पिंडाचा गाभा गोलाकार कोशिकांचा (पेशींचा) बनलेला असून जन्मवेळी त्यामध्ये अल्प तंत्रिका (मज्जा) कोशिका व तंत्रिका श्लेष्मकोशिका [→ तंत्रिका तंत्र] असतात. संयोजी (जोडणाऱ्या) ऊतक कोशिका व तंतू वयाच्या पहिल्या वर्षात उत्पन्न होतात. हळूहळू पिंडामध्ये कॅल्शियमाचे निक्षेपण (साचण्याची क्रिया) होत जाते. सातव्या वर्षानंतर कॅल्शियमाचे लहान खडे नेहमीच आढळतात. म्हणून या वयानंतर घेतलेल्या डोक्याच्या क्ष–किरण चित्रामध्ये पिंडाचे स्थान व त्यावरून मेंदूच्या इतर भागांचे स्थान निश्चित करता येते.
तृतीय नेत्र पिंडाच्या कार्याबाबत अद्याप निश्चित माहिती झालेली नाही. या पिंडाच्या मेलॅटोनीन (इंडॉल या द्रव्याचे संयुग) नावाच्या स्रावामुळे उभयचर (पाण्यात व जमिनीवर राहणाऱ्या) प्राण्यांच्या जनन तंत्रात, मेंदूत, स्त्रीमदचक्रात तसेच त्वचेतील रंगद्रव्ययुक्त कोशिकांत बदल घडून येत असावा, असा शास्त्रज्ञांचा कयास आहे. या पिंडाची अर्बुदे (कोशिकांच्या विकृत वाढीमुळे निर्माण होणाऱ्या व शरीरक्रियेस निरुपयोगी असणाऱ्या गाठी) नेत्रगोल पक्षाघात, जलशीर्ष (कवटीतील अंतर्दाब वाढून मस्तिष्क–मेरुद्रवाचे प्रमाण वाढणे), कालपूर्व लैंगिक वाढ यांना कारणीभूत होतात [→ तंत्रिका तंत्र].
लेखक -ढमढेरे, वा. रा.; भालेराव, य. त्र्यं.
स्त्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 10/7/2020
रोहिणीतील रक्तामधील रासायनिक बदलाने चेतवल्या जाणाऱ...
सन २०११ च्यात जनगणनेनुसार भारताची लोकसंख्येुच्याळ ...
एशियन पेण्ट्स, वनराई आणि एच. व्ही. देसाई नेत्र रुग...