नवजात बालकाच्या पायाचा जन्मजात असणारा वाकडेपणा म्हणजे क्लबफूट होय. या आजाराचे कारण अद्याप माहित नसल्याने या आजाराचा प्रतिबंध होवू शकत नाही. क्लबफूटचे वेळीच निदान करुन उपचार केल्यास तो पूर्णपणे बरा होऊ शकतो. क्युअर इंटरनॅशलन इंडिया आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त कार्यक्रमातून येथील क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण जिल्हा रुग्णालयात क्लबफूटचा उपचार मोफत केला जात आहे.
साधारण 2012 पासून या मोहिमेची सुरुवात करण्यात आली आहे. या कार्यक्रमाच्या जिल्हा समन्वयक मयुरा गायकवाड या कामकाज पाहत आहेत. क्लबफूटचा उपचार न केल्यास आयुष्यभरासाठी अपंगत्व येवू शकते. यामध्ये 50 टक्के मुलांना दोन्ही पायांना आणि 50 टक्के मुलांना एकाच पायाला क्लबफूटची बाधा असते. जगामध्ये 500 मुलांपैकी एक मूल क्लबफूटबाधित जन्माला येते. यानुसार भारतात दरवर्षी 50 हजारापेक्षा जास्त मुले क्लबफूटबाधित जन्माला येतात.
साताऱ्यामध्ये आजपर्यंत अशा 43 बालकांवर उपचार करण्यात येत असल्याची माहिती मयुरा गायकवाड यांनी दिली. त्या म्हणाल्या, क्लबफूटबाधित जन्मलेल्या बालकांना जिल्हा रुग्णालयात नोंदणी करण्यास त्यांच्या पालकांना मदत करणे. निदान झालेल्या बालकांची पूर्ण माहिती क्यूअर क्लबफूट परामर्शदात्यांना देणे. उपचार घेणाऱ्या बालकांचे कार्यक्रमातून गळती होवू नये म्हणून त्यांच्यावर निगराणी ठेवणे, जेणेकरुन त्यांचे पाय पुन्हा वाकडे होवू नये ही या कार्यक्रमाची महत्वपूर्ण भूमिका आहे.
याच्या उपचार पद्धतीमध्ये 6 ते 8 आठवडे प्लास्टर केले जातात. बाळाचे वय जास्त असेल तर प्लास्टरची संख्या वाढते. शेवटचे प्लास्टर तीन आठवड्यांचे असते. त्यापूर्वी टेनोटोमी नावाची छोटी शस्त्रक्रिया केली जाते. शेवटी प्लास्टर काढल्यावर बाळाला विशेष बूट दिले जातात.
क्लबफूटचा उपचार पूर्णपणे मोफत केला जातो. गरजू रूग्णांनी येथील क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण जिल्हा रुग्णालयामध्ये तसेच 9881493512, 9868005679 वर संपर्क साधावा, असे आवाहन श्रीमती गायकवाड यांनी केले आहे.
प्रशांत सातपुते,
माहिती अधिकारी, सातारा.
माहिती स्रोत: महान्युज
अंतिम सुधारित : 7/26/2020