অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

मराठवाड्यात वर्षभरात १५ जणांचा गेला आवाज

मराठवाड्यात वर्षभरात १५ जणांचा गेला आवाज

तंबाखू, गुटख्याचा परिणाम - गुटख्याने कॅन्सर झाल्यास पाच वर्षांत मृत्यू ठरलेलाच

औरंगाबाद - १९ व्या शतकात संसर्ग, रोगजंतू, टी.बी., एड्‌स हे माणसाचे शत्रू होते. मात्र, आता या सर्वांना मागे टाकून कर्करोगाने दिवसेंदिवस अधिक बळी घेण्यास सुरवात केली आहे. या रोगाचे गुटखा, तंबाखू आणि सिगारेट हेच मुख्य कारण समोर आले असून, वर्षभरात मराठवाड्यातील जवळपास १५ जणांचे स्वरयंत्र काढून टाकावे लागले आहे.
अलीकडच्या काळात आजारांमध्ये सर्वाधिक धोका हा कर्करोगाचा असेल, असे जागतिक आरोग्य संघटनेमार्फत वारंवार सांगितले जात आहे. व्यसन करणाऱ्यांची संख्या दिवसागणिक वाढत असल्यामुळेच अशा आजारांची संख्या वाढत असून अशीच स्थिती राहिल्यास एक दिवस कर्करोग विळखा घालेल, अशी भीती व्यक्‍त केली जात आहे. मराठवाड्यात कर्करोग झालेल्या रुग्णांचा तसेच त्यांच्या कुटुंबीयांच्या व्यसनाबद्दल धूत हॉस्पिटलने एक सर्व्हे केला आहे. त्यात धक्‍कादायक बाबी समोर आल्या आहेत.
या संदर्भात कर्करोग सर्जन डॉ. विराज बोरगावकर म्हणाले, की वर्षभरात २८० ते ३०० रुग्णांपैकी जवळपास १५० जणांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या. काही जणांवर तर शस्त्रक्रिया देखील करता आल्या नाहीत, अशी स्थिती होती. अशा रुग्णांसह त्याचे फॅमिली बॅकग्राउंड तपासले. त्यात ८० टक्‍के रुग्णांचे कुटुंबीयांतील कुणी ना कुणी तंबाखू, गुटखा तसेच सिगारेटचे व्यसन असलेले आढळले. कर्करोग झालेले ७० टक्‍के रुग्ण हे तंबाखू खाणारे, तर ३० टक्‍के रुग्ण हे गुटखा खाणारे असल्याचे निष्पन्न झाले. गुटख्यामुळे कर्करोग झाल्यास अशा रुग्णाचा केवळ पाच वर्षांच्या आत मृत्यू होत असल्याचेही समोर आले आहे. विशेष म्हणजे आता ३२ ते ४५ वयातील रुग्णही वाढत असून तोंडाच्या कर्करोगामुळे चेहरा विद्रूप होत आहे.
सिगारेटमुळे कर्करोग झाल्याने वर्षभरात जवळपास १५ जणांचे स्वरयंत्रच काढावे लागले आहे. त्यामुळे या रुग्णांचा आवाज गेला असून ते आता गळ्याचा उपयोग केवळ जेवणासाठीच करीत आहेत. ही स्थिती फारच गंभीर असून ही संख्या भविष्यात वाढण्याची भीती डॉ. बोरगावकर यांनी व्यक्‍त केली.
शासकीय कर्करोग रुग्णालयात २१ सप्टेंबर २०१२ पासून आत्तापर्यंत ८७ हजार ७२७ जणांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी २७ हजार १६३ रुग्णांना भरती करण्यात आले होते. ६९ हजार ५३० रुग्णांवर किरणोपचार करण्यात आले. आतापर्यंत ५ हजार १५७ छोट्या, तर १ हजार २६६ मोठ्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. या रुग्णालयात मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांसह अकोला, अमरावती, नंदूरबार, धुळे, बुलडाणा येथून रुग्ण उपचारासाठी येत असल्याचे डॉ. अरविंद गायकवाड यांनी सांगितले. परदेशातील पाच ते सहा रुग्णांनी खास करून येथे उपचार घेतले असल्याचेही त्यांनी नमूद केले.
महिलांमधील कर्करोगाची कारणे
किरणोपचारतज्ज्ञ डॉ. बी. के. शेवाळकर - तोंडाच्या कर्करोगाचे प्रमाण हे २५ टक्‍के आहे. स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण हे पूर्वी ८ ते १० टक्‍के होते. ते आता १० ते १५ टक्के झाले असून गर्भाशयाचे ३० टक्‍के आहे. ग्रामीण भागात स्वच्छता नसणे, कमी वयात लग्न होणे, जास्त मुलं होणे यामुळे कर्करोग होतो, तर शहरी भागात उशिरा लग्न केले जाते, तसेच मुलास स्तनपान केले जात नाही, त्यामुळे हा आजार होत आहे.
अचानक शरीरावर पांढरे, लाल चट्टे, छोट्या जखमा आढळून आल्यास तातडीने तज्ज्ञ डॉक्‍टरांना दाखवावे. कर्करोग प्राथमिक स्टेजला असेल तर तो उपचारांनी बरा होतो. सध्या गुटखाबंदी आहे. मात्र, अजूनही अनेक लोक गुटखा खाताना आढळतात. त्यामुळे बंदीऐवजी मनाची तयारी महत्त्वाची. घरातील मोठ्या मंडळींनी व्यसने टाळायला हवीत. त्यांचे अनुकरण करूनच घरातील मुले व्यसनांच्या आहारी जातात. व्यसनमुक्‍त ज्येष्ठांनी दिलेला सल्ला तरुणांना आदर्श वाटेल.
- डॉ. विराज बोरगावकर, कर्करोगतज्ज्ञ, धूत रुग्णालय.
देशात २०१० मध्ये ९ लाख ७९ हजार ७८६ इतके कर्करोगाचे रुग्ण आढळले आहेत. २०२० मध्ये ही संख्या १ कोटी १४ लाख ८ हजार ७५७ पर्यंत पोहचेल, अशी शक्‍यता वर्तविली जात आहे. प्राथमिक स्थितीत असतानाच वेळेत उपचार घेतल्यास तो लवकर बरा होतो, अन्यथा मोठा त्रास सहन करून जगावे लागते. हा आजार असल्याचे निष्पन्न झाल्यास आयुर्वेदिक किंवा इतर उपायांमध्ये वेळ घालवू नये. रक्‍ताचा कर्करोग झाल्यास ६० टक्‍के रुग्ण बरे होतात.
- डॉ. मनोज तोष्णीवाल, कर्करोग तज्ज्ञ.

 

सकाळ

 

अंतिम सुधारित : 2/4/2016



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate