অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

शून्य माता व बालमृत्यू अभियान

अभियान सुरवात

महाराष्ट्राच्या अगदी शेवटच्या टोकावर वसलेल्या गोंदिया जिल्ह्यात 26 जानेवारीपासून नाविण्यपूर्ण ‘शून्य माता मृत्यू व बालमृत्यू अभियान’ जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु करण्यात आले. गोंदिया जिल्हा हा संपूर्णत: आदिवासी आणि नक्षलग्रस्त आहे. संपूर्ण जंगलव्याप्त दुर्गम भागात आरोग्यविषयी साक्षरता पोहोचवून ‘शून्य माता व बालमृत्यू’ ही संकल्पना रुजविणे खूपच जिकीरीचे लक्ष वाटले. परंतू जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांच्या प्रेरणेतून ‘शून्य माता व बालमृत्यू’ हे अभियान चांगलेच सकारात्मक वेग घेवू लागले आहे.

जिल्ह्यात जून 2017 पासून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कार्यान्वित झाले. जिल्हा मुख्यालयी बाई गंगाबाई महिला व बाल रुग्णालय हे 200 बेडचे सुसज्ज प्रसूती रुग्णालय आहे. याच रुग्णालयात सुसज्ज 50 बेडचे नवजात शिशुसाठी अतिदक्षता कक्ष सुरु करण्यात आला. त्यामुळे ‘कोवळी पानगळ’ रोखण्यासाठी मदत झाली. तसेच 12 ग्रामीण रुग्णालयातून प्रथम सेवा संदर्भ केंद्र पुनर्जिवित करण्यासाठी जिल्हाधिकारी श्री.काळे यांनी पुढाकार घेतला. तालुकास्तरावर ग्रामीण रुग्णालयात प्रशिक्षीत प्रसूती तज्ज्ञ व बालरोग तज्ज्ञ यांच्या सेवा 24 बाय 7 उपलब्ध ठेवण्यासाठी समन्वय कक्षाची स्थापना केली. सुरक्षित प्रसूती झालीच तरच 100 टक्के ‘शून्य माता मृत्यू’ अभियान यशस्वी होईल. हा या अभियानाचा मूलमंत्र जिल्हाधिकारी श्री.काळे यांनी दिला.

डॉ.पुलकुंडवार यांनी सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात 24 बाय 7 वैद्यकीय अधिकारी मुख्यालयी उपलब्ध राहून गर्भवती महिला व नवजात शिशुंना अत्यावश्यक सेवा देतील याची हमी घेवून प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु केली. प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात सुसज्ज प्रसूती कक्ष, नवजात शिशु कॉर्नर, अत्यावश्यक औषधी व 24 बाय 7 उपलब्ध रुग्णवाहिका यांची सोय करुन अभियानाला गती दिली आहे. जिल्ह्यात सध्या मानव विकास मिशन अंतर्गत प्रत्येक आठवड्याला हाय रिस्क गर्भवतींचा स्पेशल कॅम्प प्रसूती तज्ज्ञांना प्राथमिक आरोग्य केंद्रावर बोलावून आयोजित करण्यात येतो. प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येणाऱ्या 20 ते 25 गावातील गर्भवती महिलांना खास रुग्णवाहिका पाठवून मोफत प्राथमिक आरोग्य केंद्र दवाखान्यात आणून प्रसूती तज्ज्ञांमार्फत वैद्यकीय तपासणी सल्ला, उपचार व कुटुंबियांचे समुपदेशन करण्यात येते. बाई गंगाबाई महिला रुग्णालय या एकमेव जिल्हा महिला रुग्णालयातील प्रसूती तज्ज्ञ डॉ.मोहबे, डॉ.योगेश केंद्रे, डॉ.सुवर्णा हुबेकर यांच्या समन्वयातून मानव विकास शिबिरातून गर्भवतींची नियमित तपासणी झाल्यामुळे सुरक्षित मातृत्वाची हमी मिळाली.

शून्य माता व बालमृत्यू अभियान अमलबजावणी

‘शून्य माता व बालमृत्यू’ हे ध्येय साध्य करण्यासाठी गर्भवती महिलांना डॉ.हुबेकर यांनी समुपदेशन केले की, गर्भवती महिलांना सुरक्षीत मातृत्व हवे असेल तर त्यांनी आरोग्याची सप्तपदी पाळलीच पाहिजे. गर्भवती महिलांनी गर्भधारणेचे निदान झाल्याबरोबर पहिल्या तीन आठवड्याच्या आत नोंदणी करणे आवश्यक आहे. जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.पुलकुंडवार यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रातील प्रत्येक आरोग्यसेविकेला वैयक्तिक आवाहन केले की, आपल्या कार्यक्षेत्रातील गर्भवतींची 100 टक्के नोंदणी झालीच पाहिजे.

जिल्हाधिकारी श्री.काळे यांनी प्रत्येक तालुक्याच्या तालुका आरोग्य अधिकारी यांना नोडल अधिकारी संबोधून त्यांच्यावर प्रत्येक गर्भवतीची राज्य शासनाच्या आरोग्य सेवेच्या ‘ई-ममता’ या सॉफ्टवेअरवर गर्भवतीच्या आयडीसहीत नोंदणी अपडेट करण्याच्या सूचना देवून वेळोवेळी आकस्मिक अवलोकन केले.

गर्भावतींच्या सुरक्षीत मातृत्वाची सप्तपदी

गर्भवतीच्या आरोग्य तपासणीच्यावेळी सुरक्षीत मातृत्वाच्या सप्तपदीबद्दल जसे

  • 100 टक्के नोंदणी,
  • गर्भवतीचे लसीकरण,
  • अत्यावश्यक रक्त तपासण्या,
  • गर्भवतीची वैद्यकीय तपासणी व प्रतिबंधक लोह व कॅल्शियम गोळ्यांचा उपचार,
  • संतुलीत आहार व दुपारची विश्रांती,
  • नियमीत वैद्यकीय तपासणी,
  • धोक्याच्या लक्षणांची ओळख, तत्काळ वैद्यकीय उपचार व आरोग्य संस्थेतच बाळंतपण
ही सप्तपदी गर्भवतीला समजावून सांगण्यात आली. परंतू गोंदियासारख्या दुर्गम व आदिवासी भागात आरोग्य व पोषण आहाराबाबत साक्षरता कमी असल्याने बहुतांश गर्भवतीमध्ये रक्तक्षयाचे प्रमाण आढळून येत होते. त्यामुळे जिल्हाधिकारी श्री.काळे यांच्या संकल्पनेतून गर्भवतीच्या पुरुष कुटुंबीयांना दवाखान्यात पाचारण करुन एक गटचर्चा बैठक आयोजित करण्याचे धोरण आखण्यात आले.

प्रत्येक वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील प्रत्येक गावात प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी गर्भवतीच्या पतीची, सासरे व कुटुंबियाची गटचर्चा सभा आयोजित केली. 26 जानेवारी 2017 रोजी अशा प्रकारची पुरुष मंडळीची पहिली सभा जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्यातील चिचगाव येथील आरोग्य उपकेंद्रात झाली. यावेळी जि.प.अध्यक्ष उषा मेंढे, जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार, जि.प.आरोग्य व शिक्षण समिती सभापती पी.जी.कटरे प्रामुख्याने उपस्थित होते. सडक/अर्जुनी तालुक्यातील चिखली या गावी पालकमंत्री राजकुमार बडोले, जिल्हाधिकारी श्री.काळे, डॉ.पुलकुंडवार यांनी उपस्थित राहून या ‘शून्य माता व बालमृत्यू’ अभियानात लोकसहभाग वाढविला.

