काही समस्यांमुळे आरोग्यसेवांवरचा एकूण खर्च वाढत चालला आहे. शासकीय आरोग्यसेवा यामुळे अडचणीत येत आहेत. यावरही काही पर्याय आहेत. उदा. आरोग्यसेवेची रचना त्रिस्तरीय करून प्राथमिक स्तरावर 60-70% आरोग्यसेवा देता आल्यास बराच खर्च वाचतो. निरनिराळया देशांमध्ये यासाठी निरनिराळया प्रकारची प्राथमिक आरोग्यसेवेची व्यवस्था आहे.
सर्व शासकीय आरोग्यसेवांपुढे हे एक मोठे आव्हान आहे. आरोग्यसेवांचा खर्च सतत वाढत आहे. आधुनिक तंत्रज्ञान,यंत्रसामुग्री, मधुमेहासारख्या दीर्घकालीन आजारांचे वाढते प्रमाण या सर्वांमुळे आरोग्यसेवांवरचा खर्च वाढत चालला आहे. त्यामुळे अनेक शासनांसमोर हा खर्च कसा पेलायचा हे एक आव्हान आहे. अनेक युरोपियन देशांतून भारतात परदेशी नागरिक उपचारासाठी येतात. याचे कारण त्या देशांमधल्या आरोग्यसेवा पु-या पडत नाहीत आणि त्यांची प्रतीक्षा यादी वाढत आहे.
अनेक देशांमध्ये कमी अधिक ग्रामीण भाग असतोच. अमेरिका व युरोपमध्ये देखील असे ग्रामीण भाग आहेत. अविकसित देशांमध्ये 70-80% पर्यंत ग्रामीण जनता असते. बहुतेक देशांमध्ये खेडे-पातळीवर आरोग्यसेवा पुरवणे हे मोठे अवघड काम आहे. याचे मुख्य कारण ग्रामीण जनतेची आर्थिक परिस्थिती बरी नसते आणि सामाजिक सोयी कमी असतात. यामुळे डॉक्टर आणि नर्सेस त्या ठिकाणी रहायला तयार नसतात. यामुळे अनेक देशांमधील खेडयांमध्ये प्रशिक्षित आरोग्य कार्यकर्ते नेमून काम चालवले जाते. निरनिराळया देशांमध्ये असे कार्यकर्ते निरनिराळया नावांनी ओळखले जातात. काही देशांमध्ये परिचारिकांनाच आणखी प्रशिक्षण देऊन ग्रामीण आरोग्यसेवा चालवल्या जातात.
गेल्या काही वर्षात औषधांमध्ये खूप संशोधन होऊन नवनवीन औषधे उपलब्ध झाली आहेत. या औषधांची किंमत पूर्वीच्या औषधांच्या तुलनेने जास्त आहे. यामुळे आरोग्यसेवांचा खर्च वाढत चालला आहे. आजही लोकांचा आरोग्यसेवेच्या खर्चाचा एक मोठा भाग औषधांचाच असतो.
लेखक : डॉ. श्याम अष्टेकर (MBBS, MD community Medicine)
संदर्भ : आरोग्याविद्या
अंतिम सुधारित : 10/7/2020
महाराष्ट्रातल्या आरोग्यसेवांचे शास्त्रीय पद्धतीने ...
2007 पासून महाराष्ट्रात आशा योजना लागू केलेली आहे....
या सर्व आजार आणि मृत्यूदरांच्या पार्श्वभूमीवर भारत...
भारतातली सध्याची आरोग्यसेवा ही एका अरिष्टात सापडले...