लिंगनिश्चिती म्हणजे 'मुलगा होणार की मुलगी' हे कसे होते ते पाहू या. पुरुषाच्या शरीरातील सर्व पेशींत X Y ही लिंगसूत्रे (आणि 44 शरीरसूत्रे) असतात, तर स्त्रीशरीरात लिंगसूत्रे फक्त XX प्रकारची असतात. शरीरसूत्रांची संख्या दोन्हीकडे समान आहे. पुरुषाचे शुक्रबीज व स्त्रीचे स्त्रीबीज यात निम्मी म्हणजे प्रत्येकी 23 रंगसूत्रे असतात. या 23 पैकी एक रंगसूत्र'लिंगसूत्र' म्हणून ओळखले जाते; बाकीची22 रंगसूत्रे ही 'शरीरसूत्रे' असतात. लिंगसूत्रे दोन प्रकारची असतात, म्हणून त्यांना X आणि Y अशी नावे आहेत. पुरुषात शुक्रबीज तयार होताना पेशीविभाजनामुळे22 + X आणि 22 +Y अशी दोन प्रकारची शुक्रबीजे तयार होतात. मात्र स्त्रीमध्ये तयार होणा-या लिंगपेशी एकाच म्हणजे 22 + X प्रकारच्या असतात. स्त्रीबीजाचे फलन होते म्हणजे त्याला शुक्रबीज येऊन मिळते. स्त्रीबीजास पुरुषाकडून 22X प्रकारचे शुक्रबीज मिळाल्यास होणारा गर्भ 44 XX (म्हणजे मुलगी) होईल.
याउलट पुरुषाकडून 22 Y प्रकारचे शुक्रबीज मिळाल्यास होणारा गर्भ 44 X Y (म्हणजे मुलगा) होईल. म्हणजे मुलगा होणार की मुलगी, हे एका अर्थाने पुरुषाकडून ठरते.
खरेतर वीर्यामध्ये असलेल्या लक्षावधी शुक्रपेशींमध्ये 22 X व 22 Y या दोन्ही प्रकारच्या पेशी असतात. शुक्रबीजांपैकी स्त्रीबीजास X मिळेल की Y ही गोष्ट योगायोगावर आणि काही अज्ञात परिस्थितीवर ठरते. परंतु मुलीच झाल्या तर स्त्रीला कुटुंबात,समाजात त्रास भोगावा लागतो. अनेक वेळा मारहाण, सोडून देणे, इत्यादी प्रकारांना तोंड द्यावे लागते. लिंगनिश्चितीची शास्त्रीय बाजू सर्वांना नीट कळायला पाहिजे. या माहितीमुळे काही प्रमाणात तरी हा अन्याय दूर व्हायला मदत होईल. पण केवळ जीवशास्त्रीय कारणांपलीकडे जाऊन मानवतेच्या पातळीवरच अशा सामाजिक दोषांचा मुकाबला करावा लागेल.
लेखक : डॉ. श्याम अष्टेकर
(MBBS, MD community Medicine)संदर्भ : आरोग्याविद्या
अंतिम सुधारित : 10/7/2020