অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

प्लीहा

(पानथरी). उदरगृहेत (उदराच्या पोकळीत) जठराच्या डाव्या बाजूस डाव्या वृक्काच्या(मूत्रपिंडाच्या) वर, मध्यपटल (उदरगुहा व वक्षीय गुहा यांना विभागणारे स्नायुमय पटल) आणि जठरबुघ्न (जठरागमी द्वारापासून डावीकडे वर मध्यपटलाच्या कमानीला भिडलेला घुमटाकार भाग)यांच्या मधे असलेल्या रक्ताभिसरण तंत्राशी (संस्थेशी) संबंधित असलेल्या अवयवाला ’प्लीहा’म्हणतात. सर्वसाधारण भाषेत प्लीहेचा उल्लेख ’पानथरी’ असाही करतात. प्रौढावस्थेत सर्वसाधारणपणे मुठीच्या आकाराचा असलेला हा अवयव मऊ व ठिसूळ आणि गडद जांभळसर रंगाचा असून त्याचा आकार चतुःपृष्ठक (चार त्रिकोणी पृष्ठे असलेल्या घनाकृतीसारखा) असतो. सामान्यतः प्लीहेचे वजन १५० ते २०० ग्रॅ. असून लांबी १२ सेंमी., रुंदी ७ सेंमी. व जाडी ३-४ सेंमी. असते.उदरगुहेतील यकृत व वृक्क या मोठ्या अवयवांप्रमाणे प्लीहेलाही तिच्यापासून उत्पन्न होणारा स्त्राव वाहून नेणारी वाहिनी (वाहक नलिका) नसते. यामुळे तिचा समावेश पुष्कळ वेळा वाहिनीविहीन ग्रंथींमध्ये [⟶ अंतःस्त्रावी ग्रंथि ] करतात.

इतिहास

प्लीहेबद्दलची जिज्ञासा २,००० वर्षीपूर्वीपासून जागृत झाली असावी, शास्त्रीय व इतर जुन्या लेखांतून प्लीहेचा उल्लेख अनेक शतकांपासून आढळतो. गेलेन (इ. स. १३१-२०१) या ग्रीक वैद्यांनी ’अती गूढ अवयव’ असा प्लीहेबद्दल उल्लेख केला आहे.आनंद, राग या भावना आणि पळण्याचा वेग यांचा प्लीहेशी संबंध असल्याचे प्रतिपादण्यात आले आहे. प्लेटो (इ.स.पू. ४२७-३४७) व ॲरिटीअस (इ.स. पहिले शतक) यांनी प्लीहा ’काळे रक्त किंवा काळे पित्त गाळणारा’ अवयव असल्याची कल्पना मांडली होती.सोळाव्या शतकात होऊन गेलेल्या ॲन्ड्र्यू बोर्ड नावाच्या मठवासी वैद्यांनी प्लीहेबद्दल ’ती माणसाला आनंदी बनवून हसावयास लावते; परंतु प्लीहेत अडथळा उत्पन्न झाल्यास औदासिन्य उत्पन्न होते’ असे म्हटले आहे.

मार्चेल्लो मालपीगी (१६२८-९४) या इटालियन शरीररचनाशास्त्रज्ञांनी प्लीहेच्या सूक्ष्मदर्शकीय रचनेचे प्रथम वर्णन केले व त्यांनीच हा अवयव रक्ताभिसरण तंत्राशी संबंधित असल्याचे दाखवून दिले. माथिस, बार्बेट, क्लार्क व जी. बी. मोर्गान्ये या शास्त्रज्ञांनी कुत्र्यावरील प्लीहा-उच्छेदन शस्त्रक्रियेच्या परिणामांचा अभ्यास करून निरनिराळ्या वेळी त्याविषयी माहिती प्रसिद्ध केली. प्रत्येकाने असे दाखवून दिले की, हा अवयव निरोगी जीवनास अनावश्यक आहे. नेमकी हीच गोष्ट ॲरिस्टॉटल (इ.स. पू. ३८४-३२२) या ग्रीक शास्त्रज्ञांनी कित्येक शतकांपूर्वी प्रतिपादिली होती.

काही शतकांपूर्वी लष्करी शस्त्रक्रियाविशारदांनी मानवातील प्लीहा-उच्छेदन शस्त्रक्रिया केल्या होत्या; पण त्या सर्व प्लीहेच्या आघातजन्य विकृतीकरिताच होत्या. क्विटेनबॉम यांनी १८२६ मध्ये व स्पेन्सर वेल्स यांनी १८७६ मध्ये आघातविरहित रोगावरील इलाज म्हणून प्लीहा-उच्छेदनाचा प्रथम उपयोग केला. त्यानंतर गंभीर रक्तस्त्राव व सूक्ष्मजंतू संक्रामणामुळे रोगी दगावण्याच्या भीतीने ही शस्त्रक्रिया करणे जवळ जवळ पुढील पस्तीस वर्षे बंद होते. शस्त्रक्रियाविज्ञानाच्या प्रगतीनंतर ही शस्त्रक्रिया करण्यास पुन्हा सुरूवात झाली. आधुनिक काळात ती अनेक विकृतींवरील इलाज म्हणून केली जाते व एक निर्धोक शस्त्रक्रिया म्हणून गणली जाते. आज रक्तासंबंधीच्या काही रोगांवर प्लीहाउच्छेदन शस्त्रक्रिया एक उपयुक्त व निर्धोक शस्त्रक्रिया म्हणून मान्य झाली आहे.१९२१ मध्ये प्रसिद्ध शस्त्रक्रियाविशारद बी. जी. ए. मोयनिहॅन यांनी या शस्त्रक्रियेसंबंधी सखोल व विस्तृत माहिती लिहून ठेवली आहे.

सर्वसाधारण वर्णन

प्लीहेस मध्यपटलाकडील व अंतस्त्यांकडील (उदरातील अवयवांकडील) असे दोन पृष्ठभाग, ऊर्ध्व व अधःस्थ (वरची व खालची) अशा दोन कडा आणि अग्र व पश्च (पुढचे व मागचे) अशी दोन टोके असतात. मध्यपटल पृष्ठभाग बहिर्गोल असतो व तो मध्यपटलाच्या उदरगुहीय पृष्ठभागाशी संलग्न असतो. यामुळे श्वसनक्रियेच्या वेळी मध्यपटलाबरोबरच प्लीहेची हालचाल होणे अपरिहार्य असते. मध्यपटलाच्यावर म्हणजे त्याच्या फुप्फुसावरण पृष्ठभागाशी संबंधित डाव्या फुप्फुसाचा तळाचा भाग,त्यावरील फुप्फुसावरण आणि डावीकडील नववी, दहावी व अकरावी या फासळ्या असतात. प्लीहा डाव्या अकराव्या फासळीशी जवळजवळ समांतर असते. अंतस्त्य पृष्ठभागावर जठर डावे वृक्क (मूत्रपिंड), अग्निपिंड पुच्छ व बृहदांत्र (मोठे आतडे) यांच्या सान्निध्यामुळे उमटलेले कमीजास्त खोलगट ठसे असतात. अंतस्त्यांच्या नावांवरून या ठशांना जठरांकन, वृक्कांकन,अग्निपिंडांकन व बृहदांत्रांकन अशी नावे दिली आहेत. जठरांकनाशी जठर पश्व भित्ती, वृक्कांकनाशी डाव्या वृक्काचा वरचा आणि अग्रपृष्ठभाग, अग्निपिंडांकनाशी अग्निपिंड पुच्छ व बृहदांत्रांकनाशी डावा बृहदांत्र बाक संलग्न असतात.

जठरांकनाच्या पश्च भागात एक अनियमित स्वरूपाची खाच असते, तिला’नाभिका’ म्हणतात. नाभिकेतून रक्तवाहिन्या, तंत्रिका (मज्जातंतू) व लसीका वाहिन्या (रक्तद्रवाशी साम्य असणारा द्रव पदार्थ वाहून नेणाऱ्या नलिका)प्लीहेच्या मगजात (मऊ, लिबलिबीत पेशीसमूहात) शिरतात. ऊर्ध्व अथवा वरची कडा खालच्या कडेपेक्षा काहीशी अग्र बाजूस येत असल्यामुळे तिला अग्र कडा व खालचीला पश्च कडा असेही म्हणतात. अग्र कडा स्पष्ट असून तिच्यावर एक किंवा दोन खोबणी असतात. मध्यपटल पृष्ठभाग आणि वृक्कांकन यांच्यामध्ये पश्च कडा असते. प्लीहेचे पश्व टोक बोथट व गोलसर असून कशेरूकदंडाकडे (पाठीच्या कण्याकडे) असते. अग्र टोक चापट आकाराचे असून त्यावर बृहदांत्राचा डावा बाक टेकलेला असतो.

