অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

दलदल परिसंस्था

दलदल परिसंस्था

चिखल आणि गाळ यांनी भरलेली पाणथळ जागा म्हणजे दलदल. दलदल ही एक आद्र्रभूमीच आहे. दलदल परिसंस्था ही आद्र्रभूमी परिसंस्थेचाच एक प्रकार आहे. जेथे जमिनीतील पाण्याची पातळी भूपृष्ठाच्या वर आलेली असते, तेथे दलदली तयार होतात. दलदली या गोड्या पाण्याच्या, मचूळ किंवा खाऱ्यापाण्याच्या असून त्या हंगामी किंवा कायमस्वरूपी असतात. दलदल कोणत्याही प्रकारची असो, पाण्याचा निचरा न झाल्यामुळे तेथे पाणी साचते. दलदलींमधील पाणी स्थिर किंवा अतिशय संथ वाहणारे असते. सपाट प्रदेशात पावसाचे पाणी साचून, पूरतटांपलीकडे, नदीच्या संथ प्रवाहालगत, त्रिभुज प्रदेशांत, सरोवरांच्या खोलगट भागात आणि हिमगाळाच्या मैदानांत दलदली तयार होतात.

सायबीरियात उन्हाळ्याच्या सुरुवातीला उत्तरेकडे वाहत जाणाऱ्यानद्यांची मुखे व तेथील समुद्र हिवाळ्यात गोठलेले असतात. उन्हाळ्याच्या सुरुवातीला या नद्यांच्या मार्गात गोठलेल्या मुखांमुळे अडथळा निर्माण झाल्याने नद्यांचे पाणी पूर्व-पश्चिम पसरून उत्तर सायबीरियात दलदली निर्माण होतात. खाऱ्याव मचूळ पाण्याने डबडबलेल्या समुद्रकिनारी, किनाऱ्याच्या आतील बाजूला, खाड्यांमध्ये, नद्यांच्या मुखाशी व रुक्ष प्रदेशात खाऱ्यादलदली आढळतात. समुद्रकिनाऱ्यावरच्या दलदली अंतर्भागात बऱ्याच अंतरावर असूनही भरती-ओहोटीशी संबंधित असतात. भारताच्या पूर्व व पश्चिम किनारपट्टींवर अनेक ठिकाणी खाऱ्यादलदली आढळतात. भारतातील सुंदरबन, आफ्रिकेतील ओकाव्हांगो त्रिभुज प्रदेश, पश्चिम सायबीरियातील वास्युगान दलदल हे जगातील काही प्रमुख दलदली प्रदेश आहेत.

जगात वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या दलदली आढळतात. त्या निरनिराळ्या नावांनी ओळखल्या जातात. उदा., अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील फ्लॉरिडा राज्यात त्यांना एव्हरग्लेड्स, कॅनडातील उत्तर ध्रुवाजवळील प्रदेशांत त्यांना मस्केग, तर इंग्लंडमध्ये त्यांना मूर, बॉग, फेन अशी नावे आहेत.

दलदलीच्या प्रदेशांत वैविध्यपूर्ण वनस्पतिजीवन व प्राणिजीवन आढळते. दलदलींचे प्रकार, त्यांतील पाण्याची खोली व तापमान, क्षारता आणि सामू यानुसार ही विविधता दिसून येते. दलदलयुक्त प्रदेशांना ऑॅक्सिजनयुक्त गोड्या पाण्याचा सातत्याने पुरवठा होत असल्याने त्यांत विविध परिसंस्था विकसित झालेल्या दिसतात. ओक, सीडार, विलो, एल्म, मॅपल, जंगली रबर, कच्छ वनश्री इ. प्रकारचे वृक्ष, हरिता, विविध प्रकारची गवते, झुडपे, शेवाळी, कमळासारख्या व लव्हाळ्यासारख्या जलवनस्पती, तरंगत्या वनस्पती इ. प्रकारचे वनस्पतिजीवन दलदलींमध्ये आढळते. त्याला अनुसरून प्राणिजीवन आढळते. त्यांत कासव, मगर, साप, गोगलगाय, माकडे, हरिण, बीव्हर, ऊद मांजर, कालव, कीटक, रॅकू न, ऑपोस्सम, चिचुंदरीr, अस्वल, ससे इत्यादींचा समावेश असतो. पाणकोंबडे, बगळा, आयबिस इ. पक्षी दलदलीच्या प्रदेशात आढळतात.

दलदलीचे प्रदेश म्हणजे अनुत्पादित, पडिक जमीन अशी एक धारणा होती. त्यामुळे जगातील अनेक दलदलींचा निचरा करून, त्यांत भर टाकू न, दलदल कमी करून त्या जमिनींचा वापर लागवडीसाठी, कुरणांसाठी किंवा नागरी वस्त्यांसाठी करण्यात आला आहे. प्रत्यक्षात दलदली प्रदेशात आवश्यक पारिस्थितिकी कार्ये घडत असतात. दलदली भूमिगत पाण्याचे मुख्य स्रोत असल्यामुळे जलस्तर स्थिर राखण्याच्या दृष्टीने त्या उपयुक्त ठरतात.

नद्यांच्या प्रवाहात व खाडी प्रदेशात असलेल्या दलदलींमुळे मुसळधार पावसाच्या काळात प्रवाहाचा वेग कमी होऊन नैसर्गिक पूरनियंत्रक म्हणून दलदली कार्य करतात. उंच प्रदेशाकडून वाहत येणारी पोषकद्रव्ये दलदलींमध्ये साचत जातात. त्यामुळे समुद्राकडे वाहत जाणाऱ्याखनिजांचा प्रवास लांबला जातो. नद्यांच्या खोऱ्यातील दलदलींचा उपयोग नैसर्गिक रीत्या पाण्यातील प्रदूषके आणि पाण्याबरोबर वाहत येणारी कारखान्यांतील अपशिष्टे काढून टाकण्यासाठी होतो.

या प्रदेशात प्रवाहाचा वेग कमी होत असल्यामुळे त्यांनी वाहून आणलेल्या गाळाच्या कणांचे संचयन होत जाते. त्यामुळे पाण्याचे यांत्रिक गालन (निस्यंदन) होते. तसेच त्यातील जीवाणूंमुळे जैविकदृष्ट्या प्रदूषके वेगळी होतात. ज्या प्रदेशांत दलदलींचे जलवहन करण्यात आले आहे, तेथे पूराचा व प्रदूषणाचा धोका वाढल्याचे आढळते. किनाऱ्यावरील दलदली प्रदेशांत आढळणाऱ्याकच्छ वनश्रीमुळे सागरी लाटांची तीव्रता कमी झाल्यामुळे लाटांपासून किनारी प्रदेशाचे संरक्षण आपोआप होते. काही दुर्मिळ प्राणी व पक्ष्यांचे हे आश्रयस्थान असते. आर्थिक व पारिस्थितिकीय दृष्ट्या दलदली उपयुक्त असल्यामुळे त्यांचे संवर्धन करणे आवश्यक आहे.

 

लेखक - वसंत चौधरी

स्त्रोत: कुमार विश्वकोश

अंतिम सुधारित : 6/4/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate