आपटे, ना. रा.
वरीलप्रमाणे आंत्राचा, बस्तीचा, हृदयाचा, रक्तवाहिनीचा, श्वासवाहिन्यांचा भाग ढिला, ताणलेला, वर उचलून आलेला असा राहतो. त्यामुळे तो तिथे वरूनही स्पर्शाला समजतो. उदरामध्ये व छातीच्या फासळ्यांच्या मधल्या भागातही असा भाग हाताला लागतो. ह्यालाच गुल्म असे म्हणतात. त्यातून नैसर्गिक रीतीने ऊर्ध्ववहन, अधोवहन जे असेल ते होत नाही, अडते.
वातज गुल्माची अवस्थानुरूप चिकित्सा ज्यामध्ये मळाच्या गाठी असून शौचाला व वात सरण्याला अवरोध होतो, पोट फुगलेले असते व तीव्र वेदना असतात तसेच जो रुक्ष आणि शीत अशा कारणांनी झालेला असतो त्याला वातरोग चिकित्सेत सांगितलेली तेले द्यावीत. ही तेले आहारामध्ये पिण्याला, अभ्यंगाला आणि बस्तीला वापरावीत. नंतर स्निग्ध झालेल्या रोग्याला शेक द्यावा. ह्यामुळे स्त्रोतसे मऊ होऊन वाढलेला वात कमी होतो. अवरोध नाहीसा होऊन मल व वात ह्यांचे अनुलोमन होते. पोट फुगणे व वेदना नाहीशा होतात.
वातिक गुल्मामध्ये मल आणि वात ह्यांचा अवरोध असेल व अग्नी चांगला असेल, भूक लागत असेल तर पौष्टिक असे अन्नपान द्यावे. अर्थात ते स्निग्ध आणि उष्ण द्यावे. वातज गुल्मांवर पुनःपुन्हा हे उपचार स्थानाला अनुसरून केले पाहिजेत. मात्र कफ आणि पित्त यांचा प्रकोप होणार नाही इकडे लक्ष दिले पाहिजे. ह्याकरिता नियंत्रण असणे जरूर आहे. म्हणजे प्रमाणाने हे उपचार केले पाहिजेत.
कोणत्याही दोषाचा गुल्म असला, तरी बस्तिकर्म हे सर्वांत श्रेष्ठ आहे. बस्तिकर्माने गुल्मामधला मुख्य दोष जो वात तो जिंकला जातो. हिंग्वादी, हपुषादि, दशमूलादि, त्र्यूषणादि, लशूणादि, षट्पल ही सिद्ध तुपे द्यावीत.
वातगुल्मामध्ये भूक लागत नसेल, अरुची असेल, तोंडाला पाणी सुटत असेल, जडपणा असेल व तंद्रा असेल तर कफ दोष वाढलेला आहे असे समजून हलकेसे वमन देऊन कफ काढून टाकावा.
वरील चिकित्सा करूनही शूल, पोट फुगणे आणि मलमूत्राविरोध असेल, तर गुल्माचे स्थान स्निग्ध झाले आहे की नाही हे पाहून ज्या औषधांची तुपे तयार करावयास सांगितली आहेत त्यांचेच काढे, गोळ्या व चूर्णे करून यांपैकी योग्य त्यांचा उपयोग करावा. गुल्म झालेला अवयव जर स्निग्ध नसेल, तर वरील औषधांनी सिद्ध केलेली तुपेच वापरावीत. चूर्णे इ. वापरू नयेत. ती चूर्णे बोर, डाळिंब, ऊन पाणी, ताक, मद्य, आंबट कांजी किंवा दह्यावरची निवळी ह्यांच्याबरोबर सकाळी किंवा जेवणाच्या अगोदर द्यावीत. कफवाताचा संबंध असताना ह्या चूर्णास महाळुंगाच्या रसाच्या भावना देऊन त्यांच्या गोळ्या करून त्या द्याव्यात. तसेच वैश्वानर चूर्ण, शार्दूल चूर्ण, त्रिकटूदि चूर्ण इ. चूर्णे निरनिराळ्या अवस्थांत द्यावीत.
वातगुल्माबरोबर श्वास, कास, हृद्रोग इ. विकार असतील, तर त्या त्या प्रमाणे योग उपयोगात आणावेत. उदा., वातज गुल्माबरोबर वात, हृद्रोग, अर्श, योनिशूल, मलावरोध हे विकार असतील तर सुंठ, गूळ, काळे तीळ ही एक, दोन आणि चार ह्या प्रमाणात घेऊन कोमट दुधाबरोबर द्यावीत.
वातगुल्मात कफाचे बल असेल, तर मद्याच्या निवळीबरोबर आणि पित्ताचे बल असेल, तर दुधाबरोबर एरंडेल प्यावे व पित्त अतिशय वाढून दाह होत असेल, तर सस्नेह अनुलोमन करणारे असे विरेचन द्यावे. हे करूनही तेवढ्याने दाह कमी झाला नाही तर रक्तसृती करावी. नलिनी घृत द्यावे. वातगुल्मामध्ये पोट फुगलेले असेल, गृध्रसी, विषमज्वर, हृद्रोग, विद्रधी, शोष असेल तर लसूणसिद्ध दूध द्यावे. शूल आणि अवरोध असेल, तर चित्रकादि काढा हिंग, सैंधव व बिडलोण घालून द्यावा. दाह आणि वेदना असतील, तर पुष्करादि काढा द्यावा. अशा रीतीने वातगुल्मात निरनिराळ्या अवस्थांप्रमाणे ग्रंथोक्त उपचार करावेत.
स्त्रोत-मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 6/6/2020