অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

फुप्फुस

श्वसनक्रियेत हवेचा उपयोग करणाऱ्या व तीमध्ये महत्त्वाचा भाग घेणाऱ्या पृष्ठवंशी (पाठीचा कणा असलेल्या) प्राण्यांतील अंतस्त्याला (शरीरांतर्गत पोकळीतील इंद्रियाला) फुप्फुस म्हणतात. मानवात वक्षीय पोकळीत हृदयाच्या डाव्या व उजव्या बाजूस एक अशी दोन फुप्फुसे असतात. दोहींच्या मध्ये हृदयाशिवाय मध्यावकाशातील इतर शरीरभाग असतात. प्रत्येक फुप्फुसाच्या हृदयाकडील बाजूवर श्वासनालाची (कंठापासून फुप्फुसापर्यंत जाणाऱ्या कूर्चामय व पटलमय नळीची) मोठी शाखा, रक्तवाहिन्या, लसीकावाहिन्या [→ लसीका तंत्र], तंत्रिका (मज्जा) हे अवयव फुप्फुसात शिरण्याकरिता किंवा आतून बाहेर येण्याकरिता जी जागा असते तिला ‘फुप्फुस-मूळ’ म्हणतात. या ठिकाणी प्रत्येक फुप्फुस श्वासनाल आणि हृदय यांना जखडलेले असते. मुळाखालील परिफुप्फुसाच्या (फुप्फुसावरील स्रावोत्पादक पातळ पटलमय आवरणाच्या) दुपदरी थरापासून बनलेला फुप्फुस-बंधही फुप्फुसास थोडा फार जखडतो. या दोन्ही गोष्टी वगळता प्रत्येक फुप्फुस स्वतंत्र परिफुप्फुस पोकळीत पूर्णतः मोकळे व लोंबकळते असते.

रचना

फुप्फुस हलक्या, सच्छिद्र व स्पंजासारख्या ऊतकाचे (समान रचना व कार्य असलेल्या कोशिकांच्या–पेशींच्या–समूहाचे) बनलेले असते. श्वसनक्रिया प्रस्थापित झाल्यानंतर ते फुप्फुस पाण्यात टाकले असता तरंगते, तर श्वसनक्रिया प्रस्थापित न झालेले फुप्फुस पाण्यात बुडते. कारण पहिल्याचे वि.गु. ०·९५० (पाण्यापेक्षा हलके), तर दुसऱ्याचे १·०५० (पाण्यापेक्षा जड) असते. अर्भक जन्मतः जिवंत होते वा मृतजात होते, हे ओळखण्याकरिता ही फुप्फुस परीक्षा फार उपयुक्त असते, तिला ‘जलस्थितिक परीक्षा’ म्हणतात. वायुकोशातील (फुप्फुसाच्या हवेने भरलेल्या सर्वांत लहान पिशवीसारख्या भागातील) हवेच्या अस्तित्वामुळे फुप्फुस दाबले असता किंवा चुरगळताना विशिष्ट करकर जाणवते. हवा न शिरलेले फुप्फुस यकृतासारखे घट्ट असते. फुप्फुस अतिलवचिक असते व म्हणून वक्षीय पोकळीतून बाहेर काढताच प्रत्याकर्षित स्थितीत राहते. त्याचा पृष्ठभाग मऊ व चमकदार असून, त्यावर एकमेकींना छेदणाऱ्या सूक्ष्म व गडद रेषा असतात. या रेषांमुळे पृष्ठभाग बहुतल क्षेत्रांत विभागलेला असतो आणि क्षेत्रे फुप्फुस खंडिका दर्शवितात.

जन्मतः फुप्फुस गुलाबी रंगाचे असते, कारण त्यात पुष्कळ रक्तवाहिन्या विखुरलेल्या असतात. प्रौढावस्थेत हा रंग स्लेटच्या पाटीप्रमाणे गडद काळपट बनतो. वाढत्या वयाबरोबर तो अधिक गडद होत जातो. हा रंग श्वसनावाटे हवेतील कार्बनाचे कण पृष्ठभागाजवळील अवकाशी ऊतकात (ज्यातील घटक एकमेकांपासून दूरदूर असल्यामुळे पोकळसर असल्यासारख्या वाटणाऱ्या ऊतकात) साठल्यामुळे येतो. वाढत्या वयाबरोबर कार्बन-संचय वाढून रंगही गडद होतो. खेड्यातील मोकळ्या हवेत राहणाऱ्यांपेक्षा शहरवासियांच्या फुप्फुसात, तसेच स्त्रियांपेक्षा पुरुषांच्या फुप्फुसात कण-संचय अधिक होतो. फुप्फुसाची पश्चकडा अग्रकडेपेक्षा नेहमी अधिक काळपट असते. वरच्या कमी चलनक्षम भागात पृष्ठभागाचे रंजन दोन बरगड्यांच्या दरम्यानच्या भागावर अधिक स्पष्ट दिसते.

उजव्या फुप्फुसाचे वजन सु. ६२५ ग्रॅ. व डाव्याचे ५६५ ग्रॅ. असते. यांत व्यक्तिपरत्वे किंवा एकूण रक्ताचे प्रमाण किंवा लसीकाद्रव्याचे प्रमाण यामुळे फेरफार असू शकतात. वक्षीय पोकळीच्या डाव्या भागाकडे हृदयाचा अधिक भाग असल्यामुळे डावे फुप्फुस वजनाने कमी भरते. पुरुषाची फुप्फुसे स्त्रीच्या फुप्फुसांपेक्षा अधिक जड असतात. प्रौढावस्थेत फुप्फुसाची सर्वसाधारण उंची २५ ते २७ सेंमी. असते. उजव्या बाजूस मध्यपटल (वक्षीय पोकळी व उदर पोकळी यांना अलग करणारे स्नायुमय पटल) त्याखालील यकृतामुळे अधिक उंचीवर असते व म्हणून उजव्या फुप्फुसाची उंची डाव्यापेक्षा २·५ सेंमी. कमी असते; परंतु हृदय डावीकडे असल्यामुळे उजव्याची रुंदी डाव्यापेक्षा अधिक असते व त्याची धारणक्षमताही (घनफळही) अधिक असते.

फुप्फुसाचा आकार शंकूसारखा असून त्याला अग्र किंवा वरचे टोक (शिखर), बूड अथवा तळभाग, अग्र, पश्च आणि अधःस्थ अशा तीन कडा आणि पर्शुकीय (बरगड्यांशी संलग्न असणारा) पृष्ठभाग व अभिमध्य पृष्ठभाग असे दोन पृष्ठभाग असतात. या भागांचे वर्णन प्रस्तुत नोंदीतच पुढे दिले आहे.

प्रत्येक फुप्फुसावर पातळ लसी-कलेचे (स्रावोत्पादक पातळ पटलाचे) आच्छादन असते व त्याला परिफुप्फुस म्हणतात. हे आच्छादन दुपदरी पिशवीसारखे असून त्याचा जो भाग फुप्फुसाच्या पृष्ठभागाशी संलग्न असतो त्याला ‘अंतस्त्य- परिफुप्फुस’ म्हणतात व जो भाग बरगड्या, त्यांमधील स्नायू, मध्यपटल आणि हृदय व मध्यावकाशातील इतर अवयवांशी संलग्न असतो त्याला ‘भित्तीय परिफुप्फुस’ म्हणतात. या दोन्हींमधील अव्यक्त पोकळीला ‘परिफुप्फुस गुहा’ म्हणतात. प्राकृतिक (सर्वसाधारण) अवस्थेत दोन्ही भाग एकमेकांच्या नेहमी सान्निध्यात असतात. फक्त रोगजन्य परिस्थितीतच ते एकमेकांपासून अलग होऊन पोकळीत द्रव, रक्त किंवा हवा साचू शकते [→ परिफुप्फुसशोथ]. श्वसनक्रियेच्या वेळी फुप्फुसाच्या हालचालीबरोबर ते एकमेकांवर घासले जातात व हे घर्षण सुरळीत होण्यासाठी पोकळीमध्ये अल्पसे लसीकाद्रव्य पसरलेले असते.

दोन्ही फुप्फुसांचे विशिष्ट भेगांनी छोट्या भागांत विभाजन झालेले असते व या छोट्या भागाला ‘खंड’ म्हणतात. डाव्या फुप्फुसातील ही भेग तिरपी असून तीमुळे त्याचे ऊर्ध्वस्थ व अधःस्थ असे दोन खंड पडतात. उजव्या फुप्फुसात दोन भेगा असून त्यांमुळे त्याचे ऊर्ध्वस्थ, मध्य आणि अधःस्थ असे तीन खंड पडतात. प्रत्येक खंड आणखी लहान लहान भागांत विभागलेला असतो व त्यांना ‘श्वसनी-फुप्फुस खंडांश’ म्हणतात. फुप्फुसांचे हे विभाजन १९३२ नंतर स्पष्ट समजल्यावर खंडोच्छेदन शस्त्रक्रिया (फुप्फुसाचा रोगट भाग काढून टाकण्याची शस्त्रक्रिया) अधिक बिनचूक करणे शक्य झाले आहे. प्रत्येक फुप्फुसात असे नऊ खंडांश असतात.

फुप्फुसाचे मूळ त्याच्या मध्यावकाशाकडे असलेल्या (अभिमध्य) पृष्ठभागावर असणाऱ्या नाभिकेतून (खळग्यातून) आत शिरणाऱ्या व बाहेर येणाऱ्या काही अवयवांचे बनलेले असते. त्यांमध्ये मुख्य श्वासनलिका, श्वासनलिका रोहिणी व नीला, दोन फुप्फुसनीला, श्वसन तंत्रिका जाल-लसीकावाहिन्या व संबंधित लसीका ग्रंथी यांचा समावेश असतो. फुप्फुस-मुळावर सर्व बाजूंनी परिफुप्फुसांचे वेष्टन असते. दोन्ही फुप्फुस-मुळांतील घटकांची रचना पुढून मागे बघितल्यास सारखीच असते; त्यात फुप्फुस-नीला पुढे, रोहिणी मधे व श्वासनलिका मागे असते. वरून खाली बघितल्यास या रचनेत दोन्ही बाजूंमध्ये फरक दिसतो.

श्वसनाच्या वेळी फुप्फुसाचे सर्व भाग एकसारखे हालत नाहीत. फुप्फुस-मुळाचा भाग जवळजवळ अचलच असतो. संथ श्वसनक्रियेत फुप्फुसाचा अंतर्भाग फारच थोडा हालतो. पृष्ठालगतचा भाग सर्वांत अधिक प्रसरण पावतो. अभिमध्य पृष्ठभाग, पश्चकडा व वरचे टोक कमी प्रमाणात प्रसरण पावतात, कारण त्यांच्या लगत कमी हालणारे अवयव असतात. मध्यपटलाच्या नजीकचा व पर्शुकीय पृष्ठभाग सर्वांत जास्त प्रसरण पावतात.

फुप्फुस-एकक

श्वसनक्रियेच्या वेळी फुप्फुसाच्या आकारमानातील बदल मुख्यत्वे वायुकोशांत घडून येतो. नवजात अर्भकाच्या फुप्फुसात सु. २ कोटी वायुकोश असतात. ही संख्या बाल्यावस्थेत ३० कोटीपर्यंत वाढते. फुप्फुस-ऊतक गुच्छाप्रमाणे रचलेल्या अनेक ‘हवा अवकाशांचे’ मिळून बनलेले असते. प्रत्येक गुच्छाला ‘फुप्फुस-एकक’ म्हणतात. प्रत्येक एककाला हवा आत जाण्याकरिता व बाहेर पडण्याकरिता एकच श्वासनलिका असते व तिला ‘अंतिम श्वासनलिका’ म्हणतात. या श्वासनलिकेच्या आणखी शाखा होतात व त्यांना ‘श्वसन श्वासनलिका’ म्हणतात. श्वसन श्वासनलिकांकडून वायुकोशाकडे जाणाऱ्या अरुंद भागाला ‘वायुकोश नलिका’ म्हणतात.

वायुकोश

प्रत्येक वायुकोशाचा व्यास सु. २०० – ३०० मिलिमायक्रॉन (१ मिलिमायक्रॉन = १०–९ मी.) असतो व एक वायुकोश पुष्कळ (सु. १,८००) केशवाहिन्यांशी (सूक्ष्म रोहिण्या व सूक्ष्म नीला यांना जोडणाऱ्या सूक्ष्म वाहिन्यांशी) संलग्न असतो. बाल्यावस्थेतही वायु-अधिस्तर-रक्त हा परस्पर संपर्की पृष्ठभाग (एका बाजूस वायुकोशातील हवा, मधे वायुकोशाचा अधिस्तर – एकमेकींना घट्ट चिकटलेल्या कोशिकांनी बनलेले स्तरयुक्त आच्छादक ऊतक – व दुसऱ्या बाजूस केशवाहिन्यांच्या जालातील रक्त यांनी मिळून बनणारा पृष्ठभाग) प्रचंड असतो आणि तो सु. ७० – १०० चौ. मी. एवढा असतो.


वायुकोश हे पातळ आवरण असलेल्या खोबणी किंवा कोटरिका असून आवरणाच्या एका बाजूला केशवाहिन्यांतील तांबड्या कोशिका व दुसऱ्या बाजूस हवा असते. या दोन्हींमधील वायूंच्या अदलाबदलीस हे आवरण कमीत कमी विरोध करते. वायुकोशांची भित्ती संयोजी (जोडण्याचे कार्य करणाऱ्या) ऊतकाच्या स्तरावर अधिष्ठित अशा पातळ अंतःस्तराची बनलेली असते. जवळजवळ असणाऱ्या वायुकोशांच्या भित्ती एकमेकींस लागून असतात व त्यांमध्ये संयोजी ऊतक व केशवाहिन्यांचा थर असतो. तिन्ही मिळून ‘आंतरवायुकोश पटल’ बनते. या पटलाला अतिसूक्ष्म छिद्रे असल्याचे आढळून आले आहे. या छिद्रांतून हवा शेजारच्या वायुकोशात आणि लगतच्या श्वसनश्वासनलिकेत जाऊ शकते. वायुकोशातील काही कोशिका कोशिकांच्या पृष्ठभागावर परिणाम करणारे स्राव स्रवतात. या स्रावांमुळे पृष्ठभागाचा ताण कमी होतो व त्यामुळे उच्छ्‌वासाच्या वेळी वायुकोश पूर्णपणे मिटण्याचे टळते. वायुकोश पोकळीत काही महाभक्षी कोशिकाही असतात व त्या अंतःश्वसनाद्वारे वायुकोशापर्यंत आलेल्या बाह्य सूक्ष्मकणांचे भक्षण करतात. काही तांबड्या कोशिका वायुकोशात आल्यास त्यांचेही भक्षण या कोशिका करतात. असे नको असलेल्या पदार्थाचे सूक्ष्मकण या कोशिकांद्वारे लसीकावाहिन्यांत नेले जातात. काही महाभक्षी कोशिका त्यजन प्रवाहाद्वारे थुंकीतून बाहेर टाकल्या जातात (श्वासनलिकांच्या आतील भित्तीवर पृष्ठभागी सकेशल कोशिकांचा थर असतो व प्रत्येक कोशिकेवर जवळजवळ २७० केसासारखे प्रवर्ध – वाढी – असतात. या केसांच्या हालचालीमुळे एकाच दिशेने म्हणजे श्वासनाल व घशाकडे बाह्यकण, सूक्ष्मजंतू व मृत कोशिका यांसारखे त्याज्य पदार्थ वाहून नेणारा प्रवाह उत्पन्न होतो आणि त्याला त्यजन प्रवाह म्हणतात). आजारपरत्वे बहुरूपकेंद्रकी (ज्यांच्या केंद्रकाचे – कोशिकेच्या कार्यावर नियंत्रण ठेवणाऱ्या जटिल पुंजाचे – अनेक केंद्रके असल्यासारखे खंड पडलेले आहेत अशा प्रकारच्या) पांढऱ्या कोशिका, लसीका कोशिका याही वायुकोशात व नंतर थुंकीतून बाहेर येतात. यामुळे रोगनिदानास थुंकी सूक्ष्मदर्शकाखाली तपासणे उपयुक्त असते.

