सांगली जिल्ह्यामध्ये हिवताप रूग्णसंख्या सध्या मर्यादित असली तरी, वाढते शहरीकरण, विविध प्रकल्प, वाढती बांधकामे, पाणीपुरवठा योजना, मजूर वर्गाचे स्थलांतर इत्यादीमुळे डासोत्पती स्थानात वाढ होत आहे. भविष्यात ही रूग्ण संख्या नियंत्रणात राहण्याच्या दृष्टिने शासकीय प्रयत्नांबरोबरच जनतेचा सहभाग व सहकार्य आवश्यक आहे. यासाठी राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जून 2017 मध्ये हिवताप जनजागरण मोहीम गावपातळीपर्यंत विविध उपक्रमाद्वारे राबविण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर कीटकजन्य हिवताप आणि डेंग्यू आजार, लक्षणे आणि प्रतिरोध यांची माहिती घेऊया.
भारतातील हवामान हे हिवतापास पोषक असल्याने स्वातंत्र्य पूर्व काळापासून हिवताप हा मुळ धरून आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात हिवतापाचे 7.5 कोटी रूग्ण होते, त्यापैकी 8 लाख लोकांचा हिवतापाने मृत्यू झाला. यावरून स्वातंत्र्य पूर्व काळामध्ये हिवतापाने फारच भयानक रूप धारण केलेले होते. 1965 साली मात्र हिवताप बऱ्याच प्रमाणात आटोक्यात आलेला होता. यावर्षी फक्त एक लाख लोकांनाच हिवतापाची लागण झालेली होती. त्यातही सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यावर्षी एकही हिवतापाने मृत्यू झालेला नव्हता. हिवतापासाठीचे ते साल फारच आशादायक होते. परंतु 1976 नंतर आजतागायत हिवताप रूग्णांच्या संख्येत वाढत दिसून येत आहे. 1997 मध्ये 90 कोटी लोकसंख्येपैकी 24 लाख लोकसंख्या ही हिवतापाने पिडीत होती. तर त्यावर्षी 711 हिवताप मृत्यूची नोंद झालेली होती. यावरून हिवताप हा किती भयानक रोग आहे याची कल्पना येते.
हिवताप हा तीव्र ताप येणारा म्हणूनच ओळखला जातो. त्याची लागण ही अतिसुक्ष्म अशा जंतूमुळे होते. त्यास हिवताप परोपजीवी जंतू म्हणतात. हिवताप झालेल्या व्यक्तीपासून निरोगी व्यक्तीच्या शरीरात हिवताप जंतूचा प्रवेश विशिष्ट प्रकारच्या डासामुळे होतो. सर्व प्रकारचे डास हे हिवतापाचा प्रसार करू शकत नाहीत. तर लाळग्रंथीमध्ये हिवताप जंतू आलेल्या ॲनाफेलीस डासाच्या मादीने चावा घेतला असता हिवतापाची लागण होते. (सूक्ष्मदर्शक यंत्राच्या सहाय्याने हिवताप जंतूचे निरीक्षण करता येते) हिवताप जंतूच्या जीवनचक्राचा काही भाग मानवी शरीरात तर काही भाग डासाच्या शरीरात पूर्ण होतो. जेव्हा ॲनाफेलीस डासाची मादी आजारी असलेल्या व्यक्तीस चावते तेव्हा हिवताप जंतूंचा तिच्या शरीरात प्रवेश होतो. नंतर हिवताप जंतू डासाच्या पोटात प्रवेश करतात. ती हिवताप प्रसारास सक्षम बनते. हा डास जेव्हा निरोगी व्यक्तीस चावतो तेव्हा हिवतापाचे जंतू त्याच्या रक्तामध्ये सोडले जातात. त्या व्यक्तीस 14 ते 21 दिवसांनी ताप येतो. हिवतापाचा एक रूग्ण पुष्कळ लोकांना हा आजार देवू शकतो.
हिवतापाच्या मुख्यत: तीन अवस्था असतात.
थंडी (कोल्ड स्टेज) - या अवस्थेमध्ये प्रथम थंडी वाजते. कापरे भरते व डोके दुखते. अशा अवस्थेमध्ये रूग्णास रजई, दुलई पांघरावीशी वाटते, ओठ व हातापायाची बोटे निळसर होवून कोरडी भासतात, त्वचेवरील केस उभे राहतात, ही अवस्था 15 मिनिटापासून 1 तासापर्यंत टिकते.
ताप (हॉट स्टेज) - या अवस्थेमध्ये खूप ताप येतो व रोग्यास अंग भाजल्यासारखे वाटू लागते. तो कपडे काढून टाकतो. रोग्यास मळमळल्यासारखे वाटते. उलट्या होतात व डोके अतिशय दुखते. रोग्यास सारखी तहान लागते. नाडीची गती वाढते. ही अवस्था 2 तासापासून 6 तासापर्यंत टिकते.
घाम (स्वेटिंग स्टेज) - या अवस्थेमध्ये भरपूर घाम येवून ताप उतरतो. रोग्यास गाढ झोप लागते. तो कपडे काढून टाकतो. जाग आल्यावर अशक्तपणा जाणवतो. ही अवस्था 2 ते 4 तास टिकते.