प्लीहेचा बहुतांश पृष्ठभाग पर्युदराने (उदरगुहेत भित्तींच्या आतील बाजूवर आणि तीमधील अंतस्त्यांवर कमीजास्त प्रमाणात पसरलेल्या पातळ अस्तरासारख्या पटलाने) वेष्टिलेला असतो व तिच्या संपुटास (तंतुमय आवरणास) पर्युदर घट्ट चिकटलेले असते. प्लीहा काहीशा सैल बंधांनी जठर व पश्च उदर भित्तीला जखडलेली असते. हे बंध पर्युदराच्या घड्यांचे बनलेले असतात व त्यांना ’जठर-प्लीहा बंध’ आणि ’प्लीहा-वृक्क बंध’ आशी नावे आहेत.

रचना

मानवी प्लीहा तंतुमय ऊतक (समान रचना व कार्य असलेल्या कोशिकांचा-पेशींचा-समूह) व प्रत्यास्थ (लवचिक) तंतू मिळून झालेल्या थरांनी बनलेल्या संपुटात वेष्टिलेली असते. संपुटात अत्यल्प स्नायू ऊतकही विखुरलेले असते. संपुटापासून मगजामध्ये जाणाऱ्या अनेक प्रपट्टिका (मगजाचे छोटे छोटे भाग पाडणारे तंत्वात्मक बंध) विखुरलेल्या असतात. मगजाच्या सूक्ष्मदर्शकीय तपासणीत काही भाग पांढरा किंवा करडा-पांढरा व काही भाग तांबडा दिसतो. पांढरा भाग वसाभ (स्निग्ध पदार्थांसारखे) ऊतक असून ते रोहिण्यांच्या भोवती आवरणासारखे पसरलेले असते. रोहिणिकांभोवती त्यांचे केशवाहिन्यांत (सूक्ष्म रोहिण्या व सूक्ष्म नीला यांना जोडणाऱ्या सूक्ष्म नलिकांत) विभाजन होईपर्यंत हा वसाकोशिकांचा थर असतो. काही ठिकाणी हा थर विस्तार पावतो आणि तेथे वसापुटके बनतात. या पुटकांना ’मालपीगीय पुटके’ (मालपीगी या शरीरचनाशास्त्रज्ञांच्या नावावरून) म्हणतात. प्रत्येक पुटकाचा व्यास ०·२५ ते १· ० मिमी. एवढा असतो. ताज्या प्लीहाच्छेदाच्या पृष्ठभागावर ही पुटके अर्धपारदर्शक पांढऱ्या टिंबाप्रमाणे विखुरलेली दिसतात. मालपीगीय पुटके वसाकोशिका निर्माण करणारी केंद्रे असतात व त्यांमध्ये लसीका वाहिन्या नसतात. पुटकात तयार होणाऱ्या वसाकोशिका अमीबीय गतीने [⟶ अमीबा] तांबड्या भागात शिरतात व तेथे त्यांची वृद्धी होते. वाढत्या वयाबरोबर या पुटकांची अपपुष्टी होते व वृद्धावस्थेत त्यांचा अभावही संभवतो. तांबडा भाग छोट्या छोट्या नीला कोटरिकांचा (अशुद्ध रक्ताने भरलेल्या पोकळ्यांचा) बनलेला असल्यामुळे तांबडा दिसतो. या भागातच कोशिकारचनेपासून बनलेले रज्जू विखुरलेले असतात व त्यांना ’प्लीहारज्जु’ किंवा ’बिलरोट रज्जू’ (सी.ए.टी. बिलरोट या शस्त्रक्रियाविशारदांच्या नावावरून) म्हणतात. हे रज्जू रक्तातील कोशिका व पुष्कळ महाभक्षी कोशिका (सूक्ष्मजीव व इतर बाह्य कण यांचे भक्षण करणाऱ्या मोठ्या कोशिका) मिळून बनलेले असतात. महाभक्षी कोशिकांच्या विपुलतेमुळेच प्लीहेला ⇨जालिका-अंतःस्तरीय तंत्रामध्ये महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले आहे.तांबड्या व पांढऱ्या मगजाचे प्रमाण सारखे नसते व ते सूक्ष्मजंतू संक्रामण, विषबाधा वगैरे शारीरिक विकृतीप्रमाणे बदलते.

 

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate