অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

माँ तुझे सलाम…

माँ तुझे सलाम…

महिला दिनानिमित्त अवयवदान चळवळीमध्ये सहभागी झालेला स्त्री शक्तींवर विशेष लेख

झोया राणा... वय 21 वर्षे. मूळची नागपुरची. मुंबईला फाईन आर्ट्सचे शिक्षण सुरु होते. त्यातच काही दिवसांच्या सुट्टीमध्ये ती आपल्या घरी आली. तिच्या येण्यामुळे घरात आनंदी वातावरण होते. कारण ‘झोया’ म्हणजे एक अवखळ हास्यांचा निरंतर झराच. आपल्या हास्य तुषारांनी इतरांना आपलंस करणारी. अशातच नियती आड आली आणि मार्च 2015 मध्ये सिव्हील लाईन्स येथे अचानक एका गाडीची ठोकर लागून तिचा अपघात झाला. तिला दवाखान्यात नेण्यात आले. 24 तासांनी डॉक्टरांनी तिला ब्रेनडेड घोषित केले. क्षणात होत्याचे नव्हते झाले.

झोया आई-वडिलांचा काळजाचा तुकडा. आज मृत्यूशय्येवर पहुडली होती. तशीच निरागस...जशी झोपताना दिसायची. आई-वडील अचानक झालेल्या आघाताने पुरते कोलमडले. या कसोटीच्या क्षणी झोयाची आई श्रीमती रोझिना राणा यांनी मन घट्ट करुन आपली लेक पुढील प्रवासाला निघताना निर्णय घेतला तो तिचे अवयवदान करण्याचा... केवढं धाडस ! मृत्यूनंतरही मुलीला इतरांमध्ये जगविण्यासाठी धडपडणारी आई. झोयाच्या किडनीमुळे एका 28 वर्षीय आणि 35 वर्षीय इसमाची डायलिसिसच्या दृष्टचक्रातून सुटका झाली. तिच्यामुळे दोघांना पुनर्जीवन मिळाले. मृत्यूनंतरही दुसऱ्यांच्या आयुष्यात हास्य फुलवून दोन घरातील कर्त्या पुरुषांना झोयाने जीवनदान दिले. एप्रिल 2016 मध्ये झोयाचे वडील शमशुद्दीन आणि आई श्रीमती रोझिना यांनी तिच्या स्मरणार्थ “झोया राणा संस्थे”ची स्थापना केली. “For The Art : Called Life” हे या संस्थेचे ब्रिदवाक्य आहे. या संस्थेद्वारे नवतरुणांना करिअरबाबत मार्गदर्शन केले जाते. तसेच चित्रकला, पेंटींग आदी कलागुणांसाठी युवकांना प्रोत्साहित करुन मार्गदर्शन करण्यात येते. त्यांना त्यांच्या हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करुन दिले जाते. या नवतरुणांमध्ये रोझिना यांना आपली “झोया” गवसते. यावेळी म्हणावेसे वाटते...माँ तुझे सलाम.

श्रीमती रमा राधाकृष्णन. पेशाने शिक्षिका. त्यांचे पती एस. राधाकृष्णन (वय 61 वर्षे). राधाकृष्णन हे वेकोलिमधून उपमुख्य व्यवस्थापक (विक्री व विपणन) या पदावरुन सन 2013 मध्ये निवृत्त झाले. मुलगा कार्तिक अमेरिकेत नोकरीला तर मुलगी कविता अभियंता (इलेक्ट्रॉनिक्स) असून पुण्यात काम करते. चौकोनी सुखी कुटुंब. अशातच एस.राधाकृष्णन यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने नागपूरमधील ऑरेंज सिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तपासणीअंती त्यांच्या मेंदूतील रक्तवाहिन्यांमधील रक्त गोठल्याचे स्पष्ट झाले. डॉक्टरांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. परंतू यश आले नाही. राधाकृष्णन ब्रेनडेड झाल्याचे घोषित झाले. संपूर्ण कुटुंब खचले. घरचा आधारवड गेला. परंतु श्रीमती रमा यांनी या कठीण परिस्थितीतही स्वत:ला सावरले आणि मुला व मुलीशी बोलून पतीची किडनी आणि डोळे दान करण्याचे ठरविले.