जगामध्ये आढळणाऱ्या चार प्रकारच्या हिवतापापैकी आपल्या देशामध्ये तीन प्रकार आढळून येतात. त्यापैकी पी. व्हायव्हॅक्स प्रकारचा हिवताप (हिवतापाचा सर्वसामान्य प्रकार) व पी. फॅल्सीफेरम प्रकारचा (मेंदूवर परिणाम करणारा मस्तिष्कज्वर) आपल्याकडे प्रामुख्याने आढळून येतात. पी फॅल्सीफेरमध्ये मेंदूचा हिवताप (मेंदूज्वर) झाल्यास तो हिवताप घातक असू शकतो. त्वरीत औषधोपचार केला नाही तर रूग्ण 2 ते 3 दिवसात दगाविण्याची शक्यता असते. पूर्वी भारतात आढळून येणाऱ्या एकूण हिवताप रूग्णापैकी सुमारे 60-65 टक्के रूग्ण हे पी. व्ही. प्रकारचे असत. सध्यामात्र ही परिस्थिती बदलत असून पी. एफ. रूग्णांची संख्या सर्वत्र वाढत आहे.
डास आपणास चावणार नाहीत याची दक्षता घ्यावी. देशातील अनेक लोक पांघरूणाशिवाय घराबाहेर झोपणे पसंत करतात. अशावेळी डासांपासून संरक्षण करण्यासाठी मच्छरदाण्यांचा उपयोग केला पाहिजे. डासांचा त्रास टाळण्यासाठी किटकनाशकभारीत मच्छरदाणीचा वापर केला पाहिजे. डास प्रतिबंधक अगरबत्यांचा वापरही करणे आवश्यक आहे.
सभोवताली पाणी साठून राहिलेले खड्डे, डबकी बुजवून डासोत्पती स्थाने कमी करता येतात. ज्या छोट्या डबक्यातील, तळ्यातील पाणी वाहते करणे शक्य नसेल अशा डबक्यामध्ये, तळ्यामध्ये डासांच्या अळ्या खाणारे गम्बुशिया वा गप्पी जातीचे मासे सोडता येतात. इमारतीवरील टाक्या, वॉटर कुलर्स, कारंजी नियमितपणे वेळोवेळी स्वच्छ करावीत जेणेकरून डासोत्पतीस प्रतिबंध घातला जाईल. प्रत्येक सेप्टिक टँकवरील पाईपना कॅप / जाळी बसविल्याने डासांची वाढ रोखता येते.
हिवतापामध्ये सर्वसाधारणपणे प्रथम ताप येतो त्यानंतर यकृत व प्लीहाला सूज येते. हिवताप परोपजीवी जंतूचे हे तांबड्या रक्तपेशीवर हल्ला केल्यामुळेच रक्तक्षय होण्याची शक्यता जास्त आहे. यामुळे मानवाच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो. भारतासारख्या देशामध्ये जर 20-30 लाख लोकांच्या कार्यक्षमतेवर परिणाम होत असेल तर ते देशाचेच नुकसान आहे. गर्भवती स्त्रियांना व बालकांना हिवतापासून सर्वात जास्त धोका आढळून आलेला आहे. तसेच हिवताप जंतूच्या सततच्या वास्तव्यामुळे अशक्तपणा येतो व वजनात घट येते त्यामुळे कार्यक्षमतेवर परिणाम होतो. मेंदूच्या हिवतापामध्ये वाढती डोकेदुखी, ग्लानी, जलद श्वासोच्छवास, बुद्धीभ्रम होवून रूग्ण बेशुद्ध होतो. प्रसंगी मुत्रपिंडाच्या कार्यक्षमतेवरही परिणाम होतो. भारतात जवळ जवळ सर्व हिवताप मृत्यू हे या प्रकाराने होतात. गर्भवती स्त्रियांना हिवतापाची लागण झाल्यास प्रसंगी गर्भपात होण्याची शक्यता असते.
फोफावणाऱ्या हिवतापाला वेळीच प्रतिबंध घातला तरच मानवी जीवन हे सुसह्य होणार आहे. यासाठी हिवतापाला सर्वांनी मिळून विरोध केला पाहिजे. यासाठी मुख्यत: डासांवर नियंत्रण व हिवताप रोग्यावर उपचार या दोनच पद्धती अंमलात आणावयाच्या आहेत. हिवताप जंतूचे रूग्णाच्या शरीरातील सततच्या वास्तव्यामुळे हिवतापाचा प्रसार मोठ्या प्रमाणावर होत आहे. यासाठी रूग्णांनी हिवतापासाठीचा समूळ उपचार घेऊन सहकार्य करणे आवश्यक आहे.
-संप्रदा द. बीडकर
माहिती स्रोत: महान्युज
अंतिम सुधारित : 2/8/2020
हिवताप हटवण्यासाठी 1955 पासून राष्ट्रीय व आंतरराष्...
ग्रामीण तसेच शहरी भागात हिवतापाचे नियंत्रण करणे हे...
मलेरिया / हिवताप हा डास चावल्यामुळे होणारा रोग किं...
उष्णकटिबंधी रोग : पृथ्वीच्या उष्णकटिबंधामध्ये विशे...