फुप्फुसाचे भाग

फुप्फुसाच्या भागांचे थोडक्यात वर्णन खाली दिले आहे. फुप्फुसाचे अग्र अथवा वरचे टोक गोलाकार असून मानेच्या खालच्या भागात शिरलेले असते. त्याचा सर्वोच्च बिंदू जत्रू अस्थीच्या (एका बाजूस उरोस्थीला – छातीच्या मध्यभागी असलेल्या पुढील उभ्या हाडाला – व दुसऱ्या बाजूस स्कंधास्थीला – खांद्याच्या मागील बाजूतील चपट्या, त्रिकोणाकृती हाडाला – जोडलेल्या आडव्या हाडाच्या) मध्य तृतीयांशाच्यावर २·५ सेंमी. अंतरावर असतो. अग्रावर परिफुप्फुस आच्छादन असते व त्याच्याही वर अधिपरिफुप्फुस पटल (ग्रैव प्रावरणीचा म्हणजे मानेतील स्नायू, रक्तवाहिन्या व तंत्रिका यांना परिवेष्टित करणाऱ्या तंतुमय ऊतकपट्ट्याचा भाग) असते. फुप्फुस अग्राच्या आजूबाजूस मानेतील स्नाूयू, रक्तवाहिन्या व तंत्रिका संलग्न असतात. अग्राखालून सु. १·२७ सेंमी. अंतरावरून अधोजत्रू रोहिणी (बाहू व प्रबाहू सहित सर्व भागाला रक्त पुरवठा करणारी प्रमुख रोहिणी) काखेकडे वळते. सर्वोच्च बिंदूच्या खाली तिचे अंकन (खूण) झाल्याची खाच उमटते.

बूड अथवा तळभाग अंतर्गोल असून मध्यपटलाच्या बहिर्वक्र पृष्ठभागावर वक्षीय बाजूकडे टेकलेला असतो. उजव्या फुप्फुसाच्या तळभागाखालील मध्यपटलाखाली यकृताचा उजवा खंड असतो. डाव्या बाजूस मध्यपटलाखाली यकृताचा डावा खंड, जठरबुध्न (जठरागमी द्वारापासून डावीकडे वर असलेला जठराचा घुमटाकार भाग) व प्लीहा (पानथरी) हे अवयव असतात. तळभाग व पर्शुकीय पृष्ठभाग यांच्या दरम्यान असणारी अधःस्थ कडा पातळ व धारदार असते आणि ती बरगड्या व मध्यपटल यांमध्ये असणाऱ्या खाचेत शिरते. या ठिकाणी परिफुप्फुसाची खालची कडा फुप्फुसाच्या अधःस्थ कडेपेक्षा अधिक खोलवर गेलेली असते. म्हणजेच परिफुप्फुसाचा बराचसा भाग या ठिकाणी फुप्फुसविरहित असतो.

पर्शुकीय पृष्ठभाग बहिर्गोल सफाईदार असून त्याचा आकार वक्षीय पोकळीच्या बाजूशी मिळता जुळता असतो. या भागाचा संपर्क बरगड्यांवर (आतून) असलेल्या परिफुप्फुसाशी असतो. या भागावर काही बरगड्यांचे ठसे उमटलेले दिसतात.

अभिमध्य पृष्ठभाग मध्यावकाशाकडे असतो आणि त्याचे मागील व पुढील असे दोन भाग असतात. मागचा मेरुदंडाशी (पाठीच्या कण्याशी) संलग्न असतो आणि पुढचा मध्यावकाशाच्या संपर्कात असून त्यात मध्यावकाशातील परिहृद् पिशवी व तीमधील हृदय यांचे त्या त्या बाजूचे काही भाग संपर्कात असतात. म्हणून त्याला ‘हृद्अंकन’ म्हणतात. हृदयाचा अधिक भाग डावीकडे असल्यामुळे डाव्या फुप्फुसावरील हृद्अंकन अधिक खोल व मोठे असते. या अंकनाच्या वर त्रिकोणी दबलेला भाग असून त्यास ‘नाभिका’ म्हणतात. या ठिकाणी फुप्फुस-मुळातील फुप्फुसात शिरणारे व आतून बाहेर येणारे अवयव असतात. फुप्फुस-मुळाभोवती परिफुप्फुसाचे आवरण असते. आवरणाच्या मुळाखालील दुपदरी घडीला ‘फुप्फुस-बंध’ म्हणतात. नाभिकेच्या वर हृद्अंकनाच्यावर उजव्या बाजूस घळीसारखे अंकन असते त्यात ऊर्ध्व महानीला संलग्न असते. फुप्फुस –मुळाच्या मागे वरून खाली येणाऱ्या घळीत ग्रसिका (घशापासून जठरापर्यंत अन्न वाहून नेणारी मांसल नलिका) संलग्न असल्यामुळे तिला ‘ग्रसिका अंकन’ म्हणतात. याच पृष्ठभागाच्या खालच्या बाजूस फुप्फुस-बंधाच्या पुढे अधःस्थ महानीलेचे अंकन असते.

