शरीरात अनेक प्रकारच्या ग्रंथी आहेत. त्यांत मुख्य प्रकार दोन आहेत.
पहिला प्रकार म्हणजे तयार होणारा रस नळीवाटे आणून सोडणा-या ग्रंथी उदा. लालोत्पादक पिंड, स्वादुपिंडाचा काही भाग, यकृत, इ. या ग्रंथींतून तयार होणारे रस 'स्थानिक' स्वरुपाची कामे करतात. (उदा. लाळेमुळे पचनाची सुरुवात होणे पित्तरसामुळे आतडयात स्निग्ध पदार्थाचे पचन होणे, इ.)
ग्रंथींचा दुसरा प्रकार म्हणजे अशी नळी नसलेल्या ग्रंथी. यांचा रस सरळ रक्तात मिसळतो. या ग्रंथींतून किती रस पाझरावा याचे नियंत्रण रक्तातील रासायनिक घडामोडींवर व चेतासंस्थेच्या आदेशावर अवलंबून असते.
या दुस-या प्रकारच्या ग्रंथींमध्ये तयार होणा-या रसांना 'संप्रेरक' रस म्हणता येईल. कारण या रसांमुळे शरीरातील अनेकविध क्रियांचे प्रेरण व नियंत्रण होते. या संप्रेरकांचे काम अगदी विशिष्ट असते. उदाहरणार्थ, पुरुषसंप्रेरकांमुळे 'पुरुषी लक्षणे' दिसतात. थायरॉईड किंवा गलग्रंथीतून येणारी संप्रेरके शरीरातल्या अनेक रासायनिक घडामोडींवर नियंत्रण ठेवतात. पिटयुटरी या मेंदूखालच्या ग्रंथीतून येणा-या संप्रेरकांमुळे शरीराची वाढ होते. स्त्रीबीजांडातून येणा-या संप्रेरकांमुळे स्त्रीत्वाची लक्षणे, गर्भधारणा, इत्यादी गोष्टी शक्य होतात.
आपल्याला संप्रेरकांच्या अस्तित्वाची जाणीव सहसा होत नाही. जेव्हा संप्रेरकांचे प्रमाण कमीजास्त होऊन शरीरात उलथापालथ होते तेव्हाच ही जाणीव होते. हे बदल अचानक होतात किंवा हळूहळू दिसतात. पण संप्रेरकाच्या पातळीतल्या बदलांचे परिणाम निश्चितपणे खूप दूरवर होतात.
काही संप्रेरके आता तयार करता येतात. आता संप्रेरकांच्या कामांची यादी जरा पाहू या.
संप्रेरके म्हणजे रासायनिक पदार्थ असतात. त्यांचे काम अगदी विशिष्ट प्रकारचे असते. संप्रेरकांची रक्तातील पातळी अगदी सूक्ष्म आणि काटेकोर असते. त्यात थोडा फरक पडला तरी त्या त्या कामावर दूरगामी परिणाम होतात.
काही संप्रेरके वाढीच्या कामासाठी आवश्यक असतात. उदा. पिटयुटरीमधून येणारे 'वाढ संप्रेरक'(ग्रोथ हार्मोन), तसेच गलग्रंथीतून येणारे थायरॉक्झिन. वाढीच्या काळात यांचे प्रमाण कमी असेल तर वाढ खुंटते. वाढ संप्रेरकांचे वाढीच्या काळातले प्रमाण गरजेपेक्षा जादा असेल तर उंची व रुंदी प्रमाणाबाहेर वाढतात, अगदी आठ-नऊ फुटांपर्यंत उंची जाऊ शकते.
स्त्रीसंप्रेरकांचे काम अनेकविध स्वरुपाचे असते उदा. मासिक पाळी येणे, स्त्रीबीज बाहेर पडणे, गर्भधारणा, स्त्रीत्वाची इतर लक्षणे- आवाज मृदू असणे, चरबीचे प्रमाण, अवयवांची गोलाई, केसांची विशिष्ट ठेवण, स्त्री-जननसंस्थेची वाढ व कार्य, इ.
पुरुषसंप्रेरकांचे कामही अगदी विशिष्ट असते. उदा. दाढीमिशा, लैंगिक इच्छा, शरीरातील ठेवण, पुरुषी आवाज, इ.
स्त्रीसंप्रेरकांचा उपयोग मोठया प्रमाणात कुटुंबनियोजनासाठी होत आहे. पुरुषसंप्रेरकेही जास्त प्रमाणात वापरली जात आहेत. यांचा दुरुपयोगही मोठया प्रमाणावर होत आहे. या प्रकरणात संप्रेरकांच्या कमीजास्त प्रमाणाने होणा-या आजारांची माहिती घेऊ या.
संप्रेरकांची थोडक्यात माहिती (तक्ता (Table) पहा)
लेखक : डॉ. श्याम अष्टेकर (MBBS, MD community Medicine)
संदर्भ : आरोग्यविद्या
अंतिम सुधारित : 7/21/2020
दूरदर्शन सह्याद्री निर्मित कॅन्सर व आयुर्वेद कॅन्...
शरीरातील स्नायू ताठ होऊन त्यांचे प्रचंड, अनियंत्रि...
अल्सर म्हणजे काय, अल्सर कशाने होतो , अल्सरची लक्षण...
गतिजन्य विकार : अनियमित हालचालीमुळे प्रवासात होणाऱ...