कुटुंबियांनी हा निर्णय घेतल्यानंतर अवयवदान सल्लागार डॉ. एस.जे. आचार्य, सहसंयोजक मंजिरी दामले यांनी आवश्यक बाबींची पूर्तता केली. वैद्यकीय चमूने किडनी काढण्याची शस्त्रक्रिया केली. यातील एक किडनी एका 23 वर्षीय तरुणीला तर दुसरी किडनी एका 63 वर्षांच्या महिलेला बसविण्यात आली. तसेच राधाकृष्णन यांचे दोन्ही डोळे दान करण्यात आले. त्यांच्यामुळे चौघांना पुनर्जीवन मिळाले.

आपल्या व्यक्तीच्या मृत्यूचा धक्का सहन करणं आणि त्यावेळेस अवयवदानाची संकल्पना स्वीकारणे हे नातेवाईकांसाठी खूप जड जातं. परंतू मृतदेह दफन केला जाणार असेल किंवा त्यावर अग्नीसंस्कार होणार असतील तर अवयवदान केल्यास अवयवाअभावी मृत्यूशय्येवर असलेल्या रुग्णाला आयुष्य जगण्याची आणखी एक संधी मिळू शकते. बरेचजण आपल्या आवडत्या व्यक्तींच्या मृत्यूनंतर त्यांच्या वस्तू दान करतात. त्याचप्रमाणे अवयवदानाकडेही त्याच प्रेरणेने पाहिले गेले पाहिजे.

भारतीय प्राचीन संस्कृतीमध्ये दानाचे महत्व वादातीत आहे. कारण दानाला देवपण माणणारी आपली संस्कृती आहे.

“शतेषु जायते शूर, सहस्त्रेषु च पण्डित:।
वक्ता दशसहस्त्रेषु, दाता भवति वा न वा॥

या संस्कृत वचनानुसार शूर माणूस 100 व्यक्तींमध्ये एक असतो. हजार व्यक्तीसमुहात एक पंडित तर दहा हजार व्यक्तींमध्ये एक वक्ता जन्मास येतो. परंतु दानशूर व्यक्ती असेलच किंवा नाही हे सांगणे अवघड आहे. म्हणजे दानी व्यक्ती दुर्मिळ आहे.

आजकाल समाजामध्ये निस्वार्थपणे सेवा करणाऱ्यांची संख्या फारच कमी आहे. आपल्या दानामुळे जर कोणाच्या आयुष्यात रंग भरता येत असेल, कुणाच्या जीवनात आनंद निर्माण करता येत असेल तर प्रत्येकांनी पुढाकार घ्यायला हवा. यासाठी शासनाच्यावतीने महाअवयवदान चळवळ राबविली गेली आहे. कोणत्याही शासकीय योजनेची यशस्विता लोकसहभागावर अवलंबून असते. यासाठी जास्तीत जास्त लोकांनी सहभागी होऊन अवयवदानाबद्दल लोकजागर करायला हवा. यासाठी श्रीमती रोझिना आणि श्रीमती रमा यांनी आपल्या व्यक्तीचे अवयवदान करुन समाजाला एक आदर्श घालून दिला आहे. या दोन्ही स्त्री शक्तींना त्रिवार मानाचा मुजरा.

म्हणून म्हणावेसे वाटते की,
“जिंदगी हरता रहा हरदम यहॉ।
पानेके लिए नया कदम जहाँ।
जीतेजी तु कर सका ना जिंदगी।
मरते मरते तोड दे शोषित बंदगी।
तेरा मरना प्रकाश देगा।
एैसा बन तपता चिराग॥


लेखक - अपर्णा डांगोरे-यावलकर,
माहिती व जनसंपर्क विभाग, नागपूर.

स्त्रोत - महान्युज

अंतिम सुधारित : 8/4/2023



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate