रक्तस्राव’ म्हणतात. रक्तस्राव आघातजन्य किंवा विकृतिजन्य असू शकतो. वाहिनीच्या प्रकाराप्रमाणे रक्तस्रावास रोहिणी रक्तस्राव, नीला रक्तस्राव आणि केशवाहिनी रक्तस्राव म्हणतात.शरीराच्या पृष्ठभागाच्या बाहेर होणाऱ्या रक्तस्रावाला बाह्य अथवा दृश्य आणि आत होणाऱ्या रक्तस्रावाला अंतर्गत अथवा अदृश्य अशा संज्ञा वापरतात. रक्तस्रावाचा उल्लेख शरीर भागावरूनही केला जातो; उदा., डोक्याच्या कवटीमधील रक्तस्रावाला अंतर्कर्पर रक्तस्राव तर उदरगुहेतील रक्तस्रावाला उदरीय रक्तस्राव म्हणतात. रक्तस्राव जेव्हा शरीराच्या विशिष्ट भागातून होतो तेव्हा विशिष्ट नावाने ओळखला जातो. नाकातून होणारा नासारक्तस्राव, मूत्रातून होणारा रक्तमेह, उलटीतून होणारा रक्तवमन आणि मलातून झाल्यास रक्तमल अशी नावे दिली जातात.

कारणे

आघातजन्य रक्तस्राव वाहिनीस इजा झाल्यामुळे होतो व तो बाह्य किंवा अंतर्गत असू शकतो. अंतर्गत रक्तस्रावाचे निदान करणे कठीण असते. कधी कधी गंभीर ⇨अवसादाची लक्षणे दिसू लागेपर्यंत अदृश्य रक्तस्राव होत असल्याचे लक्षात येत नाही.

विकृतिजन्य रक्तस्रावाच्या कारणांची विभागणी पुढीलप्रमाणे करता येते : (१) वाहिनीभित्तीची चिरकारी (दिर्घकालीन) विकृति; उदा., रोहिणी-काठिण्य, रोहिणी-विस्फार. (२) वाहिनीभित्तीची तीव्र विकृति उदा., वाहिनीवरील विषबाधाजन्य (पारा वा आर्सेनिक दुष्परिणाम). (३) रक्ताच्या विकृति; उदा., मारक पांडुरोग [⟶ पांडुरोग], क्लथनासंबंधीच्या विकृति [⟶ रक्तक्लथन], श्वेत कोशिकार्बुद (रक्तकर्क).

रक्तनाश

सर्वसाधारणपणे एकूण रक्तघनफळाच्या ३०% पर्यंत रक्तनाश रक्तदाब कमी न होता मानव सहन करू शकतो. बहुतेक प्राणी शरीरवजनाच्या १% वजन भरेल एवढा रक्तनाश सहन करू शकतात, तर ३% वजन भरेल एवढा रक्तनाश सशांना व कुत्र्यांना मारक असतो. ५५% रक्तघनफळाचा नाश बहुतेक कुत्र्यांना मारक असतो. एकाएकी अथवा अकस्मात उद्‌भवणारा रक्तस्राव हळूहळू व वारंवार होणाऱ्या रक्तस्रावापेक्षा अधिक गंभीर असतो.

मानवी जीवनास ३०% पेक्षा जास्त रक्तघनफळाचा जलद नाश धोकादायक असतो. त्यापेक्षा कमी रक्तनाश काही प्रतिपूरक यंत्रणा कार्यान्वित होऊन रक्तघनफळ पूर्ववत करण्याचा शरीर प्रयत्न करते. प्रतिपूरक यंत्रणांची विभागणी (अ) तत्काळ कार्यान्वित होणाऱ्या आणि (आ) कालांतराने कार्यान्वित होणाऱ्या, अशी करता येते.

(अ) तत्काळ सुरू होणाऱ्या : जादा व अकस्मात रक्तघनफळ कमी होताच रक्तदाब ताबडतोब कमी होतो. वाहक क्षेत्रातील रक्त सामावून घेण्याची क्षमता अनेक छोट्या छोट्या वाहिन्यांच्या आकुंचनामुळे कमी केली जाते. यामुळे त्वचा, श्लेष्मकला (आतडी, गर्भाशय इ. नलिकाकार पोकळ्यांचे पातळ पटलमय अस्तर) आदि जीवनावश्यक नसलेल्या शरीरभागांतील रक्त फक्त जरूरीच्या जीवनाश्यक भागांस पुरवले जाते. उदा., मेंदूतील लंबमज्जा भागातील सर्व महत्त्वाच्या केंद्रांना योग्य रक्त पुरवठा केला जातो. या यंत्रणेला ‘पुनर्वितरण’ म्हणतात. रक्तस्रावामुळे अनुकंपी तंत्रिका तंत्रातील [⟶ तंत्रिका तंत्र] प्रतिक्षेपी क्रियांद्वारे उद्दीपित होऊन. (१) रोहिणी आकुंचन, (२) नीला व नीला कोटरांचे आकुंचन आणि (३) हृदक्रिया वाढ (नाडी ७२ वरून २०० पर्यंत वाढू शकते) हे प्रमुख परिणाम होतात. अनुकंपी तंत्रिका तंत्राच्या उद्दीपनामुळे हृदयाला रक्त पुरवठा करणाऱ्या रोहिण्यांवर तसेच मेंदूला जाणाऱ्या रोहिण्यांवर परिणाम होत नसल्यामुळे या जीवनावश्यक भागांना नेहमीप्रमाणे रक्त पुरवठा चालू राहतो.

(आ) कालांतराने सुरू होणाऱ्या : यामागे कमी झालेला रक्ताचा द्रव भाग पूर्ववत करण्याचा हेतू असतो. जठरांत्र मार्ग (जठर, लहान आतडे व मोठे आतडे यांनी मिळून बनणारा अन्नमार्ग) व आंतरकोशिकीय अवकाश यांतून शक्य तेवढा द्रव रक्तात अभिशोषित करण्याचा जोरदार प्रयत्न केला जातो. केशवाहिन्यांतील द्रव स्थितिकीय दाब (स्थिर द्रवातील एखाद्या बिंदूच्या वर असणाऱ्या द्रवाच्या स्तंभाच्या वजनामुळे उद्‌भवणारा त्या बिंदूपाशील दाब) कमी होऊन ऊतक-द्रव (समान रचना व कार्य असलेल्या कोशिकांच्या समूहातील द्रव) त्यांत शिरतो. रुग्णास तहान लागण्यामागे ऊतक-द्रव केशवाहिन्यांमध्ये गेल्याची व ऊतक-कोशिकांची द्रव पुरवठा करण्याची मागणी असते. शरीराची जलसंचय पूर्ववत करण्याची तहान ही नैसर्गिक सूचनाच असते.

त्यानंतर काही आठवडे किंवा काही महिने चालणारे अस्थिमज्जादी (लांब हाडांच्या पोकळीतील पदार्थादी) भागांचे कार्य सुरू होते व त्यामुळे कोशिकासंख्या प्राकृतिक बनते. याकरिता लागणारा अवधी रक्तस्रावाचे प्रमाण, व्यक्तीचा आहार व वैयक्त्तिक नुकसान भरून काढण्याची क्षमता यांवर अवलंबून असतो.

वरील यंत्रणांशिवाय रक्तवाहिनी तुटलेल्या जागी काही रक्तस्तंभन (रक्तप्रवाह रोखण्याच्या) प्रतिक्रिया सुरू होतात [⟶ रक्तक्लथन].

लक्षणे

रक्तस्राव वाढत गेल्यास लक्षणे गंभीर बनतात. सुरुवातीस रक्तदाब अल्पसा कमी होऊन रुग्ण उभा असल्यास नाडी जलद होते व तो पहुडलेला असल्यास कधी कधी लक्षणविरहित अवस्थाही आढळते. रक्तदाब कमी होणे, त्वचा व श्लेष्मकला फिकट पडणे, हातपाय गार पडणे ही लक्षणे आढळतात व ती रक्त पुनर्वितरणजन्य असतात. त्यानंतर सर्वांगास घाम फुटणे, नाडी मंदगती होणे, श्वसनक्रिया जलद व उथळ होणे ही लक्षणे आढळतात. अस्वस्थता, मळमळणे व कधीकधी उलट्याही होतात. रक्तस्राव मोठ्या प्रमाणात झाल्यास अत्यल्प रक्तदाब व वायुक्षुधा ही लक्षणे उद्‌भवतात. शेवटी बेशुद्धी, बाहुली विस्फार व मृत्यू संभवतो. लहान मुले व वृद्ध यांवर प्रौढांपेक्षा अधिक लवकर दुष्परिणाम होतात.

रक्तस्रावजन्य अवसादाला अल्प रक्तघनफळजन्य अवसाद असेही म्हणतात. त्याच्या स्थिर अथवा अप्रगामी आणि प्रगामी अशा अवस्था असू शकतात. एका ठराविक पातळीपर्यंत झालेल्या रक्तस्रावजन्य दुष्परिणामांतून शरीर पूर्ववत बनू शकते. या प्रकाराला ‘अप्रगामी अवसाद’ म्हणतात; परंतु पहिली किंवा सुरुवातीची अवसाद अवस्था जादा अवसाद उत्पन्न करते तेव्हा तो अवसाद प्रगामी बनतो. या अवस्थेत जेव्हा ⇨रक्तधान इ. सर्व उपचार फलदायी ठरत नाहीत, तेव्हा तो अवसाद अपरावर्तनीय बनतो व काही मिनिटे किंवा तासांतच रुग्ण मृत्यू पावतो. या अवस्थेत कधीकधी रक्तधानामुळे हृद्क्षेपित रक्त प्रमाण प्राकृतिक बनून रक्तदाबही पूर्ववत होतो; परंतु ही सुधारणा अल्पकालीनच असते.

 

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate