অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

पौरुषजन

(अँड्रोजेन) पौरुषजने ही शरीरात निर्माण होणारी स्टेरॉइड हॉर्मोने असून पौरुषदर्शक गुणधर्म निर्माण करणे हे त्यांचे प्रमुख कार्य आहे. यांपैकी टेस्टोस्टेरोन (वृषण स्राव) हे हॉर्मोने प्रामुख्याने वृषणाद्वारे (पुं-जनन ग्रंथींद्वारे) स्रवले जाते. त्याखेरीज इतर हॉर्मोने अधिवृक्क ग्रंथीच्या बाह्यक भागाकडून स्रवली जातात.

पौरुषजन हॉर्मोने पुरुष-लिंग इंद्रियाची म्हणजे शिश्नाची कार्यक्षमता राखतात. त्याप्रमाणेच लैंगिक उपलक्षणांची वाढ घडवून आणतात. शरीरातील केसांच्या वाढीचे वितरण, घोगरा फुटलेला आवाज, शुक्राणू (पुं-जनन पेशी) तयार होणे व परिपक्क होणे, शरीरात प्रथिननिर्मिती करणे व शरीरवृद्धी घडवून आणणे इ. कार्यांत (वा उपलक्षणांत) ती भाग घेतात. या हॉर्मोनांचे नियंत्रण पोष ग्रंथीच्या अग्रखंडाकडून होते.

पौरुषजनांपैकी प्रमुख हॉर्मोन टेस्टोस्टेरोन हे होय. इतर पौरुषजन हॉर्मोने अँड्रोस्टेरॉन, अँड्रोस्टेनडायोन आणि अ‍ॅड्रीनोस्टेरॉन ही होत. स्त्रियांतही ही अन्य पौरुषजने अंडाशयात आणि गर्भधारणाकाळात वारेमध्ये निर्माण होतात. ती गर्भाशयाच्या दृष्टीने वाढ होण्यास मदत करतात. स्त्रीत ही हॉर्मोने फाजिल प्रमाणात निर्माण झाल्यास अंडाशयाच्या कार्यात बिघाड उत्पन्न करतात व पौरुषदर्शक उपलक्षणे स्त्रीत निर्माण करतात.

टेस्टोस्टेरोन

पुरुषाच्या शरीरात वृषणाच्या अस्तित्वामुळे जे काही परिणाम घडून येतात ते मुख्यतः टेस्टोस्टेरोनामुळे घडून येतात. हे हॉर्मोने वृषणाच्या ऊतकातील (समान रचना व कार्य असलेल्या कोशिकांच्या—पेशींच्या—समूहातील) लहानलहान मोकळ्या जागांतील (अंतराली) लायडिख कोशिकांकडून (फ्रांट्स फोन लायडिख या जर्मन शारीरविज्ञांच्या नावावरून ओळ्खण्यात येणाऱ्या कोशिकांकडून) तयार केले जाते. या कोशिका दोन रेतोत्पादक नलिकांच्या मधल्या भागात असतात. एकूण वृषणाच्या ऊतकांपैकी या कोशिका २०% असतात. नवजात बालकात व तारुण्यावस्थेनंतर प्रौढात या कोशिका मोठ्या प्रमाणात असतात व मोठ्या प्रमाणात टेस्टोस्टेरोन स्रवतात. लहान मुलात मात्र या नसतात. या कोशिकांचे अर्बुद (कोशिकांच्या अत्यधिक वाढीमुळे निर्माण होणारी गाठ) निर्माण झाले असता हे हॉर्मोन मोठ्या प्रमाणात स्रवले जाते. तेराव्या वर्षापर्यंत लहान मुलात टेस्टोस्टेरोन सामान्यतः निर्माण होत नाही. तारुण्यात पदार्पण करते वेळी त्याची निर्मिती एकदम वाढते व पुढे आयुष्यभर सुरू राहते. पोष ग्रंथीचे पीतपिंडकर हॉर्मोने टेस्टोस्टेरोन स्रवण्याच्या क्रियेवर नियंत्रण करीत असते.

टेस्टोस्टेरोनाची रासायनिक संरचना १९ कार्बन अणू असलेले स्टेरॉइड केंद्रक अशी असते. निर्मितीनंतर ते प्रथिनास बद्ध असलेल्या स्वरूपात रक्तात सोडले जाते. नंतर १० ते १५ मिनिटांत ते ऊतकांवर निक्षेपित होते (साचते) किंवा अपघटित होते (रेणूचे तुकडे होतात). ऊतकावर निक्षेपित होणाऱ्या टेस्टोस्टेरोनाचे कोशिकांमध्ये डायहायड्रोटेस्टोस्टेरोनामध्ये रूपांतर होते आणि या रूपातच ते कोशिकांतर्गत कार्ये पार पाडते.

कार्ये

वाढणाऱ्या गर्भात वारेपासून येणाऱ्या जनन ग्रंथी उद्दीपक (गोनॅडोट्रोपीन) हॉर्मोनामुळे गर्भातील वृषणे टेस्टोस्टेरोन स्रवतात. या टेस्टोस्टेरोनामुळे बालकातील पौरुषदर्शक लिंगाची (शिश्न व मुष्क-म्हणजे वृषणे ज्या पिशवीत नंतर उतरतात ती पिशवी–यांची) वाढ होते. त्याचप्रमाणे अष्ठीला ग्रंथी,रेताशय व रेतवाहिनी यांची वाढ होते व स्त्रीत्वदर्शक उपलक्षणे दबली जातात. गर्भारपणाच्या अखरेच्या दोन महिन्यांत वृषणे उदरातून मुष्कात उतरतात. या प्रवासासही टेस्टोस्टेरोन जबाबदार असते. ज्या बालकामध्ये वृषणे मुष्कात उतरलेली नसतात त्याला टेस्टोस्टेरोन टोचल्यास ती खाली उतरतात. जनन ग्रंथी उद्दीपक हॉर्मोनाद्वारेही हे कार्य साधता येते.

प्रौढावस्थेतील पौरुषदर्शक मुख्य व उपलक्षणांची वाढ

तारुण्यावस्थेच्या प्राप्तीनंतर टेस्टोस्टेरोनामुळे शिश्न, मुष्क व वृषणे यांची वाढ होऊन ही इंद्रिये कित्येक पट मोठी होतात. ही वाढ विसाव्या वर्षापर्यंत होत राहते. याबरोबरच पुरुषात लैंगिक उपलक्षणांची वाढ होते. या मुख्य व उपलक्षणांमुळेच स्त्री व पुरुष हा भेद निर्माण होतो. ही उपलक्षणे खालीलप्रमाणे असतात.

  1. शरीरावरील केसांच्या वाढीचे वितरण : टेस्टोस्टेरोनामुळे जननेंद्रियाच्या वरील भागात केस वाढतात. केसांची ही वाढ बेबींच्या दिशेने मध्यरेषेस धरून बेंबीपर्यंत पोहोचते. चेहेऱ्यावर दाढी व मिशा फुटतात. छातीवर केस उगवतात, क्वचित अन्यत्र पाठ, बाहू वगैरे जागीही केस उगवतात. यामुळे इतर ठिकाणचे केसही अधिक दाट बनतात.
  2. टक्कल : डोक्याच्या अग्रभागावरील केस टेस्टोस्टेरोनामुळे कमी होतात. कार्यक्षम वृषणे नसलेल्या व्यक्तीस टक्कल पडत नाही. पौरुषजनाबरोबरच आनुवांशिक गुणधर्म टक्कल पडण्यात भाग घेत असल्यामुळे पुष्कळ जोमदार असलेल्या व्यक्तीला कधीच टक्कल पडत नाही. सर्वसाधारणपणे चाळीशीनंतर टेस्टोस्टेरोनाचे प्रमाण कमी झाले की, हळूहळू टक्कल पडण्यास सुरुवात होते. आनुवांशिक कारणाने स्त्रीत पौरुषजन स्रवणारे अर्बुद निर्माण झाले व ते बराच काळ पौरुषजन स्रवत राहिले, तर टक्कल पडू शकते.
  3. आवाज : टेस्टोस्टेरोनामुळे स्वरयंत्र मोठे होते. त्यावरील अंतस्त्वचेची वृद्धी होते. त्यामुळे प्रथम आवाज फुटतो, नंतर त्यात पुरुषी कणरपणा व घोगरेपणा येतो.
  4. त्वचा : संपूर्ण शरीरावरील त्वचा जाड होते. त्वचेखालील उपत्वचा कडक होते. कृष्णरंजक (मेलॅनीन) या रंगद्रव्याचे प्रमाण वाढून त्वचा तांबूस, काळपट होते. त्वचेतील त्वक्-स्नेह ग्रंथी अधिकतेने त्वक्-वसा स्रवतात. यामुळे चेहेऱ्यावर मुरुमाच्या पुटकुळ्या येतात. तारुण्यात पदार्पण करताना एकदम शरीरातील टेस्टोस्टेरोनाचे प्रमाण वाढते तेव्हा बऱ्याच जणांना चेहेऱ्यावर मुरुमाचा किंवा तारुण्यपिटिकांचा त्रास होतो.
  5. स्नायूंची व हाडांची वाढ : तारुण्यात प्रवेश केल्यानंतर दंड, हात, पाय, खांदा इ. ठिकाणच्या स्नायूंची प्रमाणबद्ध वाढ होते. या वाढीबरोबरच शरीरात इतरत्रही प्रथिनसंचय वाढतो. हाडांची जाडी वाढते. त्यांतील कॅल्शियमाच्या निक्षेपणाचे प्रमाण वाढते. हाडातील एकूण आंतरकोशिकीय (दोन कोशिकांमधील) भाग वाढतो व त्यामुळे कॅल्शियम संचय वाढतो. वाढत असलेल्या लहान मुलात टेस्टोस्टेरोन अधिक प्रमाणात स्रवले गेल्यास अस्थींची वाढ अधिक प्रमाणात होते. टेस्टोस्टेरोनामुळे अस्थींच्या अग्रप्रवर्धांचा (वाढ होत असलेल्या लांब हाडांच्या टोकाशी असलेल्या व ज्यांमुळे हाडांची वाढ होते अशा भागांचा) अग्रप्रवर्धाशी (दंडाशी) लवकर संयोग घडवून आणला जातो व त्यामुळे वाढ जलद झाली, तरी अशा मुलात हा संयोग लवकर झाल्याने उंचीची वाढ खुंटते.

टेस्टोस्टेरोनाचे मोठ्या मात्रेने अंतःक्षेपण (इंजेक्शन) दिल्यास शरीरातील न्यूनतम चयापचयमान १५% वाढते. शरीरातील नेहेमीचे टेस्टोस्टेरोन वृषणविहीन स्थितीपेक्षा चयापचयमान १०—१५% वाढविण्यास जबाबदार असते. हा जादा प्राथिननिर्मितीचा अप्रत्यक्ष परिणाम असतो. वृषणविहीन प्रौढात टेस्टोस्टेरोन टोचल्यास रक्तातील तांबड्या कोशिकांची संख्या २० टक्क्यांनी वाढते. प्रौढ स्त्रीपेक्षा पुरुषांत रक्तारुण (हीमोग्लोबिन) व तांबड्या कोशिका या दोन्हींचे प्रमाण अधिक असते. हा फरक टेस्टोस्टेरोनामुळेच निर्माण झालेला असणे शक्य आहे.

वरील कार्ये टेस्टोस्टेरोन कोशिकेतील प्रथिननिर्मिती वाढवूनच घडवून आणते. कोशिकेत त्यांचे डायहायड्रोटेस्टोस्टेरोनामध्ये रूपांतर होते. हे द्रव्य नंतर ग्राहकप्रथिनास बद्ध होऊन केंद्रकाकडे (कोशिकेतील प्रक्रियांवर नियंत्रण ठेवणाऱ्या गोलसर पुंजाकडे) जाते. केंद्रक प्रथिनाशी संलग्न होऊन डीएनए-आरएनए प्रतिलेखन क्रियेत भाग घेते. या मागोमाग तीस मिनिटांच्या अवधीत कोशिकेतील आरएनएचे प्रमाण वाढू लागते. पाठोपाठ कोशिका प्रथिनाची निर्मिती व संचय यांत वाढ होते.

पोष ग्रंथीच्या अग्रखंडाचे लैंगिक कार्यावरील नियंत्रण

पोष ग्रंथीचा अग्रखंड पुटकोद्दीपक व पीतपिंडकर अशी दोन हॉर्मोने स्रवतो. पीतपिंडकर हॉर्मोनालाच वृषणातील अंतराली (लायडिख) कोशिका उद्दीपक असेही म्हणतात. ही दोन्ही हॉर्मोने पुरुषाची लैंगिक कार्यशक्ती ठरविण्यात भाग घेतात. पीतपिंडकर हॉर्मोन वृषणातील अंतराली कोशिकांना उद्दीपित करून टेस्टोस्टेरोन स्रवण्यास उद्युक्त करतो. या उद्दीपनाच्या प्रमाणातच टेस्टोस्टेरोन स्रवले जाते. पुटकोद्दीपक हॉर्मोने मूलशुक्रकोशिकेचे शुक्राणुत रूपांतर होण्यास मदत करते. हे हॉर्मोन नसेल, तर पक्व शुक्राणू तयार होणार नाहीत. त्याबरोबरच शुक्राणुनिर्मिती पूर्ण होण्यासाठी काही प्रमाणात त्या वेळी टेस्टोस्टेरोन स्रवले जाणेही आवश्यक असते. पुटकोद्दीपकामुळे मूलशुक्रकोशिकांचे प्रगुणन होते आणि त्यांचे दुय्यम शुक्रकोशिकांत (शुक्राणुपूर्वकोशिकांत) रूपांतर होते. या दुय्यम शुक्रकोशिकांचे पक्व शुक्राणूंत रूपांतर होण्यास टेस्टोस्टेरोन मदत करते. अशा प्रकारे शुक्राणूंच्या निर्मितीसाठी दोन्ही हॉर्मोनांची जरूरी असते.

पोष ग्रंथीचा अग्रखंड इतर हॉर्मोनांप्रमाणेच ही हॉर्मोनेही अधोथॅलॅमसाच्या नियंत्रणाखाली स्रवत असतो. अधोथॅलॅमसाकडे येणारे मानसिक व भावनिक संदेश यात उद्दीपित किंवा प्रतिबंध करू शकतात. अधोथॅलॅमसाचे नियंत्रण पीतपिंडकर मुक्तिकारक व पुटकोद्दीपक मुक्तिकारक या हॉर्मोनांद्वारे साधले जाते. ही हॉर्मोने प्रवेशजालातील रक्तावाटे अग्रखंडात येऊन त्याला संबंधित हॉर्मोने स्रवण्यास उद्युक्त करतात. टेस्टोस्टेरोन व अग्रंखडाची हॉर्मोने यांत अन्योन्य प्रतिबंधाचे नाते असते. रक्तातील टेस्टोस्टेरोनाची पातळी वाढली (अंतःक्षेपण दिल्यामुळे किंवा इतर कारणाने), तर अग्रखंडाची वरील दोन्ही हॉर्मोने कमी प्रमाणात स्रवली जातात. उलट टेस्टोस्टेरोनाची पातळी कमी झाली, तर ही हॉर्मोने जास्त प्रमाणात स्रवली जातात.

तारुण्यावस्था व तिची सुरुवात

पहिल्या दहा वर्षांच्या आयुष्यात मुलाच्या पोष ग्रंथीचा अग्रखंड अजिबात जनन ग्रंथी उद्दीपक हॉर्मोने स्रवत नाही. त्यानुसार टेस्टोस्टेरोनही अजिबात स्रवले जात नाही. दहाव्या वर्षाच्या सुमारास अग्रखंड ही हॉर्मोने स्रवू लागतो. त्यांचे प्रमाण उत्तरोत्तर वाढत जाते व त्याच्या पाठोपाठ वृषणकार्यातही वाढ होते. तेराव्या वर्षांच्या सुमारास मुलातील वृषण क्रियाशील होऊन प्रौढाप्रमाणे वीर्यनिर्मिती सुरू होते. या काळास तारुण्यावस्थेची सुरुवात असे म्हटले जाते. या वयाच्या सुमारास शरीरात नक्की कोणल्या प्रक्रिया घडून येतात त्याचे गूढ अद्याप पूर्णतः उकललेले नाही. दहाव्या वर्षापूर्वी ही वाढ न होण्याचे कारण वृषण व पोष या दोन्ही ग्रंथींत नसून अधोथॅलॅमसामध्ये असते. या काळात अधोथॅलॅमस मुक्तिकारक हॉर्मोने स्रवत नाही. म्हणून अग्रखंडाकडून जनन ग्रंथी उद्दीपक हॉर्मोने स्रवली जात नाहीत. अधोथॅलॅमसामधील नियंत्रण केंद्राच्या वाढीमुळे येथून पुढे संबंधित मुक्तिकारक हॉर्मोने स्रवली जातात व व्यक्ती तारुण्यावस्थेत पदार्पण करते.

पौरुषजन विकृती : पौरुषन्यूनत्व

पौरुषन्यूनत्व बऱ्याच कारणांनी येऊ शकते. एखाद्यात जन्मतःच वृषणे नसते, क्वचित त्याची वाढ अपूर्ण झालेली असते, तिसरे कारण म्हणजे वृषणे नेहमी मुष्कात उतरतात त्याप्रमाणे उतरली न जाता जांघेत किंवा उदरातच राहिली, तर वृषणांचा काही प्रमाणात किंवा संपूर्ण ऊतकनाश होतो. अखेरचे कारण म्हणजे कारणपरत्वे वृषणे काढून ताकली जाणे यास वृषणहीनता म्हणतात.

मुलाची वृषणे तारुण्यावस्थेपूर्वीच हरपली, तर जी नपुंसकावस्था उद्‌भवते ती जन्मभर राहते. अपूर्व वाढीची लैंगिक लक्षणे आयुष्यभर राहतात. अशा व्यक्तीची उंची इतरांपेक्षा किंचित जास्त असते. स्नायू दुर्बल असतात. शरीरयष्टी सडपातळ असते. शिश्न व इतर उपलक्षणांची वाढ होत नाही. ती लहान मुलाप्रमाणेच राहतात. आवाज मुलासारखा असतो. दाढी-मिशा फुटत नाहीत. पुरुषी केशवाढीचे वितरण निर्माण होत नाही.

तारुण्यावस्था प्राप्त झाल्यानंतर वृषणे काढून टाकली, तर पुरुषातील काही उपलक्षणे मुलासारखी होतात, तर काही कायम राहतात. लिंग इंद्रिये लहान होतात; पण मुलासारख्या स्थितीस जात नाहीत. आवाजात किंचित बदल होतो. पुरुषी केशवाढीचे वितरण, अस्थींची जाडी व स्नायू यांत बदल होतो. पूर्वीचा लैंगिक अनुभव असलेल्या वृषणहीन पुरुषात शिश्नाचे उद्दीपन होऊ शकते. लैंगिक संबंधाची आसक्ती कमी होते; परंतु संपूर्ण नाहीशी होत नाही. टेस्टोस्टेरोनजन्य लैंगिक इच्छा लोप पावते.

 

संदर्भ : Guyton, A. C. Textbook of Medical Physiology, Tokyo, 1976.

लेखक : रा. सी. कापडी / श्यामकांत कुलकर्णी

स्त्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate