অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

पेशी, पेशीगट आणि पेशीसंस्था

पेशी, पेशीगट आणि पेशीसंस्था

आपले घर हे अनेक दगडविटांचे मिळून बनलेले असते. तसेच आपले शरीरही असंख्य सूक्ष्म पेशींचे बनले आहे.

सूक्ष्म जीवजंतूंपैकी बरेच प्रकार केवळ एका पेशीचेच बनलेले असतात. या पेशी स्वयंपूर्ण असतात. सभोवतालच्या परिस्थितीतून अन्न घेणे, स्वसंरक्षण करणे, पुनरुत्पादन करणे,नको असलेले पदार्थ बाहेर टाकणे ही सर्व कामे ती एकच पेशी करते.

मात्र प्राणी जेवढा प्रगत, तसा या पेशींच्या कामांमध्ये वेग वेगळेपणा असतो. उदाहरणार्थ, एखाद्या छोटया कारखान्यात एकच माणूस माल आणणे, प्रक्रिया करणे, तो विकणे, साफसफाई ठेवणे, हिशेब ठेवणे अशी सर्व कामे करत असतो. मोठया कारखान्यात मात्र या प्रत्येक कामासाठी इंजिनीयर, कामगार, कारकून, ड्रायव्हर, मॅनेजर अशी खास माणसे नेमलेली असतात. या प्रत्येकाचे काम जसे वेगळे तसेच माणसात प्रत्येक पेशीसमूहाचे काम वेगळे असते.

यासाठी पेशींचे अनेक प्रकार दिसून येतात. त्वचेच्या पेशी चपटया, पसरट असतात. जठराच्या अंतर्भागातील आवरणाच्या पेशी उभट दंडाकृती असतात. हाडांच्या पेशी वेगळया असतात तर मेंदूच्या पेशींना अनेक लांब टोके असतात. रक्ताच्या पेशी निरनिराळया प्रकारच्या असतात आणि त्यांची कामेही वेगवेगळी असतात. वीर्यातल्या प्रत्येक शुक्रपेशीला हालचालीसाठी शेपटी असते. स्त्रीजननसंस्थेत ठरावीक प्रवास करुन स्त्रीबीजाचे फलन करण्याची त्यांची प्रवृत्ती असते. पेशींच्या या विविध गुणधर्मामुळे शरीरात असंख्य प्रकारची कामे पार पाडली जातात. प्रत्येक प्रकारच्या पेशींचा गुणसूत्र-संच सारखाच असतो. त्या त्या व्यक्तीत मात्र त्यातला काही भाग जागृत तर उरलेला सुप्त असतो.

अनेक पेशीसमूहांचा एखादा गट, वेगळे खास काम करीत असला तर त्या गटाला'संस्था' असे म्हणता येईल. उदा. पचनसंस्था, श्वसनसंस्था, इत्यादी. पेशीसमूहांची कामे वेगवेगळी परंतु परस्परपूरक असतात.

ही सर्व रचना व उत्पत्ती निसर्गात सहज होत असली तरी गुंतागुंतीची आहे. साधी एक सजीव पेशी आपल्या हाताने निर्माण करणे हे आतापर्यंत माणसाला जमलेले नाही. ही सृष्टी निर्माण होताना पृथ्वीवरच्या हजारो चौरस मैलांच्या जमीन आणि अथांग पाण्यामध्ये कोटयवधी वर्षे निसर्गाकडून असंख्य प्रयोग झालेले आहेत.

 

लेखक : डॉ. श्याम अष्टेकर

(MBBS, MD community Medicine)

संदर्भ : आरोग्याविद्या

 

अंतिम सुधारित : 6/6/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate