थॉयरॉक्झिन हे अत्यंत महत्त्वाचे संप्रेरक आहे. शरीरातील रासायनिक घडामोडींवर त्याचे नियंत्रण असते. शरीरातील रासायनिक क्रियांचा वेग यावर अवलंबून असतो. पेशीपेशींमध्ये होणारे श्वसन म्हणजे प्राणवायू, कार्बवायू यांची देवाणघेवाण यामुळेच होते. तसेच शरीराची वाढ व इतर अनेक रासायनिक घडामोडींवर या संप्रेरकांचे नियंत्रण असते.
याच्याच जवळ आणखीही एक ग्रंथी पॅरॅथॉयरॉईड - असते आणि ही ग्रंथी हाडांची वाढ,रक्तातले चुन्याचे प्रमाण नियंत्रित करते.
या संप्रेरकाचे रक्तातील प्रमाण वाढले तर हातापायांना घाम सुटणे, थरथर, हृदयाची गती वाढणे (धडधड), शरीराचे तपमान वाढणे, डोळे 'मोठे'दिसणे, इत्यादी दुष्परिणाम जाणवतात. गलग्रंथीचा आकारही वाढू शकतो. वेळीच आजार ओळखून उपचार करणे महत्त्वाचे असते. मात्र हा आजार सौम्य प्रमाणात असेल तर ओळखणे अवघड असते. तज्ज्ञ डॉक्टरच याची शहानिशा करू शकेल. आयोडीनचे विशिष्ट औषध/ शस्त्रक्रिया, इत्यादी उपायांनी हा आजार आटोक्यात आणता येतो.
थॉयरॉक्झिन संप्रेरकाचे प्रमाण कमी झाले तर
थॉयरॉक्झिन संप्रेरकाचे प्रमाण कमी झाल्यास शरीरातील रासायनिक घटकांचा वेग मंदावतो. बाळाच्या वाढीच्या काळात हा आजार झाला असेल तर वाढ कमी होते.
याची कारणे अनेकविध असतात. हा आजार चाळीशीच्या स्त्रियांना होतो. मात्र त्याचे कारण नीट कळलेले नाही. याचबरोबर इतर अनेक कारणे आहेत. उदा. आयोडीन कमतरतेमुळे थायरॉईड हार्मोन कमी पडणे.
याची लक्षणे-चिन्हे प्रत्येक शरीरसंस्थेवर उमटतात.
एकूणच थायरॉईड कमतरतेमुळे शरीरात सर्वत्र दुर्बलता येते. हा आजार लवकर कळून येत नाही, त्याला काही महिने लागू शकतात.
नवजात बाळांना थॉयरॉईड कमतरता असल्यास पुढीलपैकी लक्षणे-चिन्हे दिसतात.
थॉयरॉईड कमतरतेचे निदान करण्यासाठी आपण सावध आणि सजग असले पाहिजे अशी लक्षणे दिसणारी स्त्री किंवा बाळ दिसल्यास ताबडतोब तज्ज्ञ डॉक्टरकडून उपचार करून घेणे आवश्यक आहे. यासाठी वेळीच पाठवणे आवश्यक आहे.
रक्ततपासणीत थायरॉईड संप्रेरकांचे प्रमाण समजते. त्यावरून नक्की रोगनिदान करता येते.
याचे उपचार (संप्रेरक गोळी) अगदी कमी खर्चात होतात. मात्र आयुष्यभर उपचार घ्यावेच लागतात.
उपचार सुरु केल्यावर 2-3 महिन्यांत पुष्कळ लक्षणे कमी होतात.
नायट्रिक ऍसिड, कल्केरिया कार्ब, लॅकेसिस, मर्क्युरी सॉल, सिलिशिया, सल्फर, थूजा
गलग्रंथीतून थॉयरॉक्झिन संप्रेरके निर्माण होण्यासाठी आयोडीन लागते. आयोडीन हे द्रव्य समुद्राच्या पाण्यात,समुद्री अन्नात (मासे,वनस्पती) व भूगर्भातल्या पाण्यात (थोडे प्रमाण) आढळते. डोंगरी भागात व समुद्रापासून जास्त आत असलेल्या भू भागात आयोडीनचे प्रमाण फारच कमी असते. आयोडीनची कमतरता असलेल्या अशा प्रदेशातील लोकांना गलगंड (गलग्रंथीची वाढ) होतात. महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात आयोडीन कमतरता आढळते.
गलगंड असलेल्या मातांना होणारी मुले बौध्दिक व शारीरिक वाढीत कमी पडतात हे एक कायमचे नुकसान असते. अशा बाळांमध्ये चेहरा सुजलेला, निस्तेजपणा, जाड, मोठी जीभ,पोट मोठे, बेंबीजवळ फुगवटा,(हार्निया, अंतर्गळ), कोरडी त्वचा, इत्यादी खाणाखुणा दिसतात. बाळाच्या वाढीचे/ विकासाचे टप्पे लांबणे, खाणेपिणे कमी असणे, मलावरोध,रडण्याचा वेगळाच आवाज ह्या महत्त्वाच्या खुणा आहेत. वेळीच ओळखून तज्ज्ञाकडे पाठवणे फार महत्त्वाचे असते. योग्य वेळी उपचार झाला तर निदान पुढचे नुकसान टळू शकते.
गलगंडग्रस्त प्रदेशांत मुलांमध्ये अशा प्रकारचे आजार मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. यासाठी त्या प्रदेशात अशा आजारांची शक्यता मनामध्ये बाळगूनच मुलांकडे पाहिले पाहिजे. अन्यथा सहजपणे हे निदान होणार नाही.
आयोडीनच्या अभावामुळे गर्भावस्थेत दुष्परिणाम होऊन गर्भपात, अपु-या दिवसांचे बाळंतपण, उपजत मृत्यू, इ. धोके होऊ शकतात. यातून वाचलेल्या गर्भावर गर्भावस्थेतच अनिष्ट परिणाम होऊन मेंदूची अपुरी वाढ किंवा थॉयरॉईड कमतरतेचे अनेक दुष्परिणाम होऊ शकतात. गरोदरपणाच्या पहिल्या तिमाहीत आयोडीन कमतरता झाली तर बहुधा मेंदूवर परिणाम होतो. यातून मूक बधिरता, मतिमंदत्व, नीट चालता न येणे, हातापायांची अचल-ताठरता (स्पास्टिक), इ. लक्षणे दिसतात. गरोदरपणाच्या दुस-या तिमाहीत आयोडीन कमतरता झाली तर शारीरिक वाढ खुंटणे, जननसंस्थेचा विकास अपुरा होणे, सूज,मतिमंदत्व, इ. लक्षणे दिसतात. दोन्ही प्रकार आयोडीनच्या कमतरतेमुळेच होतात. हे विकार आयोडीन पुरवठयामुळे टळू शकतात.
भारतातील बहुतेक प्रांतात आयोडीनयुक्त मीठ पुरवणे हे सक्तीचे आहे. महाराष्ट्रात ही व्यवस्था अंशतः होती. हे पुस्तक लिहीत असताना महाराष्ट्रात इतर साध्या मिठास बंदी घातलेली आहे. काही जणांच्या मते शास्त्रीयदृष्टया व व्यावहारिकदृष्टया साधे मीठ चालू ठेवणे आवश्यक आहे. केरळ व गोवा हे सागरी प्रदेश आयोडीनयुक्त मिठाची इतकी गरज नसल्याने या कायद्यातून मुक्त आहेत.
अन्न शिजवताना मीठ टाकले तर त्या मिठातून 30-70% आयोडीन नष्ट होते. म्हणून मीठ आहारात नंतर मिसळणे एक प्रकारे चांगले ठरते. हल्ली दुकानात मिळणारे पॅकबंद मीठ आयोडीनयुक्त असते. इतर सुटे मीठ आयोडीनयुक्त नसते. सुटया मिठातून आयोडीन महिन्याभरात उडून जाते. दुकानातून आयोडीनयुक्त मीठ आणले तरी घरी काही काळजी घ्यावी लागते. एकतर ते सुटे करून न ठेवता बंद डब्यात किंवा झाकलेले असावे. मातीच्या मडक्यात हे मीठ ठेवल्यास त्यातले आयोडीन खूप कमी होते, म्हणून मिठासाठी मडके वापरू नये.
लेखक : डॉ. श्याम अष्टेकर (MBBS, MD community Medicine)
संदर्भ : आरोग्यविद्या
अंतिम सुधारित : 10/7/2020
स्त्री-पुरुषसंप्रेरके ही स्टेरॉईड जातीची विशिष्ट उ...
शरीरात अनेक प्रकारच्या ग्रंथी आहेत. त्यांत मुख्य प...