गर्भवतीच्या घरच्या पुरुष मंडळींना आपल्या घरात येणाऱ्या नव्या पाहुण्यांबद्दल जशी उत्सुकता असते तसेच गर्भवतीच्या आरोग्याची चिंता देखील असते. त्यामुळे त्यांना या मोहिमेत सहभागी करुन घेवून त्यांना गर्भवतीच्या रक्तातील हिमोग्लोबीनचे प्रमाण, गर्भवतीचे वजन, गर्भवतीचा रक्तदाब किंवा इतर वैद्यकीय आजार याबाबत सविस्तर माहिती डॉक्टरांनी दिली. तसेच गर्भवतीला काही अचानक त्रास झाला किंवा धोक्याचे लक्षणे कशी ओळखावी, रुग्णालयात भरती केव्हा करावे आदी सविस्तर समुपदेशन डॉक्टरांनी दिले. याला पुरुष मंडळीकडून खुपच सकारात्मक प्रतिसाद मिळाला. गर्भवती महिलेचे हिमोग्लोबीनचे प्रमाण व रक्तदाबाची माहिती दर महिन्याला एक पत्रकाद्वारे संबंधित महिलेच्या कुटुंबाला देण्यात येते. जिल्हाधिकारी श्री.काळे यांनी गर्भवतीच्या कुटुंबियांसमोर एकच लक्ष ठेवले की, सुदृढ बाळ जन्माला आले पाहिजे.

3 किलो वजनाचे बाळ म्हणजे बाल जिवीताची हमी हा विचार जिल्हाधिकाऱ्यांनी गर्भवतीच्या पुरुष मंडळी नातेवाईकांवर ठसविला. गर्भवतींचे नियमीत वैद्यकीय तपासणी, हिमोग्लोबीन व बीपी चेकअप व संतुलीत पोषाहार याची 100 टक्के अंमलबजावणी होईल, याची जबाबदारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.निमगडे यांनी घेतली. डॉ.पुलकुंडवार यांनी ‘शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी’ या उक्तीप्रमाणे सुदृढ व निरोगी बाळ हवे असेल तर गर्भवतीच्या आहाराकडे व पोषणाकडे लक्ष दिले पाहिजे म्हणून या ‘शून्य माता मृत्यू’ अभियानात महिला व बाल प्रकल्प अधिकाऱ्यांना देखील सामील करुन घेवून जिल्ह्यातील अंगणवाडींना डॉ.पुलकुंडवार यांनी स्वत: भेट देवून स्व.एपीजे अब्दुल कलाम अमृत आहार योजनेची थेट आदिवासी पाड्यावर कशी अंमलबजावणी होते याचे क्षेत्रीय भेटी देवून वेळोवेळी पाहणी करुन संबंधितांना योग्य दिशा निर्देश दिले. त्यामुळे गर्भवतींच्या वजनामध्ये सकारात्मक फरक पडत आहे.

‘शून्य माता व बाल मृत्यू’ अभियानाला तंत्रज्ञानाची जोड दिली आहे. व्हाटस्अपसारख्या सोशल मिडीयाचा वापर करुन ‘शून्य माता व बाल मृत्यू’ हा ग्रुप स्थापन करुन त्यात सर्व जिल्हास्तरावरील प्रसूती तज्ज्ञ, तालुका आरोग्य अधिकारी व प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी सक्रिय करण्यात आले. जिल्हाधिकारी श्री.काळे व डॉ.पुलकुंडवार ग्रुपच्या माध्यमातून सतत संपर्क ठेवून मार्गदर्शन करुन ‘प्रत्येक जीव महत्वाचा’ हे ध्येय प्रेरीत करीत आहेत. त्यामुळे सुरुवातीच्या एक महिन्याच्या काळातच ‘माता मृत्यू शून्य’ करण्यासाठी यश आले आहे. ही वाटचाल अशीच सुरु राहील.

लेखक - डॉ.सुवर्णा हुबेकर,
बाई गंगाबाई शासकीय स्त्री रुग्णालय, गोंदिया.

स्त्रोत - महान्युज

अंतिम सुधारित : 7/31/2023



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate