অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

पावसाळा आणि आरोग्य.

पावसाळा आणि आरोग्य.

पावसाळा सुरू झालेला आहे. या अनुषंगाने महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री डॉ.दीपक सावंत यांनी पावसाळ्यात होणाऱ्या जलजन्य व अन्य आजारांबाबत शासनाने केलेल्या उपाययोजनांची माहिती खास महान्‍यूजच्या वाचकांसाठी दिली. याबाबतची माहिती डॉ.दीपक सावंत यांच्याच शब्दांत…
गेल्या वर्षीचा स्वाईन फ्लू आपल्या सगळ्याच्याच लक्षात असेल त्याचबरोबर डेंग्यूचाही मोठ्या प्रमाणावर प्रादूर्भाव दिसून आला. हे सर्व पाहता आपल्याकडे तपासणीकरिता आवश्यक असणारी यंत्रणा नव्हती. डेंग्यू तसेच स्वाईन फ्लू मध्ये असणाऱ्या विषाणूमध्ये जे म्युटेशन होते ते स्टडी करणे अत्यंत आवश्यक आहे. कारण म्युटेशन झाले की ड्रग बदलतो. यासाठी माजी आरोग्य संचालक सुभाष साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली असून ही समिती मार्गदर्शन तत्त्वे तयार करून ती राज्याला लागू करण्यासंदर्भात पाहणी करत आहेत. या समितीने तीन चार बैठका घेतल्या असून या समितीत खाजगी क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींचाही देखील सहभाग होता. मुंबई महानगरपालिका असेल, नागपूर महानगर पालिका असेल किंवा नाशिक महानगरपालिका असेल या सर्व भागातील तज्ज्ञ व्यक्ती त्याचबरोबर एम्सचे काही प्रतिनिधी घ्यायचा आम्ही प्रयत्न केला. त्याचबरोबरच एनआयव्हीचे (नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी) चे प्रतिनिधी या समितीवर घेण्यात आले. या समितीने अभ्यास करून डेंग्यू, मलेरिया, जलजन्य आजार, डायरिया, हॅपेटायटीस, स्वाईन फ्लू यासारखे आजार झाल्यास काय करायचे याबाबत काही मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत. आता आम्ही असे ठरविले आहे की, स्वाईन फ्लूच्या लसीकरणाची ही योग्य वेळ आहे. कारण साधारणपणे स्वाईन फ्लूसाठी लसीकरण करायचे असेल तर त्याची इम्युनिटी पॉवर तयार व्हायला दहा ते बारा दिवस लागतात आणि स्वाईन फ्लूचा उद्रेक साधारणपणे आपल्या या वातावरणामध्ये ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये होण्याचा धोका सदैव असतो.
पाऊस पडून गेला, ऊन पडायला लागले की डेंग्यू डोकं वर काढायला लागतो. त्यासाठी डेंग्यू, स्वाईन फ्लूसाठी मार्गदर्शक तत्त्वे अशी दोन वेगळी भाग केली असून मलेरियासाठी मार्गदर्शक तत्त्वे आहेतच. यासाठी आपण स्वाईन फ्लूसाठी लसीकरण करायचं विचारात आले आणि हे लसीकरण ज्या महिला गर्भधारणेच्या तिसऱ्या टप्प्यात आहे, अशांना हे लसीकरण करता येईल का हे आम्ही तपासून पाहत आहोत. कारण महाराष्ट्रात या महिलांची संख्या लाखांच्या घरात असून अशांना धोका जास्त असतो. हाय रिस्क ग्रुपमध्ये लठ्ठपणा, उच्च रक्त दाब, मधुमेह तसेच ज्यांना वारंवार श्वसनाचे आजार होतात अशा लोकांना स्वाईन फ्लू होणाची जास्त संभावना असतो. दुसरी संभावना असते ती लहान मुलं की ज्यांना नेहमी सर्दी, खोकला असते व ज्यांची रोग प्रतिकार शक्ती कमी असते, एकदा स्वाईन फ्लूने हातपाय पसरले की तो वर्षभर दिसण्याचा धोका असतो. त्यामुळे याबाबत योग्य काळजी घेणे आवश्यक आहे.
केमीस्ट दुकानातून कॉऊंटरवरून जी सर्दी-खोकल्याची औषधे घेतली जातात ती देऊ नये, अशा सूचना एफडीआयमार्फत सर्व केमिस्टांना देण्यात आल्या आहे. या काळात केमिस्टने काऊंटर प्रक्टिस बंद करावी आणि कोणत्याही व्यक्तीस कोल्डरिन, फ्लू यासारख्या गोळ्या देऊ नये. रोगी हा डॉक्टरकडे जाणे आवश्यक असते. त्यांनी स्वत:च इलाज केला तर तो दुसऱ्या नाहीतर तिसऱ्या स्टेजला जातो. स्वाईन फ्लूचा रोगी व्हेंटीलेटरवर जाणं हे टाळणं आवश्यक आहे. तसेच स्वाईन फ्लूच्या पेशंटचे योग्य वेळी निदान होणं गरजेचं आहे. त्यासाठी आपण काही लॅबोरेटरी नोटीफाय केल्या आहेत. या लॅबमध्ये स्वाईन फ्लूसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व तपासण्या कशा होतील हे पाहिले आहे. यासाठी आपण काही खाजगी लॅबचे सहकार्य घेतले आहे.
दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे महानगरात डेंग्यूसाठी मोठी अडचण असते ती हायराईज इमारतीमध्ये. या इमारतीमध्ये आरोग्य कर्मचाऱ्याला तेथील रहिवाशी शिरकाव करू देत नाही. त्यामुळे ज्या ठिकाणी रूग्ण आहे त्या ठिकाणी आरोग्य कर्मचारी जाऊन तपासणी करू शकत नाही. ज्या ठिकाणी रूग्ण सापडतो त्या ठिकाणच्या 100 मीटर परिसरात अळीपरीक्षण करण्यात येते. त्यामुळे डेंग्यू हा नोटीसेबल डिसीज म्हणून जाहीर करण्यात आला तर या सर्व गोष्टी सुसह्य होतील.
तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे इमर्जेन्सी मेडीकल ॲक्ट म्हणजे आकस्मिक सेवा कायदा. आज आरोग्य खात्याला कोणाचाही मृत्यू झाल्यास जबाबदार धरले जाते आणि ही जबाबदारी आरोग्य खात्याची आहे, हेही आम्ही जाणतो. पण आरोग्य विभाग, महानगरपालिका, नगरपरिषद यांची हॉस्पीटल, जिल्हा परिषदेमार्फत चालविण्यात येणाऱ्या डिस्पेन्सरीज त्याचबरोबर मेडीकल कॉलेजची हॉस्पीटल ही महाराष्ट्रभर आहे. गेल्या वर्षीची स्वाईन फ्लूने मृत्यूची आकडेवारी जर बघितली तर आरोग्य खात्याची हॉस्पीटलची आकडेवारी फार कमी होती. खाजगी रूग्णालयामध्ये स्वाईन फ्लूमुळे मृत्यूचे प्रमाण जास्त होते. त्यानंतर मेडीकल कॉलेज, कॉर्पोरेशनची हॉस्पीटल असे प्रमाण होतं. या सर्व हॉस्पीटलमध्ये सुसूत्रता आणणं अत्यंत आवश्यक आहे. ही सर्व हॉस्पीटल्स आपआपल्या पद्धतीने काम करीत असतात. यावर एकछत्री अंमल असणं आवश्यक आहे. कारण ज्यावेळी भारत सरकारमार्फत मार्गदर्शन तत्त्वे आरोग्य खात्याकडे येतात त्यावेळी ती सर्वदूर जाणं गरजेचं असते. त्यामुळे हा कायदा करण्यात आला आहे. एखाद्या शहरात, राज्यभर रोगांची साथ उद्भवत असेल तर महानगरपालिका, आरोग्य यंत्रणा त्याचबरोबर राज्य शासनाची ती जबाबदारी आहे. यासाठी सुसुत्रता तयार करण्यासाठी, मार्गदर्शक सूचना देण्यासाठी हा कायदा खूप महत्त्वाचा ठरेल. या कायद्यामुळे शासकीय व खाजगी रूग्णालयात समन्वय साधण्यासाठी तसेच अंकुश ठेवणे शक्य होणार आहे.
डेंग्यू, मलेरिया तसेच अन्य आजारांबाबतच्या जाहिरातीमध्ये सुसूत्रता दिसून येत नाही. या जाहिराती लोकांना अपील होत नाही. लोक या जाहिराती नजरेआड करतात आणि निघून जातात. त्यामुळे जाहिरातीचा वापर होत नाही. जसे केमिस्टच्या दुकानाकरिता हिरव्या रंगातील प्लस चिन्ह वारण्यात येते अगदी त्याचप्रमाणे डेंग्यू, मलेरिया, स्वाईन फ्लू, जलजन्य आजारांच्या जाहिराती बनविण्याचे काम सुरू आहे.
हा महाराष्ट्र आपला आहे. या महाराष्ट्रातील जनतेचं आरोग्य सदृढ राहण्यासाठी आम्ही जे प्रयत्न करतोय त्याला आपल्या सहकार्याची अत्यंत आवश्यकता आहे. कोणत्याही प्रकारे पीसीपीएनडीटी कायद्याचे पालन करणे आवश्यक आहे. मुलगी या देशाची संपत्ती आहे. त्यामुळे मुलीला वाचवा, मुलीला शिकवा. घर जर शिक्षीत झालं तर आपला समाज शिक्षीत होईल आणि या देशाचं आणि महाराष्ट्रात आरोग्य अबाधित राहिल.

 

-शब्दांकन : संजय डी.ओरके

माहिती स्रोत: महान्यूज, सोमवार, २९ जून, २०१५.

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate