स्त्री-पुरुषसंप्रेरके ही स्टेरॉईड जातीची विशिष्ट उदाहरणे आहेत. स्टेरॉईडचे इतर अनेक प्रकार मूत्रपिंडावरच्या ऍड्रेनल ग्रंथीतून तयार होतात. सिनेमातली मारामारी पाहताना आपलेही रक्त उसळते, त्याचे कारण ऍड्रेनॅलिन नावाचे हार्मोन आहे. या संप्रेरकांच्या शरीरातील परिणामांची व कामांची यादी मोठी आहे. रक्तातील साखरेचे प्रमाण वाढवणे,हृदयाची गती व दाब वाढवणे, शरीरात पाणी व मीठ यांचा साठा करणे, रोगप्रतिकारशक्ती कमी करणे, वावडयाची प्रक्रिया थांबवणे, इत्यादी.
या गुणधर्मामुळे या औषधांचा अतिशय गैरवापर होतो. या औषधांचे दुष्परिणामही असतात आणि ते अश्राप रुग्णांना काही अडाणी डॉक्टरांमुळे भोगावे लागतात. अनेक अप्रशिक्षित डॉक्टर्स सर्रास स्टेरॉईड संप्रेरके देतात. अडाणी डॉक्टरांकडून मिळालेल्या तीन-साडेतीन गोळयांच्या पुडीत स्टेरॉईडची गोळी न चुकता आढळते. या गोळीने बहुतेक रोगप्रक्रियांना तात्पुरता म्हणजे एक-दोन दिवस आराम पडतो, पण नंतर रोग उसळू शकतो. हे कसे होते हे आपण थोडक्यात पाहू या.
स्टेरॉईड औषधांमुळे दाह प्रक्रियेला आळा बसतो. दाहामुळे होणारी वेदना, नुकसान त्यामुळे कमी होते. पण दाह ही स्वतः रोगाला आळा घालणारी प्रक्रिया असल्याने 'दाह'कमी झाला, की रोग पसरण्याची शक्यता असते. स्टेरॉईड संप्रेरक हे परिणामकारक पण दुधारी हत्यार आहे. त्याचा वापर तज्ज्ञानेच केला पाहिजे.
लेखक : डॉ. श्याम अष्टेकर
(MBBS, MD community Medicine)संदर्भ : आरोग्यविद्या
अंतिम सुधारित : 6/6/2020
शरीरात अनेक प्रकारच्या ग्रंथी आहेत. त्यांत मुख्य प...
थॉयरॉईड (गलग्रंथी) ही फुलपाखराच्या आकाराची ग्रंथी ...