डाव्या फुप्फुसावरील नाभिकेच्या वर महारोहिणीची कमान व तिचा अवरोही भाग यांचे खोलसर घळीसारखे अंकन असते. दोन्ही बाजूंच्या मध्यपटल तंत्रिका मानेतून खाली वक्षात उतरून मध्यपटलाच्या उजव्या व डाव्या भागास पुरवठा करावयास जाताना, फुप्फुस-मुळांच्या पुढून, मध्यावकाशीय परिफुप्फुस व परिहृद यांच्यामधून जातात.

अग्रकडा अधःस्थ कडेप्रमाणे धारदार व पातळ असते. दोन्हीफुप्फुसांच्या अग्रकडा परिहृदयावर पुढे येतात. उजव्या अग्रकडा जवळजवळ सरळ असते. डाव्या फुप्फुसाच्या अग्रकडेवर चौथ्या डाव्या बरगडीच्या कूर्चेपासून खाली जी खोबण असते तिला ‘हृद् खोबण’ म्हणतात. या ठिकाणी हृदयावर परिहृदाचे आणि त्याही पुढे फक्त परिफुप्फुसाचे आच्छादन असते.

अधःस्थ कडा बूड आणि पर्शुकीय पृष्ठभाग यांच्या दरम्यान असून धारदार व पातळ असते. तिचा मध्यावकाशाकडील भाग बोथट व गोलसर असतो.

पश्चकडा पर्शुकीय पृष्ठभाग आणि अभिमध्य पृष्ठभागाच्या मागील भागाच्या (केशरुक भागाच्या) दरम्यान असते. फुप्फुसाचा पश्च बाजूचा जाड गोलसर भाग म्हणजे पश्चकडा असल्यामुळे ती सहज व स्पष्ट दर्शविण्यासारखी नसते.

रक्त पुरवठा

हृदयाच्या उजव्या निलयात येणारे अशुद्ध रक्त (शरीर कोशिकांनी वापरल्यामुळे ऑक्सिजनाचे प्रमाण कमी झालेले रक्त) फुप्फुस-रोहिणीच्या शाखांद्वारे फुप्फुसाकडे नेले जाते. या शाखांना उजवी व डावी फुप्फुस-रोहिणी म्हणतात. प्रत्येक फुप्फुसात या रोहिणीच्या शाखा, खंडीय व खंडकीय श्वासनलिकांच्या सोबत फुप्फुस-ऊतकात विखुरल्या जातात. प्रत्येक खंडकीय रोहिणीचे विभाजन होऊन शेवटी ती वायुकोशाच्या सभोवती असलेल्या केशवाहिन्यांच्या जाळ्यात विलीन होते. प्रत्येक खंडाची रोहिणी-शाखा स्वतंत्र असते. वायुकोशावरील दाट केशवाहिन्यांच्या जाळ्यातून छोट्या छोट्या नीलांची सुरुवात होते व त्यांपासून प्रत्येक फुप्फुसातून हृदयाकडे रक्त वाहून नेणार्यात दोन मोठ्या नीला बनतात. फुप्फुसातून जाताना या नीलांच्या शाखा फुप्फुस-रोहिणी व श्वासनलिका यांच्या सोबत न जाता स्वतंत्रपणे जातात. या चारही फुप्फुस-नीला हृदयाच्या डाव्या अलिंदात व तेथून डाव्या निलयात ऑक्सिजनाचे योग्य प्रमाण असलेले रक्त आणून सोडतात.

तंत्रिका पुरवठा

फुप्फुसाला परानुकंपी व अनुकंपी तंत्रिका तंत्रांकडून पुरवठा होतो [→ तंत्रिका तंत्र]. परानुकंपी भाग प्राणेशा तंत्रिका (दहावी मस्तिष्क तंत्रिका) जेव्हा फुप्फुस-मुळाच्या मागून उतरते तेव्हा तिच्या काही तंतूंपासून बनतो. अनुकंपी भाग त्या त्या बाजूच्या अनुकंपी शृंखलेच्या दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या वक्षीय गुच्छिकांकडून येणाऱ्या तंतूंचा बनतो. फुप्फुस-मुळाजवळ या सर्व तंतूंची (परानुकंपी व अनुकंपी) अग्र व पश्च अशी दोन तंत्रिका जाळी बनतात. या जाळ्यांमधून निघणारे अभिवाही (फुप्फुसाकडून संवेदना वाहून नेणारे) तंत्रिका तंतू आणि अपवाही (फुप्फुसाकडे प्रेरक संदेश वाहून नेणारे) तंत्रिका तंतू श्वासनलिकांच्या शाखांप्रमाणेच विभाजित होतात व फुप्फुस-रोहिणींच्या शाखेतील स्नांयू व श्वासनलिका शाखांतील स्नायू यांना पुरवठा करतात. अनुकंपी तंत्रिका फुप्फुस-रोहिणी शाखांचे विस्फारण करतात. श्वासनलिकांतील स्नायूंना अनुकंपी व परानुकंपी या दोन्ही भागांचा पुरवठा होतो आणि त्यांची उद्दीपने अनुक्रमे श्वासनलिकांचे विस्फारण व आकुंचन घडवून आणतात.

फुप्फुसांकडून संवेदना वाहून नेणाऱ्या तंत्रिका वायुकोशांच्या भित्तीवर व श्वासनलिकांच्या आतील बाजूच्या अधिस्तरावर विखुरलेल्या असतात. श्लेष्मा (दाट चिकट पदार्थ) किंवा अंतःश्वसनाबरोबर आत शिरलेले प्रक्षोभक कण जेव्हा या तंतूंना उद्दीपित करतात तेव्हा ⇨ प्रतिक्षेपी क्रियाजन्य ⇨ खोकला उत्पन्न होतो आणि असे बाह्य पदार्थ कफाच्या रूपाने उत्सारित होतात (बाहेर फेकले जातात). वायुकोश भित्तीमधील तंत्रिका तंतू ठराविक फुगवटीचा विस्फारजन्य ताण पडताच उत्तेजित होतात व तेथून निघणारे संदेश लंबमज्जेतील [मेरुरज्जूच्या वरच्या टोकाशी संलग्न असलेल्या शंक्वाकृती भागातील; → तंत्रिका तंत्र] श्वसन केंद्रकापर्यंत पोहोचतात. अशा प्रकारे या संदेशामार्फत श्वसनक्रियेच्या नियंत्रणात महत्त्वाचा भाग घेतला जातो [→ श्वसन तंत्र].

लसीका वहन

छोट्या छोट्या लसीकावाहिन्यांचे जाळे परिफुप्फुसाखालील संयोजी ऊतकात विखुरलेले असते. फुप्फुसातील लसीकावाहिन्या श्वासनलिकांच्या मोठ्या शाखांजवळ असणाऱ्या फुप्फुस-लसीका ग्रंथीत लसीका वाहून नेतात. या ग्रंथीतून लसीका श्वासनाल विभाजनाच्या जवळपास असलेल्या ग्रंथींत वाहून नेली जाते. उजव्या फुप्फुसातील लसीका उजवीकडील ग्रंथीत आणि डाव्यातील डावीकडील ग्रंथीतच वाहून नेली जात नाही. डाव्या फुप्फुसाच्या तळभागाकडच्या काही भागाच्या लसीकावाहिन्या उजवीकडील ग्रंथींत लसीका वाहून नेतात.

मध्यावकाशातील इतर अवयवांकडील लसीका वाहून नेणाऱ्या लसीकावाहिन्यांपासून डावी आणि उजवी अशा दोन मोठ्या लसीकावाहिन्या बनतात. त्यांच्यामार्फत फुप्फुसातील लसीका लसीका-महावाहिनीत वाहून नेली जाते. ही महावाहिनी वक्षीय पोकळीतून वर मानेत जाते व तेथे डाव्या अधोजत्रू नीलेस मिळते. श्वासनालाच्या उजव्या बाजूस लसीका ग्रंथी डाव्या बाजूकडील ग्रंथींपेक्षा मोठ्या असतात. क्ष-किरण चित्रणात फुप्फुस-मुळाजवळील ग्रंथींची वाढ अथवा त्यांचे कॅल्सीभवन (कॅल्शियमाची लवणे साचून कठीण होण्याची क्रिया) स्पष्ट दिसते. डब्ल्यू. एस्. मिलर यांच्या मताप्रमाणे यकृत व मूत्रपिंड यांसारख्या अवयवांपेक्षा फुप्फुसातील लसीकावाहिन्यांचे प्रमाण पुष्कळ अधिक असते.

भ्रूणविज्ञान

भ्रूण (तीन महिने वयाखालील गर्भ) ३ मिमी. लांबीचा असताना अग्रांत्राच्या (ज्यापासून नंतर घसा, ग्रसिका, जठर व ग्रहणी – लहान आतड्याचा सुरुवातीचा भाग – हे भाग बनतात अशा भ्रूणातील अवयवाच्या) अभ्युदरीय (उदराकडील) भित्तीवर एक अंधवर्ध (टोकाला बंद असलेला पिशवीसारखा भाग) दिसू लागतो. हा अंधवर्ध खालच्या व पुढच्या बाजूकडे वाढू लागतो व भ्रूण ५ मिमी.

लांबीचा असताना त्याचे उजव्या आणि डाव्या फुप्फुस कलिकांत विभाजन होते. उजव्या फुप्फुस कलिकेच्या पुढील विभाजनापासून तीन खंड आणि डाव्या फुप्फुस कलिकेच्या विभाजनाने दोन खंड बनतात. पूर्ण वाढलेल्या फुप्फुसातही हीच विभागणी कायम असते.

आठ मिमी. लांबीच्या भ्रूणात उजव्या कलिकेत तीन श्वासनलिकांची आद्यांगे दिसू लागतात. डाव्या कलिकेत अशी दोनच आद्यांगे दिसतात. या आद्यांगांच्या सतत होणाऱ्या वृद्धी व विभाजनातून श्वासनलिकांचे वृक्षरूप जाळे तयार होते. फुप्फुस कलिकेच्या अगदी शेवटच्या सूक्ष्म विभाजनजन्य भागाला‘इन्फंडिब्युलम’ म्हणतात. सहाव्या महिन्यानंतर या भागावर वायुकोश दिसू लागतात.

फुप्फुस विभेदनाच्या तीन अवस्था वर्णितात : (१) ग्रंथिल अवस्था, (२) सूक्ष्मनलिका अवस्था आणि (३) वायुकोशावस्था. ग्रंथिल अवस्थेत श्वासनलिका विभाजन होते. सूक्ष्मनलिका अवस्थेत फुप्फुसाच्या श्वसनमार्गाचे सूक्ष्म भेद दिसू लागतात आणि सतत वृद्धिंगत होणाऱ्या रक्ताभिसरण तंत्राशी अधिक संलग्नता प्रस्थापित होते. वायुकोशावस्था सहाव्या महिन्यानंतर सुरू होत असली, तरी नवीन श्वासनलिका व वायुकोश तयार होण्याचे कार्य जन्मानंतरही चालू असते.

अग्रांत्राच्या पुढच्या टोकापासून निघणाऱ्या अंधवर्धापासून फुप्फुसे तयार होत असल्यामुळे या ठिकाणी तयार होणाऱ्या घसा या शरीरभागाशी ती श्वासनालाद्वारे नेहमी जोडलेली राहतात.

प्रौढावस्थेत फुप्फुस-ऊतकाची वाढ होत नाही; पण शस्त्रक्रियेच्या वेळी एखादा फुप्फुस खंड काढून टाकण्यात आल्यास उरलेले फुप्फुस-ऊतक आकारमानाने वाढते. हा कोशिकावृद्धीचा प्रकार नसून उरलेल्या वायुकोशांची धारणक्षमता केवळ ताणाने फुगून वाढते.

कार्य

फुप्फुसाचे कार्य रक्तातील कार्बन डाय-ऑक्साइड वायू बाहेर टाकणे व ऑक्सिजन आत घेणे आणि अशा प्रकारे रक्त शुद्ध करणे हे आहे. वायुकोशात ही वायूंची देवघेव होते. याखेरीज काही मर्यादित प्रमाणात शरीरातील बाष्प बाहेर टाकणे, कार्बन डाय-ऑक्साइडाचा संचय अथवा उत्सर्जन याद्वारे शरीराच्या रासायनिक संघटनाचे सातत्य राखणे या कार्यात फुप्फुस भाग घेते. श्वासनलिकेतील सकेशल कोशिका, श्लेष्मल स्राव, खोकल्याची प्रतिक्षेपी क्रिया, महाभक्षी कोशिका इत्यादींच्या द्वारा फुप्फुस शरीराच्या संरक्षण व्यवस्थेतही भाग घेते.

विकार

श्वसन तंत्राचा फुप्फुसे हा महत्त्वाचा भाग असल्यामुळे त्यांच्या काही विशेष महत्त्वाच्या व नेहमी आढळणाऱ्या रोगांविषयी येथे थोडक्यात माहिती दिली आहे. फुप्फुस व श्वासनलिका बाह्य वातावरणाच्या सतत संपर्कात असल्यामुळे, विविध सूक्ष्मजंतू व व्हायरस यांच्या संसर्गामुळे, शुष्कनामुळे (योग्य आर्द्रतेच्या अभावी ऊतककोशिका कोरड्या पडण्यामुळे), अंतः श्वसनाबरोबर आत शिरलेल्या बाह्य कणाच्या भौतिक व रासायनिक परिणामांमुळे त्यांमध्ये रोग उद्‌भवण्याचा सतत धोका असतो. रोगापासून संरक्षणात्मक अशा काही योजना नैसर्गिकरीत्या केलेल्या असतात; उदा., श्वासनलिकांच्या अंतः स्तरावरील सकेशल कोशिकांच्या केसांच्या हालचाली त्यजन प्रवाह निर्माण करून श्लेष्मात अडकलेले बाह्यकण ढकलण्याचे कार्य करतात. तरीदेखील फुप्फुसे व श्वासनलिका यांच्या शोथामुळे (दाहयुक्त सुजेमुळे) उद्‌भवणारे आजार नेहमी आढळतात. फुप्फुस-कोशिकानाश, त्या मागोमाग होणारी संयोजी ऊतक वाढ (व्रण तयार होणे) व त्याबरोबर रक्ताभिसरणात उत्पन्न होणारी अक्षमता या गोष्टीही फुप्फुस विकृतीस कारणीभूत असतात. संपूर्ण शरीरातील नीलांद्वारे परत येणारे रक्त फुप्फुसात अक्षरशः गाळले जाते व म्हणून रक्तनिर्मित रोगांचा प्रादुर्भाव फुप्फुसांत होतो. शरीरात इतरस्र उद्‌भवणाऱ्या कर्कार्बुदांपासून (नवीन कोशिकांच्या अत्यधिक वाढीमुळे निर्माण होणाऱ्या मारक गाठींपासून) प्रतिक्षेपजन्य कर्कार्बुदे [⟶ प्रतिक्षेप] फुप्फुसांत नेहमी तयार होतात. मूळ फुप्फुसातच निर्माण होणाऱ्या कर्करोगाचे म्हणजे प्राथमिक फुप्फुस कर्करोगाचे प्रमाणही निश्चितपणे वाढत आहे.

फुप्फुसासंबंधीच्या पुढील महत्त्वाच्या विकारांविषयी स्वतंत्र नोंदी आहेत : (१) ऑक्सिजन-न्यूनता, (२) दमा, (३) परिफुप्फुसशोथ, (४) न्यूमोनिया, (५) खोकला, (६) श्वसनस्थगिती, (७) शुकरोग, (८) क्षयरोग.

प्रस्तुत नोंदीत पुढील विकारांविषयी थोडक्यात माहिती दिली आहे : (१) फुप्फुसशोफ, (२) फुप्फुसपात, (३) अंतर्कीलन व अभिकोथ, (४) वातस्फीती अथवा वायुकोश विस्तार, (५) तंत्वात्मकता, (६) व्यवसायजन्य विकृती, (७) रक्तवाहिनी काठिण्य आणि (८) कर्करोग.

फुप्फुसशोफ

अतिजलद पारस्रवणामुळे (पटलामधून द्रव पलीकडे जाण्यामुळे) फुप्फुसातील केशवाहिन्यांमधील द्रव वायुकोश, श्वासनलिका आणि आंतरकोशिकीय स्थाने या ठिकाणी गोळा झाल्यामुळे निर्माण होणाऱ्या विकृतीला ‘फुप्फुसशोफ’ म्हणतात. चिरकारी (दीर्घकालीन) फुप्फुस रक्ताधिक्याचा परिणाम म्हणून किंवा स्वतंत्रपणे ही विकृती एकाएकीच उद्‌भवते. एकाएकी उद्‌भवणारी विकृती डाव्या निलयाची निष्फलता किंवा द्विदल संकोच (द्विदल कपाट-झडप-असलेले डावे अलिंद व डावे निलय यांमधील द्वार अरुंद बनणे) यासारख्या हृदयविकारात उद्‌भवते. या विकृतीच्या इतर कारणांमध्ये उपचारार्थ केलेल्या आंतरनीला अंतः क्षेपणांचा (इंजेक्शनांचा) अतिरेक, इन्फ्ल्यूएंझासारख्या रोगातील अतितीव्र फुप्फुस-संक्रामण, अंतः श्वसनाद्वारे क्लोरीन किंवा फॉस्जीन यासारखा विषारी वायू किंवा उलटीतील पदार्थ फुप्फुसात शिरणे, पॅराफीन तेलासारखा क्षोभक पदार्थ फुप्फुसात प्रविष्ट होणे, फुप्फुसोच्छेदन शस्त्रक्रियेचा परिणाम इत्यादींचा समावेश होतो. प्रारण उद्‌भासनजन्य विकृती [⟶ प्रारण जीवविज्ञान], मूत्रविषरक्तता (मूत्रातील घटकद्रव्यांच्या रक्तातील उपस्थितीमुळे निर्माण होणारी विषारी अवस्था) व प्रौढ कष्टश्वसन लक्षणसमूह अथवा फुप्फुस अवसाद (रक्तप्रवाहांत एकदम बिघाड झाल्यामुळे होणारा शक्तिपात) या विकृतींमध्येही फुप्फुसशोफ उत्पन्न होतो. ३,००० मी. उंचीपेक्षा जास्त उंचीवर अतिजलद गतीने गिर्यारोहण केल्यास फुप्फुसशोफ उत्पन्न होऊन विशिष्ट लक्षणे उद्‌भवतात.

या विकृतीत तीव्र कष्टश्वसन आणि नीलविवर्णता (रक्ताला ऑक्सिजनाचा पुरेसा पुरवठा न झाल्यामुळे त्वचा निळसर होणे) ही लक्षणे उद्‌भवतात. खोकल्याबरोबर रक्तमिश्रित कफ उत्सर्जित होतो. श्रवणयंत्रातून (स्टेथॉस्कोपमधून) ऐकल्यास बुडबुड्यासारखा विशिष्ट ध्वनी छातीच्या दोन्ही बाजूंस ऐकू येतो. या विकृतीचे तीव्र, अल्पतीव्र आणि चिरकारी प्रकार आढळतात.

उपचारामध्ये मूळ रोगावर इलाज करणे महत्त्वाचे असते. मुखवट्यातून ऑक्सिजन पुरवठा उपयुक्त असतो. उंचीवरील रोग्यास खालच्या पातळीवर ताबडतोब हलवणे, तसेच हळूहळू क्रमाक्रमाने गिर्यारोहण करणे, अतिश्रम न करणे, प्रतिकूल हवामानाचा परिणाम टाळण्याची काळजी घेणे इ. उपाययोजना करता येतात.

 

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate